18 November 2019

News Flash

आव्हान पालकत्वाचे : कथा कुणाची व्यथा कुणा!

दीपक व नियतीचा प्रेमविवाह होऊन आठ महिने झाले होते. लग्नाआधी एकाच कार्यालयात काम करत असताना दोघांचा परिचय झाला

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. राजन भोसले

एका बाजूला नवऱ्याच्या वर्तणुकीचे धिंडवडे काढत असतानाच, ‘‘तुला कळत नव्हतं का? इतके दिवस चाललेली गोष्ट तू मला आधीच का नाही सांगितलीस? तू का त्यांच्या गलिच्छपणाला साथ दिलीस?’’ असा जाब बारा-तेरा वर्षांच्या नियतीला विचारताना तिच्या आईला आपण किती मोठी चूक करतोय हे कळत नव्हतं. एका बाजूला आईचं आकांडतांडव, तिला होणाऱ्या निराशेविषयी वाटणारी सहानुभूती, तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी ‘आपणच याला जबाबदार ठरलो.’ असा बोचणारा विचार नियतीला आतून पोखरत असे. त्याचाच दीर्घकालीन परिणाम तिच्या वैवाहिक जीवनावर झाला होता..

दीपक व नियतीचा प्रेमविवाह होऊन आठ महिने झाले होते. लग्नाआधी एकाच कार्यालयात काम करत असताना दोघांचा परिचय झाला. पुढे वर्षभरात मत्री, प्रेम व त्यानंतर लग्न या प्रकारे त्यांचा सहप्रवास झाला. दीपक बत्तीसचा तर नियती एकोणतीसची. दोघं एमबीएपर्यंत शिकलेले. दोघांचं व्यक्तिमत्त्व उठावदार, पेहराव आधुनिक व राहणी काळानुरूप. लग्नानंतर एक वेगळीच तक्रार घेऊन दोघे एका नामांकित लैंगिक विज्ञान तज्ज्ञांकडे आले होते.

डॉक्टरांसमोर बसताच थोडं थांबत थबकत दीपक सांगू लागला, ‘‘डॉक्टर, आमचा प्रेमविवाह झाला. गेले आठ महिने आम्ही एकत्र नांदत आहोत. नियतीच्या आईच्या घरातच आम्ही राहतो आहोत. नियतीच्या आई-वडिलांचा घटस्फोट सोळा वर्षांपूर्वी झालेला आहे. घरात वीस वर्षांपासून स्वयंपाकाचं काम करणाऱ्या कमलबाईसुद्धा राहतात. त्यांनी नियतीला तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटापूर्वीपासून पाहिलं आहे.’’ दीपकने समर्पक संदर्भ देत आपली पार्श्वभूमी नमूद केली. या माहितीनंतर मूळ समस्येकडे येत दीपक सांगू लागला, ‘‘लग्न झाल्यापासून आमचे नेहमी व नियमित शारीरिक संबंध येतात. आम्हा दोघांनाही ते हवे असतात व त्यात दोघांचाही सहभाग असतो. सध्या मूल नको म्हणून मी कुटुंब नियोजनाची साधनं वापरतो. पण एक अडचण आहे..’’ दीपक थबकला. केविलवाणा चेहरा करत, नियतीबरोबर हलकीशी नजरानजर त्याने केली. पुढे जे सांगायचं होतं त्यासाठी जणू तिची मूक संमतीच तो मिळवतोय अशी त्याची देहबोली होती. नियती दुखावली जाऊ नये याची काळजी घेत, पण धीटपणे दीपक सांगू लागला. ‘‘डॉक्टर, मी जर तिच्या स्तनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाच तर ती खूप संतापते व मला दूर लोटून रडू लागते.’’ नियती खाली मान घालून आपल्या भावनांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत होती.

‘‘आमच्या लग्नाआधीसुद्धा आमच्यामधे जवळीक होत असे. तेव्हाही असंच होत होतं. ‘तिला संकोच असेल, अजून लग्न व्हायचंय म्हणून कदाचित तिला काही मर्यादा पाळायच्या असतील, तिची तयारी नसेल तर आपण आग्रह करणं बरोबर नाही..’ या भावनेने मी तेव्हा या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण आमचं लग्न होऊन आता आठ महिने झालेत. लग्नानंतरही हे असंच चालू राहिलंय.’’ दीपक एकटाच बोलत होता. ‘‘डॉक्टर, मला नियतीबद्दल खूप आकर्षण आहे. तिचं शरीरसौष्ठव चारचौघीत उठून दिसेल असे आहे. अनेक मुली स्वत:च्या शरीराबद्दल साशंक असतात. त्यांना ‘बॉडी इमेज इशूज’ असतात. तसं नियतीच्या बाबतीत अजिबात नाही. तिला आपलं रंगरूप व बांधा उठावदार आहे याची पूर्ण जाणीव आहे. पण असं असूनही प्रणय करतेवेळी ती असं का करते हेच मला कळत नाही. मी तिच्याशी या विषयावर बोलताच ती नाराज होते. एकतर गप्प राहते किंवा रडायला लागते व हा विषय तिथेच संपतो. एरवी ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली आहे. उत्साही ‘डायनॅमिक टीम प्लेअर’ आहे.’’ नियतीच्या डोळ्यात पाणी तरारलेलं मला दिसलं.

दीपक सांगत होता, ‘‘यापूर्वी मी एकटय़ाने मुलुंडच्या एका ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञांकडे या गोष्टीसाठी गेलो होतो. त्यांनी नियतीला नैराश्य आल्याचं सांगत त्यावरच्या गोळ्या लिहून दिल्या. तिने त्या गोळ्या घ्यायला चक्क नकार दिला. नंतर मी एका मनोविकारतज्ज्ञांकडे हिला घेऊन गेलो. ते ‘सायकोथेरपी’ करतात असं ऐकलं होतं. त्यांच्याशी झालेल्या दोन्ही भेटींमध्ये त्यांनी नियतीला जे सांगितलं ते ऐकून आम्ही दोघेही अस्वस्थ झालो. ते तिला म्हणाले, ‘तू जे करते आहेस ते योग्य नाही. अशाने नवऱ्याची बाहेर लफडी होतील. तुला मन घट्ट करावं लागेल. उगीचच नखरे व नाटक करायचं सोडून दे. अशा वागण्यानेच तर लग्नं तुटतात.’ अशा प्रकारची जरब बसेल अशी समज देण्याला ‘सायकोथेरपी’ म्हणतात यावर माझा विश्वास बसेना. आता मोठय़ा आशेने तुमच्याकडे आलो आहोत.’’

नियतीने हलकीशी मान वर करत डॉक्टरांशी नजरानजर केली. तिचे पाणावलेले डोळे व तिच्या चेहऱ्यावरचे भाव डॉक्टरांना खूप काही सांगून गेले. वेदना, अगतिकता, आकांक्षा तिच्या देहबोलीतून स्पष्ट व्यक्त होत होत्या. ‘नियतीच्या समस्येचं कारण तिच्या अंतर्मनात धुमसतंय, पण व्यक्त करण्याचं धारिष्टय़ तिला होत नाहीय,’ असा अंदाज डॉक्टरांनी लावला व तो अगदी खरा होता.

लहानपणी किंवा वाढीच्या संस्कारक्षम वयात घडलेल्या काही क्लेशकारक घटना, झालेले काही आघात खूप खोल जखमा करून जातात. या जखमा शारीरिक जखमांपेक्षा जास्त वेदनादायी असू शकतात व अनेकदा अनेक वर्षे बऱ्यासुद्धा होत नाहीत. अशा दुखऱ्या जखमांची वेदना जागृत करतील असे सर्व प्रसंग व अनुभव टाळण्याकडे अशा व्यक्तींचा कल असतो. नियतीच्या मनातही अशीच एखादी जखम असावी, असा अंदाज डॉक्टरांना आला होता. नाजूक विषयाला समुपदेशनाच्या मार्गाने हात घालताना जी विशेष काळजी घ्यावी लागते व जो संयम बाळगावा लागतो त्याची परिपूर्ण माहिती व जाण असल्यामुळेच डॉक्टरांनी वेगळी वेळ ठरवून नियतीला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावलं. डॉक्टरांशी झालेल्या चार-पाच प्रदीर्घ भेटींमधून बराच वेदनादायक इतिहास समोर आला.

नियती बारा वर्षांची असतानाची घटना. त्या काळात तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला नव्हता पण त्यांचे संबंध बरेच जुजबी व व्यवहारी होते. नियतीची आई नोकरी करत असे व वडील घरूनच स्वत:चा व्यवसाय करत असत. एकदा नियती शाळेच्या सहलीबरोबर चार दिवस औरंगाबादला गेली असताना, रविवारी तिच्या खोलीतलं कपाट नीट लावत असताना तिच्या आईला नवीन कोऱ्याकरकरीत ब्रेसिअर्सनी भरलेल्या तीन मोठय़ा पिशव्या सापडल्या. नियती सगळ्या कपडय़ांची खरेदी नेहमी आईबरोबरच करत असे. मग ब्रेसिअर्सचा हा एवढा मोठा साठा तिच्या कपाटात आला कुठून? ही गोष्ट चक्रावून टाकणारी होती. दुसऱ्या दिवशी सहलीवरून परत येताच याबाबतीत नियतीकडे आईने विचारणा केली. त्यावर नियतीने या सर्व ब्रेसिअर्स तिच्या वडिलांनी विकत घेतल्याचं सांगितलं. नियतीनं सांगितलं की अनेकदा आई नसताना नियतीचे वडील तिला अंतरवस्त्राच्या एका लहान दुकानात घेऊन जात. तिथे अनेक प्रकारचे ब्रेसिअर्स तिला घालून पाहा असं सुचवत व असं करत असताना तिथेच उभं राहून ते त्यांची पसंती नापसंती व्यक्त करत. पसंत पडताच विकत घेऊन ते घरी येत. असं अनेक दिवस चाललं होतं. नियतीने हा प्रकार व या सलग घडलेल्या अनेक गोष्टी सांगताच तिच्या आईला काही गोष्टी उलगडत गेल्या. स्वत:च्या नवऱ्याला चांगल्यापैकी ओळखून असलेल्या तिच्या आईला हळूहळू बऱ्याच गोष्टींचा अर्थ लागत गेला.

प्रत्येक पत्नीला आपल्या पतीचा स्वभाव, प्रवृत्ती व विचार करण्याची पद्धत याची बऱ्यापैकी जाण असते. आपला नवरा काय काय करू शकतो, त्याची मजल कुठपर्यंत आहे, कोणत्या गोष्टी त्याला जमतील व कोणत्या कधीच जमणार नाहीत याचा पूर्ण अंदाज प्रत्येक सुज्ञ पत्नीला असतो. नियतीच्या आईलाही तो होता. म्हणूनच नियतीने जे सांगितलं त्यावर तिचा पूर्ण विश्वास बसला.

नियतीच्या आईकडून जी मोठी चूक झाली ती यानंतर. तिने संतापून तिच्या पतीला समोर बोलवून नियतीच्या देखत या गोष्टीची शहानिशा सुरू केली. असं करत असताना तिचा पारा चढत गेला, आवाज व भाषा तीव्र होत गेली. पतीवर सर्वतोपरी तोंडसुख घेत असताना हे सर्व आपण नियतीसमोर करतोय याचं भान तिला राहिलं नाही. हा उद्रेक नियतीवर कोणते आघात करू शकतो याचं तारतम्य तिला राहिलं नाही. या प्रसंगानंतर नियतीच्या आई-वडिलांचे आधीच दुरावलेले संबंध अधिकच बिघडत गेले व त्याचं पर्यवसान त्यांच्या घटस्फोटात झालं. घटस्फोटाची केसही दीड वर्ष लांबली. या काळात आई नियतीला असंख्य वेळा ‘तुझे वडील एक विकृत, व्यभिचारी व्यक्ती आहेत. त्यांनी माझं व तुझं जीवन नासवलं, उद्ध्वस्त केलं.’ या प्रकारच्या गोष्टी सांगत असे. नियतीला वडिलांबद्दल माहीत नसलेल्या अनेक वैयक्तिक गोष्टी सांगत असताना नियती अजून फक्त बारा वर्षांची आहे याचं भान तिच्या आईने कधी ठेवलं नाही. ‘‘त्यांना स्त्रियांच्या स्तनांचं वेड सुरुवातीपासूनच होतं. दिसेल तेव्हा दिसेल त्या स्त्रीच्या स्तनांकडेच ते प्रथम पाहायचे व त्याची ओंगळ वर्णनं नंतर माझ्यापाशी करत मला नको त्या अभद्र गोष्टी ऐकवायचे. हे मी अनेक वर्षे सहन केलं. आपल्या स्वयंपाकाच्या कमलबाईसुद्धा यातून सुटू शकल्या नाहीत.’’  बेभान होऊन रडत-ओरडत अशा गोष्टी ती नियती व कमलबाईंना ऐकवत असे. त्याला दुजोरा देत त्यात भर टाकण्याचं काम करण्यात कमलबाईसुद्धा मागे राहिल्या नाहीत.

एका बाजूला नवऱ्याच्या वर्तणुकीचे धिंडवडे काढत असतानाच, ‘‘तुला कळत नव्हतं का? इतके दिवस चाललेली गोष्ट तू मला आधीच का नाही सांगितलीस? तू का त्यांच्या गलिच्छपणाला साथ दिलीस?’’ असा जाब बारा-तेरा वर्षांच्या नियतीला विचारताना तिच्या आईला आपण किती मोठी चूक करतोय हे कळत नव्हतं. एका बाजूला आईचं आकांडतांडव, तिला होणाऱ्या निराशेविषयी वाटणारी सहानुभूती, तिच्या एकटेपणाची खंत, तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी ‘आपणच याला जबाबदार ठरलो,’ असा बोचणारा विचार नियतीला आतून पोखरत असे.

या सर्व अत्यंत वेदनादायी अशा प्रकरणाचा केंद्रिबदू ‘स्त्रीचे स्तन व पुरुषांना असलेलं स्तनांचं आकर्षण असा आहे,’ असा अर्थ नियतीने काढला होता व आज त्याची झळ ती व तिचा नवरा दीपक यांच्यापर्यंत पोहोचली होती. हा अर्थ व हे अनुमान किती चुकीचं व भ्रामक आहे हे सांगणारी व्यक्ती तिला भेटली नव्हती. शिवाय हा विषय नाजूक! चटकन कुणापाशी बोलणं अवघड. म्हणूनच नियतीने हा विचार खोल मनाच्या गाभाऱ्यात दाबून टाकला होता. तिथून तो बाहेर काढण्यासाठी जी मनाची तयारी व जे वातावरण लागतं ते उपलब्ध करून देणं ही समुपदेशकांची एक महत्त्वाची जबाबदारी असते.

हळुवारपणे डॉक्टरांनी नियतीला आपली व्यथा व्यक्त करू दिली. असं करत असताना नियती अनेकदा खूप भावनावश झाली. कधी गळा भरून येई तर कधी शब्द मिळत नसत. अत्यंत नाजूक विषय व्यक्त करण्यासाठी एक वातावरण लागतं. ते उपलब्ध करून देणं ही पूर्णपणे समुपदेशकांचीच जबाबदारी असते. त्यासाठी ज्या तीन आत्यंतिक आवश्यकता आहेत त्यांना समुपदेशनशास्त्रात ‘पोटन्सी, प्रोटेक्शन व परमिशन’ असं संबोधलं आहे. या तीन आवश्यकतांचं सुरेख विवरण डॉक्टर अमन लिखित ‘इसेन्शिअल टिए’ या इंग्रजी पुस्तकात पाहायला मिळतं.

समुपदेशनाच्या या प्रदीर्घ चाललेल्या प्रक्रियेत डॉक्टरांनी एक गोष्ट नियतीला आवर्जून स्पष्ट केली, ‘‘तू या प्रकरणाला अजिबात जबाबदार नाहीस. याचा दोष स्त्रीच्या स्तनांना देणं हीसुद्धा खूप मोठी चूक आहे. खरी चूक जी आहे ती प्रामुख्याने विकृती असलेल्या व्यक्तींची म्हणजेच तिच्या वडिलांची आहे व त्याचबरोबर या गोष्टीला हाताळताना जी अपरिपक्व व विस्फोटक पद्धत तिच्या बेभान आईने अवलंबली या गोष्टींची आहे.’’

घटस्फोट होऊ घातलेली दाम्पत्यं एक चूक वारंवार करतात. आपल्याला आपल्या नवऱ्याबाबत किंवा बायकोबाबत काय वाटतं, तो किंवा ती आपल्याशी आजपर्यंत कसे चुकीचे वागले, आपण किती बरोबर होतो व दुसरा किती चूक होता याची लांबलचक व अतिरंजित वर्णनं वारंवार मुलांना ऐकवली जातात. असं करताना आपण खूप खोल जखमा मुलांवर करतोय, ज्याचे परिणाम कदाचित आजन्म त्यांना सोसावे लागतील, ज्यांचा घातक परिणाम त्यांच्या स्वत:च्या वैवाहिक जीवनावर होईल, याचा अंदाज त्यांना येत नाही. आपण केवळ वेगळे होऊ घातलेले पती-पत्नीच नव्हे तर पालकही आहोत व पालक म्हणून आपली एक वेगळी व महत्त्वाची जबाबदारी आहे हे त्यांच्या ध्यानात येत नाही. दुसऱ्याबद्दलच्या घृणेने बेफाम होऊन मुलांचे कान भरताना अनेक पालकांना आपण नकळत मुलांमध्ये स्वत:बद्दलचा संदेह (सेल्फ डाउट) निर्माण करणं, त्यांचा आत्मविश्वास हिरावून घेणं, अविश्वास, असंतोष, अनादर, अकृतज्ञता यांसारख्या आतून कमकुवत करणाऱ्या संज्ञा त्याच्यात पेरणं, हे सर्व करतोय हेच कळत नाही.

नियतीच्या बाबतीत तिच्या जुन्या जखमा भरणं फार अवघड गेलं नाही. एरवी ती हुशार, विचारी व संयमी असल्यामुळे व त्यात दीपकची समंजस व प्रेमळ साथ असल्यामुळे तिने स्वत:ला सावरलं. वर्षभरात दोघांनी एकत्रित बँकेचं कर्ज घेऊन स्वत:चं नवीन घर घेतलं व तिथे स्वतंत्रपणे नांदू लागले. आज दोघं आपल्या वैवाहिक जीवनाच्या सर्व अंगांचा परिपूर्ण आनंद घेत आहेत.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 29, 2019 1:06 am

Web Title: avahan palkatvache dr rajan bhosale abn 97
Just Now!
X