News Flash

कामातुराणां न भयं न लज्जा

अनेक वर्षांपासून हाँगकाँगमधे स्थायिक झालेल्या आहुजांच्या सुनेने लग्नानंतर चार वर्षांनी आत्महत्या केली.

|| डॉ. राजन भोसले

रीनाच्या आईने केलेल्या चुका अनेक पालक करतात. मुलीच्या लग्नाची अवास्तव काळजी करणं, तिने एखाद्या स्थळाला ‘हो’ म्हणावं म्हणून तिच्यावर दबाव आणणं, तिने ‘नाही’ म्हणताच नाराजी व्यक्त करणं, मुलाची व मुलाकडच्या लोकांची पुरेशी माहिती न काढणं, ‘मुलाकडचे लोक खूप श्रीमंत आहेत,’ या गोष्टीमुळे हरखून जाणं, अशा काही चुका पालक करतात आणि मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात.

अनेक वर्षांपासून हाँगकाँगमधे स्थायिक झालेल्या आहुजांच्या सुनेने लग्नानंतर चार वर्षांनी आत्महत्या केली. तीन वर्षांचा मुलगा सतीश आजोळी गेलेला होता. नवरा विनय दुसऱ्या खोलीत झोपलेला असताना भर दुपारी तिने गळफास लावून घेतला. लग्न झाल्यापासूनच ती खूप दु:खी होती. विनयच्या विचित्र व हिंसक वृत्तीमुळे ती आठ वर्षांत कधीही त्याच्याशी बरोबरीचे, सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकली नव्हती. विनयशी असलेले तिचे संबंध किती आणि का पराकोटीचे क्लेशदायक होते याची पूर्ण कल्पना तिच्या सासू-सासऱ्यांना होती, पण तिला मदत करण्याचा फारसा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही की त्याला समजून सांगण्याचा प्रयत्नही केला नाही.

आहुजांना दोन मुलं. मोठी गीता व तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान विनय. जन्मापासूनच विनयचे खूप लाड केले गेले. त्याला तो मागेल त्या सर्व गोष्टी तात्काळ पुरवल्या गेल्या. त्याच्या दिमतीला दोन पूर्णवेळ काम करणाऱ्या बायका ठेवल्या होत्या. विनयला कसलीही कमतरता कधी भासू नये याची पूर्ण काळजी आहुजा घेत असत. विनय बुद्धिमत्तेने सर्वसाधारण होता. अभ्यास, खेळ, कला यापैकी कशातही वेगळी चुणूक त्याने कधी दाखवली नाही. थोडा आळशी, बराचसा हट्टी, चटकन चिडणारा, उर्मट, बोलाचालीला हात उगारण्याची प्रवृत्ती असलेला असं त्याचं व्यक्तिमत्त्व. अशा वागण्यामुळे घरात मोलकरणीसुद्धा टिकत नसत. त्यांना थोडा जास्त पगार देऊन टिकवण्याचा परिपाठ आहुजांनी पाळला होता.

बारा वर्षांचा होता होता एक नवीन व विचित्र गोष्ट विनयच्या बाबतीत समोर आली. घरात काम करणाऱ्या मोलकरणींच्या शरीराला विविध प्रकारे कामुक स्पर्श करण्याचा प्रकार त्याने सुरू केला. ही गोष्ट त्याच्या आई-वडिलांच्या निदर्शनास आणून देताच त्या त्या मुलींना कामावरून काढलं जाई. पुढे असा प्रकार त्याने नात्यातल्या काही मुलींबरोबरही केला. त्यावर त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न आहुजांनी काही वेळा केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. दुसरीकडे शाळेत तो मागे पडत होता. अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं. कसंबसं दहावी होताच आहुजांनी त्याला आपल्या व्यवसायात सहभागी करून घेतलं. पुढचं शिक्षण तो करू शकणार नाही, हे आहुजांना दिसत होतं. व्यवसायातही त्याने उत्साह दाखवला नाही. आहुजांचा व्यवसाय मोठा होता. कारखाना, आयात-निर्यात, अशी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होती. काही वर्षे अशीच गेली. विनय यथावकाश व्यवसायातल्या काही मोघम गोष्टी शिकला. वडिलांनी त्याला कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केलं.

हे सर्व होत असताना विनयला कुणाशी मैत्री करणं कधी जमलं नाही. घरात व बाहेर कुणाशीच त्याचं फारसं पटत नसे. नातेवाईकांपासूनही तो दूर राहायचा. स्वत:ला एकटं कोंडून घ्यायचं, तासन्तास कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर घालवायचे, नेहमी बाहेरून अन्न मागवायचं, महागडं शॉपिंग करायचं, एकटय़ानं फॉरेन टुर्स करायच्या अशा त्याच्या सवयी होत्या. मोठी बहीण एम.ए.पर्यंत शिकली. तिचं लग्न होऊन ती सुखाने नांदत होती. ती व तिच्या नवऱ्यानं आहुजांना विनयबद्दल सावधगिरीचा इशारा काही वेळा दिला खरा पण त्यांना ‘हा तुमचा विषय नाही,’ असं ऐकवलं गेलं.

विनयचं लग्न करावं, असं आहुजांच्या मनात आलं तेव्हा त्यांनी समजून उमजून आर्थिकदृष्टय़ा खूपच निम्न स्तरातील मुली बघायला सुरुवात केली. गरीब घरातून आलेली मुलगीच विनयबरोबर नांदेल, त्याच्या तिरसट स्वभावाशी जुळवून घेईल, त्याचा तऱ्हेवाईकपणा स्वीकारेल, त्याचा उर्मट व उद्धटपणा सहन करेल असा व्यवहारी विचार त्यांनी केला. त्याप्रमाणे पत्नीच्याच नात्यातल्या भारतात राहणाऱ्या एका विधवेची मुलगी रीना त्यांनी निवडली. रीना रंगरूपाने देखणी आणि बी.कॉम.पर्यंत शिकलेली होती. विनयने पसंती दर्शवताच लग्न हाँगकाँगमध्येच थाटामाटात पार पडलं.  लग्नानंतर विनयनं मधुचंद्रासाठी बँकॉकला जायचं ठरवलं. बँकॉकवरून परत येताच रीनाने विनयच्या आई-वडिलांपाशी विनयच्या वर्तणुकीबाबत काही खूप गंभीर तक्रारी केल्या. या तक्रारी विनयचे विचित्र लैंगिक आग्रह, विकृत कामुक वर्तन, सॅडिस्टिक असा हिंसक व्यवहार याबद्दल होत्या. त्या तक्रारी ऐकून रीनाच्या सासूने ‘हे सगळं खरं सांगते आहेस ना?’ असा उलट प्रश्न रीनाला विचारला. खरंतर आपला मुलगा कसा आहे याची पूर्ण जाणीव विनयच्या आई-वडिलांना होती. पण त्यांनासुद्धा रीनाने विनयच्या वर्तनाबद्दल सांगितलेले प्रकार अगदीच नवीन व विचित्र होते. लगेच कसलीच प्रतिक्रिया द्यायचं त्यांनी टाळलं व ‘आम्ही विनयशी बोलू’ असं त्यांनी तिला सांगितलं.

एक आठवडा गेला. सासू रीनाला म्हणाली, ‘‘लग्न म्हटल्यावर तडजोड आली. नवरा बायकोनं एकमेकांच्या इच्छा व गरजा पूर्ण करायलाच हव्यात. तुला विनयला समजून घ्यावं लागेल. त्याने केलेल्या गोष्टी तिथे बँकॉकमध्येच शक्य होत्या, इथे त्या शक्य नाहीत. तरी सध्या गप्प राहा. त्याला वेळ दे. पुढे बघू.’’  सासूबाईंच्या या उत्तरानं रीनाचं समाधान झालं नाही. बँकॉकवरून परत आल्यावरही विनयने आपलं आग्रही, आक्रमक व हिंसक लैंगिक वर्तन चालूच ठेवलं होतं. तिला शारीरिक पीडा होईल असं लैंगिक वर्तन (sadism) करत असतानाच गलिच्छ भाषा, अश्लील अपमान, वेळोवेळी हात उगारणं हेही चालूच होतं. रीना सोशिक होती. अगदी लहान असताना तिचे वडील वारले. त्यानंतर तिच्या आईने सोसलेले कष्ट, हाल-अपेष्टा, पीडा तिने अगदी जवळून पाहिली होती. आईला आपल्या तक्रारी सांगून अधिक दु:खी करायला नको म्हणून तिने यातलं काहीच तिला सांगितलं नाही. सासूबाईंना सांगण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्या ‘मी काही करू शकत नाही,’ असं म्हणून हा विषय टाळत. दरम्यान रीना गर्भवती झाली. गरोदरपण, बाळंतपण यासाठी लागणाऱ्या सर्व तरतुदी हाँगकाँगमध्येच केल्या गेल्या. एका बाजूला ही स्थित्यंतरं रीनाच्या जीवनात होत होती, पण दुसरीकडे विनयच्या वागण्यात कसलीच सुधारणा होत नव्हती. त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, त्याचे आग्रह, त्याचे अत्याचार तसेच सुरू होते. तारेवरच्या कसरतीप्रमाणे रीनाच सतत एकतर्फी तडजोड करत राहिली. सासू-सासऱ्यांनी ‘तुमचं तुम्ही बघा’ असा अलिप्त पवित्रा ठेवला. रीनाने स्वत:च्या आईपासून मात्र या गोष्टी लपवल्या.

रीना दु:खी आहे हे तिच्या आईला उमगलं होतं व ते नवऱ्याच्या तुटक, फटकळ स्वभावामुळे असावं, असा साधारण अंदाज तिला आला होता. पण त्यांनी रीनाला आवर्जून कधीच त्यामागची कारणं विचारली नाहीत. आज जेव्हा रीनाने आत्महत्या केली तेव्हा तिच्या आईला रीनाने लिहिलेली एक खासगी डायरी मिळाली. त्यामधून तिला हा धक्कादायक घटनाक्रम कळला. एकीकडे मुलगी अशा प्रकारे गेल्याचं अपार दु:ख, तर दुसरीकडे आपण तिला काहीच मदत करू शकलो नाही याचं शल्य तिला बोचत होतं. रीनाला जाऊन सहा महिने झाले तरीही या धक्क्यातून बाहेर येणं तिला जमेना, तेव्हा तिच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यावरून ती एका ज्येष्ठ समुपदेशनतज्ज्ञ डॉक्टरांना भेटली.

‘डॉक्टर, आई म्हणून माझं काय चुकलं? मी कुठे कमी पडले? माझ्या मुलीनं माझ्यापासून हे सर्व का लपवलं? स्वत:चा जीव देण्याइतपत यातना सहन केल्या, पण मला कधीच यातलं काही का सांगितलं नाही?’ हे व या प्रकारचे प्रश्न रीनाच्या आईला भेडसावत होते. रीनाच्या आईशी झालेल्या तीन-चार भेटींनंतर, जेव्हा ती थोडी सावरली, तेव्हा डॉक्टरांनी तिला आई म्हणून झालेल्या काही चुका व वागण्यातल्या काही गंभीर त्रुटी हळुवारपणे दाखवून दिल्या.

रीनासाठी विनयचं स्थळ आल्यानंतर, रीनाच्या आईने मुलाची कसल्याही प्रकारची माहिती काढण्याचा काहीच प्रयत्न केला नव्हता. तो नात्यातला, श्रीमंत घरातला आहे एवढय़ावर तिने लग्नाला संमती दिली. विनयशी स्वत: बोलणं, त्याचा स्वभाव, विचार, आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे तिनं कधी केलंच नाही. ‘तो दहावीनंतर पुढे का नाही शिकला?’ हा प्रश्न तिच्या मनातही आला नाही. रीनाच्या मनात काय आहे? तिला विनयबद्दल काय वाटतं? त्या दोघांमध्ये काही चर्चा, विचारांची देवाण-घेवाण झाली आहे का? झाली नसेल तर का नाही झाली व झाली असेल त्यातून रीनाने काय अनुभवलं? अशी कुठल्याही पद्धतीची चौकशी रीनाच्या आईने केली नाही व तशी उत्सुकताही कधी दाखवली नाही. याउलट ‘इतक्या श्रीमंत घरातून समोरून मागणी आलीय,’ या विचारांनीच ती हुरळून गेली. विनयच्या वडिलांनी लग्न करण्याची घाई केली तेव्हा खरंतर रीनाने आईला ‘आपण थोडं थांबून नंतर लग्न करूया,’ असं सुचवलं होतं. पण तेव्हा तिच्या आईने तिची इच्छा न जुमानता, विनयच्या वडिलांच्या घाईलाच उलट साथ दिली. ‘तुला काही कळत नाही. होतंय तर होऊन जाऊदे,’ असं तिचं म्हणणं होतं. हे सर्व होत असताना ‘यात आपलं काही चुकतंय का?’, असा विचार तिने कधी केलाच नाही.

लग्नानंतरही रीनाच्या आईने रीनाला अनेकदा उदास व चिंतातुर असलेलं पाहिलं, पण थोडं खोलात जाऊन त्याची कारणं जाणून घेण्याचा पुरेसा प्रयत्न तिने कधीही केला नाही. ‘लग्नानंतर जमवून घ्यायला थोडा वेळ लागणारच. नवरा-बायकोंनी एकमेकांच्या स्वभावाशी जुळवून घ्यावंच लागतं. आपण नेहमी सकारात्मक बाजू बघावी, नकारात्मक विचार करू नये,’ असे साचेबंद विचार ती रीनाला ऐकवत राहिली. रीनाच्या उदासपणाबाबत सासू-सासऱ्यांकडे चौकशी करण्याचंही तिला कधी सुचलं नाही.

रीनाच्या आईने केलेल्या चुका अनेक पालक करतात. मुलीच्या लग्नाची अवास्तव काळजी करणं, तिने एखाद्या स्थळाला ‘हो’ म्हणावं म्हणून तिच्यावर दबाव आणणं, तिने एखाद्या स्थळाला ‘नाही’ म्हणताच त्याबद्दल नाराजी व रोष व्यक्त करणं, मुलाची व मुलाकडच्या लोकांची पुरेशी माहिती न काढणं अशा गोष्टी अनेक पालक करतात. केवळ ‘मुलाकडचे लोक खूप श्रीमंत आहेत,’ या एका गोष्टीने हरखून जाणारे बरेच पालक असतात.

रीनाच्या आईने केलेल्या चुका डॉक्टरांनी तिला नक्कीच दाखवून दिल्या, पण त्याबरोबर रीनाने स्वत: केलेल्या काही चुका, तिच्या नवऱ्यामध्ये असलेली लैंगिक विकृती व सासू- सासऱ्यांनी जाणून-बुजून त्याकडे केलेलं दुर्लक्ष या सर्वाचा तो एकत्रित परिणाम होता हेसुद्धा डॉक्टरांनी स्पष्ट केलं, जेणेकरून ‘सर्व दोष आपलाच आहे,’ असा समज तिने करून घेऊ नये.

लग्न ठरवताना एकमेकांबद्दलच्या काही चौकशा आवर्जून व निर्भीडपणे परस्परांकडे करणं, मुलगा व मुलीला एकमेकांशी स्वतंत्र बोलू-भेटू देणं, मुलांच्या मताला व भावनांना अनुरूप महत्त्व देणं अगत्याचं असतं. होणाऱ्या दाम्पत्यांचं ‘विवाहपूर्व समुपदेशन करणं’ ही संकल्पना पुरोगामी आहे. तिचं स्वागत व्हायला हवं. या प्रकारचं समुदेशन व मार्गदर्शन देणारी दर्जेदार केंद्रं आता प्रस्थापित झाली आहेत.

लग्न झाल्यानंतरही पालकांची जबाबदारी संपत नसते. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अनेक चढ-उतारांमधून जात असताना एक हक्काचं ठिकाण असणं गरजेचं असतं, जिथे व्यक्ती आपलं मन पूर्णपणे मोकळं करू शकेल.. आणि स्वत:च्या आई-वडिलांएवढं जवळचं-हक्काचं ठिकाण आणखी कुठलं असणार?

लग्न झालं म्हणून माहेराशी असलेले मुलीचे संबंध कधीच संपुष्टात येत नसतात. आई-वडिलांकडे असलेला ओढा व लळा अंतर्धान पावत नसतो, तसं अपेक्षितही नसतं. याच्या नेमकं उलट, मुलीचं लग्न झाल्यानंतरही सतत तिच्या वैवाहिक जीवनात अनावश्यक लुडबुड करत राहण्याची चूक काही पालक करतात. ‘सुवर्णमध्य’ किंवा ‘मध्यमार्ग’ या आदर्श संकल्पना आहेत. एक तर लग्न झालेल्या मुला-मुलींच्या वैवाहिक जीवनात सतत ढवळाढवळ करत राहणं किंवा मग संबंध तुटल्याप्रमाणे त्यांच्यापासून पूर्णपणे अलिप्त राहणं अशा टोकाच्या भूमिका काही पालक घेतात. त्याऐवजी लग्न झालं असलं तरी मुलांसाठी उपलब्ध राहणं व मदत मागताच प्रसंगानुरूप व यथाशक्ती मदत-मार्गदर्शन करणं हा मध्यमार्ग पालकांनी अवलंबावा.

रीनाच्या बाबतीत घडलं ते दुर्दैवी असलं तरी दुर्मीळ नाही. विनयसारखे अनेक पुरुष आजही या प्रकारचं हिंसक वर्तन त्यांच्या पत्नीशी करताहेत. आहुजांसारख्या घरांमध्ये आजही अनेक सुना अशी एकांगी कुचंबणा व अत्याचार मुकाटपणे सहन करत आपलं जीवन व्यतीत करत आहेत. अनेकदा या प्रकारच्या केसेस समोर येतच नाहीत व उभं आयुष्य एकाकी, अन्याय-अनाचार सोसण्यात निघून जातं. रीनाच्या बाबतीत झाली तशी शोकांतिका टाळण्यात पालक मोठी मदत करू शकतात.

मुलीचं ओझं वाटून न घेता ‘तिच्या सुखदु:खाची थोडीशी जबाबदारी आपल्यावरही आजन्म राहणार आहे,’ याची जाणीव पालकांनी ठेवायला हवी. तिला या जगात आपल्या इच्छेने आपण आणलं. आपल्याशी असलेलं तिचं नातं व तिच्या सुखदु:खाशी असलेलं आपलं नातं कधीच संपत नसतं.’ ही जाण पालकांनी ठेवायलाच हवी.

(या लेखातील घटना सत्य आहेत, मात्र नावे आणि ठिकाणे बदलली आहेत.)

rajanbhonsle@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:05 am

Web Title: avahan palkatvache article some mistakes parents make and ruin girls lives mpg 94
Next Stories
1 हिमबिबटय़ाचे संरक्षण
2 आयुष्याच्या संध्याकाळी
3 चालते बोलते विद्यापीठ
Just Now!
X