26 October 2020

News Flash

मनातलं कागदावर : बेबी बम्प!

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी दुसऱ्यांदा गरोदर होती.

तिला गरोदर असल्याची चाहूल लागली.

उज्ज्वला रानडे – write2umr@gmail.com

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी दुसऱ्यांदा गरोदर होती.  नेहाच्या वरिष्ठांनी तिला सांगितलं होतं, त्यांच्या वाहिनीसाठी तिचा ‘एक्सक्लुझिव्ह बाइट’  घ्यायचा होताच, पण सगळ्यांत महत्त्वाचं होतं, ते म्हणजे तिचा ‘बेबी बम्प’ कॅमेऱ्यात नीट येतोय ना, हे पाहणं!  त्यासाठी तिच्या बंगल्यावर आलेल्या नेहाला वेगळ्याच चितेनं ग्रासलं होतं..

सकाळी नेहाला जाग आली तेव्हा घर सिगारेट आणि ऑम्लेटच्या वासानं भरून गेलं होतं. तिच्या पोटात ढवळून आलं. तिनं बाथरूमकडे धाव घेतली आणि पोटात डचमळणारा ऐवज रिकामा केला. ब्रश करून ती किचनमध्ये आली तर गॅसच्या शेगडीवर एका बाजूला चहा उकळत होता; तोंडात सिगारेट धरून दुसऱ्या शेगडीवर विक्रम ऑम्लेट करत होता.

‘‘मला उठवलं का नाहीस? मला आज साडेसातला घर सोडायचं आहे हे काल रात्री सांगितलं होतं ना मी तुला?’’ तिनं जरा चढय़ा आवाजातच विचारलं.

‘‘मला पण साडेसहाला जाग आली. चहा झाला की उठवणारच होतो.’’ चहा गाळता गाळता विक्रम म्हणाला.

‘‘तुला माहित्येय ना या दिवसांत मला अंडय़ाच्या वासाचा त्रास होतोय; आणि सिगारेटच्या वासाचा तर नेहमीच होतो. तरी तुला या गोष्टी टाळता नाही का रे येत?’’

‘‘ही बघ विझवली सिगारेट! बस्स? आता तुला अध्र्या तासात घर सोडावं लागेल. या दिवसांत तू काहीतरी खाऊन घर सोडणं गरजेचं आहे. तू तर झोपली होतीस आणि मला एवढाच ब्रेकफास्ट बनवता येतो गं राणी. मग काय करणार? जा, तू आवर तुझं, ऑम्लेट-ब्रेड खाऊन घे. मी सोडतो तुला खारला.’’ या विक्रमवर रागावणं कठीण आहे हे लक्षात घेऊन चहा पिऊन ती आंघोळीला गेली.

ती काम करत असलेल्या न्यूज चॅनलच्या वृत्तविभागाकडे काल बातमी आली होती, की प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी उद्या सकाळी तिच्या आजारी वडिलांना भेटायला दिल्लीला जाणार होती. उर्वशी दुसऱ्यांदा गरोदर होती आणि या ‘करोना’च्या साथीच्या दिवसांत धोका नको म्हणून साडेनऊच्या चार्टर्ड फ्लाईटनं जाणार होती. जाईल तर काय झालं! वयाच्या पस्तिशीपर्यंत दोन डझन तरी चित्रपटांत हिरोईनची भूमिका तिनं केली होती. स्वत:ची कित्येक कोटींची कमाई, शिवाय लग्नासाठी एक धनाढय़ उद्योगपती तिनं गाठला होता. आता दुसऱ्यांदा गरोदर होती, तर नवरा तिला चार्टर्ड फ्लाईटनं पाठवणारच!

काल नेहाच्या सरांनी तिला बोलावून सांगितलं, ‘‘तुला उर्वशीची बातमी कव्हर करायला उद्या जायचं आहे. तिचा ‘बेबी बम्प’ कॅमेऱ्यात नीट यायला हवा, शिवाय काही बाईट मिळवता आला तर उत्तमच!’’ ते ऐकून ती वैतागलीच. काय बाईट घ्यायचा? बाई गं, तुला कसले डोहाळे लागलेत, हे विचारायचं, की तुम्हाला पहिला मुलगा आहे; आता दुसरं मूल तुम्हाला मुलगी आवडेल की मुलगा, असं विचारायचं?

सर तरी काय करणार म्हणा. आता या साथीच्या काळात दुसऱ्या काही बातम्याच नाहीत; शिवाय असं गॉसिप आवडणारा फार मोठा वर्ग समाजात आहे. मग आपल्याला मागणी तसा पुरवठा करणं भाग आहे. तिनं स्वत:चीच समजूत घातली.  ‘मास मीडिया’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तेव्हा ती फारच स्वप्नाळू होती. आपण शि. म. परांजपे, लोकमान्य टिळक,  गोपाळ गणेश आगरकर यांचा वारसा चालवतोय, असा तिला अभिमान होता. नोकरीच्या पहिल्या दोन वर्षांंतच तो गळून पडला..

आंघोळ करून ती बाहेर आली आणि परवा घातलेलाच टॉप पुन्हा घातला. एवढे दोनच सैल टॉप्स तिच्याकडे होते. आता असे थोडे सैल टॉप्स आणखी घ्यायला हवेत. जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस आपला बेबी बम्प लपवायला हवा! घरी आल्यावर आजच टॉप्स ऑनलाइन ऑर्डर करायचं तिनं ठरवलं.  ब्रेकफास्ट करून ती विक्रमच्या मागे बाईकवर बसली. बाईकला वेग आला तसं गार वाऱ्यानं तिचं मन थोडं सैलावलं. तिनं विक्रमच्या खांद्यावर डोकं टेकलं. विक्रमनं हॅन्डलवरचा एक हात मागे नेऊन तिच्या डोक्यावर प्रेमानं थोपटलं.

विक्रमशी भेट एवढीच एक छान गोष्ट या पत्रकारितेच्या प्रवासात घडली होती. विक्रम टीव्ही मालिकांतील एक लोकप्रिय नट होता. नाही म्हणायला काही चित्रपटांतून किरकोळ भूमिका त्यानं केल्या होत्या. त्याची प्रमुख भूमिका असलेला एक चित्रपट त्या मानानं बऱ्याच उशिरा आला होता. त्यानिमित्त झालेल्या वार्ताहर परिषदेला ती तिच्या वृत्तवाहिनीतर्फे गेली होती. सर्वानी केलेल्या कौतुकाच्या वर्षांवात तिनं रोखठोकपणे विचारलेला, ‘‘सर, हल्ली चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीबद्दल बरंच बोललं जातं. असं घराणेशाहीचं कोणतंही पाठबळ नसल्यामुळे तुम्हाला छोटय़ा पडद्यावरून मोठय़ा पडद्यावर यायला उशीर झाला का?’’ हा प्रश्न त्याला अंतर्मुख करून गेला, असं त्यानं नंतरच्या भेटीत तिला सांगितलं. त्या चित्रपटाच्या ‘प्रीमियर’साठी त्यानं तिला आमंत्रण दिलं. नंतर बघता बघता भेटी वाढल्या आणि ती त्याच्या कधी प्रेमात पडली तिला कळलंच नाही.  घरच्यांनी खूप विरोध केला.

त्यांच्या वयातलं अंतर, पस्तिशी आली तरी त्याला आर्थिक स्थैर्य नसणं, ‘इंडस्ट्री’त कुणी ‘गॉडफादर’ नसणं, चित्रपटसृष्टीतील बेभरवशी करिअर, त्यामुळे व्यसनाधीन होण्याची असलेली शक्यता, चित्रपटात काम करणाऱ्यांचे लग्नबाह्य़ संबंध, एक ना दोन. पण तिनं त्याच्याशी लग्नगाठ बांधलीच. तो व्यसनाधीन अजून तरी झाला नव्हता आणि अजून तरी त्यांचं कुणाशी लफडं नव्हतं, हे सोडलं तर बाकी मुद्दे अगदी योग्य होते, हे तिला अलीकडे फार जाणवत होतं. त्या एका चित्रपटानंतर हाती फारसं काही लागलं नाही. टाळेबंदीच्या काळात तर सर्व शूटिंग्जच बंद होती. घरात दरमहा तिच्याच काय त्या तुटपुंज्या पगाराची आवक होती.

तेव्हाच तिला गरोदर असल्याची चाहूल लागली. विक्रम नकोच म्हणत होता. पण ती ठाम राहिली. एकदा मूल ठेवण्याचा निर्णय घेतल्यावर मात्र त्यानं तिला पूर्ण सहकार्य केलं. पण आता नोकरी जाण्याची चिंता तिला सतावू लागली. गरोदरपणात ‘आऊटडोअर’ला वार्ताहर म्हणून काम करणं सोपं नव्हतंच. अजून तीन-चार महिने मिळाले तर तोपर्यंत विक्रमची शूटिंग्ज कदाचित चालू होतील अशी आशा होती..

उर्वशीच्या बंगल्याबाहेर विक्रमनं तिला सोडलं तेव्हा झाडून सगळ्या वाहिन्यांचे प्रतिनिधी तिथे पोहोचले होते. ते पाहून तिचा मूडच गेला.  सगळ्यात पहिल्यांदा उर्वशीची बातमी देण्याचा मान तिला मिळणार नव्हताच तर. तिचा कॅमेरामन विशाल आधीच तिथे पोहोचला होता. तो म्हणाला, की नुकतीच बंगल्यातून बातमी आली होती की मॅडमची फ्लाईट एक तास उशिरानं उडणार होती. आता एक तास माश्या मारणं आलं. तेवढय़ात  ‘ई फॉर एंटरटेनमेंट’ या वाहिनीमध्ये काम करणारी पत्रकारितेच्या कोर्समधली तिची मैत्रीण प्रियांका तिला शोधत तिथे आली. ‘‘अरे यार, मुझे इंटय़ूशन थी की तुम यहाँ मिलोगी. समझो मॅडम की फ्लाईट हमारे लिये ही लेट हुई हैं। चलो कॉफी पी के आते हैं ’’

विशालची परवानगी घेऊन ती निघाली. गप्पांचा विषय नोकरीत दिवस कसे वाईट आलेत,  चॅनेल्स कसे रिपोर्टर्सना धडाधड घरी बसवतात, ‘सेन्सेशनल ब्रेकिंग न्यूज’ मिळवण्याचा ताण, वृत्तवाहिन्यांवरचा लोकांचा रोष, वगैरे. एकूणच प्रियांकाशी बोलून तिच्या मनावरचा ताण वाढलाच. ती परत आली तेव्हा बंगल्यात हालचाल सुरू झाली होती. पांढरेशुभ्र कपडे घातलेल्या शोफरनं मर्सिडीज कार पोर्चमध्ये आणली. डिकीत दोन जडशीळ बॅगा चढवल्या गेल्या. उर्वशीच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन त्याची नॅनी स्थानापन्न झाली.

‘‘चलो चलो, गेट की ओर चलते हैं,’’ विशाल तिची वाटच बघत होता. तो घाई करायला लागला. पण तिचे पाय जडशीळ झाले होते. आता कोणत्याही क्षणी उर्वशी बाहेर येईल. एवढा वेळ प्रतीक्षा केलेला क्षण आला म्हणून वाहिन्यांच्या प्रतिनिधींची पळापळ सुरू झाली. उर्वशीबद्दल असूया, स्वत:बद्दल कीव, येणाऱ्या बाळाच्या भविष्याची चिंता, अशा संमिश्र भावनांनी नेहाचा ताबा घेतला.

‘‘नेहा, हरी अप, मॅडम आ गई!’’ विशालच्या शब्दांनी ती भानावर आली आणि उठून उभी राहाते तोच तिला भडभडून उलटी झाली. ‘‘नेहा, तुम.. आर यू प्रेग्नंट नेहा?’’ विशालनं विचारलं. ‘‘हाँ विशाल, पण ऑफिसमध्ये सांगू नकोस कुणाला. नाहीतर मला काढून टाकतील नोकरीवरून. विक्रमकडे पण काम नाही. जितका शक्य आहे तेवढा काळ ही गोष्ट लपवायला हवीय, ’’ नेहा काकुळतीनं म्हणाली.

‘‘आय कॅन अंडरस्टँड. आय अश्युअर यू, मी कुणालाही सांगणार नाही. मॅडम बाहेर आल्यात. मी जातो. तू बस इथे. मी घेतो सांभाळून. ’’ म्हणत विशाल कॅमेरा सांभाळत गेटकडे धावला.

डौलात पावलं टाकत, आपलं टपोरलेलं पोट मिरवत उर्वशी बंगल्याबाहेर येत होती. तिच्या ‘बेबी बम्प’ला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सगळ्यांची धांदल उडाली होती आणि तिथून थोडं दूर एखादं अनौरस मूल पोटात वाढवत असल्यासारखं आपला ‘बेबी बम्प’ किती दिवस आणि कसा लपवता येईल, याची नेहा काळजी करत होती!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:06 am

Web Title: baby bump manatla kagdavar dd70
Next Stories
1 पत्र लिहिणाऱ्यांसाठी
2 बलात्कार एक हिंस्र राजकारण
3 कोणतंय हे दृश्य विदारक?
Just Now!
X