24 September 2020

News Flash

जीवन चलने का नाम!

अवघे पाऊणशे वयमान

(संग्रहित छायाचित्र)

तनुजा

मला एक नक्की माहिती आहे की, अभिनेत्री, स्टार असणं ही फक्त एक छोटीशी बाब आहे, माणूस असणं महत्त्वाचं. आज मी पंचाहत्तरी ओलांडली हे खरं आहे, पण मी स्वत:ला वृद्ध मानत नाही. वृद्धत्व आणि तारुण्य या वृत्ती आहेत. तुम्ही स्वत:ला कसं समजता आणि समजून घेता, हे महत्त्वाचं आहे. मला कोणालाही सल्ला द्यायला आवडत नाही. तो द्यायचाच झाला, तर इतकंच सांगेन की कोणालाही सल्ला देऊ नका.

पाच, दहा, सोळा, पन्नास, पंचाहत्तर हे माझ्यासाठी फक्त अंक आहेत, वयाचा आणि या आकडय़ांचा काही संबंध नाही. आपण जन्माला येतो, जसं आयुष्य मिळेल तसं जगत जातो. जे वाटय़ाला येईल ते भोगत राहतो. मग ते सुख असो की दु:ख. एक नक्की की जगण्यात गंमत आहे. मी आयुष्य जसं मिळालं तसं जगत आले. ना कधी भूतकाळाचा विचार केला ना भविष्यकाळाचा! माझ्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त वर्तमानकाळ! आज, आत्ता, याक्षणी जे जगतेय ते जगतेय! तो क्षण! या क्षणांच्या मालिकेचा उत्सव म्हणजे जीवन! मी हा उत्सव भरभरून जगत आलेय.

मी भूतकाळात रमत नाही याचं कारण, भूतकाळाची भूतं मनात घर करून राहतात. काही भूतं चांगली असतात, काही वाईट असतात. त्यांना मी माझ्यावर स्वार होऊन देत नाही. मी चित्रपटसृष्टीत होते व आहे. आधी नायिका होते नंतर चरित्र भूमिका करू लागले. नायिकेच्या ग्लॅमरमध्ये आणि कचकडय़ांच्या प्रतिमेमध्ये जर अडकले असते तर? तर मी या चित्रपटसृष्टीत टिकलेच नसते. प्रतिमेला प्रत्यक्षावर आरूढ होऊ देणे योग्य नाही. फ्लॅशचा चकचकाट, मेकअपची धुंदी आणि अभिनयाचं गारूड हे सेटवर तिथंच ठेवून मी बाहेर पडले नसते तर मी या जगात जगूच शकले नसते. सेल्युलॉईडवरचा सिनेमा टिकाऊ असतो कारण त्यानं शूटिंगच्या वेळचा अभिनयाचा तो क्षण नेमका टिपलेला असतो. त्या फ्रेममध्ये जे अडकून पडले ते संपले. मला कधीच संपायचं नव्हतं, जगणं वाहातं ठेवायचं होतं. ‘जीवन चलने का नाम!’ आणि हे जीवन स्वत:चं नसतं, ते दुसऱ्यांसाठी असतं, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी असतं, दुसऱ्याला आपण केव्हा आनंद देऊ शकतो? जेव्हा आपण तो आनंद भोगू शकतो.

हा सर्व विचार माझ्याकडे कुठून आला? याचा विचार करत असताना जाणवतं, हे सारं माझ्या आईकडून, माझ्या बाबांकडून, माझ्या आजीकडून, माझ्या मावशीकडून, माझ्या भावंडांकडून आलं. तुम्हाला तुमच्या लहानपणी कसं वाढवतात, त्यावर तुमची घडण अवलंबून असते. त्यांनी मला सेवेची शिकवण दिली. पण सेवा करत असताना त्या बदल्यात तुम्ही कशाची अपेक्षा ठेवून ती करत असाल तर तिला काही अर्थ नसतो. स्वार्थात परमार्थ नसतो, हे त्यांनी मला शिकवलं. म्हणूनच आज आयुष्याच्या या टप्प्यावर मी जनसेवा करते असं म्हणत नाही, तर मी माझ्या स्वत:च्या मनाची गरज भागवते असंच म्हणते. हे करताना मला, माझी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. स्वत:ची काळजी म्हणजे, प्रकृतीची काळजी आणि स्वत:च्या मानसवृत्तींचीही काळजी. हे तसं सोपं आहे. आपण आपल्या गरजा अगदी कमी करून टाकायच्या, आवश्यक तेवढंच स्वत:जवळ ठेवायचं.

मी अलीकडे मुंबईत फार कमी असते. मला लोणावळ्याला राहायला आवडतं. शुद्ध हवा, छोटंसं घर, मोजकी माणसं आणि हिरव्यागार निसर्गाचं सान्निध्य. मुंबईत असले की, सारखी धावपळ असते, माझ्याकडे येणाऱ्या माणसांची वर्दळ, घरातल्या मुलांच्या जबाबदाऱ्या हे सतत चालू असतं. आताशा याचा कंटाळा येतो.

मग मी पथारी बांधते आणि लोणावळ्याला पोहोचते.

लोणावळ्याला आल्यावर मी अधिक मुक्त असते. कधीही कुठल्याही प्रकारचा आखीवरेखीव कार्यक्रम नसतो. हवं तेव्हा उठते, हवं तेव्हा व हवं तितकं झोपते. हवं ते खाते व हवं ते करते. माझ्या प्रकृतीला झेपेल ते व तेवढेच खाते. मी कित्येक तास शांत बसून राहाते, सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांतील शांततेचे आवाज ऐकते. अविरत कोसळणाऱ्या पाऊसधारा पाहताना हरखून जाते, पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाते, आंब्याच्या मोहराबरोबर मीही मोहरते.

लोणावळ्यात माझ्या घरातील अंगणात मी झाडे लावते. रस्तारुंदीकरणात त्यातली झाडं गेली, ती तुटत असताना माझ्यातलं काही तुटत असल्याची भावना जागी झाली, पण त्याच वेळी हेही मनात येतं की ही माणसं त्यांचं काम करत आहेत. मग मी त्यांना दोष न देता, एका झाडाच्या ऐवजी तीन झाडं लावते. सकाळी जाग आल्यावर किंवा संध्याकाळी बागेतून फिरताना मी माझ्या झाडांना गाणी ऐकवते, स्पीकरवर मंत्रोच्चारण ऐकवते. मला खात्री असते, माझी झाडं हे संगीत ऐकतात, यासाठी जगदीशचंद्र बोसांची साक्ष काढायची जरुरी नाही. मनाची साक्ष पुरेशी आहे. माझं जीवन हेच माझं संगीत आहे. जेव्हा हवं तेव्हा ते हवं तसं छेडावं. त्यातून सुमधुर धूनच ऐकू येणार. मी टीव्ही फारसा बघत नाही, जेव्हा बघते तेव्हा चॅनेल फिरवत राहते, एखादा कार्यक्रम आवडला तर तो पाहते, नाहीतर सोडून देते. पुस्तकांचेही तसंच. कधी एखादी कादंबरी वाचेन तर कधी एखादं कार्टून बुक वाचत बसेन. त्या त्या क्षणी, जे जे वाटेल ते ते करेन. अर्थात तसं करण्याची सवड आता आयुष्याने मला दिलीय.

या धरतीवर माझं प्रेम आहे, तिचं नैसर्गिक रूप टिकावं म्हणून आपण साऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत, मी माझा वाटा उचलते. इथली प्रत्येक वनस्पती, साधासा कीडाही मानवी जीवनचक्राशी निगडित असतो. त्या प्रत्येक घटकाचा आपण आदर केला पाहिजे, मी तेच करत असते. माझ्या अवतीभवती असणाऱ्या व्यक्तींमध्ये तो आदर पाझरावा म्हणून मी प्रयत्न करत असते. त्याला काही प्रतिसाद देतात, काही देत नाहीत. जे प्रतिसाद देतात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते, जे देत नाहीत त्यांना या गोष्टीचे महत्त्व आज ना उद्या कळेल याची आशा करते. तुम्ही हे करा किंवा करू नका असं संगणारी मी कोण? ज्याला त्याला आपलं विचारसूत्र असतं, त्याप्रमाणे तो तो वागतो.

अगदी परवाची गोष्ट. लोणावळ्यातील माझ्या कार्यालयाबाहेर, एका कारमधील स्त्रीने तिच्या जवळचा सर्व कचरा रस्त्यावर ओतला. मी ते पाहिलं, बाहेर आले आणि त्या स्त्रीला मी विचारलं, ‘‘तुम्ही हा कचरा इथं का टाकला?’’ त्यांनी आढय़तेने मला विचारलं, ‘‘तुम्ही कोण आहात मला विचारणाऱ्या. रस्ता काय तुमचा आहे? तुम्ही तुमचं काम करा.’’ मी शांतपणे उत्तरले, ‘‘मी लोणावळ्याची एक सामान्य नागरिक आहे. माझं गाव स्वच्छ व सुंदर असणं आणि ते तसं ठेवणं हा माझा हक्क आहे, तो मी बजावते आहे. तुम्ही हा कचरा उचला आणि कचऱ्याच्या कुंडीत ठेवा किंवा मी माझ्या हाताने तो कचरा तुमच्या गाडीत ठेवीन, मला त्याची लाज वाटणार नाही. माझ्या गावासाठी मी माझे हात नक्की खराब करेन.’’ माझा निर्धार पाहिला आणि ती स्त्री गप्प झाली, तिने निमूट तो कचरा उचलला. अचानक तिच्या लक्षात आलं की ती तनुजा नावाच्या अभिनेत्रीशी बोलत होती. ‘ओह माय गॉड, ओह माय गॉड’ करत ती माझ्या मागे आली. मग मी तिच्याशी थोडं बोलले. समजावलं. बस.

मला एक नक्की माहिती आहे की, अभिनेत्री, स्टार असणं ही एक फक्त छोटीशी बाब आहे, माणूस असणं महत्त्वाचं.

मी पंचाहत्तरी ओलांडली हे खरं आहे, पण मी स्वत:ला वृद्ध मानत नाही. वृद्धत्व आणि तारुण्य या वृत्ती आहेत. तुम्ही स्वत:ला कसं समजता आणि समजून घेता, हे महत्त्वाचं आहे. मला कोणालाही सल्ला द्यायला आवडत नाही. तो द्यायचाच झाला, तर इतकंच सांगेन की कोणालाही सल्ला देऊ नका. ज्याला त्याला आपलं जीवन संगीत हवं तसं गाऊ द्या. बस!

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:22 am

Web Title: avaghe paunshe vayaman article on tanuja
Next Stories
1 कर्करोगाला प्रतिबंध आहाराचा
2 ‘हंडा हटाव’ राष्ट्रीय घोषवाक्य व्हायला हवे!
3 भगिनीभाव
Just Now!
X