News Flash

शब्दांच्या पलीकडले

ज्ञानी माणूस तुमच्या कानांवर आघात करतो. जेणेकरून तुमचे डोळे उघडावे. बळजबरीनं डोळे उघडून उपयोग नाही

| September 28, 2013 01:01 am

ज्ञानी माणूस तुमच्या कानांवर आघात करतो. जेणेकरून तुमचे डोळे उघडावे. बळजबरीनं डोळे उघडून उपयोग नाही, पण शब्दांच्या रूपानं कानावर जो आघात होतो, तो हलकेच डोळ्यांपर्यंत पोहोचतो. हळूहळू डोळे उघडतात. अशी जाग येण्यात एक गोडवा असतो.
गौतम बुद्ध ४० वर्षे बोलत राहिले. सतत बोलत राहिले आणि अखेरीस त्यांनी सांगितलं की, स्वत:च स्वत:चा दीप बनायला हवं. तुम्हाला स्वत:च्या प्रयत्नांन ते जाणता येईल, अनुभूती येईल तेव्हाच ते गवसेल. इतरांनी कितीही सांगितलं तरी काही उपयोग नाही.
ज्ञानी माणूस बोलताना संकोचतो. अज्ञानी माणूस नि:संकोच बोलतो. मोठय़ांदा उच्चरवानं बोलतो. थेट घराच्या छपरावरून सांगतो. ज्ञानी माणूस संकोचतो, दुविधेत पडतो. एक एक पाऊल जपून उचलतो. कारण अगदी सांभाळून बोललं तरी चूक व्हायची शक्यता असते हे त्याला पक्कं ठाऊक असतं. जे सांगायचं ते शब्दात पकडणं मुश्कील आहे हे त्याला माहीत असतं. हे सारं फार कठीण होऊन बसतं. सांगता येत नाही पण सांगितल्याशिवाय राहावत नाही. कारण जे जाणलेलं असतं त्या अनुभवातच इतरांना सहभागी करून घेण्याचा घटक त्यात असतो. आनंदाचा जन्मजात भाव असाच असतो. स्वत:ला वाटत जाणं, वाटता वाटता पसरत जाणं.
जीवनाचा स्वभावच वर्धिष्णू असण्याचा आहे. पसरत जाण्याचा आहे. एक लहानसं बीज तुम्ही धरित्रीच्या गर्भात पेरता. त्यातून एक विराट वृक्ष निर्माण होतो. किती पसरलं ते इवलंसं बीज! यालाच ब्रह्म म्हणतो आपण. एक बीज पेरलं, त्यातून एक मोठा वृक्ष उत्पन्न झाला. त्या वृक्षावर परत कोटय़वधी बीजं निर्माण झाली. त्यातलं प्रत्येक बीज परत लावलं तर कोटय़वधी वृक्ष निर्माण होतील. त्यातल्या प्रत्येक वृक्षावर शेकडय़ांनी, सहस्रांनी बीजं येतील. वैज्ञानिक म्हणतात की एक बीज साऱ्या पृथ्वीला हिरवीगार करण्याइतकं समर्थ असतं. एक बीज साऱ्या पृथ्वीला रानावनांनी झाकून टाकू शकतं. एका बीजाचं हे एवढं सामथ्र्य! हेच अस्तित्वाचं लक्षण असतं. पसरत जाणं, वाढत जाणं, पसरतच जाणं. हे बीज कुठं थांबणार असेल? कुठंही थांबणार नाही. थांबणं, स्थगित होणं याचा स्वभावधर्मच नाही.
आनंद हे जीवनाचं अंतिम बीज आहे. त्यापलीकडे काही नाही. त्याच्यावर काही नाही. त्याचं पसरत जाणं कुठं थांबत नाही. ज्यांना याची अनुभूती आली त्यांना ते शब्दात व्यक्त करता येत नाही. पण सांगितल्याशिवाय राहावत नाही. हे खरंच अपूर्व गुंतागुंतीचं कोडं आहे. बोलाल अवश्य! बोलताना पुन्हा पुन्हा सांगाल, जो जाणतो तो बोलू शकत नाही. ही अट पण सांगेल की तुम्ही त्याला शब्दांत व्यक्त करू नका. शब्दांचा सहारा घेतलात की चुकलात म्हणून समजा.
जे मी तुम्हाला सांगतो आहे ते खरं तर माझ्या शब्दांमध्ये सापडणार नाही. जे तुम्हाला सांगावंसं वाटतं ते शब्दांत पकडता येणार नाही. शब्दांनाच धरून बसलात तर मला काय सांगायचंय ते तुम्ही जाणू शकणार नाही. शब्द हे केवळ त्या अर्थाकडे नेणारा इशारे आहेत! त्यांच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. तुम्ही शब्द ऐका पण तिथंच थांबू नका. कारण शब्द ‘सत्य’ नाहीत. शब्द ऐका आणि त्यांच्या पलीकडे बघा. मी जे सांगेन ते ऐका, मी जो आहे तो बघा. अंतत: ‘दर्शन’ कामाला येईल. ‘श्रवण’ कामाला येणार नाही. श्रवण केवळ दर्शनाच्या योग्य बनवा. श्रवणाच्या आधारानं प्रत्यक्षानुभूती घेणं महत्त्वाचं. ऐकता ऐकता एवढी योग्यता प्राप्त करा की, ‘बघण्याची’ कला आणि कौशल्य अंगी येईल.
म्हणूनच परमज्ञानी माणसाला आपण द्रष्टा म्हणतो. श्रोता म्हणत नाही. केवळ ऐकून कुणी ज्ञानी होत नाही. प्रत्यक्षानुभूतीनं ज्ञान मिळतं. म्हणूनच ज्ञान मिळवलेल्या माणसाला द्रष्टा म्हणतात. म्हणूनच सत्यान्वेषणाला ‘दर्शन’ म्हणतात. ऐकता ऐकता अशी योग्यता मिळवायला हवी की बघण्याची कला प्राप्त होईल. कानावर होणाऱ्या आघातांनी तुमचे डोळे उघडायला हवेत. साधारणत: शरीराचे कान आणि डोळे जोडलेले असतात. डोळे, नाक, कान यांचं केंद्र एकच आहे. चेतनेमध्ये ते तसेच जोडलेले आहेत. कानांवर सतत आघात करण्याचं उद्दिष्ट एकच की, कानांच्या मार्गानं तुमचे डोळे उघडतील.
कुणी माणूस झोपलेला असला तर तुम्ही काय करता? त्याचे डोळे उघडायला जाता का? तुम्ही मोठय़ांदा म्हणता की, ‘उठा. जागे व्हा.’ म्हणजे आपोआप डोळे उघडतात. हेच ज्ञानी माणूस करत असतो. तुमच्या कानांवर आघात करतो. जेणे करून तुमचे डोळे उघडावे. तुम्ही झोपलेले असता. तो तुम्हाला उठवतो. सरळ कुणाच्या मिटलेल्या डोळ्यांना उघडायला गेलात तर तो वैतागेल. नाराज होईल. त्याला राग येईल, कदाचित तो दूर ढकलेल, मारेल, की हे काय चाललंय. बळजबरीनं डोळे कसले उघडता? पण शब्दांच्या रूपानं कानावर जो आघात होतो, तो हलकेच डोळ्यांपर्यंत पोहोचतो. हळूहळू डोळे उघततात. अशी जाग येण्यात एक गोडवा भरलेला असतो. म्हणूनच ज्ञानी माणूस बोलत असतो आणि तो जाणत असतो की बोलणं हा उपाय नाही. बोलणं हा एक विधी आहे. त्यानं काही सत्यप्राप्ती होणार नाही. जेव्हा दर्शन होईल, अनुभूती मिळेल, तेव्हाच सत्य जाणवेल.
म्हणूनच ही कायमची अट असते की जो जाणतो तो बोलत नाही. जो फक्त बोलतो तो जाणत नाही. पंडित फक्त बोलतो. तो तुमचे कान फक्त भरतो. ज्ञानी जेव्हा बोलतो तेव्हा ते बोलणं केवळ आघातस्वरूप असतं. त्या आघातानं डोळे उघडतात. दोघांचंही बोलण्याचं उद्दिष्ट वेगळं असतं. पंडित बोलतो तेव्हा माहितीत भर पडते. ज्ञानी बोलतो तेव्हा तुमचं अस्तित्व वृद्धिंगत होतं. केवळ माहितीरूप ज्ञान हे उष्टे कण आहेत. परमात्मा हा नित्य ताजा आहे. त्याची अनुभूती नित्य नूतन, ताजी, आनंदमय असते.
जेव्हा तुम्हाला परमात्म्याचं दर्शन घडेल, त्याची प्रचिती येईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ज्ञानी मंडळींनी जे सांगितलं ते आणि हे अनुभवलं ते दोन्ही फारसे परस्परसंबंधी नाही. पण हे केव्हा घडेल? जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षानुभूती येईल तेव्हा हे समजेल. तुमच्या लक्षात येईल की ज्ञानी जन बोलताना चाचरत होते. जे सांगायचं ते त्यांना नीट सांगता येत नव्हतं. सारे ज्ञानी लोक असेच चाचरत बोलतात असंही तुम्हाला जाणवेल. एका दृष्टीनं ते ‘जाणवणं’ योग्यच म्हटलं पाहिजे. कारण ज्ञानी याचा एक अर्थ आहे. ‘नवीन जन्मलेला.’ लहान मुलंही थांबून, चाचरत बोलत असतात. त्यांना सांगायचं असतं एक, पण शब्दांची स्पष्टता नसल्यानं किंवा शब्द तसे अपुरेच असल्यानं बोलतात वेगळंच! ते काय म्हणताहेत ते आपल्याला कळतच नाही. ते बरंच काही बोलले तरी त्यातून स्पष्टपणे काहीच कळत नाही. मग आपण काय करतो? तो काय बोलतोय त्याकडे लक्ष न देता त्याचा संकेत कशाकडे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. तो काय म्हणतोय ते नव्हे तर त्या दशेमध्ये तो काय प्रकट करायचा प्रयत्न करतोय ते आई समजून घेते. हळूहळू शब्दांची गरज उरत नाही. आई त्याचा इशारा, संकेत जाणून त्याला काय सांगायचं आहे ते समजू लागते.
बालपणीचं बोबडं बोलणं पुढे सुधारलं जातं. कारण ते बालपण कधी तरी समाप्त होतं. पण ज्ञानी मंडळींचं हे बालपण कधी न संपणारं बालपण असतं. ही कायमची अवस्था असते. यातून ते बाहेर पडणं कठीण असतं. ती अनुभूती ही स्वत: अनुभवण्याची गोष्ट असते. शब्दांत सांगून तिचं आकलन कसं होणार? परत ती शब्दांत असणारी नसल्यानं तिचं यथार्थ ज्ञान कसं देणार? खुद्द ज्ञानी जनांना ती अनुभूती आल्यानंतर निर्दोष बालपणाची प्राप्ती झालेली असते. ही अवस्था कायमची आणि शाश्वत असते. त्यांना या बोबडेपणातून बाहेर पडणं अशक्य असतं. म्हणून ज्ञानी माणसाचा इशारा, त्याचा संकेत कशाकडे आहे ते समजण्याचा प्रयत्न करा. तो काय म्हणतो. (कोणते शब्द वापरतो) याची फारशी फिकीर करू नका. त्याचा निर्देश कशाकडे आहे, कोणत्या दिशेला तो जायला सांगतोय ते समजून घ्या. त्यातून अनुभूतीकडे जाणारी वाट सापडू शकते.
( मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘विचारकिरण’ या माधवी कुंटे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातून साभार )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:01 am

Web Title: beyond the words
टॅग : Bodhivruksh,Chaturang
Next Stories
1 तिसरा डोळा
2 कारवॉ गुजर गया….
3 कसं जगायचं कण्हत की गाणं म्हणत?