15 October 2019

News Flash

सौंदर्यातली रिस्क?

नदीच्या पाण्यात पहिल्यांदा प्रतिबिंब पाहिलं तेव्हा नवयौवनेला सौंदर्याचं रहस्य उमगलं की प्रियकराच्या नजरेनं तिला पहिल्यांदा सुंदर असण्याची जाणीव दिली कुणास ठाऊक! पण अगदी प्राचीन काळापासून

| April 11, 2015 01:01 am

womanya4नदीच्या पाण्यात पहिल्यांदा प्रतिबिंब पाहिलं तेव्हा नवयौवनेला सौंदर्याचं रहस्य उमगलं की प्रियकराच्या नजरेनं तिला पहिल्यांदा सुंदर असण्याची जाणीव दिली कुणास ठाऊक! पण अगदी प्राचीन काळापासून आपण सुंदर दिसावं, आकर्षक असावं, कुणाला तरी आवडावं ही भावना प्रत्येकाच्याच मनाच्या खोल गाभाऱ्यात दडी मारून बसलेली असते, निदान यौवनात तरी..
पण आज आरशाचं गुपित, प्रियकराची नजर असल्या भानगडींच्या पलीकडं अनेकजण पोहोचले आहेत. स्वत:ला कायम आकर्षक ठेवायचं, तरुण ठेवायचं, शरीराचा डौल कायम ठेवायचा आहे तर सरळ सर्जरी करून मोकळं व्हायचं.. हा सोपा (?) पण खर्चीक उपाय सर्वमान्य झालाय.. पण तो जिवावरही बेतू शकतो.. हे नुकतंच घडलंय कॅथरीन कॅन्डो या सौंदर्यवतीच्या बाबतीत. इक्वादोरमधली १९ वर्षीय कॅथरीन गेल्या वर्षअखेरीस झालेल्या सौंदर्यस्पर्धेतली विजेती होती. क्वीन ऑफ डय़ुरान खिताब तिला मिळाला आणि त्याबरोबर तिला मिळाली एक कार, टॅब आणि ब्युटी ट्रीटमेंटचं फ्री पॅकेज. तेच फ्री लायपोसक्शन (शरीरातील चरबी वितळवणे वा काढून टाकणे) करायला गेलेल्या कॅथरीनला हृदयविकाराचा झटका येऊन ती शस्त्रक्रियेनंतर वारली आणि एका सौंदर्यस्वप्नांची राख झाली. तिच्या आधी ब्राझीलची टीव्ही मॉडेल पमेला नासिमेन्टो या २७ वर्षीय तरुणींचाही असाच करुण अंत झाला तोही सर्जरीच्या टेबलवरच. सर्जनला अटक केली गेली आहे. पण सौंदर्याच्या अतिहव्यासापोटी हे होतंय का? कारण पमेलाची पोट सपाट करण्याची ही म्हणे तिसरी शस्त्रक्रिया होती.
आधुनिक विज्ञानाची कास धरून विकसित झालेल्या सौंदर्यक्षेत्रातल्या या तंत्रज्ञानानं, कॉस्मेटिक वा अ‍ॅस्थेटीक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, लायपोसक्शन, लेझर ट्रिटमेंटने म्हणता म्हणता चिरतरुण राहणं शक्य केलं. जन्मजात व्यंग काढून टाकणं या शस्त्रक्रियांनी शक्य आहे, हे या संशोधनाचे उपकारच आहेत. मात्र त्याही पलीकडे केसांचं पुनरेपण, सुरकुत्या काढणं, गालाची ठेवण, नाकाचा आकार बदलणं.. (मायकल जॅक्सन पूर्वीचा आणि नंतरचा आठवून पाहिलं तरी हा फरक लक्षात येईल.) या गोष्टी सहज होऊ लागल्या. अर्थात काही हजार किंवा लाखो रुपये खर्च करू शकणारेच असे ‘सुंदर’ दिसू शकतात. परंतु आज जगभरातला हा मोठा ‘बिझनेस’ झाला आहे.
जगभरातल्या अशा कॉस्मेटिक सर्जरीज होण्याच्या आकडय़ांत वर्षोगणिक करोडोंनी वाढ होते आहे. आणि त्यामुळे त्यातल्या अर्थकारणातही! एकटय़ा अमेरिकेतच गेल्या वर्षी १२ अब्ज डॉलर्सचा बिझिनेस झालाय. आणि गमतीचा भाग म्हणजे तिथे अशा शस्त्रक्रिया करणाऱ्यांत ४३ टक्के पुरुष आहेत, आता बोला! म्हणजे हे वेड स्त्रियांपुरतं मर्यादित न राहता आता पुरुषांनाही त्याने आपल्या पकडीत घेतलेलं दिसतंय.
आणि भारताच्या बाबतीत बोलायचं तर जगभरातल्या पहिल्या दहा कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्या देशांमध्ये आपला क्रमांक दहावा आहे, पण अर्थातच थायलंड, तैवान नंतर!
सुंदर, डौलदार दिसायच्या नादात कॅथरिन, पमेलाचं आयुष्य खर्ची पडलं, तशी रिस्क आहेच, थोडे-अधिक दुष्परिणामही आहेत, पण ती जोखीम पत्करून चिरतरुण राहू शकण्याची सोय झालीय..
वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय, ययातिच्या काळात अशा शस्त्रक्रिया असत्या तर निदान पुरुलाही आपलं तारुण्य योग्यवेळी उपभोगता आलं असतं! ..

जगा आणि मुलांनाही जगू द्या

‘आई’ या शब्दाला लगडलेले सारे गुणावगुण सार्वत्रिक आहेत. ‘प्रेमस्वरूप आई..’ चे गोडवे आपण वर्षांनुवर्षे गात आलो आहोत. पण नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आधुनिक जगातल्या, तेही जगभरातल्या आईला मात्र अवगुणांनी अगदी नको जीव केलं आहे. आपण कित्ती कित्ती वाईट आई आहोत, हे इतरांनी सांगण्यापेक्षा तीच स्वत:ला सांगत राहते आणि स्वत:ला छळ छळ छळते. पण मातांनो, इकडे लक्ष द्या. अमेरिकेतल्या जेसीका वालेन्टीच्या अभ्यासपूर्ण लेखाद्वारे असं सिद्ध झालंय की या स्वत:ला फटके मारण्याच्या नादात तुम्ही स्वत:बरोबर तुमच्या मुलांचं नुकसान करता आहात. कारण तुमचे ताणतणाव थेट त्या मुलांपर्यंत पोहोचताहेत, हे तुमच्या लक्षातही येत नाहीए.
त्यांना आनंदी आयुष्य द्यायचं असेल तर तुम्ही अपराधगंड काढून आनंदी राहायला हवं कारण आईने शारीरिकदृष्टय़ा जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर राहिलं तर आणि तरच मुलांची प्रगती होऊ शकते, याबद्दल कोणतीही साधार आकडेवारी अजूनतरी प्रसिद्ध झालेली नाही.
तेव्हा मातांनो, आज मला कामावर इतके तास थांबावं लागलं, ओव्हरटाइम करावा लागला तर लगेच अस्वस्थ होऊ नका. आई काही दिवस, काही तास उशिरा आली तरी मुलं त्याच्याशी जुळवून घेऊ शकतात. मुलांबरोबर आईने सतत राहायला हवं, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही, आईच सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार असते, ब्ला ब्ला ब्ला. हे सगळं समाजानं तुमच्यावर लादलेलं आहे, हे लक्षात घ्या.
शिवाय या अभ्यासातून हेही लक्षात आलंय की अगदी लहान मुलांपेक्षा पौंगडावस्थेतील मुलांना तुमच्या असण्याची जास्त गरज असते. तेव्हा नोकरी-व्यवसायाच्या तुमच्या उमेदवारीच्या काळात अपराधगंडामुळे करिअरकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमचं शिक्षण, समाजातला दर्जा, तुमची मिळकत या गोष्टी मुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्या आधारेच तुम्ही मुलांना योग्य शिक्षण, संगोपनासाठी सपोर्ट सिस्टिम तयार करू शकता आणि उरलेला जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबर सकसपणे, आनंदात घालवू शकता. तेव्हा व्यग्र मातांनो, टेन्शन सोडा. अपराधगंड काढून जगा आणि जगू द्या!

फर्टिलिटी टुरिझम
फर्टिलिटी टुरिझम.. शेवटी हाही शब्द कानी पडलाच! फुड टुरिझम, मेडिकल टुरिझम, सेक्स टुरिझम हे सगळे निश प्रकार झाल्यानंतर आता ‘फर्टिलिटी टुरिझम’ हाही शब्द रूढ व्हायला हरकत नव्हतीच. अर्थात टुरिझममधला आनंद, साहस यात नाही, उलट आशा निराशेचा खेळच जास्त आहे. कारण बाळ होणं न होणं, अनेकांचं मातृत्व, पितृत्व त्यात पणाला लागलेलं असतं.
आपल्या देशापेक्षा इतर देशांत अधिक चांगल्या, यशस्वी पद्धतीने, स्वस्तात, आयव्हीएफ, आयवीआय तंत्रज्ञानाद्वारे बाळ जन्माला घालण्याची सोय झाल्यामुळे ‘फर्टिलिटी टुरिझम’ला चांगले दिवस आलेले आहेत, असं म्हणावं लागेल. सरोगसी वा गर्भ भाडय़ानं देण्याच्या बाबतीत भारत त्यातही गुजरातमधील आणंदचं नाव घेतलं जातं, पण आता यशस्वी आणि त्यातल्या त्यात स्वस्त आयवीआय (कश्क) उपचारासाठी स्त्रियांनी, विशेषत: ब्रिटिश स्त्रियांनी स्पेनची वाट धरली आहे. याचं एक कारण ब्रिटिश कायद्यानुसार आपल्या जन्माला कारणीभूत शुक्राणू वा बीजांडं देणारी व्यक्ती कोण हे ते मूल १८ वर्षांचं झालं की जाणून घेऊ शकतं. त्या कायद्याला नुकतीच, १ एप्रिलला दहा वर्षे पूर्ण झालीत. त्यामुळे साहजिकच शुक्राणू वा बीजांडे देणाऱ्या – (स्पर्म वा एग डोनेट करणाऱ्यांच्या) संख्येत प्रचंड घसरण झाली. आणि इंग्लंडमधल्या पालक होऊ इच्छिणाऱ्यांना दुसऱ्या देशाचा मार्ग धरावा लागला आहे.
स्पेनमध्ये गेल्या दहा वर्षांत अशा गर्भधारणा करून घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये ६० टक्क्य़ांनी वाढ झालेली आहे. स्पेनमध्ये १७ आणि लॅटीन अमेरिकेत ७ आयवीआय तंत्रज्ञानाची फर्टिलिटी क्लिनिक्स आहेत आणि इंग्लंडपेक्षा २०-२५ टक्के कमी खर्चाचं असून देखील तेथे सुमारे १० कोटी रुपयांचा बिग बिझनेस होतो आहे. अर्थात या तंत्रज्ञानामुळे गर्भ राहणं आणि प्रत्यक्ष निरोगी मूल जन्माला येणं यांच्या आकडय़ांत तफावत आहेच. मात्र पाळीच्या एक, दोन किंवा तीन सायकलचा वापर करत यशाकडे वाटचाल होत असते.
खरं तर १९७८ मध्ये आयवीएफ तंत्रज्ञानामुळे लुईस ब्राऊन ही जगातली पहिली टेस्ट टय़ूब बेबी जन्माला आली आणि आपलं मूल नसण्यानं होणाऱ्या मानसिक किंवा खरं तर सामाजिक कोंडीतून असंख्य स्त्रियांची सुटका झाली. पण त्यातूनच आपल्या बीजाचं बाळ मिळावं यासाठी आपल्या शरीरावरच प्रयोगांची किंवा औषध-उपचारांची पराकाष्टा करणाऱ्यांची संख्याही वाढत गेली..
मात्र एवढं सगळं केल्यावर हातात जेव्हा आपलं बाळ येतं तेव्हा कुठे या सगळ्या प्रयत्नांना अर्थ येतो. त्या साऱ्या अर्थासाठीच तर फर्टिलिटी टुरिझम सुरू झालंय..
आरती कदम – arati.kadam@expressindia.com
संदर्भ- ‘मॅरेज अ‍ॅण्ड फॅमेली’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या तीन नामवंत विद्यापीठातील तज्ज्ञ अभ्यासकांच्या लेखांचा आधार घेत जेसीका वालेन्टीन यांचा ‘गार्डियन’ मधील लेख.
फर्टिलिटी – टेलीग्राफ, विकीपीडिया
कॉस्मेटिक सर्जरी – द मिरर वेबपेज,
मेल ऑनलाइन

First Published on April 11, 2015 1:01 am

Web Title: beauty risk
टॅग Children,Mother