18 September 2020

News Flash

आव्हान पालकत्वाचे : मना कल्पना कल्पिता कल्पकोटी

मुलांमधल्या या नाजूक स्थित्यंतराला पालकांनी नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. राजन भोसले

पौगंडावस्थेच्या उंबरठय़ावर संप्रेरकांनी छेडलेली एक नवीन गरज मुलांच्या शरीरात अवतरते. अशा वेळी ज्या भावना-वासना मुलांना अगदी नवीन असतात त्यांना सामोरं जाताना त्यांनी अडखळणं, धडपडणं किंवा चूक करणं हे स्वाभाविकच आहे. याच काळात एखादा ‘ऑबसेसिव्ह कंपल्सिव डिसॉर्डर’चा शिकार होऊ शकतो. या मानसिक आजाराचा उगम अपराधीपणाच्या तीव्र भावनेमधून होतो. आत्मसंदेह, आत्मग्लानी या भावनांचा गुंता व्यक्तीला त्यात जखडून टाकतो. मुलांमधल्या या नाजूक स्थित्यंतराला पालकांनी नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं.

सत्तरीच्या जवळ पोहोचलेले कुमावत आपल्या ३३ वर्षांच्या अविवाहित मुलाबरोबर राहत होते. मुलाचं नाव संजीव. कुमावतांची मुलगी संजीवपेक्षा आठ वर्षांनी मोठी. तिचा घटस्फोट झाला होता आणि ती नोकरीनिमित्त पुण्याला राहत होती. कुमावतांच्या पत्नीचं कर्करोगाने निधन होऊन आता सहा वर्षें उलटली होती. मुलगा संजीव नोकरी सोडून चार वर्षे घरीच बसला होता. त्याला होणाऱ्या मानसिक त्रासासाठी चार वर्षे मनोविकारतज्ज्ञांची औषधे चालू होती.

सतत औषधं घेऊनही संजीवच्या परिस्थितीत फार सुधारणा कधी दिसलीच नाही. उलट औषधांमुळे सतत मरगळ व झोप; यामुळे कुठल्याही प्रकारची कार्यक्षमता संजीवमध्ये राहिली नव्हती. त्याचं वजनही चार वर्षांत वाढत-वाढत आता १०२ किलोपर्यंत पोहोचलं होतं. या सर्व परिस्थितीने संजीवचे वडील बरेचसे हताश व हतबल झाले होते. मनोविकारतज्ज्ञांकडे असंख्य फेऱ्या झाल्या होत्या. कंटाळून कुमावतांनी एका दुसऱ्या मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांची फी जास्त होती, पण ते जास्त वेळ देतात असा त्यांचा लौकिक होता, म्हणून संजीवला घेऊन ते त्यांच्याकडे गेले. त्यांनी संजीवची औषधं बदलली व त्याला ‘ई.एम.डी.आर.’ या नवीन उपचारपद्धतीची गरज आहे, असं सांगितलं. ही नवीन उपचारपद्धत महाग तर होतीच, पण त्याची सहा सेशन्स होऊनही संजीवमध्ये काहीही फरक पडला नाही व संजीवही त्यांच्याकडे जाण्याचा कंटाळा करू लागला. निराश झालेल्या कुमावतांनी मुलीच्या सुचवण्यावरून एका समुपदेशन करणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांची भेट ठरवली. डॉक्टरांनी पूर्ण दीड तास वेळ देऊन संजीव व त्याच्या वडिलांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या.

संजीवला गेली दहा वर्षे ‘ऑबसेसिव्ह कंपल्सिव डिसॉर्डर’ (प्रेरक बाध्यकारी विकार) म्हणजेच ‘ओ.सी.डी’चा त्रास होता. ‘‘माझ्या मनात सारखे घाणेरडे लैंगिक विचार येतात. सारखं दिसेल त्या स्त्रीच्या शरीराच्या विविध भागांकडे लक्ष जातं. स्त्रीच्या विवस्त्र शरीराची कल्पना सारखी मनात येते. असे विचार येऊ नयेत म्हणून मी खूप प्रयत्न करतो पण ते येतच राहतात. विचार दाबून टाकण्यासाठी आईने शिकवलेला मंत्रही जपतो, पण विचार थांबत नाहीत. पुन्हा-पुन्हा आणखीनच अचकट विचकट स्वरूपात ते येत राहतात. हात-पाय धुतले की थोडा वेळ बरं वाटतं म्हणून मी दिवसात दहा-पंधरा वेळा हातपाय धुतो. परत-परत येणाऱ्या या लैंगिक विचारांचं मनात चालणारं हे थमान मला खूप थकवून टाकतं. असं झालं की अगदी जीव द्यावासा वाटतो, पण तरीही ते थांबत नाहीत.’’ बांध फुटल्याप्रमाणे संजीव बोलत होता.

‘‘मी १४ वर्षांचा होतो तेव्हा याची सुरुवात झाली. तेव्हा आई व मोठय़ा बहिणीबद्दल असे अश्लील विचार माझ्या मनात येत असत. चोरून नुसतं त्यांच्याकडे बघताना मला अनेकदा आईने फटकारलं होतं. एकदा मी आईला या विचारांबद्दल बोललो तर ती खूप रागावली, ‘तू पापात्मा आहेस, तुझी नजर वाईट आहे. तुझ्यावर काळी छाया आहे.’ असं मला म्हणाली. मी वडिलांना पण हे सांगितलं होतं, पण ते काहीच बोलले नाहीत. ते आईशीसुद्धा बोलायचं टाळत म्हणून मी मग गप्पच राहिलो.’’ संजीव बोलत होता. वडील मान खाली घालून सर्व ऐकत होते.

डॉक्टरांशी झालेल्या या पहिल्याच व प्रदीर्घ भेटीत बराच पूर्वेतिहासही समोर आला. कुमावतांची दिवंगत पत्नी खूप धार्मिक होती. दिवसातून तीन वेळा घरात ती यथासांग देवपूजा करत असे. त्यानंतरही तिचा दिवसा जप व पोथीवाचन चालूच असे. मुलांशी बोलताना ‘हे करणं पाप. याने देव शिक्षा देईल. त्याने देवीचा प्रकोप होईल.’ अशी विधानं करत मुलांच्या अनेक हालचालींवर ती नेहमी बंधनं टाकत असे. तिच्या कर्मठ नियमांमधून नवराही सुटत नसे. आठवडय़ातून तीन उपवास, रोज दोन वेळा देवीच्या मंदिरात जाण्याचा परिपाठ, वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळी व्रतं पाळणं असा तिचा उपक्रम असे. नवऱ्यापासून ती दूर राहत असे. रात्री संजीव वडिलांबरोबर वेगळ्या खोलीत झोपत असे. आईवडिलांमध्ये कसल्याही प्रकारची शारीरिक, मानसिक किंवा भावनिक जवळीक संजीवने कधी पाहिली नव्हती. आईने कधीही जवळ घेतलेलं संजीवच्या स्मरणात नाही. उलट ‘दुरून बोल. जवळ येऊ नकोस.’ अशी ताकीद ती देत असे हे संजीवला चांगलं आठवतं. वडिलांनीसुद्धा मायेने कधी स्पर्श केलेला त्याच्या आठवणीत नाही. मोठय़ा ताईला तर आईनेच ‘संजीवपासून दूर राहा.’ असं बजावून ठेवलं होतं.’’ संजीव बोलत होता.

‘‘आईला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे पहिल्यांदा कळलं तेव्हा मी महाविद्यालयात शिकत होतो. तिने कर्करोगाची गाठ  खूप दिवस आमच्यापासून लपवून ठेवली. जेव्हा निदान झालं तेव्हा तिने त्याचा दोष घरातील सर्वावर टाकला. माझ्यावर दोष टाकताना ‘माझी नजर वाईट होती म्हणून तिला स्तनाचा कर्करोग झाला.’ असं ती मला अनेक वेळा म्हणाली. मला याने खूप यातना झाल्या पण आईच्या आजारासमोर माझ्या त्रासाचं काय महत्त्व? असा विचार करून मी गप्प राहिलो. आई जाऊन आता खूप वर्षे झाली पण अजूनही मला मीच दोषी आहे, आई माझ्यामुळेच गेली असं वाटतं. मला माझीच चीड येते. आणि एवढं सगळं होऊनही माझ्या मनात अजूनही तसेच लैंगिक विचार आजही येतात व आपण पापी आहोत, असं सतत वाटतं.’’ संजीवचे डोळे भरून आले व बघता-बघता संजीव ओक्साबोक्शी रडू लागला.

या पहिल्या भेटीनंतर संजीव अनेकदा समुपदेशनासाठी त्या डॉक्टरांकडे जात राहिला. कुमावतांनाही डॉक्टरांनी काही वेळेला एकटं बोलावलं. त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा होता. पालक म्हणून त्यांना समुपदेशन प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं केवळ महत्त्वाचंच नव्हे तर गरजेचंही होतं. सुदैवाने कुमावत संयमी व समंजस होते. जीवनाचा खडतर प्रवास त्यांना बरंच शिकवून गेला होता.

या प्रकारच्या केसेसमध्ये उपचार करणाऱ्या तज्ज्ञांनी अनेक गोष्टी ऐकून घेणं व समजून घेणं गरजेचं असतं. संजीवच्या बालपणापासूनच घरातलं वातावरण, आई-वडिलांचे स्वभाव व वर्तणूक, त्यांचं परस्परांशी असलेलं नातं, काही ध्यानात राहिलेले ठळक अनुभव, घरातल्या सर्वाची आपापसातली नाती व त्यातले बारकावे इत्यादी. पण समुपदेशनाचं प्रशिक्षण मिळालेलं नसल्याने याची जाण अनेक मनोविकारतज्ज्ञांना अजिबात नसते ही चिंतेची बाब आहे. गुण येणं दूर, उलट वारेमाप खर्च व औषधांचे होणारे दुष्परिणाम वरून सहन करावे लागतात.

डॉक्टरांबरोबर नव्याने सुरू झालेल्या समुपदेशनाच्या प्रत्येक सेशननंतर संजीवमध्ये क्रमाक्रमाने सुधारणा दिसू लागली. त्याचं हात-पाय धुणं कमी झालं. तो घराबाहेर पडू लागला. त्याची औषधंही कमी झाली. समुपदेशनशास्त्रात रुग्णाचं पूर्णपणे ऐकून घेणं याचं खूप महत्त्व आहे. यालाच ‘लिसिनग स्किल’ किंवा ‘अ‍ॅक्टिव्ह लिसिनग’ म्हटलं जातं. मराठीत याला ‘श्रवण कौशल्य’ म्हणता येईल. हे श्रवण कौशल्य पालकांनाही शिकवलं जातं. खरं तर सर्वानीच हे शिकावं. नात्या-गोत्यातले अनेक गुंते, तणाव, गैरसमज या एका कौशल्याने निस्तरता येऊ शकतात. श्रवण कौशल्याचं शास्त्र आहे व ती एक वैशिष्टय़पूर्ण प्रक्रिया आहे.

समुपदेशनातून डॉक्टरांनी अनेक गोष्टी संजीवला समजावून सांगितल्या, ‘‘पौगंडावस्थेत असताना तुझ्या मनात आई व ताईबद्दल जे विचार आले ती एक सामान्य गोष्ट आहे. अनेक मुलांच्या बाबतीत हे दिसून येतं. त्यात अघटित असं काहीच नाही. त्याला पाप किंवा विकृती समजणं हे अगदी चुकीचं आहे. मानसशास्त्राच्या अनेक पुस्तकांमध्ये याचं विस्तृत विवरण आहे. स्त्रीच्या शरीराबद्दल त्या वयात कुतूहल व आकर्षण निर्माण होणं हे पूर्णपणे नैसर्गिक असतं. आई ही प्रत्येक मुलाच्या जीवनात येणारी अशी पहिली ‘स्त्री’ असते की जी जन्मापासून त्याच्या सर्व गरजा बिनाशर्त पुरवत जाते. ‘आपल्या सर्व शारीरिक व मानसिक गरजांच्या पूर्तीसाठी आईकडे धाव घेणं’ ही स्वाभाविकता जगत-अनुभवतच सर्व मुलं मोठी होत असतात. पौगंडावस्थेच्या उंबरठय़ावर संप्रेरकांनी छेडलेली एक नवीन गरज जेव्हा त्यांच्या शरीरात अवतरते तेव्हासुद्धा अगदी नकळत त्यासाठीही आईकडे वळणं त्यांच्याकडून अनवधानाने होऊन जातं. मुलांमधल्या या नाजूक स्थित्यंतराला पालकांनी नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या भावना-वासना मुलांना अगदी नवीन असतात त्यांना सामोरं जाताना त्यांनी अडखळणं, धडपडणं किंवा चूक करणं हे अत्यंत स्वाभाविकच आहे. त्यासाठी मुलांना फटकारणं किंवा रागावणं हमखास टाळावं. त्यांना समजून घेण्याची व समजावून सांगण्याची तीच योग्य वेळ असते. अशा वेळी पालकांनी सांगितलेल्या गोष्टी, मारलेले शेरे, दिलेल्या धमक्या खूप खोलवर आघात करतात. मुलांमधली ही अस्थिर अवस्था कालपरत्वे यथावकाश लोप पावते. पण या अवस्थेतून जात असताना काही काळ त्यांनी संकोचणं, बावरणं, गोंधळणं अपरिहार्य असतं. मुलांच्या जीवनातली ही नाजूक वेळ पालकांनी सावधपणे सांभाळणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. यातच कुमावत पती-पत्नी कमी पडले व एका नैसर्गिक प्रक्रियेचा विपर्यास झाला.

संजीवच्या बाबतीत त्याच्या आईने हा विषय अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळला होता. तिचे कर्मठ विचार, प्रत्येक गोष्टीला पाप-पुण्याच्या भाषेत पडताळण्याची सवय, स्वत: टोकाच्या धार्मिक धारणांमध्ये व कर्मकांडांमध्ये गुंतून रहात घरातल्यांकडूनही त्याच अपेक्षा करणं; या व अशा अनेक चुका ती करत होती. एका बाजूला ती या चुका करत असताना वडिलांनी गप्प राहाणं ही त्यांची मोठी चूक होती. या तमाम चुकीच्या वर्तणुकीचे घाव मात्र एक निष्पाप मुलाच्या जडण-घडणीवर इतके खोलवर झाले, की तो एक आत्मविश्वास गमावलेला अकार्यक्षम असा मनोरुग्ण होऊन बसला.

‘ओ.सी.डी.’ या मानसिक आजाराचा उगम अपराधीपणाच्या तीव्र भावनेमधून होतो. आत्मसंदेह (सेल्फ डाऊट), आत्महीनता (सेल्फ कंडेमेनेशन) व आत्मग्लानी (गिल्ट) या भावनांचा एक मनोवैज्ञानिक गुंता व्यक्तीला त्यात जखडून टाकत जातो. नको वाटणारे विचार सारखे मनात येत राहतात. जितका या नको वाटणाऱ्या विचारांना टाळण्याचा किंवा नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न व्यक्ती करेल तितकं ते अशक्य होत जातात व विचारांचा हा गुंता अधिकच गुंतत जातो.

संजीवचं समुपदेशन सहा महिने चाललं. मनातला लैंगिक विचारांचा झंझावात थंडावत गेला. औषधं कमी झाल्याने सारखी येणारी मरगळ व झोप कमी झाली. तो नियमित व्यायाम करू लागला. त्याचं वजनही कमी होऊ लागलं. वडील व मुलगा यांनी आपापसात बोलावं असं डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं होतं, त्याचा विधायक परिणाम दोघांच्या मन:स्वास्थ्यावर झाला. संजीवने पुन्हा नोकरी मिळवली. वडील व संजीव यांच्यात स्नेह वाढला. दोघांमध्ये मत्रीपूर्ण नातं निर्माण झालं. आज दोघांचाही एकमेकांना आधार वाटतो. ‘ओ.सी.डी.’ अजूनही मधूनमधून सौम्य स्वरूपात डोकं वर काढत असतो, पण त्यासाठी नेमकं काय करायचं हे संजीवला आता अवगत झालं आहे.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 12:05 am

Web Title: avahan palkatvache article by dr rajan bhosale abn 97
Next Stories
1 वेध भवतालाचा : शैक्षणिक क्षेत्रातली शोधयात्री
2 नात्यांची उकल : भांडा सौख्य भरे..
3 आभाळमाया : वटवृक्षाच्या सावलीत!
Just Now!
X