मुलं सहलीला जाऊन आली तरी दमत नाहीत, कारण त्यात मेंदूच्या दोन्ही भागांना चालना मिळते. स्नेहसंमेलन, खेळाचे तास असतात तेव्हा मुलांना आनंद मिळतो. कारण त्या वेळी हालचाल होते. हालचाल होणं केवळ शरीराचंच नाही, तर बुद्धीचंही टॉनिक आहे. पण शाळेत एका बाकावर बसून जखडलेली व मेंदूला काम न मिळाल्यामुळे दमलेली मुलं घरोघरी दिसून येतात. ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून एकाच प्रकारचं काम रोज करणारे आई-बाबाही त्यामुळेच दमतात.
आपल्याला काय आवडतं, काय केलं तर आपल्याला छान वाटतं, आपल्याला कसे मित्र-मत्रिणी आवडतात, रिकामा वेळ कसा घालवतो, आपण विचार कसा करतो, निर्णय काय घेतो, अभ्यास आणि करिअरचा विचार कसा करतो, या सर्व गोष्टी आपल्या मेंदूतली काही क्षेत्रं ठरवत असतात. एकूण विचार केला तर आपण आजवर आयुष्यात जे महत्त्वाचे निर्णय घेतले ते कशाच्या आधारावर घेतले, यावरही मेंदूचा- असं म्हणण्यापेक्षा मेंदूतल्या विशिष्ट क्षेत्रांचा- प्रभाव असतो.
आपल्याला हे माहितीच आहे की, मेंदूचे दोन भाग असतात. एक डावा आणि दुसरा उजवा. मेंदूचा डावा भाग हा उजव्या शरीराचं नियंत्रण करतो आणि उजवा मेंदू हा डाव्या शरीराचं नियंत्रण करतो हेदेखील माहीत असतंच. मेंदूत वेगवेगळी कामं करणारी जी क्षेत्रं आहेत, ती या दोन्ही भागांत मिळून विभागलेली आहेत.
– मेंदूच्या डाव्या भागात भाषा, विचार, गणित, तर्क यांची केंद्रं आहेत, तर उजव्या भागात भावना, कला, सृजनशीलता यांची केंद्रं आहेत.
– डाव्या मेंदूत व्यवहाराची कामं चालतात. धोरण ठरवण्याचं काम डाव्या मेंदूचं. हा वस्तुनिष्ठ विचार, एखाद्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करतो. विज्ञानाचं काम या क्षेत्राकडे सोपवलेलं आहे.
 – उजव्या मेंदूला कल्पनाविलास आवडतो, हा मेंदू व्यक्तिनिष्ठ विचार करतो. धाडस करणं हे या मेंदूचं काम असतं. चित्र आणि वेगवेगळ्या कला हे उजव्या मेंदूंचं महत्त्वाचं माध्यम आहे. मनस्वीपण हा उजव्या मेंदूचा गुण आहे. याचा तपशिलात विचार करू या.
 उदाहरणार्थ,
१) आपण बोलत असतो तेव्हा डाव्या भागात ब्रोका केंद्रात भाषेचं काम चालू असतं. पण ज्या वेळेला आपण पुस्तक वाचत असतो, तेव्हा डाव्या भागात मुख्य काम चालतं. मात्र पुस्तक वाचणं म्हणजे शब्द (चित्र) वाचताना उजव्या मेंदूतल्या काही भागांचं सहकार्य मिळत असतं.
२) आपण भाषा ऐकत असतो तेव्हा ब्रोका केंद्र + ऐकण्याचं काम करणाऱ्या टेम्पोरल लोबचं सहकार्य होत असतं. हा टेम्पोरल लोब दोन्ही अर्धगोलांमध्ये असतो. तसेच ऐकलेलं समजून घेण्याचं कामही चालू असतं.
३) आपण जर एखादं गाणं ऐकत असू तर भाषा + संगीत + गाण्यातल्या भावना + त्यातून आपल्या मनासमोर उभं राहणारं एक कल्पनाचित्र या साऱ्याचा मेळ साधला जातो. यामुळे डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही अर्धगोलातल्या जास्तीत जास्त केंद्रांना काम मिळतं.
मेंदू जेव्हा कोणतंही काम करीत असतो, त्या वेळेला कधी डाव्या, कधी उजव्या तर कधी दोन्ही अर्धगोलांना चालना मिळण्याचं काम होत असतं.
वर्गात काय घडतं?
आता आपण शाळेतला पारंपरिक वर्ग डोळ्यासमोर आणू. उत्साहाने रसरसलेली, ज्यांचा मेंदू दर क्षणाला नवीन खाद्य खायला मागत असतो, असे पन्नास-साठ मेंदू तिथं असतात. त्यांच्यासमोर शिकवणं चालू असतं, ते खडू-फळा यांच्या साहाय्याने. या वर्गात कोणत्या भागाला जास्त काम असतं, ते बघू. शिक्षक पुस्तकातला धडा वाचून दाखवत आहेत, मुलं ऐकत आहेत. – डाव्या मेंदूला काम.
शिक्षक फळ्यावर लिहीत आहेत. मुलं बघत आहेत. – डाव्या मेंदूला काम.
मुलं वाचन करताहेत. लेखन करताहेत. – डाव्या मेंदूला काम.
समोर पाठय़पुस्तक आहे. त्यात अक्षरं जास्त, चित्रं कमी. चित्रं रंगीत असतीलच असं सांगता येत नाही. – म्हणजे पुन्हा डावा मेंदूच.
यातल्या भाषेच्या पाठय़पुस्तकांमध्ये आवडतील अशा, भावनांना साद घालतील अशा गोष्टी असतीलही; पण धडय़ाखालच्या प्रश्नांमुळे पुन्हा उत्तर भावनांमध्ये द्यायचं नाही.  प्रश्नांची उत्तरं देणं हे डाव्या मेंदूचं काम.
वर्गामध्ये बहुतेकदा डाव्या मेंदूला काम असतं.
 वास्तविक विचार करणं, तर्क करणं, अंदाज बांधणं, तपासून घेणं, प्रश्न पडणं, प्रश्न विचारणं, प्रश्नांची उत्तरं मनाच्या साहाय्याने शोधणं हे याच डाव्या मेंदूचं महत्त्वाचं काम आहे, पण त्याला चालना कमी दिली जाते.
 विचार करण्याचं काम सोपवलं जातंच नाही. तपशिलात जाऊन निष्कर्ष काढण्याचं काम बहुतेकदा सोपवलं जात नाही. प्रश्न विचारलेले चालत नाहीत. पाठय़पुस्तकाच्या बाहेर जाऊन निष्कर्ष काढणं हे मुलांचं काम नसतंच, त्यासाठी गाइड्स असतात. म्हणजे डाव्या मेंदूलाही पूर्ण न्याय दिला जात नाही. फक्त ऐका. पाठ करा. लिहा. वाचा. इतकीच शिक्षक-पालकांची अपेक्षा असते.
 पूर्ण मेंदू वापरण्याची १०० टक्के क्षमता असताना केवळ वाचन-लेखन करायला मुला-मुलींना भाग पाडायचं, याने मेंदूला कंटाळा येतो. तो थकतो.
वास्तविक मेंदूला नवीन गोष्टी शिकायला-करायला हव्या असतात. पण आपल्या शिक्षणपद्धतीत त्याला काही आव्हानच उरत नाही.
सध्याच्या पारंपरिक वर्गामध्ये जे चालतं ते अजिबातच चालू नये, असं आपण म्हणू शकत नाही. अभ्यास-गृहपाठ यात लेखन-वाचनाचा काही एक भाग राहणारच आहे. पण केवळ तोच एक भाग राहून चालणार नाही. हे मेंदूला घातक आहे. कारण यामुळे मुलांना भयंकर सुस्ती येते. त्यांना वाचन-लेखनाचा कंटाळा का येतो, याचं प्रमुख कारण इथं आहे. मुलं अशा सुस्तीतच टी.व्ही.देखील बघतात. बघत राहायचं, ऐकत राहायचं. मेंदूला काही काम द्यायचं नाही. कारण त्याला तशीच सवय लागलेली आहे. जे शाळेत करायचं, तेच घरी करायचं. शाळेत डाव्या मेंदूच्या ठरावीक केंद्रांना काम, टय़ूशनला तेच आणि गृहपाठातही तेच. हे टाळायला हवं. यामुळे मेंदूघातक गोष्टीच घडत राहतात.
 दोन्ही बाजूंना काम हवं
यावर उपाय म्हणून मुलांना १०० टक्के मेंदू वापरायला द्यायला हवा.
– भाषा असेल तर त्यात सर्जनशीलताही हवी.
– गणित असेल तर त्यात संगीत गुंफायला काय हरकत आहे? संगीताच्या तालावर पाढे म्हटल्याने दोन्ही अर्धगोलांना चालना मिळते.
– विज्ञानात आकृत्या असतात. तसं रंगीत चित्रांतूनही विज्ञान समजून घेता येईल का?
– तर्कनिष्ठ विचार हवेत, लॉजिक कसं वापरायचं असतं याच्याही संधी द्यायला हव्यात.
– एखादी गोष्ट आवडली की नाही, ती योग्य वाटते की नाही, हे मोकळेपणाने सांगताही आलं पाहिजे. मुलांच्या भावनांना, त्यांच्या मतांना शालेय वर्गामध्ये कुठं स्थान असतं? भीती, अपमान, शिक्षा या नकारात्मक भावना मात्र उफाळून येतात.
जास्तीत जास्त मेंदू वापरला जाईल, तेच खरं शिक्षण म्हणावं लागेल. नाही तर निवडक केंद्रांना काम दिलं तर पूर्ण शिक्षण होत नाही. किमान आठ वर्षांपर्यंतच्या वर्गामध्ये तरी वातावरण हे सहज हवं.
सहलीला मुलं जाऊन आली तरी दमत नाहीत, कारण त्यात दोन्ही भागांना चालना मिळते. स्नेहसंमेलन, खेळाचे तास असतात तेव्हा मुलांना आनंद मिळतो, हालचाल होते. हालचाल होणं केवळ शरीराचंच नाही तर बुद्धीचंही टॉनिक आहे. पण शाळेत एका बाकावर बसून जखडलेली व मेंदूला काम न मिळाल्यामुळे दमलेली मुलं घरोघरी दिसून येतात. ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून एकाच प्रकारचं काम रोज करणारे आई-बाबाही त्यामुळेच दमतात.
पूर्ण मेंदू वापरण्याच्या या प्रक्रियेला ‘होल ब्रेन िथकिंग’ म्हणतात. तो वापरला गेला की आपण आपसूकच ताजेतवाने राहतो. याला वयाचं बंधन नाही. परीक्षेच्या काळात मुलांचे खेळ बंद होऊ नयेत. त्यातून मेंदूला ऊर्जाच मिळत असते.
  प्राधान्याने विचार कोणत्या बाजूचा?
डाव्या मेंदूची आणि उजव्या मेंदूची कामं आपण साधारणपणे समजून घेतली.
– आपल्यात काही जण हे प्राधान्याने डाव्या बाजूने विचार करणारे असतात, तर काही जण उजव्या मेंदूने विचार करणारे असतात. करिअर निवडीत, निर्णयप्रक्रियेतही मेंदूच्या क्षेत्राचं प्राधान्य दिसून येतं.
जे लोक कलेत रमतात, त्याचाच व्यवसाय करतात. त्याचा प्राधान्याने उजवा मेंदू काम करीत असतो. जे लोक विज्ञान-गणिताची व्यवसायासाठी निवड करतात, त्यांचा डावा मेंदू प्रभावशील असतो.
 काही जण दोन्हीचा समन्वय साधू शकतात.
– आपली शिक्षणपद्धती डाव्या मेंदूला प्राधान्य देणारी असली तरी केवळ काहीच केंद्रांना काम दिल्यामुळे भारतीय समाजाच्या विचारक्षमतेला म्हणावा तसा न्याय मिळालेला नाही. विचारप्रक्रियेतही डाव्या आणि उजव्या मेंदूचा समतोल साधायला हवा. एकूण भारतीय समाजाचा विचार करता आजही आपला समाज मुख्यत्वे भावनांच्या आधारे निर्णय घेतो असं दिसतं. उदा. नेते, आध्यात्मिक पुढारी यांच्या भावनिक आवाहनांना समाज बळी पडतो. अजूनही जातीपातीच्या आधारावर मते देतो. तपशिलात जाऊन बुद्धीच्या आधारे निर्णय घेणं हे जमत नाही. हे जमण्यासाठी  प्रत्येक निर्णयात भावना आणि बुद्धी दोन्हीची गुंफण हवी. केवळ भावनांच्या आहारी जाऊन वाहवत जाणं जसं योग्य नाही, तसंच व्यक्तींच्या मनाकडे- भावनांकडे दुर्लक्ष करणं हेही योग्य नाही. लहानपणापासून निर्णयक्षमता या दृष्टीने विकसित करीत न्यायला हवी. १०० टक्के मेंदू वापरायला शिकवलं पाहिजे. आजची महत्त्वाची गरज ही आहे.
१ि२ँ१४३्रस्र्ंल्ल२ी@ॠें्र’.ूे

health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Here’s why you should start your day with fenugreek seeds or methi water
सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मेथीचे पाणी का प्यावे? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…
मेंदूतील केमिकल लोच्या!
Changes in transport on the occasion of Shri Sant Tukaram Maharaj beej sohala
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; ‘असा’ आहे बदल