22 April 2019

News Flash

दुटप्पी चारित्र्य ?

आव्हान पालकत्वाचे

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. राजन भोसले

अमरच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कुण्या मित्राने पाठवलेला अर्धनग्न स्त्रीचा फोटो एके दिवशी अचानक वडिलांच्या पाहण्यात आला आणि वडिलांचं रौद्र रूप अमरला पाहायला मिळालं. पण महिन्याभराने त्याच वडिलांच्या मोबाइलमध्ये अश्लील फोटोंचा मोठा संग्रह त्याला सापडला आणि वडिलांचं दुटप्पी चारित्र्य अमरसमोर आलं. वडिलांवरचा त्याचा विश्वास उडाला. म्हणूनच पालकांनी मुलांच्या स्वत्वावर आघात न करता, समंजसपणे, योग्य आविर्भाव व भाषा वापरून कुठलाही विषय खरं तर मांडला जाऊ शकतो हे समजणं आज आत्यंतिक गरजेचं झालं आहे.

सतरा वर्षांच्या अमरचे वडील स्वभावाने रागीट व कमी बोलणारे. त्यांच्या शिस्तीच्या बाहेर जाण्याची परवानगी घरात कुणालाच नाही. अमरची आई धार्मिक व नवऱ्याच्या सतत धाकात राहणारी अबोल गृहिणी. अमरची लहान बहीण अभ्यासात हुशार पण एकलकोंडी, सतत पुस्तकांमध्ये रमणारी. अमर मात्र स्वभावाने मोकळा, मित्रांमध्ये रमणारा असा बोलका युवक.

अमरच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कुण्या मित्राने पाठवलेला अर्धनग्न स्त्रीचा फोटो एके दिवशी अचानक वडिलांच्या पाहण्यात आला व वडिलांचं रौद्र रूप अमरला पाहायला मिळालं. अपमानाची सरबत्ती ते घरातून हाकलून देण्याची धमकी या सर्वाना अमरला सामोरं जावं लागलं व तेही सर्वासमोर. ओशाळलेला अमर बावरून गेला. घरात गप्प गप्प राहू लागला. अपराधीपणाची झोंबणारी भावना त्याच्या मनातून जाईना. वडिलांच्या देखत फोन हातात घेण्याचीही भीती वाटू लागली.

साधारण महिन्याभरानं, एका रविवारच्या दुपारी, आईच्या सांगण्यावरून, काकांचा फोन नंबर शोधण्यासाठी म्हणून अमरने वडिलांचा फोन हातात घेतला. वडिलांचा डोळा लागला होता. त्यांना उठवायला नको या भावनेने अमरने त्यांचा फोन हातात घेतला.. पण स्क्रीनवर चालू असलेला व्हिडीओ बघून अमरला धक्काच बसला. तो व्हिडीओ बंद करताच वडिलांच्या फोनवर सेव्ह केलेले असंख्य अश्लील फोटो व व्हिडीओचा एक भला मोठ्ठा फोल्डरच अमरच्या समोर उघडला गेला. अश्लील फोटो व व्हिडीओ यांचा एवढा मोठा साठा वडिलांच्या फोनवर असेल असं अमरला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. काही क्षण अमरचं मन बधिर झालं. गुपचूप फोन बंद करून अमर तिथून दूर झाला. आपल्याला दरदरून घाम येतोय, असं त्याच्या ध्यानात आलं. निमित्त करून अमर घराबाहेर पडला. धक्का, दु:ख, गोंधळ, राग अशा अनेक भावनांचा एक बेफाम गोंगाट अमरच्या मनात सुरू झाला. अवघ्या महिन्यापूर्वी अमरच्या फोनवर एक अर्धनग्न फोटो बघून वडिलांनी घरात आकांडतांडव केला होता व स्वत: मात्र ते अशा फोटोंचा साठा बाळगून आहेत.. याची सांगड घालणं अमरला जमेना.

मनात विचारांचा सतावणारा गुंता, अंत:करणात भावनांचा आणि डोक्यात चक्रावून टाकणारा गोंगाट – अमरला आपण आपलं मानसिक संतुलन तर नाही ना गमावत आहोत, अशी भीती भेडसावू लागली. घराबाहेर भर दुपारी एकटा समुद्रकिनाऱ्यावर बसून अमर एका मानसिक वादळाशी झुंज देत होता. अगदी समुद्रात उडी टाकून जीव द्यावा हा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. आईशी या विषयावर बोलणं शक्य नव्हतं. तिच्यात हे पचवण्याची क्षमता नाही याची अमरला खात्री होती. कुणा मित्राशी जाऊन बोलावं तर विषय इतका नाजूक व तोही वडिलांचा थेट संबंध असलेला. एखाद्या कौन्सिलरकडे जावं तर खिशात तेवढे पैसे नाहीत. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अमरची अवस्था झाली होती.

अश्लील साहित्य, चित्र, व्हिडीओ पाहावेत की न पाहावेत, ते योग्य की अयोग्य, स्वीकृत की विकृत – एवढय़ावर या विषयाची व्याप्ती मर्यादित नाही आहे. आपले वडील, जे संस्कार व शिस्त याचे खंदे पुरस्कर्ते, त्यांनी याबाबत काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलेला तीव्र आक्षेप, कडक भूमिका, कठोर भाषा एका बाजूला तर दुसरीकडे ते स्वत:च अनेक दिवसांपासून अश्लील चित्रं व व्हिडीओ यांच्या अधीन झाले असल्याचा स्पष्ट पुरावा अमरने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला होता. यापुढे वडिलांकडे पाहण्याचा त्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल, असाच हा प्रकार होता. इंग्रजीमध्ये ज्याला ‘डबल स्टॅण्डर्ड’ म्हणतात अशा दुटप्पी चारित्र्याचे एक जिवंत उदाहरण त्याला दिसलं होतं व तेही आपल्या जीवनदात्या वडिलांमध्ये. आजपर्यंत वडिलांची जी प्रतिमा त्याला ठाऊक होती, त्याला पूर्ण तडा जावा असाच हा प्रकार होता.

इथे पालकांनी विचार करावा असा एक मोठा प्रश्न उभा राहतो – मुलांसाठी घालून दिलेले नीतिनियम आपण स्वत: पाळावेत की नाही व अशा नियमांचं उल्लंघन आपण स्वत:च उघडपणे किंवा लपवून करण्याचे मुलांच्या मानसिकतेवर व व्यक्तिमत्त्वावर काय व किती तीव्र परिणाम होऊ शकतात याची जाण त्यांना आहे का? तसंच मूळ विषयावर आपण घेतलेली भूमिका काय व कशी असावी व मुलांना त्याचं पालन करायला लावताना आपला पवित्रा काय असावा – हे  विषय पालकांनी खास विचार करण्यासारखे आहेत.

इंटरनेटच्या या युगात अव्यवहार्य (impractical) अशा नियमांना मुलांनी पाळावं अशी अपेक्षा ठेवणंच खरं तर अव्यवहार्य  मानावं लागेल. मुलांना पोर्नोग्राफीपासून अलिप्त ठेवणं आता आपल्या हातात राहिलेलं नाही. अनेकानेक मार्गे पोर्नोग्राफीचा भडिमार त्यांच्यावर होत आहे. त्यावर पालक व शिक्षक यांचं नियंत्रण यापुढे राहूच शकणार नाही. त्यामुळे त्यावर केवळ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणं, नियम पाळले जातील असा समज करून घेणं, धमकी किंवा अपमान यांचा उपयोग होईल अशा भ्रमात राहणं – हे पर्याय केवळ पोकळ, निरुपयोगी व व्यर्थच नव्हे तर पालकांशी असलेलं नातं पूर्णपणे विद्रूप व विकृत करू शकतील, पालकांबाबत कसलाही आदर कदापि वाटणार नाही, अशी अस्थिर अवस्था मुलांमध्ये निर्माण करू शकतील असे आहेत.

केवळ आई-वडील म्हणतात म्हणून मूल निमूटपणे ऐकून घेतील, असा काळ आता राहिलेला नाही. एखाद्या नियमांमागचं तारतम्य (लॉजिक)जोपर्यंत मुलांना नीट पटलेलं नसतं तोपर्यंत त्याची बिनशर्त (ब्लाइंड) अंमलबजावणी मुलांनी करावी, अशी अपेक्षा ठेवणंच खरं तर चुकीचं आहे.

तीव्र प्रतिक्रिया, झोंबणारे अपमान, क्रुद्ध आविर्भाव व धमकीची भाषा हे पर्याय बोथट व निरुपयोगी तर आहेतच पण पूर्ण व्यक्तिमत्त्व विस्कळीत करून टाकतील अशा क्षमतेचे आहेत. मुलांना विश्वासात घेऊन, त्यांच्या स्वत्वावर आघात न करता, समंजसपणे, योग्य आविर्भाव व भाषा वापरून कुठलाही विषय खरं तर मांडला जाऊ शकतो हे पालकांनी समजणं आज आत्यंतिक गरजेचं झालं आहे. आपल्या कृतीतून जीवनशैलीचे धडे मुलांनी शिकावेत – त्यात केवळ बाह्य़ नियमच नव्हे तर बोलण्याची, संवादाची योग्य, समंजस आणि संतुलित पद्धत मुलांनी शिकावी, ज्याचा उपयोग आयुष्यभर त्यांना सर्व परिस्थितींमध्ये व नात्यांमध्ये होऊ शकेल हे खरं तर अगत्याचं आहे.

डॉ. अल्बर्ट मेहराबियन आपल्या पुस्तकात लिहितात की, ९३ टक्के गोष्टी मुलं केवळ निरीक्षणातून शिकतात तर केवळ ७ टक्के गोष्टी शब्दांत सांगण्याने शिकतात. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही संत तुकारामांची उक्ती सर्वश्रुत आहे. मुलांवर आगपाखड करण्याचा उतावळेपणा अनेक पालक दाखवतात. ‘मुलांवर खरोखर योग्य संस्कार करायचे असतील तर आधी स्वत:चं वर्तन व विचार यांचं आत्मपरीक्षण करणं अधिक गरजेचं आहे’ – या वक्तव्यात खरं तर काहीच नवीन नाही पण बदलत्या काळात त्याची गहनता व व्याप्ती अधिकाधिक भेदक होत चालली आहे.

मुलांनी खरोखरच आपला आदर करावा, आपलं मार्गदर्शन घ्यावं असं वाटत असेल तर त्यांच्या समोर आपण एक जिवंत उदाहरण म्हणून उभं राहावं लागेल. मुलं आपल्यापेक्षा खूप लहान जरी असली तरी त्यांच्याबद्दलही मनात करुणाच नव्हे तर ‘आदरही’ असणं तेवढंच गरजेचं आहे. मुलांना फटकारणं, त्यांचा अपमान करणं, त्यांना घालून पाडून बोलणं हे प्रकार कालबाह्य़ झाले आहेत. आज मुलांना जेवढी आपली गरज आहे त्यापेक्षा जास्त गरज आपल्यालाच त्यांची लागण्याची शक्यता बदलत्या काळात वाढत चालली आहे.

टेक्नॉलॉजीचा विस्तार वेगाने होऊ घातला आहे. त्याच्या वेगाशी बरोबरी करताना हक्काने ज्यांची साथ मिळू शकेल ती म्हणजे आपली मुलं याची जाणीव पालकांनी ठेवणं आज अगत्याचं झालं आहे.

( लेखातील मुलाचे नाव बदललेलं आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 9, 2019 1:10 am

Web Title: avahan palkatvache article by dr rajan bhosale 2