चित्रा वैद्य – chiitraanov@gmail.com

ऐंशीवा वाढदिवस म्हणजे आयुष्याच्या प्रवासातला एक मैलाचा दगड. आमच्या बेबी मावशीचा हा वाढदिवस आम्ही सगळे अगदी थाटामाटात साजरा करणार होतो. अमेरिकेत राहणारी तिची मुलं, सुना, नातवंडं खास या सोहळ्यासाठी भारतात येणार होती. पण करोनाचं अस्मानी संकट अचानक उपटलं आणि सगळे मनसुबे पार धुळीला मिळाले. पण बेबी मावशीचं जगण्याविषयीचं प्रेम आणि उत्साह मात्र सगळ्याला पुरून उरला..

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत

‘करोना’ची टाळेबंदी सुरू होऊन दीड महिना उलटला की! माणसाच्या सगळं  कसं पटकन पचनी पडतं नाही का? नवीन दिनचर्येत मन लगेच  रुळूनही गेलं. चार दिवसाआड  झाडूपोछा, दोन दिवसाआड वॉशिंग मशीन, दिवसाआड भांडी, आलटूनपालटून पोळ्या आणि भात, कधी उसळ तर कधी भाजी, असं आखीवरेखीव वेळापत्रकही मी तयार केलं. सकाळी उठले, की आधी देवाला नमस्कार करते आणि मग मोबाइलला! ‘ई-पेपर’ उघडून ‘करोनाष्टके’ आणि बाकीच्या बातम्यांवर नजर टाकून झाली, की दिवसभराची कामं वेळापत्रकानुसार हाताखालून कशी अगदी झरझर सरकू लागतात.

त्या दिवशी ‘ऑनलाइन’ पेपरमधल्या बातम्या वाचून झाल्यावर सहजच ‘कालनिर्णय’वर नजर टाकली आणि एकदम ध्यानात आलं, बेबी मावशीचा ऐंशीवा वाढदिवस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला होता.

आमच्या बेबी मावशीला तिचं हे नाव म्हातारपणीसुद्धा अगदी शोभून दिसतं बरं! कारण ती आहेच तशी.  एखाद्या खेळकर ‘बेबी’सारखी सदैव उत्साही, हसतमुख आणि भरभरून बोलणारी.  ऐंशीवा वाढदिवस म्हणजे आयुष्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा दिवस. ‘लँडमार्क बर्थडे’च म्हणा ना. तिचा हा वाढदिवस आम्ही सगळे नातेवाईक अगदी थाटामाटात साजरा करणार होतो. तिची अमेरिकास्थित दोन्ही मुलं, सुना, नातवंडं खास या सोहळ्यासाठी अमेरिकेहून भारतात येणार होती. पण या ‘करोना’चं अस्मानी संकट अचानक टपकलं आणि आमचे सगळे मनसुबे पार धुळीला मिळाले. सगळ्यांच्या उत्साहावर पाणी पडलं. ‘सगळं जग कसं जवळ आलं आहे,’ असं म्हणता म्हणता एका फटक्यात जवळ राहणारी माणसंसुद्धा दूर फेकली गेली. प्रत्येक जण आपापल्या घरात बंदिस्त. बेबी मावशी मुंबईत, तिची मुलं अमेरिकेत आणि आम्ही दोघं पुण्यातच अडकलो.

बेबी मावशी या टाळेबंदीतसुद्धा तिच्या वांद्रा येथील स्वत:च्या घरात एकटीच राहते. पाच वर्षांपूर्वी तिच्या यजमानांचं अगदी आकस्मिक निधन झालं. तो धक्का तिच्यासाठी फारच मोठा होता, पण त्यातून ती लगेच सावरली. त्या वेळी तिची मुलं महिनाभर तिच्यासोबत राहिली. मोठय़ा मुलानं तर आईला कायमचं अमेरिकेला नेण्याची तयारीसुद्धा सुरू केली होती. पण बेबी मावशीनं ठामपणे नकार दिला. ‘‘नको रे बाबा तुमची ती माणूसघाणी अमेरिका! त्या शिकागोचं आणि त्या बोस्टनचं नुसतं नाव काढलं तरी मला हुडहुडी भरते. मी आपली इथेच बरी. संतोष आणि वैशालीचा आपला शेजार किती छान आहे. माझी खूप काळजी घेतात. तुम्ही अगदी निश्चिंत राहा,’’ असं म्हणून तिनं त्याचा मनसुबा पार धुडकावूनच लावला होता. तेव्हापासून मावशी त्या घरात एकटीच राहू लागली. यजमान गेल्यानंतर एकटेपणा तिला नक्कीच जाणवत असणार. पण ती पूर्वीसारखीच हसतमुख दिसे. कृष्णामाईसारखी शांतपणे, संथपणे आनंदाचे, समाधानाचे मळे फुलवत जीवनप्रवाहात वहात राहिली.

वाढदिवसाच्या दिवशी सकाळीच मी बेबी मावशीला फोन केला. फोन बराच वेळ उचलला नाही म्हणून बंद करणार होते, तेवढय़ात पलीकडून मावशीचा चिरपरिचित प्रसन्न आवाज ऐकू आला, ‘‘अगं चित्रा, थोडय़ा वेळानं करशील का फोन? जरा कणीक मळतेय पुऱ्यांसाठी.’’

‘‘बरं बरं..’’, म्हणत मी फोन बंद केला. थोडा वेळ  टीव्हीवरच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला. पण बातम्यांतून दिसणारं ‘करोना’चं भेसूर रूप बघून जीव घाबरला.  बेबी मावशीला परत एकदा फोन, या खेपेला मात्र ‘व्हिडीओ कॉल’ लावला.  वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या ना. वाटलं, आज प्रत्यक्ष भेट होणारच नाही, निदान मोबाइलच्या स्क्रीनवर तरी दिसेल. पण तिनं या खेपेला तर  फोनच उचलला नाही. तिला व्हिडीओ कॉल बघणं बहुधा जमत नसेल, म्हणून परत नेहमीसारखा फोन केला. तेव्हादेखील बऱ्याच वेळानं तिनं उचलला,‘‘अगं चित्रा, पाच मिनिटानं करशील का? श्रीखंड अगदी होतच आलंय.’’ पुन्हा आपलं तेच. आता मात्र आश्चर्य करण्याची वेळ आली.  ऐंशी वर्षांची ही म्हातारी, आणि श्रीखंड-पुरीचा बेत करतेय. तेसुद्धा या टाळेबंदीत!

मी जेव्हा दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉल लावला तेव्हा मात्र  बेबी मावशीनं फोन पटकन उचलला. तिचा तो शांत, समाधानी चेहरा पाहिला आणि खूप बरं वाटलं. फोनसमोर नीटनेटकी, छानशी साडी नेसून बसली होती बेबी मावशी. कानात हिऱ्याच्या कुडय़ा, गळ्यात सोन्याची माळ आणि चेहऱ्यावर ते नेहमीचं हास्य..

‘‘वाढदिवसाच्या तुला खूप खूप शभेच्छा..’’ का कुणास ठाऊक पण माझा गळा दाटून आला होता.

‘‘खूप खूप धन्यवाद चित्रा. बराच वेळ तुला ताटकळत ठेवलं गं. सकाळपासून फोनवर फोन येताहेत. कुणाशीच धड बोलता आलं नाही बघ. त्या ‘चिऊताई, चिऊताई दार उघड’ गोष्टीचीच आठवण झाली बघ. ‘थांब मी जरा झाडून घेते’, ‘ थांब मी जरा भांडी घासते’, ‘थांब मी जरा भाजी चिरून ठेवते,’ असंच चाललंय बघ सकाळपासून. माझ्याच्यानं भरभर कामं होत नाहीत गं आताशा,’’ ती हसत हसत म्हणाली.

‘‘तरी बरं..’’ ती बोलतच राहिली. ‘‘आज नेहमीपेक्षा लवकरच उठले. केसांकडे पार दुर्लक्ष झालं होतं गं या टाळेबंदीत. आज आधी ‘डाय’ लावून केस ठाकठीक केले. अमेरिकेहून पोरांचे फोन येण्याआधी मला तयार नको का व्हायला? ‘बर्थडे गर्ल’ म्हणून  शोभून दिसले पाहिजे ना आज!’’ असं म्हणून स्वत:च खोखो हसली.. ‘‘नंतर अंघोळ, पूजा, स्वयंपाक करता करता पोरांचे फोन आलेच. इकडे येऊ न शकल्यानं खूपच हिरमुसली होती. पण सगळ्यांशी मी मनसोक्त गप्पा मारल्या. अगदी ‘करोना’वरचे विनोद सांगून पोट दुखेपर्यंत नातवंडांना हसवलं बघ.’’

तिच्या अंगात संचारलेला तो उत्साह बघून मी थक्कच झाले. ‘‘बेबी मावशी, तुझ्या या उत्साहाला, या ऊर्जेला अगदी त्रिवार सलाम! ‘हॅट्स ऑफ’!  किती टवटवीत दिसतयेस तू. कोण म्हणेल ही ऐंशी वर्षांची म्हातारी आहे म्हणून? तू तर अठरा वर्षांची नवतरुणी शोभतेस. खरं म्हणजे किती थाटात आपण तुझा वाढदिवस साजरा करणार होतो गं. पण या नतद्रष्ट ‘करोना’मुळे तू अगदी एकटी पडलीस. पुण्याहूनसुद्धा येऊ शकलो  नाही आम्ही. खूप वाईट वाटतं बघ..’’, बोलता बोलता माझा चेहरा अगदी रडवेला झाला.

‘‘अगं एवढं काय त्या टाळेबंदीचं स्तोम माजवतेस? मी पाहा, कसा मस्तपैकी माझा ‘हॅपी बर्थडे’ साजरा करणार आहे. सकाळी आधी रामायण, महाभारत बघीन. मग श्रीखंड-पुरीचं भरपेट भोजन झोडीन. दुपारी नेहमीसारखी गाण्याची पेटी वाजवीन. आज यांच्या आवडीची भजनं वाजवणार आहे. आयुष्याच्या संध्याकाळी ही पेटीच खऱ्या अर्थानं संवादिनी झाली बघ माझी. तिच्याशी माझा संवाद वाढला आणि मला जगण्याचा सूर गवसला. अगं, शेजारचे संतोष, वैशाली तर इतके प्रेम करतात माझ्यावर. संध्याकाळी केक घेऊन येणार होते माझ्यासाठी. पण मीच नको म्हटलं. ‘सोशल डिस्टन्सिंग’ नको का पाळायला? उगाच काही वेडंवाकडं  झालं तर पोरांच्या जिवाला तिकडे अमेरिकेत घोर लागायचा. हे ‘साथसोवळं’ पाळणं, घरातच राहणं आणि हात ‘चोळत’ बसणं, ही त्रिसूत्री मी आवर्जून पाळते बरं,’’ ती हसून म्हणाली. ‘‘ऐंशीवा वाढदिवस थाटात झाला नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. सहस्रचंद्रदर्शन सोहळा करूयाच की हे संपल्यावर.  तेव्हा करू धमाल. अगं, अनंताकडे नेणारा हा माझा प्रवास. आता येणारा प्रत्येक दिवस माझा वाढदिवसच समजा.  माझ्या नावातल्या बेबीसारखाच नाचत, बागडत हा प्रवास मी पार पाडीन.’’

त्यानंतरही बेबी मावशी माझ्याशी बराच वेळ बोलत होती. जुन्या आठवणी सांगत होती. फोन बंद करण्याआधी मी तिला परत एकदा भरभरून शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर दिवसभर मी बेचैनच होते. आयुष्य अगदी चवीनं जगणारी माझी बेबी मावशी. तिच्या या वाढदिवशी खूप माणसं हवी होती. ‘करोना’ची ही ‘न भूतो न भविष्यति’ आपत्ती आयुष्याच्या संध्याकाळी बेबी मावशीच्या तरी नशिबी नको होती, असं वाटून गेलंच. ती मात्र मस्त आनंदात होती.. ऐंशी वर्षांची तीच तर परिपक्वता होती..

पत्र लिहिणाऱ्यांसाठी

वाचकहो, चतुरंग पुरवणीतील लेखांवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया पाठवत असता त्याबद्दल धन्यवाद. ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत यासाठी काही सूचना-

पत्र मराठीतून (देवनागरी) असतील तरच ती प्रसिद्ध केली जातील. केवळ लेख छान आहे, आवडला, पटला, अशी एका शब्दांची, वाक्यांची पत्रे प्रसिद्ध केली जाणार नाहीत. एखाद्या लेखावर मत मांडणारी, चर्चा घडवून आणणारी पत्रे आम्हाला निश्चितच प्रसिद्ध करायला आवडतील. इमेलवरील लेख पीडीएफ तसेच ओपन, आरटीएफ किंवा डॉक्स फाईल्स मध्ये असावा हस्तलिखित पत्रं पाठवण्यासाठी आमचा पत्ता : ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com  अथवा chaturangnew@gmail.com