|| मंगला जोगळेकर

व्यायामाचे फायदे आपल्याला खरंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. पण व्यायामामुळे के वळ ताकदवान, ताजंतवानं शरीरच कमावता येतं असं नाही. तर मेंदूही तल्लख होतो. व्यायाम आणि मेंदूचा हा संबंध आतापर्यंत विविध संशोधनांमधून समोर आला आहे. त्यामुळे आपला मेंदू दीर्घकाळ कृतिशील राहावा असं वाटत असेल तर आपल्या मेंदूच्या यंत्राला व्यायामाचं नियमित वंगण घालायला हवं.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?

अन्न, पाण्याशिवाय शरीर जगू शकत नाही हे आपल्याला माहीत असतं. पण त्याचबरोबर शरीराला शक्ती, उत्साह, आरोग्य यांची साथ मिळण्यासाठी आवश्यक असतो तो व्यायाम. आज व्यायामाची महती माहीत नाही असा विरळाच. शरीराला व्यायामाची जोड मिळाली तर शरीराकडून असाध्य गोष्टी करणं शक्य आहे. व्यायाम शरीराला फायदेकारक आहे, हे तर आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. पण आपल्याला हे ठाऊक नसेल, की व्यायाम हा मेंदूसाठीही उपयुक्त आहे. व्यायामाचे फायदे मनाला- म्हणजेच मेंदूलाही मोठ्या प्रमाणावर होतात.

व्यायामाच्या फायद्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी ताडलं आहे, की व्यायामाचा सर्वप्रथम फायदा कुणाला होत असेल, तर तो मेंदूला होतो. आणि मेंदूला फायदा झाल्यामुळेच तो शरीरालाही जाणवतो. मेंदूचं वय वाढलं तरी त्याला नव्यानं पालवी फुटू शकते, तो फोफावू शकतो, हे आपण बघितलं आहे. नियमित व्यायामामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. त्यामुळे प्राणवायू आणि इतर पोषक द्रव्यांचा सुरळीत पुरवठा होतो. मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात. त्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी नवीन रक्तवाहिन्यांचे मार्ग तयार होतात. मेंदूतील न्युरोट्रान्समीटर्सचं, प्रथिनांचं उत्पादन वाढतं. मेंदूला होणाऱ्या फायद्यामुळे सर्व शरीरच एखादं झाड बहरावं तसं फुलून येतं, हे पटवून देणारे शेकडो अभ्यास गेल्या दहा-वीस वर्षांतील आहेत.  मेंदूचं कार्य सुधारल्यामुळे अभ्यास करताना किंवा नवीन माहिती ग्रहण करताना मेंदू सज्ज असतो. व्यायामानंतर केलेला अभ्यास जास्त काळ स्मरणात राहातो आणि माहिती साठवण्याची पुढील पायरीही पद्धतशीरपणे पार पडते. विचार करण्याची क्षमता वाढते. त्याच्या परिणामामुळे स्मरणशक्तीला नवीन तेज प्राप्त होतं. हे फायदे मिळवायला वर्षानुवर्षं व्यायाम करायला हवा असंही काही नाही. केवळ तीन महिने नियमित व्यायाम करूनही मेंदूतील स्मरणशक्ती टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भागाचं कार्य सुधारलेलं दिसतं. ‘लो इन्टेंसिटी’ एरोबिक स्वरूपाचा व्यायाम करणाऱ्या गटाच्या अभ्यासातून असं दिसलं, की भाग घेणाऱ्यांच्यात मेंदूच्या स्मरणशक्तीसाठी महत्त्वाच्या भागाचा रक्तपुरवठा सुधारला, तसंच स्मरणशक्तीच्या चाचणीमध्येही त्यांची  कामगिरी अव्वल ठरली.

लक्षावधी वर्षांपूर्वी जेव्हा मानवजात जन्माला आली, तेव्हापासून अगदी आता आतापर्यंत शरीराची हालचाल केल्याशिवाय माणसाचं जगणं अशक्य होतं. परंतु गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून यंत्रयुगानं मानवी जीवनावर कब्जा करत करत त्यात एवढं परिवर्तन केलं आहे की माणसाची लवचीकताच हरपत चालली आहे.  मानवजात अस्तित्वात आल्यानंतर तिचं आयुष्य जगण्यासाठी अन्न गोळा करणं, या एकाच उद्दिष्टाभोवती फिरत होतं. अन्न मिळवण्यासाठी मैलोन्मैल चालणं, डोंगरांची चढउतार करणं, लाकडं तोडणं, इत्यादी केल्याशिवाय अन्नप्राप्ती होत नव्हती. पाच लाख वर्षं हे एकच ध्येय असलेल्या मानवाचं जीवन गेल्या दोनशे-पाचशे वर्षांत अक्षरश: ढवळून निघालं आहे. नैसर्गिक नियमापासून दूर गेल्यानं आपलं आरोग्य ढासळत आहे. अमेरिकेत एकंदर साठ टक्के माणसं स्थूल समजली जातात. आपल्या शहरांमधूनही लठ्ठ माणसं लक्षात येतील एवढ्या संख्येनं दिसून येऊ लागली आहेत. बाळसेदार बाळ छान दिसलं, तरी त्याचं बाळसं हे वाढताना गळून न जाता त्याचा झालेला गोलमटोल बाळ्या हे अनारोगी समाजाचं प्रतीक म्हणायला हवं. आजच्या आरामदायक जीवनशैलीमुळे, हॉटेल संस्कृतीमुळे, वाढत्या ताणांमुळे हृदयविकाराच्या संख्येत काळजी वाटावी इतकी वाढ झाली आहे. मधुमेहाच्या आजारानं घरोघरी शिरकाव केला आहे. मधुमेह हा आपल्याबरोबर इतर रोगांचा शरीरात शिरकाव होऊ देतो. पुरेशी हालचाल न होणारं शरीर म्हणजे उद्याच्या आरोग्यप्रश्नांना आजच निमंत्रण देण्यासारखं आहे. अशा रीतीनं आपल्या आयुष्यरेषेची लांबी आपल्या हातानं आपण कमी करतो आहोत. आरोग्यप्रश्नांनी गांजलेल्या मनाकडून चांगल्या स्मरणशक्तीची अपेक्षा तरी कशी धरू शकणार? सुखसोयींनी समृद्ध असलेलं सद्यकालीन मानवाचं जीवन आदिमानवाच्या जीवनापासून वेगळ्या वळणानं जात असलं, तरी माणसाच्या जनुकांमध्ये कोरलेली जीवनपद्धती अजून पुरातनच आहे. अजूनही जीवनासाठी शरीर लवतं ठेवणं, हेच आपल्या जनुकांना हवं आहे. बहुसंख्यांनी स्वीकारलेलं बैठं जीवन हे निसर्गत: उपयुक्त असलेल्या जीवनपद्धतीपेक्षा भिन्न असल्यामुळे व्यायाम करून शरीराला पुरेसं चलनवलन देणं हाच पर्याय आपल्यापुढे आहे.

व्यायामाचे अगणित फायदे

व्यायाम म्हणजे औषधाची स्मार्ट गोळी आहे. त्यामुळे मिळणारे फायदे नुसते लिहायचे तर पंचवीस पानंसुद्धा पुरायची नाहीत. या फायद्यांवर अविश्वास दाखवायचा मुद्दाच उपस्थित होऊ शकत नाही, कारण जगभरातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांत झालेल्या अक्षरश: शेकडो, हजारो अभ्यासांनी या फायद्यांची ग्वाही दिलेली आहे. शिवाय व्यायामाच्या विरुद्ध कुठलाही पुरावा मिळालेला नाही.

डॉ. जॉन रेटी, हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील मानसशास्त्राचे प्राध्यापक  व्यायामाबद्दल आपल्या पुस्तकात लिहितात, ‘मेंदूचं कार्य सुधारण्यात व्यायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो व्यायामाची कास धरेल, तो आपल्या आय़ुष्याचा मार्ग बदलेल, पुढे येणारे अनारोग्याचे काटे आपल्या वाटेवरून दूर करेल आणि आपली जीवनवेल बहरून टाकेल.’ व्यायामाच्या प्रमुख फायद्यांकडे नजर टाकली, तर आपल्याला असं दिसेल की व्यायाम आपल्या प्रयत्नांची सव्याज फेड करतो.

व्यायामामुळे मेंदूची कार्यशैली सुधारते, हा व्यायामाचा खरा फायदा आता लक्षात येत आहे. हृदयासाठी, फुफ्फुसांसाठी व्यायाम चांगला आहे हे व्यायामाचे उपफायदे. व्यायामाचा सर्वांत प्रमुख फायदा मेंदूचं तजेलदारपण हा आहे. मेंदूचं कार्य सुधारल्यामुळे स्मरणशक्तीही सुधारते. मेंदू हा एक स्नायू आहे असं समजलं, तर व्यायामानं जसे हातापायाचे स्नायू मजबूत होताना दिसतात तसा मेंदूसुद्धा शक्तिमान होतो हे मान्य करण्यात दुमत नसावं. जसा मेंदूचा आपल्या वागण्यावर परिणाम होतो तसंच आपल्या वागण्यानं मेंदू प्रफुल्लित होईल की नाही हेही ठरतं. व्यायाम करण्यानं मेंदूकडे आपण नुसतं लक्षच देतो असं नव्हे, तर त्याला जीवन देतो.

व्यायामामुळे हृदय आणि फुफ्फुसांचं कार्य सुधारतं. उच्च रक्तदाब आटोक्यात राहातो. तो कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होतो. त्यामुळे रक्तपुरवठा जास्त सुरळीत होतो.

आयुष्यात उदासीनता जाणवत असल्यास, मानसिक दौर्बल्य आलं असल्यास, औषधांपेक्षाही व्यायामाचा उपयोग जास्त होतो. व्यायामामुळे औदासीन्य कमी होऊन, उत्साहवर्धन होतं. काळजी दूर पळते, तणाव कमी होतात. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून नीरस आयुष्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसतो. निराशाजनक परिस्थितीमध्ये व्यायाम केल्यानं मनावरचं काळजीचं सावट दूर होऊन, शांत मनानं विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थितीतून मार्गक्रमण करणं शक्य होतं, असंही वेगवेगळ्या संशोधनांतून दिसतं.

अर्थातच या तीन प्रमुख फायद्यांशिवायही व्यायामाचे आणखी भरपूर फायदे आहेत.

स्टीफन पटनम हे आपल्या ‘नेचर्स रिटॅलीन फॉर द मॅरेथॉन माइंड’ पुस्तकात म्हणतात, की ‘व्यायामामुळे नवीन ‘स्टेम सेल्स’ (मूळ पेशींची) निर्मिती होते, ज्यामुळे मेंदूसकट इतर अवयवांनाही नवजीवन मिळतं. जसं खत घातल्यामुळे झाड झपाट्यानं वाढतं, अंगोपांगी बहरून येतं, तसाच फायदा आपल्या शरीराला व्यायामानं मिळतो.’ वर उल्लेखलेल्या डॉ. रेटी यांच्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वेगवेगळ्या प्रयोगांत व्यायामाचं योगदान अभ्यासून, व्यायामानं नवीन रंग भरून जीवनाची परिभाषा कशी बदलून टाकली, याचं चित्र रेखाटतं. त्यात मुलांचा लठ्ठपणा कमी व्हावा या उद्दिष्टातून शिकागोजवळील नेपरव्हिल इथल्या शाळेमध्ये केलेल्या व्यायामाच्या प्रयोगाची माहिती आहे. या प्रयोगात व्यायामामुळे मुलांचं वजन कमी झालंच, पण त्यापेक्षाही अनंत फायदे दिसून आले. मुलांची अभ्यासाकडे पाहाण्याची उदासीनता कमी झाली, एकाग्रचित्तता वाढली, त्यांच्या स्वभावात समजूतदारपणा आला. इतरांना मदत करण्याची वृत्ती, सांघिक वृत्ती वाढली. याबरोबर टी.व्ही.समोर घालवला जाणारा वेळ कमी झाला. विशेष म्हणजे गणित आणि विज्ञान विषयातील बुद्धिमत्ता परीक्षेत या मुलांनी खास प्रावीण्य मिळवलं. ‘अटेन्शन डेफिसिट अ‍ॅण्ड हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर.’(अऊऌऊ) असलेल्या मुलांना, पार्किन्सन्स व डिमेंशियाच्या रुग्णांना आणि इत्यादी गंभीर समस्यांसाठीही व्यायामाचा चांगला फायदा होताना दिसतो.

ख्रिश्चन अँडरसन हे सॅन फ्रॅन्सिस्को युनिव्हर्सिटीमध्ये व्यायामतज्ज्ञ म्हणून काम करतात. ते म्हणतात, की ‘व्यायामामुळे सेरोटोनिन, डोपामाइन या उत्साहवर्धन करणाऱ्या रसायनांची निर्मिती होत असल्यानं व्यायामानंतर आपल्या मनाला शांत, आनंदी, उत्साही वाटतं. सुयोग्य विचार करण्याची क्षमता ही व्यायामाची देणगी आहे.’ ते  म्हणतात की, ‘व्यायामातून मिळणारे फायदे हा काही एकट्या दुकट्या व्यक्तीचा अनुभव नाही, तर सर्वमान्य, सर्वपरिचित अनुभूती आहे.’

व्यायाम किती आणि कुठला?

व्यायाम कुठला करावा हा प्रश्नही बऱ्याच जणांना पडतो. व्यायामाचे तीन प्रकार मानले जातात. हृदयासाठी- उदा. एरोबिक किंवा कार्डिओ, शक्तीसाठी वजनं घेऊन व्यायाम (वेट ट्रेनिंग) आणि लवचीकतेसाठीचा व्यायाम- उदा. योगासनं. एरोबिक व्यायामाचा फायदा हृदयाला आणि फुफ्फुसांना होत असल्यानं मेंदूला त्याचा फायदा जास्त होतो. आपल्याकडे योगासनं करणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे, परंतु एरोबिक व्यायाम तितका लोकप्रिय नाही. एरोबिक व्यायाम करण्यासाठी जिममध्येच जायला पाहिजे असंही काही नाही. साधं वेगानं चाललात तरी असा व्यायाम होऊ शकतो. जिन्यानं खालीवर करून, सायकल चालवून, दोरीच्या उड्या मारूनही अशा प्रकारचा व्यायाम होऊ शकतो. चार दिवस एरोबिक, दोन ते तीन दिवस शक्तीसाठी आणि दोन दिवस लवचीकतेसाठी, असं व्यायामाचं नियोजन चांगलं मानलं जातं. सूर्यनमस्कार, जोर, बैठका या आपल्या पारंपरिक व्यायामांमुळेही तब्येत कमावता येते. ज्यांना दुसरंतिसरं काहीच करणं शक्य नाही, त्यांच्यासाठी चालणं हा सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. व्यायामामध्ये शक्यतो वेगळेपण ठेवायला हवं. रोज एकाच प्रकारचा व्यायाम केल्यामुळे शरीराच्या ठरावीक भागालाच फायदा होतो. त्यात वैविध्य आणल्यामुळे शरीराच्या प्रमुख स्नायूंना फायदा होऊ शकतो. अर्थातच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे ज्या व्यायामामुळे मन ताजंतवानं होतं, प्रफुल्ल होतं, तो व्यायाम आपल्याला चांगला, असं ढोबळपणे समजायला हरकत नसावी. व्यायामाचे तुम्ही खूप मोठे फॅन असलात तरीही अति व्यायाम मात्र टाळायला हवा, कारण त्याचा गैरफायदाच जास्त होऊ शकतो.

 व्यायामाच्या चळवळीचं नवं स्वरूप

व्यायाम हे आरोग्य सांभाळण्याचं अस्त्र आहे, हे आता सर्वमान्य झालं आहे. अमेरिकेमध्ये डॉक्टरांमार्फत ‘व्यायाम हेच औषध’ हा संदेश रुग्णांपर्यंत  प्रभावीपणे पोहोचावा म्हणून एक चळवळ चालू झाली आहे. डॉक्टर आणि रुग्णांचं नातं वेगळं असतं. रुग्ण डॉक्टरांचा शब्द मानायला तयार असतात. त्यामुळे व्यायाम चळवळीत डॉक्टरांचा सहभाग मिळाल्यास ही चळवळ यशस्वी होऊ शकते, हे जाणून डॉक्टरांना शास्त्रशुद्ध व्यायामाचं प्रशिक्षण देणं, त्यावर चर्चा घडवून आणणं, हे जोमानं सुरू झालं आहे. याशिवाय व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा इत्यादी गोष्टींचा समावेश असलेले एकात्मिक वैद्यकीय अभ्यासक्रम तयार झाले आहेत. ‘व्यायाम करणारी माणसं सूक्ष्मदर्शक यंत्र घेऊन शोधावी लागत नाहीत. ती आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीमुळे चटकन नजरेत भरतात.’ हे वाक्य मी कुठल्याशा पुस्तकात वाचलं आणि खरंच आपल्या धडधाकट तब्येतीमुळे ओसंडणाऱ्या उत्साहातून, आनंदातून, नवीन शिकण्याच्या वृत्तीतून अशा व्यक्तींचा वेगळेपणा ठसठशीतपणे मला समोर दिसायला लागला. व्यायाम हा शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी आपल्यासमोर असणारा एक राजमार्ग आहे. आपली जनुकं , आपल्या पेशी आणि मेंदूसकट आपलं शरीर ‘व्यायाम कर’ म्हणून आपल्याला साद घालत आहेत.  व्यायामानं उत्तम आरोग्य आणि तल्लख मेंदू कमावून आपला आणि आजूबाजूच्या व्यक्तींचाही भविष्यकाळ उजळून टाकता येईल. मग पुढाकाराचं पाऊल टाकायला आता उशीर कशाला?

mangal.joglekar@gmail.com