06 July 2020

News Flash

अवघे पाऊणशे वयमान : .. सौख्य जे मला हवे

अत्यंत समाधानी आयुष्य आहे आमचं, कारण आजही आम्ही कुठेही गेलो तरी आमच्यावर प्रेम करणारी माणसं आम्हाला भेटतात.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा देव

‘‘तुम्ही जर तुमच्या आयुष्यात समाधानी, आनंदी असाल तर आयुष्याकडून तुमच्या काही तक्रारी राहात नाहीत.  कुटुंबासाठी मी लवकर चित्रपट संन्यास घेतला, पण आता लवकरच मी पुन्हा अभिनयाकडे वळेन असं दिसतंय.. वयाच्या या टप्प्यावर समाधानी आयुष्यात आज मला ते गाणं आठवतंय,  सूर तेच छेडिता..  आज लाभले मला, सौख्य जे मला हवे. ’’

या सुखांनो या..

असं म्हणत जवळजवळ ५५ वर्षांपूर्वी या घरात मी आले आणि आजपर्यंत रमेशजींच्या साथीने या घरात मला सुखंच सुख मिळालं. आजही नव्वदी पार केलेले रमेशजी आणि पंचाहत्तरी पार केलेली मी आयुष्याच्या या टप्प्यावर एकमेकांना साथ देत अतिशय दृढ विश्वासाने आमचं सहजीवन जगतो आहोत.

अत्यंत समाधानी आयुष्य आहे आमचं, कारण आजही आम्ही कुठेही गेलो तरी आमच्यावर प्रेम करणारी माणसं आम्हाला भेटतात. आमच्या चित्रपटातल्या, आमच्या भूमिकांची आठवण काढतात आणि तितकंच प्रेम आमच्या मुलांवरही करतात. माणसाला आयुष्यात यापेक्षा अधिक काय हवं असतं? आपण केलेल्या कामाची पावती आपल्याला जेव्हा मिळते तेव्हा एक वेगळंच समाधान  मनात असतं. आजही, मी काम केलेल्या ‘आनंद’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘या सुखांनो या’ अशा अनेक चित्रपटांच्या आठवणी माझ्या प्रेक्षकांच्याही मनात ताज्या आहेत याचा आनंद निश्चीतच वेगळा आहे. त्यामुळे त्या आठवणींचे, सुखाचे, समाधानाचे क्षण आजही आमचं आयुष्य आनंदी करतात एवढं निश्चित.

आम्ही जिथे राहतो त्या सोसायटीतही इतकी चांगली माणसं आहेत, म्हणजे रोज सकाळी आम्ही, मी आणि रमेशजी सोसायटीत खाली फेरफटका मारायला उतरतो. खाली फेरी मारून झाली की खास आमच्यासाठी तिथे खुर्च्या मांडून ठेवलेल्या असतात. मग आम्ही दोघं तिथे जाऊन बसलो की आमची गप्पांची मैफील रंगते. सोसायटीतली अनेक मंडळी तिथे येतात, मग सगळ्या जुन्या आठवणी तर निघतातच आणि त्याचबरोबर साहित्यापासून  राजकारणापर्यंत सगळ्या विषयांची चर्चा होते. आमची सकाळची गप्पांची मैफील आमच्यासाठी टॉनिक असतं. त्यामुळे मी अगदी फ्रेश होऊन जाते. मग घरी आल्यावर रोजचं पेपर वाचन, घरातली काही कामं, देवपूजा, जेवण हा सगळा दिनक्रम नित्यनेमाचा. आजही सगळी कामं मी करते. अर्थात घरात सगळ्या कामांना, जेवण करायला मंडळी आहेतच, पण एखाद्या दिवशी जेवणाची बाई आलेली नसली आणि आरतीला, माझ्या सुनेला जर कुठे बाहेर जायचं असेल तर मग मी जेवणही करते. पण आमच्या घरात तसा ब्राह्मणी स्वयंपाकच जास्त प्रमाणात होतो. म्हणजे आरती कोकणस्थ ब्राह्मण आहे. त्यामुळे घरात वरण-भात- पालेभाजी असा आमच्याही आवडीचा स्वयंपाक असतो. मुळात स्वयंपाकाची जबाबदारी मी आरतीवर सोपवलेली आहे. मग मी त्यात लुडबुड करत नाही. मला असं वाटतं, या वयात सुनांवर सगळं सोपवून आपण निश्चिंत राहावं. त्या आपापल्या विचाराने योग्य ते करतातच. एक प्रकारे घर चालवण्याचं ट्रेनिंगच त्यांना या अनुभवातून मिळत जातं. पण अनेकदा मी बघितलंय सासू सुनेवर एखादी जबाबदारी सोपवते, पण त्यात आपली मतंही मांडत असते. मग त्या सुनांचा गोंधळ उडतो आणि इथेच सुरुवात होते घरातल्या विसंवादाला. या वयात हेच आपण टाळलं पाहिजे. माझ्या सासूबाईंशी माझं नातं असंच प्रेमाचं होतं आणि तसचं माझ्या दोन्ही सुनांशी माझं नातं आहे. आमचं घर आरतीने इतकं सुंदर ठेवलंय. म्हणजे घरातलं इंटिरीयर किंवा तिला शोभेच्या वस्तूंची खूप आवड आहे, त्या ती इतक्या छान सजवून ठेवते की घराचं रंगरूपच पालटून जातं किंवा आमच्या गच्चीत तिने काही फुलझाडं लावली आहेत, त्यामुळे घरात प्रसन्नता असते. रमेशजींना सकाळी उठायला थोडा उशीर होतो. मी मात्र सकाळी लवकर उठते. उठल्या उठल्या आंघोळ वगैरे उरकून मस्त गच्चीतल्या झोपळ्यावर जाऊन बसते. त्यामुळे सकाळची ताजी हवा, त्या छोटय़ाशा बागेतली फुलं आणि झोपाळा यामुळे मन अगदी आनंदी होऊन जातं. त्यामुळे मनात नकारात्मक विचारांना थाराच मिळत नाही. या वयात आयुष्यातली ही सकारात्मकता खूपच आवश्यक असते. मला असं वाटतं की ही सकारात्मकताच माझी ऊर्जा आहे. साहजिकच रोजचा दिवस माझ्यासाठी एक नवी प्रेरणा घेऊन येणारा ठरतो. त्यामुळे आजही माझ्या आवडीच्या गोष्टी करत माझं आयुष्य सुखात चाललंय.

अभिनय करणं हे मी खरं तर बऱ्याच वर्षांपूर्वीच सोडलं. मुळात मी घर चालवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे याचसाठी चित्रपटसृष्टीत आले होते. लग्नानंतर घरसंसार, दोन्ही मुलं यांच्यासाठी मी काम सोडलं. तो निर्णय माझा होता. शिवाय मला काम करून पैसे कमावणारी बाहुली व्हायचं नव्हतं. अर्थात आता कधी कधी वाटतं की मी खूप लवकर काम सोडलं, पण त्यावेळी चित्रपटसृष्टीतही खूप बदल होत होते. कदाचित ते मला झेपले नसते. शिवाय आपण कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून मी थांबले. अभिनयाव्यतिरिक्त मला ज्या गोष्टी आवडत होत्या त्या मी त्यानंतर केल्या. योगासनं करत होते, गाणं शिकत होते, पेंटिंग करत होते, मनात येईल ते लिहून काढत होते. काही वर्षांपूर्वी मी एक साडीदेखील पेंट केली होती. या कला जोपासताना मला जे समाधान मिळत होतं ते काही वेगळंच होतं. सध्या मात्र माझ्या हातून ते फारसं घडत नाही. पण सध्या मी खूप वाचते आणि उरलेला वेळ गप्पांमध्ये, मालिका बघण्यात छान जातोय. शिवाय मुला-नातवंडांनी घर भरलेलं असतं. नातवंड आजी आजी करत आजूबाजूला रेंगाळत असतात. त्यातही दिवस सहज निघून जातो. आमचा धाकटा मुलगा अभिनय दुसरीकडे राहतो, पण अजिंक्य आमच्या सोबत असतो. त्याची दोन्ही मुलं आर्य आणि तनया शाळेतून आली की माझ्या अवतीभवती असतात. आमची तनया स्पेशल चाईल्ड आहे, त्यामुळे तिची विशेष काळजी आम्ही घेतो. तिला खूप गप्पा मारायच्या असतात. मग आमचाही गप्पांचा फड रंगतो. अभिनयचा मुलगा युग सुद्धा येतोच अधूनमधून भेटायला. आम्ही दोघं आणि आमची नातवंडं यांचं नातंही खूप छान आहे. सगळ्यांचे वाढदिवस मोठय़ा थाटामाटात साजरे होतात. आजही मी त्यांना ओवाळते मग त्यांना नव्या पद्धतीने केक कापून वाढदिवस करायचा असला तर तेही केलं जातं.

तुमच्या मनात जर जगण्याविषयी समाधान, आनंद असेल तर आयुष्याकडून तुमच्या काही तक्रारी राहात नाहीत. जगण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला आत्मिक समाधान देऊन जातो आणि त्यामुळेच मला असं वाटतं की माझ्या आरोग्याच्या फारशा तक्रारी नसतात. मी साधारणपणे बघितलंय की साठीनंतर तब्येत चांगली राहावी यासाठी लोकांना वेगळे प्रयत्न करावे लागतात. पण देवाच्या दयेने माझी प्रकृती उत्तम असते. शिवाय रोजची सकाळची देवपूजा, पूजा पाठ यामुळे मानसिक शांतता देखील मिळते. आमच्या अजिंक्यला देवाधर्माचं खूप आहे. तो नित्यनेमाने देवपूजा करतो. आमचं हवं नको पाहतो, त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण खूप चांगलं असतं. अर्थात कधी कधी असंही होतं की काही गोष्टी पटत नाहीत. पण आम्ही न पटलेल्या गोष्टी बोलून मोकळे होतो. माझ्या दोन्ही सुना याबाबतीत माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतात आणि बोलतातही. मला त्यांची एखादी गोष्ट पटली नाही तर मीही बोलून मोकळी होते. पण त्यांना विरोधही करत नाही. कारण त्यांचाही त्यामागे काही विचार असेलच अशी मला खात्री असते. काही वर्षांपूर्वी आमच्या अभिनयने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. वास्तविक आम्ही एकाच घरात सुखासमाधानाने, आनंदात एकत्र राहत होतो. दोन्ही सुनांचं एकमेकींशी छान पटतही होतं. पण जेव्हा अभिनयने हा निर्णय घेतला तेव्हा मी त्याला विरोध केला नाही. कारण जर वेगळं राहावं हे त्याचं मत होतं तर मग पुढे जाऊन वाद होण्यापेक्षा आम्ही वेळीच ते स्वीकारलं. पण आजही त्याला वेळ असेल तेव्हा तो आम्हाला भेटायला येतोच. अभिनयची बायको स्मिता हिच्याशी आजही माझं खूप चांगलं नातं आहे. म्हणजे ज्या वेळी त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्मिताला खूप त्रास झाला. घरात सगळे एकत्र असण्याची तिला इतकी सवय झाली होती की नवीन घरात तिला करमतच नव्हतं. मग रोज सकाळी ९ च्या दरम्यान आमचा फोन ठरलेला असे.

आज रमेशजी मला म्हणतात की जेव्हा तुला चांगल्या ऑफर येत होत्या तेव्हा तू काम सोडलंस. आजही ते मला सांगतात की अजूनही एखादी चांगली भूमिका आली तर तू काम कर आणि आनंदाची बातमी म्हणजे नुकतीच काही दिवसांपूर्वी चांगली संधी चालून आली. दोन चित्रपटात चांगल्या भूमिकांसाठी मला विचारलं आहे आणि बहुतेक त्या भूमिका मी करेन.  आजही चांगली माणसं आणि चांगली भूमिका असेल तर मी ती करेन असा विचार आहे.

एरवी माझ्या घरात, माझ्या माणसांत, मुला नातवंडात मी खूपच सुखी, समाधानी आणि आनंदी आहे. माझं घरंच माझ्यासाठी सर्वस्व आहे. घरातल्या माणसांपासून वातावरणापर्यंत सगळ्याच गोष्टी मला सुखाच्या वाटतात. म्हणजे मुंबईत राहूनही आम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात राहतो. आमच्या घराला छान मोकळी गच्ची आहे. गच्चीतून समुद्र दिसतो. आजूबाजूची हिरवळ दिसते. पावसाच्या दिवसात तर हे वातावरण अधिकच प्रसन्न होऊन जातं.

मी आणि रमेशजी गच्चीवर गप्पा मारत बसतो. सगळ्या जुन्या आठवणी, आमच्या भूमिका, आम्हाला भेटलेली माणसं आजही आमच्या स्मरणात आहेत. त्या आठवणीत आजही आमचं मन रमतं. आमची दोघांची एकमेकांना असलेली साथच आम्हाला दोघांनाही उभारी देत असते. म्हणूनच परमेश्वराकडे एकच मागणं आहे,

आता नका क्षणांनो दोघात भिंत घालू..

स्वर्गासवे मला द्या भूमीवरून चालू..

ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता!

येणार नाथ आता..

शब्दांकन : उत्तरा मोने

uttaramone18@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 1:12 am

Web Title: avaghe paunshe vayaman seema deo ramesh deo abn 97
Next Stories
1 आरोग्यम् धनसंपदा : ग्लुटेन आहार आणि आरोग्य
2 तळ ढवळताना : भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत
3 ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : उंच टाचेचा जाच
Just Now!
X