दाजी पणशीकर

‘‘सकाळी उठल्यावर तासभर प्राणायाम हा माझा तंदुरुस्तीचा मंत्र आहे. हृदयविकाराचे दोन झटके येऊनही शंभर वर्षे जगणार, असं मी म्हणतोय त्यामागे ७० वर्षांपासून चाललेल्या प्राणायामाचे सामर्थ्य आहे. आहारासंदर्भात काटेकोर नियमांचे पालन हेदेखील माझे एक व्रत. अंत:करणाच्या तळमळीने बोललात तर माणसं बदलतात याचा प्रत्यय मी अनेकदा घेतलाय. माझ्या व्याख्यानांचा दोन हजारांचा टप्पा लवकरच पूर्ण होईल. आजही मी सलग दीड-दोन तास बोलू शकतो. ‘परोपकार: पुण्याय । पापाय परपीडनम् ।’ हा मंत्र जपत उरलेल्या १४-१५ वर्षांतील क्षण न् क्षण मला सत्कारणी लावायचा आहे.’’

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

आज माझं वय ८५ वर्षे आहे. पण मी निवृत्त नाही. लेखन, वाचन आणि प्रबोधन यामध्ये मी पूर्णपणे व्यग्र आहे. ७०-७२ वर्षांपर्यंत भाऊ प्रभाकर पणशीकर याच्यासह ‘नाटय़संपदा’ या नाटय़ संस्थेचं प्रशासकीय काम सांभाळतानाही मी लिहीतच होतो. त्याबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहामुळे १९९८ ते २०१५ एवढा प्रदीर्घ काळ मी ‘सामना’मधून रामायण-महाभारतावर लेखमाला लिहिल्या. त्याची पुस्तकं निघाली. त्या पुस्तकांच्या नवव्या-दहाव्या आवृत्तीच्या संपादनाचं काम मी सध्या करत आहे. मी शतायुषी आहे. उरलेल्या १४-१५ वर्षांतील क्षण न् क्षण मला सत्कारणी लावायचा आहे.

आपण नेहमी ऊर्जेचं प्रक्षेपण करत राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. आपल्यामधील ऊर्जा वाढविण्यासाठी सकारात्मक विचारांबरोबर एकांतात बसणं, जनसंपर्क टाळणं गरजेचं आहे हे उमगल्यामुळे ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी मी फक्त व्याख्यानांपुरताच घराबाहेर पडतो. गेली ७० वर्षे पुनश्चरणाची तपश्चर्या (एकांतात बसून पुन्हा पुन्हा विशिष्ट संख्येत जप करणं) करत असल्यामुळे व्यासपीठावर गेल्यावर या वयातही मला सर्व काही लख्ख आठवतं. वाणीची तपस्या असेल तर वक्तृत्वाला धार येते. गायकाला जसा रियाझ हवा तसं वक्त्याला चिंतन पाहिजे. माझं सतत चिंतन  सुरू असते. ‘सकलकर्मी समाधी’ अशी ही स्थिती. एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणीसं विचारलं की, ‘वक्तृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे?’ त्यांचं उत्तर होतं, ‘विषयावरती प्रेम पाहिजे आणि श्रोत्यांबद्दल जिव्हाळा..’ मलाही वाटतं की श्रोते काही तरी घेऊन जाण्यासाठी येतात, वक्त्याला ते देता आलं पाहिजे.

पैसे मिळवण्याकरिता मी कधीही व्याख्यानं देत नाही. माझा तो व्यवसाय आहे एवढंच. माझ्या बोलण्यातून प्रबोधन होतं म्हणून लोक मला पुन्हा पुन्हा बोलावतात. माझा जन्म प्रबोधनासाठीच आहे हे मला कळून चुकलंय. त्याला अनुसरून माझ्या व्याख्यानांचा दोन हजारांचा टप्पा लवकरच पूर्ण होईल. आजही मी सलग दीड-दोन तास बोलू शकतो. पण श्रोत्यांची ऐकण्याची क्षमताच तास-दीड तासांच्या वर नाही. व्याख्यानाला जाताना मी तेवढा एकच हेतू मनात ठेवतो. त्याला अन्य फाटे फुटू देत नाही. उदा. पंढरपुरात व्याख्यानाला जातो तेव्हा मी विठ्ठलाच्या दर्शनाला जात नाही. माझा पांडुरंग मला माझ्या वाणीतच गवसतो.

मला लोक रामायण, महाभारत या ग्रंथांचा भाष्यकार म्हणून ओळखतात. या ग्रंथांची मी बरेचदा पारायणं केली असली, त्यावर अनेक पुस्तकं लिहिली असली तरी आजही या ग्रंथांतील एखादं तरी प्रकरण वाचल्याखेरीज माझा दिवस जात नाही. काही तरी नवीन सापडेल आणि ते लोकांसमोर मांडता येईल या अभिलाषेने मी पुन्हा पुन्हा वाचत राहतो. त्यानिमित्ताने माझा वाल्मीकी, व्यास यांच्या वाणीशी संपर्क राहतो. महाभारतामध्ये प्रबोधन करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत असं मला राहून राहून वाटतं.

माझ्याकडे हजाराच्यावर पुस्तकं आहेत. त्यात संदर्भग्रंथ जास्त आहेत. मला चरित्रे वाचायला आवडतात. शंकराचार्य, विवेकानंद, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे यांचं समग्र वाङ्मय माझ्यापाशी आहे. संत तुकाराम हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. तुकारामाची गाथा सतत माझ्या सोबत असते. त्यातील एक तरी अभंग मी रोज वाचतोच. मात्र त्याचं इतर कोणी केलेलं निरूपण कधीच वाचत नाही. स्वत: तुकारामच आपल्याशी बोलतात यावर माझी नितांत श्रद्धा आहे. ज्ञानेश्वरीचं कुठलंही पान काढावं, त्यावरील ओव्या वाचाव्यात, माऊलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा हा माझा नित्यनेम आहे. संत वाङ्मय वाचल्यामुळे विचारांची बैठक तयार होते, अहंकार दूर होतो. संतकृपेमुळेच ‘आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची।’‘ज्याच्या वाणीत परिवर्तन क्षमता आहे, त्याच्याकडे वक्तृत्व आहे,’ असं माझं स्पष्ट मत आहे. यासंदर्भातील माझ्या अनेक अनुभवांपैकी फक्त दोनच सांगतो. २५ वर्षांपूर्वी अंबरनाथला ‘सत्यवान- सावित्री’ या विषयावर माझं व्याख्यान झालं. त्यानंतर लीलाताई जोशी यांचं मला एक पत्र आलं. या विषयावर सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवं होतं. मी त्यांना सविस्तर उत्तर पाठवलं. संदर्भग्रंथांची यादीही दिली. यानंतर ‘सावित्री’ लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून लीलाताईंनी प्रवचनं, छोटे-मोठे लेख, इथपासून कादंबरी लिहिण्यापर्यंत मजल मारली. याचा मला अजिबात पत्ता नव्हता आणि २३ वर्षांच्या कालावधीनंतर २०१७ मध्ये त्यांचा मला अकस्मात फोन आला. आपला पूर्ण प्रवास सांगत त्यांनी प्रस्तावनेसाठी आग्रह धरला. ८० वर्षांच्या त्या बाईंनी ध्यास घेऊन लिहिलेल्या कादंबरीचं नंतर ठाण्याच्या ‘सहयोग मंदिरा’त माझ्याच हस्ते प्रकाशन झालं.

दुसरी गोष्ट साधीच पण महत्त्वाची. आमच्या सोसायटीचा कचरेवाला रोज प्रत्येक घरासमोर उभा राहून ‘कचरा’ असं ओरडायचा. एकदा मी त्याला थांबवलं आणि त्याचं नाव विचारलं. म्हणाला, ‘‘नारायण.’’ त्याला सांगितलं की आजपासून तू ‘कचरा’ म्हणायच्या ऐवजी ‘नारायण’ असा आवाज दे. त्याने ऐकलं. त्याला स्वत:च्या नावाचं महत्त्व पटलं नि त्याचं आयुष्य बदललं.

अंत:करणाच्या तळमळीने बोललात तर माणसं बदलतात याचा प्रत्यय मी अनेकदा घेतलाय.. घेत आहे. रिक्षात बसताना रिक्षावाल्याच्या हातात तंबाखू दिसला की मी खाली उतरतो. त्याने विनंती केल्यास त्याला विचारतो, ‘‘तुझी तंबाखू सोडायची तयारी आहे का?’’ होकार मिळाल्यास हे व्यसन सोडण्याचा सोपा उपाय त्याला सांगतो. तो असा की ‘रोज तंबाखू खा फक्त गुरुवारी खायची नाही.’ त्याचा परिणाम असा होतो की तो माणूस बुधवार रात्रीपर्यंत मनात घोकत राहतो की गुरुवारी तंबाखूला हात लावायचा नाही. गुरुवारी तो हात लावत नाही आणि पुन्हा शुक्रवारपासून मनात सुरू होतं ‘आता गुरुवापर्यंत मी खाऊ शकतो.’ अशा प्रकारे त्याच्या मनात नकळतपणे त्याचा जप सुरू होतो. हळूहळू त्या वस्तूबद्दल (दारू, सिगरेट, तंबाखू) त्याची अप्रीती वाढत जाते. ७-८ गुरुवार गेले की त्याचं व्यसन सुटतं. फक्त पहिला गुरुवार सांभाळायचा. तलफ आली तर जवळ काही तरी गोड ठेवायचं. या उपायाने मी आजवर ठाण्यातील किमान शंभर रिक्षावाल्यांची तंबाखू सोडवलीय. तसंच रिक्षाचं भाडं देताना उरलेले दोन-पाच रुपये मी कधीही घेत नाही. यामागचा हेतू मी व्याख्यानातूनही सांगतो. तो म्हणजे या छोटय़ाशा कृतीतून एक चांगला संदेश रिक्षावाल्यांपर्यंत जातो, की जगात चांगली माणसं आहेत.आपणही चांगलं वागलं पाहिजे.

सकाळी उठल्यावर तासभर प्राणायाम हा माझा तंदुरुस्तीचा मंत्र आहे. हृदयविकाराचे दोन झटके येऊनही मी शंभर वर्षे जगणार, असं जे मी म्हणतोय त्यापाठी ७० वर्षांपासून चाललेल्या प्राणायामाचे सामर्थ्य आहे. आहारासंदर्भात काटेकोर नियमांचे पालन हेदेखील माझे एक व्रत. कोणतीही थंड वस्तू मी खात-पीत नाही. पाव पूर्ण वर्ज्य . कांदा-लसूण आमच्या घरी येत नाही आणि जगण्यापुरतं अन्नप्राशन ही माझी जीवनपद्धती आहे. अन्नामुळे सगळे दोष येतात म्हणून मी परान्न कटाक्षाने टाळतो.

पत्नीला कामात मदत करणं हा मी धर्म मानतो. प्रत्येक काम उत्तमच व्हायला पाहिजे हा माझा आग्रह असतो. तुकाराम सांगतात, ‘ज्या ज्या आम्हापाशी होतील बा शक्ती, तेणे हा श्रीपती अलंकारु।’ म्हणजे आपल्यापाशी जी जी कौशल्ये आहेत त्यांनी ‘श्रीपतीला’ म्हणजे आपण जे काम हाती घेतलंय त्याला नटवलं पाहिजे. सुबकतेच्या या हट्टापायीच कपडे दुसऱ्या कोणीही वाळत घातलेले मला चालत नाहीत. धोतराच्या दशा बरोब्बर जुळायला हव्यात. वळणदार अक्षर हादेखील माझा एक आग्रह. माझ्या सुवाच्य, नीटनेटक्या अक्षराचा मला रास्त अभिमान आहे.

धोतर, सदरा, जाकीट, टोपी, गंध व पायात चपला हा माझा वेश आहे. माझा वेश हा माझ्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि तो जपला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. १९५५ मध्ये या वेशात विल्सन महाविद्यालयात जाणारा मी एकटा विद्यार्थी होतो आणि नंतर परदेशात व्याख्यान देताना तिथे कितीही थंडी असली तरी धोतर नेसल्याशिवाय मी व्यासपीठावर पाऊल ठेवलेलं नाही.. ठेवणार नाही. तुमच्या निर्णयावर तुमचं प्रेम असेल तर समोरच्याच्या मनात त्याबद्दल आदर प्रकटतो हे मी अनुभवाने सांगू शकतो.

महर्षी व्यास म्हणतात, ‘परोपकार: पुण्याय । पापाय परपीडनम् ।’ म्हणजे ‘अडचणीत असणाऱ्यांना मदत करण्यासारखं पुण्य नाही आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासारखं पाप नाही.’ आजवर याच मार्गाने चालत आलोय आणि पुढेही चालत राहीन..

शब्दांकन – संपदा वागळे

waglesampada@gmail.com

chaturang@expressindia.com