News Flash

गद्धेपंचविशी  : कार्यकर्ता ते ‘कार्यकर्ता अधिकारी’!

मला जाणवत होतं, की या शहाबानो विधेयक-रामजन्मभूमीभोवती आखलेल्या घटनांचा देशावर दीर्घकाळ परिणाम होणार आहे.

अविनाश धर्माधिकारी – abdharmadhikari@yahoo.co.in

माझ्या तारुण्याची सुरुवातच कार्यकर्ता म्हणून अभ्यास करत आणि तितक्याच उत्साहानं समाजात मिसळून काम करत झाली. मनातील कार्यकर्त्यांचा गाभा तसाच ठेवून प्रशासनात उच्च पदावर काम करायला मिळालं तर किती चांगलं होईल, असं वाटू लागलं आणि मी ‘आयएएस’ झालो. व्यवस्थेत काम करताना त्यातील त्रुटी दिसत गेल्या, पण माझ्यातील जुना कार्यकर्ता तसाच जिवंत ठेवून, प्रशासनाच्या कायद्यांची शिस्त पाळत मी काम करू लागलो. जनहिताचं बहुआयामी ‘मॅट्रिक्स’ सुटतंय का, याचा वेध घेताना ‘कार्यकर्ता अधिकारी’ होण्याकडे वाटचाल के ली, ती याच काळात.

बारावीच्या वर्षांत, दिवाळीनंतरची टर्म सुरू झाल्यावर ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या वर्गात बसलेलो असताना आयुष्याची दिशा ठरवणारा तीव्र साक्षात्कारी क्षण मी अनुभवला. आपण कोण? आपल्याला काय व्हायचंय? आयुष्य काय? आपल्या आयुष्याचा अर्थ काय? मुळात आयुष्याला असा काही अर्थ, उद्देश, काही दिशा असते का? अशा ‘सोळावं वरीस धोक्याचं’मध्ये साहजिकच पडणाऱ्या  सर्व ‘एग्झिस्टेन्शियलिस्ट’- अस्तित्ववादी प्रश्नांचं स्वच्छ, स्पष्ट, नितळ रूप माझ्याकरता, माझ्यापुरतं माझ्यासमोर आलं- भारताचा कार्यकर्ता! आपलं ‘करिअर’ काय?- भारताचा कार्यकर्ता. आयुष्यात आपल्याला काय करायचंय- भारतमातेची सेवा. हे स्वच्छ, लख्ख दिसण्याचा क्षण तो. समोर सर्वत्र प्रकाश दिसला..

पुढची १० वर्ष त्या प्रकाशात न्हाऊन निघतच जगलो, ज्ञान प्रबोधिनीचा पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून. त्या दिशेनं दशकभर वाटचाल करताना ‘आयएएस’ अधिकारी होण्याची दिशा उजळत गेली, क्षितिज सामोरं आलं. कार्यकर्ता म्हणून चाललेला प्रवास अधिकारी होण्याच्या मुक्कामावर सहजच पोहोचला, आपल्या एका आंतरिक गतीनं, ऊर्मीनं. कार्यकर्ता म्हणून वावरण्याच्या या दशकात हातात हात घालून कृती आणि अभ्यास चालू होते, तेव्हा कोणता तरी पूर्वनियोजित मुक्काम गाठायचा नव्हता, प्रवास हेच उद्दिष्ट होतं. आपल्या अभ्यासाला अ-स्पर्श, बुद्धीला अगम्य आणि वृत्तीला ‘अ‍ॅलर्जी’- एकाही ज्ञानशाखेची असता कामा नये या जाणिवेतून अभ्यास ‘एंजॉय’ करत होतो, अजूनही करतो- कारण हा कधी संपणारा प्रवास नाही. ज्ञानसाधनेचं समीकरण  f(x)—> 8 हे  आहे, हे मला समजलेलं आहे. सर्व ज्ञान ‘इंटरलिंक्ड’, ‘इंटरडिपेंडंट’ आहे- अंती ‘एकत्वा’चा, अद्वैताचा अनुभव देणारं आहे. मी तर ज्ञान आणि कृतीचंही ‘अद्वैत’ अनुभवत काम करत होतो. युवक संघटन आणि शिवाजी महाराजांच्या खेड-शिवापूरचा तळ धरून ग्रामविकसन कामातला वाटा. आम्ही रस्ते तयार करण्यासाठी डोक्यावर पाटय़ा वाहिल्या, झाडं लावली, निर्धूर चुली आणि गोबर गॅस प्लँट्स् बांधले, गावातल्या मारुतीच्या मंदिरात साक्षरता वर्ग चालवले, सह्य़ाद्रीमध्ये कचकावून ट्रेकिंग करताना शिवकालाची जिवंत प्रेरणा साठवून घेतली.

‘कार्यकर्ता’ दशक

१९७७ मध्ये आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर वादळी लाटेनं हाहाकार उडवला, तेव्हा आम्ही मदतकार्यासाठी गेलो. तिथे मला भारताच्या बाह्य़ विविधतेचा आणि आंतरिक एकात्मतेचा साक्षात्कार झाला. पण तोवर आसाम, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोरामसहित ईशान्य भारतात देशापासून फुटून निघणाऱ्या सशस्त्र, हिंसक चळवळी चालू झाल्या होत्या, त्यांचा समक्ष जाऊन अभ्यास केला. त्यापैकी आसाममधल्या बांग्लादेशी घुसखोरविरोधी चळवळीत किंचित सहभागी झालो. मग काश्मीरमधली दहशतवादी फुटीर चळवळ जोर धरायला लागली, तशी काश्मीरशी संगत जुळली. ‘जेके एलएफ’च्या (जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रं ट) दहशतवाद्यांनी लंडनमध्ये भारतीय दूतावासातील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं अपहरण करून हाल हाल करून हत्या केली त्या वेळी आम्ही पुण्यात युवा शक्ती संघटित करून मोर्चा आयोजित केला होता. तोवर बघता बघता पंजाबमध्ये खालिस्तानवादी हिंसाचार भडकला. तिथे आम्ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी पदयात्रा केल्या. पंजाबी भाषा आणि गुरुमुखी लिपी शिकलो. ‘गुरू ग्रंथसाहेब’मधल्या संत नामदेवांच्या अभंगांचा दाखला देत, गुरुद्वारांमधून शबद कीर्तन करत राष्ट्रीय एकात्मता जपण्यातला खारीचा वाटा उचलला. मग स्फोट झाला तो जातीय आणि धार्मिक हिंसाचाराचा- गुजरातमध्ये. निमित्त होतं राखीव जागा. भारतातले जाती-पंथांचे संघर्ष उद्या ‘गृहयुद्धा’कडे जाऊ शकतात याची झलक दाखवणारं दर्शन घडलं गुजरातमध्ये. म्हणजे एकीकडे ग्रामविकसनात काम करताना तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, या राजकीय-प्रशासकीय रचनेशी संबंध येत होता, तर देशाच्या पातळीला जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षकापासून थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे नेते (यशवंतराव चव्हाण) आणि राष्ट्रपती (ग्यानी झैलसिंग) अशा सर्व पातळ्यांवरच्या व्यक्तींच्या भेटी होत होत्या. आसाम, पंजाब, गुजरात या प्रत्येक ठिकाणी इंदिराजींच्या खास विश्वासातले ‘आयसीएस’ (इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिस) अधिकारी हरिश्चंद्र सरीन भेटत गेले. ‘आयएएस’ होण्याचं बीज वडिलांनी घरातच पेरलेलं होतं. आता ते उगवून यायला लागलं. वाटलं की अंत:करणात आग ‘कार्यकर्त्यां’ची आणि हातात अधिकार ‘आयएएस’चे मिळाले, तर आपल्याला आणखी मोठं, देशाच्या ‘स्केल’वर काम करता येईल.

स्वत:साठी कविता, कार्यकर्ता अधिकारी

झालो ‘आयएएस’. निकाल जून १९८६ मध्ये आले होते. निकालाच्या दिवशी मी मनातून अस्वस्थच होतो. एका कार्यकर्त्यांचा आता अधिकारी होतो आहे हे जाणवत होतं. तेव्हाच डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की आपण नुसतं ‘अधिकारी’ नाही व्हायचं. ‘कार्यकर्ता अधिकारी’ व्हायचं. महिन्याच्या एक तारखेला समाजाकडून पगार घेणारा पूर्णवेळचा ‘कार्यकर्ता अधिकारी’. स्वच्छ आणि कार्यक्षम दोन्ही. आजपर्यंत ज्या ‘कार्यकर्ता’ वृत्तीनं आपण काम केलं, तीच वृत्ती ‘आयएएस’ अधिकारी म्हणून काम करताना व्यक्त करायची. निकालाच्या रात्री मी स्वत:साठी एक कविता मांडली, ‘आयएएस’अधिकारी म्हणून काम करताना-

‘जरी एक अश्रू पुसायास आला

तरी जन्म काहीच कामास आला’

असं जगायचं ठरलं.

अधिकारी’ होण्यापूर्वी

एकदा सेवेत रुजू झालो की ‘काँडक्ट रुल्स’- सेवाविषयक नियम लागू होतील. त्यानंतर आता कार्यकर्ता म्हणून असलेलं लेखन, आंदोलन आणि वक्तव्याचं स्वातंत्र्य असणार नाही आणि ते बरोबरच आहे, ‘वुई हॅव टू प्ले  द गेम बाय इटस् रुल्स’ असा माझा विचार होता. म्हणून अभिव्यक्तीवर सरकारी सेवेच्या मर्यादा येण्यापूर्वी एक शेवटचा अभ्यास दौरा, देशासमोरच्या गंभीर, मूलभूत प्रश्नांचा सखोल अभ्यास करावा म्हटलं. त्या वेळी शहाबानो प्रकरणातला सर्वोच्च न्यायालयाचा ‘राज्यघटनेचं वर्चस्व’ सांगत समान नागरी कायद्याला चालना देणारा ‘लँडमार्क’ निर्णय आला होता. त्यावरून संसदेत उलटसुलट गोंधळ चालू होता. पंतप्रधान राजीव गांधींनी त्यांचे मित्र- मंत्रिमंडळातले सहकारी आरिफ महंमद खान यांच्याद्वारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं  ठाम समर्थन केलं होतं. नंतर काही मुस्लीम नेत्यांच्या दबावाखाली भूमिका संपूर्ण बदलून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला रद्दबातल  ठरवणारं, प्रतिगामी ‘मुस्लीम महिला विधेयक’ संसदेत संमत करवलं होतं. (असं मी ‘यूपीएससी’च्या मुलाखतीतसुद्धा उत्तर दिलं होतं. त्याचा माझ्या निवडीवर विपरीत परिणाम झाला नव्हता. उलट ‘यूपीएससी’च्या मुलाखत पॅनलनं मला धो-धो मार्क्‍स दिले.) शहाबानो आणि मुस्लीम महिला विधेयकाभोवती हा गदारोळ चालू असताना ‘रामजन्मभूमी’चा मुद्दासुद्धा समोर यायला लागला होता. मला जाणवत होतं, की या शहाबानो विधेयक-रामजन्मभूमीभोवती आखलेल्या घटनांचा देशावर दीर्घकाळ परिणाम होणार आहे. त्या सर्वाचाच अभ्यास करावा, म्हणून मी दिल्ली- अलिगढ- लखनौ- फैजाबाद- अयोध्या असा प्रवास केला. इस्लाम, शरिया, भारतीय राज्यघटना यांचा अभ्यास करत, तज्ज्ञांशी बोलत, लेखन केलं. त्या वेळी माझं लेखन साप्ताहिक ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध होत होतं.

प्रशिक्षणाचे दिवस

पुढे प्रशिक्षणासाठी मसुरीच्या ‘लालबहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ मध्ये (एलबीएसएनएए) दाखल झालो. प्रशिक्षण काळात अभ्यास करून काही पेपर्स सादर करायचे होते. मी ‘आयएएस’ होण्यापूर्वी ‘शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव’ मागणाऱ्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होतो. म्हणून १९७९-८० मध्ये कांद्याच्या भावावरून झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं लादलेल्या ३ रुपये क्विंटलच्या जागी कांद्याच्या शेतकऱ्याला ७० रुपये क्विंटल जो भाव मिळाला होता, त्याचे चाकण परिसरातल्या शेतकऱ्यांवर झालेले परिणाम- यावर मी अभ्यास करून पेपर सादर केला होता. एक वर्ष कांद्याला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात जास्त पैसा आला, तो शेतकऱ्यानं शेती-तंत्रज्ञान सुधारायला वापरला, त्यामुळे उत्पादन आणखी वाढलं, असं माझं ‘फाइंडिंग’ होतं. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाल्यास शहरी औद्योगिक क्षेत्राकडून शेती आणि ग्रामीण क्षेत्राचं होणारं शोषण थांबेल. शेती आणि ग्रामीण क्षेत्राची क्रमश: ‘दरिद्रीकरणाची’ प्रक्रिया थांबेल, ग्रामीण भागात क्रयशक्ती निर्माण होईल, त्यामुळे भांडवलनिर्मितीची प्रक्रिया सुरू होऊन ग्रामीण भागात नवे उद्योग, त्यातून रोजगाराच्या नव्या संधी- परिणामी आणखी क्रयशक्ती आणि भांडवलनिर्मिती- असं विकासाचं चक्र सुरू होईल.. असं सर्व आम्ही शेतकरी आंदोलनात सांगत होतो. तेच चाकण परिसराच्या माझ्या अभ्यासात दिसून आलं. असाच पेपर मी ‘ड्रायलँड फार्मिग’ विषयावर तयार केला होता. दुष्काळप्रवण, पाणीटंचाईग्रस्त भागात, पाण्याची बचत करत शेती कशी करता येईल, यावरचा तो पेपर होता. पुढे प्रशासनातल्या सर्व वर्षांमध्ये आणि आजही तो अभ्यास कामी येतो.

‘कार्यकर्ता अधिकारी’ होत असताना..

खूप शिकत असून, खूप ‘एंजॉय’ करत असून मला वाटत राहिलं, की ही व्यवस्था अजून कळत-नकळत ‘इगो’ची जोपासना करतेय. ‘सिस्टीम’चा मेसेज, तुम्ही कोणी तरी ‘विशेष’ आहात, ‘वेगळे’ आहात, असा आहे हे मला जाणवलं. अजून हा देश- देश म्हणजे लोक- लोक म्हणजे सर्व लोक- गोरे, काळे, उंच-बुटके, हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन, देवधर्म मानणारे- न मानणारे, स्त्री- पुरुष- सर्व सर्व ‘माझे’ आहेत, (मी त्यांचा आहे) आणि आपल्याला मिळालेलं पद, त्यासोबत येणारे अधिकार, बंगला, घोडय़ागाडय़ा आपल्यासाठी नाहीत, ‘आपल्या’ नाहीत, त्या सर्व सेवा नीट करता यावी म्हणून दिलेल्या सुविधा आहेत, हा ‘इदम् न मम’चा संस्कार अजून ‘व्यवस्थे’च्या रचनेत, प्रशिक्षणात पुरेसा नाही. अधूनमधून तसे काही शब्द, संज्ञा येतात, काही अधिकारी प्रशिक्षक येतात. पण कळत-नकळतसुद्धा अजूनही मुख्य जोपासना ‘सत्ताधारी’ मनोवृत्तीची (रुलिंग मेंटॅलिटी) होते. भारताची प्रशासकीय व्यवस्था उभी केली ती देशावर राज्य करण्यासाठी. स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना, लोकशाही आली, पण प्रशासकीय रचना, कार्यपद्धती, प्रशिक्षण, मनोभूमिका अजून ‘सत्ताधारी’ वर्गाची राहिली. आपण सेवक आहोत, तेही जनतेचे, याचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे, याचा अर्थ खरं ‘इगो’ विसर्जित करण्याचं प्रशिक्षण हवं. प्रशासकीय कर्तव्य निगर्वी, निरहंकारी वृत्तीनं, पद्धतीनं करण्याचं प्रशिक्षण हवं, तसे बदल ‘व्यवस्थे’च्या रचनेतही हवेत, उत्तरदायित्वाच्या संकल्पनेत हवेत. तसं स्वत:ला घडवण्याकडं लक्ष दिलं.

प्रशिक्षण घेताना मला सतत हेही जाणवत होतं, की आपल्याला स्वत:त अनेक, मुळातून बदल घडवून आणायला हवेत. आतापर्यंत अकरा वर्ष आपण कार्यकर्ता म्हणून वावरलो. त्याचं मुख्य बळ आंतरिक आवेग, स्फूर्ती, समृद्ध भावनाकोश, देशभक्तीचा भर, हे सर्व होतं. तेव्हाही अभ्यास, शिस्त, कामातली कुशलता याची गरज होतीच. पण ही वैशिष्टय़ं नसली, तरी समर्पणाच्या आवेगात ती खपून जात होती. आता ते होणार नाही, चालणार नाही. प्रशासनात राज्यघटना, कायदे, फायली, नियम, पुरावे यांना आद्य स्थान आहे. अगदी नि:स्वार्थपणे समाजाला न्याय देण्यासाठी अधिकाऱ्याला भावनेच्या भरात वाहावत जाऊन चालणार नाही. कोणी तरी काही तरी येऊन सांगितलं म्हणून तेच खरं मानून तडकाफडकी कारवाई करण्याएवढं हलक्या कानाचं राहून चालणार नाही. दोन्ही किंवा जास्तसुद्धा बाजू तपासून ‘दूध का दूध और पानी का पानी’ करण्याची क्षमता हवी. गुंतागुंतीचं, बहुआयामी ‘मॅट्रिक्स’ सोडवत त्यातून जनहिताचं गणित सोडवता यायला हवं. म्हणजे हा ‘कर्मसु कौशलम्’ असलेला ‘प्रशासन योग’च आहे. तटस्थ, अलिप्त चित्तानं प्रशासन सांभाळण्याच्या नादात समृद्ध भावनाकोश हरवता कामा नये. फाइल नियमानुसारच चालवायची, पण फायलीमागचा माणूस विसरायचा नाही. फाइल हे ‘साधन’ आहे, माणूस हे ‘साध्य’ आहे. हा ‘साध्य-साधन विवेक’ सांभाळता यायला हवा. लोकमान्य टिळकांचं वाक्य सतत आठवत होतं. स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना काम कसं करायला हवं हे सांगताना लोकमान्य म्हणाले होते, ‘‘हृदयात आग आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करायला हवं’’- ते मला, प्रशासकीय अधिकाऱ्याला लागू पडतं. कामाची तळमळ, न्यायाच्या स्थापनेसाठी आवेग, देशभक्ती, ही सगळी हृदयातली आग. तर राज्यघटना, कायदे, फायली, नियम हा डोक्यावरचा बर्फ. दोन्ही हवं. नुसतीच आग भडकली किंवा डोक्यावरचा बर्फ वितळून आगीचा- राखेचा चिखल झाला- संवेदनशीलता जाऊन मुर्दाडपणा आला- असं नको. असा हा ‘साक्षेप’ हवा.

असा साक्षेप सांभाळत दहा वर्षांची प्रशासकीय कारकीर्द पूर्ण करून प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांत ‘कार्यकर्ता अधिकारी’ घडावेत यासाठी छोटय़ाशा कामाला लागलो. ती सगळी एक वेगळी गोष्ट आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 12:01 am

Web Title: avinash dharmadhikari journey from social activist to indian administrative service officer zws 70
Next Stories
1 परिवर्तनाच्या लढाईत अंधश्रद्धेचं अस्त्र
2 कॅप्टन कूल
3 स्मृती आख्यान : लवचीक मेंदू
Just Now!
X