News Flash

‘अवघड’ प्रसंगाचं भान

आव्हान पालकत्वाचे

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. राजन भोसले

नवरा-बायकोंमधील शारीरिक संबंध ही एक अत्यावश्यक व नैसर्गिक बाब, मात्र तो घडत असताना अचानक मूल उठून समोर आलं तर त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे त्या पालकांना कळत नाही. मात्र तो योग्य पद्धतीने दिला नाही तर त्यातून विचित्र गुंते निर्माण होऊ शकतात, अनेकदा तर मुलांच्या मनावर कायमस्वरूपी आणि बऱ्या न होणाऱ्या जखमा होतात. नात्यांवरही घातक परिणाम होऊ शकतो, कसा द्यावा समंजस प्रतिसाद आणि कशी हाताळावी अशी परिस्थिती, हे सांगणारा लेख.

चोवीस वर्षांचा पराग लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांकडे आला तो एक ‘विचित्र’ समस्या घेऊनच. अर्थात ती नक्कीच दुर्मीळ होती, पण ती ‘विकृती’ या सदरातच मोडणारी होती असे अनेकांचे म्हणणे पडले.

परागला लैंगिक उत्तेजना फक्त एकाच विशिष्ट प्रकाराने येत असे. जोपर्यंत त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवणारी स्त्री ‘आक्रमक’ व ‘हिंसक’ पवित्रा घेत नाही तोपर्यंत परागला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी लागणारी शारीरिक उत्तेजना अजिबात येत नसे. लैंगिक उत्तेजना येण्यासाठी स्त्री आक्रमक असण्याची ही अट (Masochism) इतकी खोल रुजलेली होती की, इतर कुठल्याही प्रकारे पराग उद्दिपित होत नसे. एकांतात सेक्सची फँटसी करतानाही पराग अशाच स्त्रीची कल्पना करत असे की, जी त्याला शारीरिक पीडा, वेदना देत आहे व त्वेषाने त्याच्यावर चढाई करत आहे. अशा स्त्रीकडून होणाऱ्या हिंसक व आक्रमक कामक्रीडेची एक आग्रही चटकच परागला लागली होती. या दुर्मीळ व साधारणपणे विचित्र वाटणाऱ्या लैंगिक सवयीमुळेच परागने लग्न करायचंसुद्धा टाळलं होतं. एक तर अशा लैंगिकसंबंधांची अपेक्षा कुणापाशी व्यक्त करणं अवघड व अशा अपेक्षा पूर्ण करू शकेल, अशी स्त्री शोधणं त्याहूनही अवघड!

सामान्यत: कामक्रीडा म्हटलं की जे साधारणपणे अपेक्षित असतं व जे आपण कथा, कादंबऱ्या किंवा चित्रपटांमधून बघतो ते म्हणजे एकमेकांना हळुवारपणे केलेले सौम्य, पण मादक असे कामुक स्पर्श, उत्कट प्रणयातून जागृत होत जाणारी काम उत्तेजना व तिलाच तृप्तीच्या पूर्णत्वाकडे घेऊन जाणारा समागम. पण परागच्या कामविश्वात अशा हळुवार कामक्रीडेचा लवलेशही नव्हता. आपण याबाबतीत इतरांपेक्षा वेगळे आहोत याची पुरेपूर कल्पना परागला होती व म्हणूनच उपचारासाठी तो लैंगिक विज्ञानतज्ज्ञांकडे आला होता. आज तो आपल्या जीवनात या आगळ्या (unusual’) व आग्रही (compulsive) लैंगिक अपेक्षेचा कैदी (fixation) असल्याचा अनुभव घेत होता व ही जाणीव त्याला सतत बोचत होती, बेचन करत होती व कुण्या मनोविकारतज्ज्ञाने त्याला नैराश्यावरचं औषधही सुरू केलं होतं ज्यामुळे सतत पेंगुळल्यासारखं वाटणं व कशातच उत्साह न वाटणं असंही होत होतं.

लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांशी झालेल्या काही भेटींनंतर, त्यांनी खूप खोलवर माहिती काढल्यावर एक खूप जुनी गोष्ट समोर आली. त्या गोष्टीला व्यक्त करण्याचं परागने खूप काळ टाळलं होतं. पण समुपदेशनाच्या प्रक्रियेमध्ये जी कौशल्यं वापरली जातात त्यामधून विषयाच्या गाभ्यात शिरून व्यक्तीला बोलतं केलं जातं.

लहानपणी खोलवर झालेल्या मानसिक जखमा, भावनिक आघात सहजासहजी बाहेर येत नाहीत. जुन्या वेदना विसरून टाकणं व टाळणं याकडेच साधारणपणे व्यक्तींचा कल असतो. बोलूनही दुसऱ्याला ते कळणार किंवा आवडणार नाही याची खात्री असल्यामुळेच व्यक्ती असे अनुभव व अशा आठवणी खोलवर दाबून टाकते. परागला बोलतं करायला म्हणूनच थोडा वेळ लागला पण थांबून थबकून का होईना पण पराग हळूहळू मोकळा झाला. परागच्या बाबतीत जे घडलं होतं ते असं.

पराग तेरा वर्षांचा असताना एकदा अचानकपणे आई-वडिलांमध्ये एकांतात होत असलेली कामक्रीडा अपघाताने परागच्या पाहण्यात आली. ही गोष्ट त्या वेळेस आई-वडिलांना मात्र अजिबात कळली नाही. प्रथमच पाहण्यात आलेला हा प्रकार, शिवाय तोही स्वत: पौगंडावस्थेच्या उंबरठय़ावर असताना, जेव्हा हॉर्मोन्सचा नवीन संचार शरीरात सुरू झालेला असतो. परागनेही हे पाहून एक तीव्र उत्तेजना अनुभवली. पुढे वेळ व संधी साधून आई-वडिलांची कामक्रीडा चोरून पाहण्याची चटकच परागला लागली. सुरुवातीस ही गोष्ट आई-वडिलांच्या ध्यानात आली नाही, पण नंतर एके दिवशी त्याच्या आईच्या ध्यानात ही गोष्ट आली. त्या दिवशी आईने रुद्र स्वरूप धारण करून परागला प्रचंड मारलं. हा मार खात असताना परागला मात्र अगदी अनपेक्षितपणे तीव्र अशा लैंगिक उत्तेजनेचा अनुभव येत गेला. आईचा चवताळलेला अर्धनग्न अवतार, त्यावर ज्या कारणासाठी हा मार पडत होता ती गोष्ट परागच्या मनात लैंगिक उत्तेजना निर्माण करणारी असल्याने, आईकडून या गोष्टीसाठी मार खाण्याचा प्रकार एका वेगळ्याच लैंगिक संवेदनांचं बीज परागच्या अंत:करणात पेरून गेला. या प्रकारची तीव्र उत्तेजना परागने या पूर्वी कधीच अनुभवली नव्हती. या प्रकारानंतर पराग जेव्हा कधी एकांतात दिवास्वप्न पाहात असे तेव्हा त्या प्रसंगाची पुन:पुन्हा आठवण किंवा कल्पना करून त्याचा आनंद घेणं त्याला आवडत असे व त्याचीच त्याला सवय होत गेली.

आईने अर्धनग्न अवस्थेत दिलेला मार व तो प्रसंग पुन्हा जसाच्या तसा डोळ्यासमोर आणून हस्तमथुनाच्या माग्रे एकांतात कामतृप्तीचा अनुभव घेण्याची ही सवय कालपरत्वे परागमध्ये अधिकच पक्की होत गेली. अशा प्रकारे पराग एका फेटिश(Fetish) मध्ये गुरफटला गेला. ‘फेटिश’ म्हणजे एखाद्या असामान्य (unusual) अशा लैंगिक वर्तणुकीने, विचाराने किंवा कल्पनेनेच केवळ जेव्हा व्यक्तीला लैंगिक उत्तेजना येते व प्रचलित अशा सर्वसामान्य विचार किंवा कल्पनेने ती येत नाही तेव्हा त्याला सायन्टिफिक भाषेत फेटिश किंवा ‘पॅराफिलिया’ असं म्हटलं जातं. पराग अशाच एका दुर्मीळ ‘फेटिश’ने ग्रासला होता. एका अर्थी त्याने स्वत:च ते ओढवून घेतलं होतं व तोच त्याला कारणीभूत होता, पण हे सगळं अजाणतेपणे त्याच्याकडून घडलं होतं.

‘फेटिश’च्या केसेस लैंगिक विज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात अवघड मानल्या जातात. याचं कारण याचा उपचार साचेबंद किंवा ठरलेल्या विशिष्ट पद्धतीने होत नसतो. प्रत्येक केस एखादी अवघड नवीन कोडं सोडवावं, अशा संशोधक प्रवृत्तीने हाताळावी लागते.

जो प्रकार परागच्या बाबतीत लहाणपणी घडला त्याच्याशी साधम्र्य असलेला प्रकार भिडे दाम्पत्याच्या घरात घडला. भिडे दाम्पत्याचं लग्न होऊन नऊ वर्ष झाली होती. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा होता- रोहन. एके रात्री भिडे पती-पत्नी शरीरसंबंध करत असताना अचानक लहानगा रोहन झोपेतून उठून त्यांच्या खोलीत आला. त्याला असं अचानक आत आलेलं बघताच भिडे दाम्पत्याची त्रेधातिरपिट उडाली. चटकन जोरात खेकसून त्यांनी रोहनला बाहेर जायला सांगितलं.

आधीच भीतिदायक स्वप्न पडल्याने रोहन घाबरलेल्या अवस्थेत झोपेतून उठला होता. त्यात आई-वडिलांना विवस्त्र अवस्थेत काहीतरी अनपेक्षित करताना बघून तो आणखीनच भेदरला, त्यांवर वडिलांचं असं हे जोरात खेकसणं – या सर्व प्रकाराने सहा वर्षांचा रोहन गोंधळून गेला. त्याला काहीच समजेना व तो जोरात रडायला लागला. आईने कसंबसं स्वत:ला सावरत सावरत त्याला बाहेर नेलं. झालेल्या प्रकाराने प्रचंड भेदरून गेलेला रोहन त्या रात्री रडून रडून शेवटी थकला व मग झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी रोहनला सामोरं जाणं त्याच्या आई-वडिलांना अवघड वाटू लागलं. त्याने रात्री पाहिलेल्या प्रकाराबद्दल जर विचारणा केली तर त्याचं काय उत्तर द्यायचं? त्याला आपण काय करत होतो म्हणून सांगायचं? त्याने पाहिलेल्या प्रकारचा जो काही अर्थ काढला असेल त्याचं परिमार्जन कसं करायचं? त्याच्यावर इतक्या जोरात आपण का खेकसलो याचं उत्तर काय द्यायचं? तो यापुढे आता आपल्याकडे पाहताना कशा अर्थाने पाहिलं? त्याने जे पाहिलं ते पती-पत्नीमध्ये कितीही नसर्गिक असलं तरी त्याबद्दल सांगताना त्याला कुठल्या भाषेत, कसं आणि कुणी सांगायचं? आपण जे सांगू त्याचा काही विचित्र परिणाम तर त्याच्यावर होणार नाही ना? रोज खेळीमेळीने वागणारे आपले वडील व आई आपल्याशी बोलताना आता का नजर चुकवत आहेत? का टाळंटाळ करत आहेत? – हे प्रश्न रोहनच्याही मनात येतील.. या विचारानेसुद्धा भिडे दांम्पत्य विचलित झाले होते. या व अशा अनेक प्रश्नांचा क्लिष्ट असा गुंता घेऊनच ते डॉक्टरांकडे आले.

डॉक्टरांनी जे सांगितलं ते खरंतर साधं व सोपं होतं. पहिली गोष्ट शारीरिक संबंध ठेवताना खोलीचा दरवाजा त्या वेळेपुरता आतून खात्रीने बंद करून घ्यावा. त्याआधी व त्यानंतर तो पुन्हा उघडून ठेवणं हे काही अवघड नाही. आणि समजा अनवधानाने जर दरवाजा उघडा राहिला असेल व अनपेक्षितपणे मूल जर आत आलं तर शांत राहून सौम्य स्वरात व समंजस भाषेत प्रथम त्याला थोडावेळ खोलीच्या बाहेर जायला सांगावं. त्यानंतर स्वत:चे कपडे व्यवस्थित करून त्याच्याशी स्वत: जाऊन त्याला हे समजावून सांगावं की तू जे पाहिलंस ती नवरा-बायको यांच्यामध्ये एकांतात होणारी एक सामान्य व योग्य गोष्ट आहे. लग्नानंतर पती आणि पत्नीने एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची ती एक प्रचलित पद्धत आहे. एकमेकांवर प्रेम करणारे सर्व पती-पत्नी एकांतात या प्रकारे प्रेमवर्तन करतात. त्यात चुकीचं किंवा त्रासदायक असं काहीच नाही. आम्हीही एकांतात होतो व तू अचानक आत येशील असं आम्हाला अपेक्षित नव्हतं. हे सांगितल्यानंतर आई-वडील दोघांनी त्याला जवळ घेऊन आपण सर्व जण एकमेकांवर खूप प्रेम करतो हे पुन्हा व्यक्त करावं. असे प्रसंग अशा प्रकारे हाताळल्यास मुलांवर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. याउलट अशा प्रसंगी आपणच चपापून जाणं, आपणच गोंधळून जाणं, मुलावर खेकसणं किंवा त्याच्याशी याबद्दल बोलायचं टाळणं याचा मुलाच्या मानसिकतेवर नक्कीच आघात होऊ शकतो, जसं परागचं झालं.

पराग व रोहन या दोघांच्या बाबतीत पालकांकडून एकाच प्रकारची चूक झाली होती. या प्रकारच्या संबंधांसाठी स्वत:च्या एकांताची जबाबदारी पालकांनी स्वत:च घ्यायला हवी. स्वत:च्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या प्रसंगाचा राग निरागस मुलांवर काढणं हे नक्कीच चुकीचं आहे. त्यातून मग भलते गुंते निर्माण होऊ शकतात हे परागच्या केसमध्ये पाहायला मिळतं. आपल्या बेजबाबदार व विस्फोटक वर्तनातून चुकीचे व घातक संकेत मुलांपर्यंत पोहोचतात. त्यांचे अपरिपक्व मन त्याचा अर्थ काढताना त्याचा कसा विपर्यास करतात त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे परागमध्ये निर्माण झालेलं लैंगिक विचलन (Sexual deviation).

लैंगिक विचलनाला पूर्वी लैंगिक विकृती (sexual perversion) असं संबोधलं जायचं. आधुनिक मानसशास्त्रात आता विकृती हा शब्द खूप कमी वापरला जातो. लैंगिक विकृती गोळ्या औषधांनी बऱ्या करता येत नाहीत. म्हणूनच अशा केसेसचा उपचार करताना मनोविकारतज्ज्ञसुद्धा  असाहाय्य होतात. तिथे प्रशिक्षित व अनुभवी समुपदेशक, सायकोथेरपिस्ट मात्र प्रभावी ठरू शकतात. मनाच्या खोल गाभाऱ्यात रुतून बसलेल्या घातकी व प्रतिरोधक धारणा काढणं हे एका क्लिष्ट शस्त्रक्रियेसारखंच अवघड असतं. तिथं गोळ्या-औषधं उपयोगी पडत नाहीत. उलट औषधांमुळे समुपदेशनासाठी लागणारी जागरूकता रुग्णामध्ये कमी होते व रुग्णाचा प्रतिसाद मंदावतो.

अपघाताने निर्माण झालेल्या अशा क्लिष्ट प्रसंगातून प्राथमिक अवस्थेत मार्ग काढणं खरंतर अवघड नसतं. पण एकदा का आपण असे प्रसंग चुकीच्या व विस्फोटक पद्धतीने हाताळले तर मग त्याचे परिणाम व्यक्तीवर खोल व दूरगामी होऊ शकतात, याची जाणीव आधुनिक पालकांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.. तरच त्यातून उद्भवणारा विपर्यास आपण टाळू शकू.

(हा लेख सत्य घटनांवर आधारित आहे, मात्र गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:08 am

Web Title: avahan palkatvache article by dr rajan bhosale 5
Next Stories
1 आहारभानाचं जागतिकीकरण
2 शांततेचं गढूळ सावट
3 आत्मभान येणे गरजेचे