29 November 2020

News Flash

देदीप्यमान कालखंडाचा साक्षीदार

एक देदीप्यमान कालखंड मी जगलो. त्या कालखंडाचा मी साक्षीदार आहे, हे माझं भाग्यच! ज्या रंगभूमीवर गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, चिंतामणी कोल्हटकर, बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर,

| June 27, 2015 01:01 am

एक देदीप्यमान कालखंड मी जगलो. त्या कालखंडाचा मी साक्षीदार आहे, हे माझं भाग्यच! ज्या रंगभूमीवर गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, चिंतामणी कोल्हटकर, बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब फाटक, लता मंगेशकर, नूतन पेंढारकर (अनंत दामले), भार्गवराम आचरेकर, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याप्रमाणे अनेक दिग्गज यांचा वावर होता. तिच्यावर वावरायचं भाग्य मला लाभलं. मी कृतार्थ आहे. तृप्त आहे..

माझं वय ९४ वर्षांचे आहे. गात्रं थकलीयत. पण मन अजूनही उल्हसित आहे. फारसं बोलता येत नाही सलगपणे, पण माझा मुलगा ज्ञानेश व मुलगी गिरीजा सोबत आहेत, तेही माझ्या बोलण्यात भर घालतील. आठवणींच्या वळचणीला उभं राहिलं आणि मागे वळून पाहिलं की दूरवर अनेक वळणं दिसतात, त्या वळणांवरून जाणाऱ्या वाटा खुणावतात.. मनात धूपाचा मंद सुवास, नांदीचे सूर दरवळू लागतात..
४ ऑक्टोबर १९२१. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या मृत्युपत्राचं वाचन झालं आणि अनपेक्षितरीत्या ‘ललित कलादर्श’ ची मालकी २५ नोव्हेंबर १९२१ ला बापूराव पेंढारकरांकडे आली. हे घडतंय तोच बापूरावांना तार आली.. त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय. हे पुत्ररत्न म्हणजे मी. मराठी रंगभूमीच्या एका महत्त्वाच्या वळणावर माझा जन्म झाला. माझे वडील अत्यंत मितभाषी आणि ऑटोमोबाइल डिप्लोमा इंजिनीअर होते. पण त्यांना नाटकाचीही तेवढीच आवड. केशवराव भोसले व बालगंधर्वाच्या ‘संयुक्त मानापमानाच्या’ वेळी ते ऑर्गनवर होते. केशवरावांचं त्यांच्यावर विलक्षण प्रेम आणि बापूरावांची केशवरावांवर श्रद्धा! बापूराव शिस्तप्रिय होते. वक्तशीर होते आणि प्रयोगशीलही होते. त्यांनी नाटकामध्ये अनेक प्रयोग केले. १९२१ मध्येच त्यांनी बॉक्स सेट उभा केला होता, डीमर्स वापरले, चित्रपटाप्रमाणे शूटिंग करून नाटकांचे ट्रेलर्स दाखवले, निऑन साइनच्या झगमगाटात जाहिरात केली. ट्रेनमध्ये नाटकाची जाहिरात केली. रंगमंचावर प्रत्यक्ष फोर्ड गाडी आणली. ‘श्री’ सारख्या नाटकात तर त्यांनी नाटकातील कलाकारांना घेऊन महालक्ष्मी रेसकोर्सचं पाच ते आठ मिनिटांचं शूटिंग करून नाटकात प्रोजेक्टरने ती रेस दाखवून अचानक नाटकात तिचा विलय घडवला. ते काळाच्या पुढचा विचार करायचे. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं लिहवून घेतली व सादरही केली. हुंडाबळी (हाच मुलाचा बाप), स्वातंत्र्य (सत्तेचे गुलाम), कामगार प्रश्न (सोन्याचा कळस).. एक ना अनेक प्रश्न हाताळले. ही सर्व नाटकं यशस्वी ठरली.
मी त्यांच्याभोवती असायचो पण नाटकापासून दूर होतो. माझं बालपण अत्यंत सुरक्षित गेलं. शिक्षण जमखिंडीत सुरू होतं. मी वकील किंवा डॉक्टर बनावं असं त्यांना वाटे. सर्व जोरात सुरू असतानाच त्यांनी चित्रपट बनवायला घेतला आणि आमचं गाडं घसरलं. व्ही.शांताराम, वाडिया यांच्यासारखे स्नेही असतानाही बापूरावांनी चित्रपटाचं दिग्दर्शन मामा वरेरकरांकडे सोपवलं. तेही अननुभवी. अर्थिक गणितं कोलमडली. ‘ललित कलादर्श’ला संकटांनी घेरलं. कलावंतांची थकबाकी सुरू झाली. बापूराव आजारी पडले. त्यांना जलोदर झाला. त्यावेळी ग्वाल्हेरला नाटक कंपनी व बिऱ्हाड होतं. मी पण ग्वाल्हेरला होतो. एकदा मला त्यांनी ‘बा रे पांडुरंगा’ म्हणायला सांगितलं. पण मला ते गाता येईना. त्यांनी मला नाटक-गाण्यापासून दूर ठेवलं होतं ते व्याकूळले. मीही व्यथित झालो. पण घशातून आवाज येईना. सूर्योपासनेने तेजस्वी झालेले डोळे, तीन सप्तकांत लीलया फिरणारा आवाज आणि रंगभूमीवर नितांत श्रद्धा असलेल्या माझ्या वडिलांचा त्या आजाराने घास घेतला. १५ मार्च १९३६ रोजी त्यांचा देहांत झाला. १६ वर्षे त्यांनी ‘ललित कलादर्श’ सांभाळली होती.
बापूराव गेले त्या दिवशी संध्याकाळी माझी आजी म्हणाली, ‘‘इथे बसून काय करतोस? हिराबाईचं गाणं आहे. ते ऐक जा!’’ मी गेलो. मला तिथे पाहून सर्वाना आश्चर्य वाटलं. माझं सांत्वन करून हिराबाईंनी गायला सुरुवात केली. त्यांनी असा काही षड्ज लावला की बस! सूर्यासारखा तेजस्वी! तिथे मी ठरवलं आपल्याला असं गाता यायला पाहिजे. मी घरी येऊन आजीला सांगितलं की मला गाणंच गायचंय. आजीनं बिऱ्हाड ग्वाल्हेरतून मुंबईत आणलं. तिथे बापूंचे चाहते होते. त्यांनी एकत्र येऊन पेंढारकर ट्रस्ट स्थापन केला व मला शालेय शिक्षण घेण्यास सांगितले पण मी, ‘मला गाणंच गायचयं’ असा आग्रह धरला. काही लोकांनी अर्थसहाय्यास नकार दिला. पूर्वी नखशिखांत दागिन्यांनी मढलेली माझी आजी, माझी आई-वहिनी यांनी निश्चयाने त्या बैठकीला सांगितलं ‘एक वेळ भांडी घासू पण याला गाणं शिकवू.’ बैठकीतून बाहेर पडल्यावर चित्रपटासारखा योगायोग घडला. समोर गायनाचार्य वझेबुवा दिसले. आजीनं मला त्यांच्या पायावर घातलं. केशवराव भोसले आदी गुरुवर्यानी मला पुण्याला यायला सांगितलं. झालं, आम्ही सारे पुण्याला थडकलो.
तालमीच्या पहिल्याच दिवशी माझा आवाज फुटला. अक्षरश: भसाडा झाला. पण त्यावर मात करायलाच हवी, या जिद्दीने कामाला लागलो. ७२ वर्षांच्या वझेबुवांनीही मला पदरात घेतलं. रोज सकाळी ५ ते ८ रियाज, मग पर्वतीवर फिरायला, १० ते १२ शिकवणी, जेवण, पुन्हा संध्याकाळी ३ ते ८ शिकवणी. मग रात्री कुठेतरी गाण्याचा कार्यक्रम ऐकायला जायचं. असं पाच वर्षे सुरू होतं. ते दिवस खूप आर्थिक अडचणीचे होते. घरी आजी, आई आणि ३ लहान बहिणी, त्यातील दोन अपंग व मी. एकच धोतर होतं माझ्याकडे. ते रात्री धुवायचं पंचावर निजायचं अन् दुसऱ्या दिवशी पहाटे वझेबुवांकडे पळायचं. बुवांनाही वाईट वाटायचं. पण त्यांचीही आर्थिक स्थिती चांगली नव्हती. मी रात्री उशिरापर्यंत रियाझ करायचो. आजीनं शेवटी बुवांकडे तक्रार केली. रात्री दोन वाजता ही गुरुमाऊली आमच्याघरी आली व हातातला तंबोरा ओढून घेतला. असा गुरू विरळच! पुण्यात बुवांकडे, गजाननबुवा जोशी शिकायला यायचे. हरिबुवा घांग्रेकर यायचे. एकदा बुवांचा मुंबई रेडिओवर लाइव्ह कार्यक्रम होता आणि त्यांना दम्याचा झटका आला. ते अक्षरश: धापा टाकू लागले. संचालक बुखाटी साहेबांनाही आता काय करावं प्रश्न पडला. १९४१ साल होतं ते. बुवांनी माझ्याकडे बोट दाखवून ‘माझ्याऐवजी हा गाईल!’ असं सांगितलं. मला तर अक्षरश: कापरं भरलं. बुवांनी आशीर्वाद दिला. त्या दिवशी एक तास दरबारी कानडा गायलो गुरुंची कृपा. त्याकाळी रेडिओचे चेक रिझव्‍‌र्ह बँकेतून मिळायचे. माझ्या नावाचा चेक तिथे बाबुराव देसाई नावाचे मॅनेजर होते त्यांनी बघितला व स्वत:कडे ठेवून घेतला आणि मला त्यांच्याकडे भेटायला बोलावले. त्यांनी विचारलं ‘‘बापूंचा तू कोण?’’ मी म्हणालो, ‘‘मुलगा’’ ‘‘मग कंपनी चालवायची की नाही? मुंबईत राहायचं की नाही?’’
मी म्हणालो, ‘‘जागा नाही.’’
ते म्हणाले, ‘‘माझ्या घरी यायचं सर्वानी ताबडतोब. कंपनी सुरू करायची. मगच चेक मिळेल.’’
बुवांना हे सांगितलं. आम्ही सारे कपूर महालमध्ये बाबूराव देसाईंकडे थडकलो आणि त्या परिवाराचेच झालो. १९६० पर्यंत आम्ही तिथेच राहायचो. गुरुवर्य वझेबुवानंतर ते माझे पितृतूल्य पालक. त्यांच्या घरी बालगंधर्व, फैयाज खासाहेब, गोविंदराव टेंबे, वसंत शांताराम देसाई आदींचे येणे-जाणे असायचे. ‘ललित कलादर्श’ पुन्हा सुरू करायची ठरलं. ‘सत्तेचे गुलाम’चा प्रयोग करायचं ठरलं.‘ एकही पैसा देणार नसशील तरच काम करेन’ या अटीवर नानासाहेब फाटक आले. मामा पेंडसे, मा. दत्ताराम आले. बापूंचा कपडेपट सांभाळणारे अनंत साखळे आदी बॅक स्टेजला उभे राहिले. वझेबुवांनी गाणी बसवून घेतली व पहिला प्रयोग बलीवाला थिएटरमध्ये केला. मी बापूंची ‘वैकुंठ’ ही व्यक्तिरेखा केली. लोक म्हणाले, ‘साक्षात् बापू!’ सर्वानी कौतुक केलं, माझं विमान ढगात गेलं. रात्री घरी आल्यावर त्या ढगात असतानाच बुवा म्हणाले, ‘चल नाटकातल्या चुका सुधारू या’ पहाटे तीनपर्यंत ते माझ्यात सुधारणा सुचवत होते. विमान जमिनीवर आलं आणि लक्षात आले अजून खूप मोठी मजल मारायची आहे.
कंपनी हळूहळू उभारत गेली. साहित्य संघाचे दिग्गज डॉ. अ. ना. भालेराव पहाडासारखे उभे राहिले. जुनीच नाटकं करत होतो. १९४३-४४ दरम्यान दुष्काळ पडला. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गावोगाव मेळे करायचं ठरलं. ठिकठिकाणची कलावंत मंडळी डॉ. भालेरावांच्या नेतृत्वाखाली एकत्र आली. पहिल्या प्रयोगाचे मानधन म्हणून जी रक्कम मिळाली ती मी दुष्काळ फंडाला दिली. सोबतच्या कलाकारांनाही मग लाजेकाजेस्तव त्याचं मानधन द्यावं लागलं. त्यात १६-१७ वर्षांची मालती नाफडे होती. ती धुसफूस करत होती. तिचे वडील तिची समजूत घालत होते. तिचे काम मला आवडले होते. मी तिच्या वडिलांना मालती नाटकात काम करेल का? असं विचारलं. काहीशा रागातच त्यांच्या सांगण्यावरून ती तयार झाली. तिच्यासोबत तिची बहीणही काम करायला आली. ‘सत्तेचे गुलाम’मधली नलिनीची भूमिका तिने छान केली. पहिल्याच प्रयोगाला आजी आली होती. नाटकानंतर मला म्हणाली, ‘‘मला हीच सून हवी’’ झालं. माझ्या मनात ठिणगी पडली, पण दहा दिवसांनी अचानक आजीचं निधन झालं. आणि तो विषय तिथेच थांबला.
माझी नाटकं चालूच होती, पण ती सारी जुनीच होती. मराठी रंगभूमीला मरगळ आली. नाटक कंपनी थांबवून मी शिलेदारांच्या ‘मराठी रंगभूमी’ मध्ये कपडेपट सांभाळायला गेलो. तिथे गंधर्वाबरोबर ऑर्गन वाजवणारे केशवराव कांबळे होते. त्यांचा परिचय झाला. त्यांच्याकडून गंधर्व गायकी शिकण्याचा प्रयत्न केला. साहित्य संघात गणपतराव बोडसांचा सहवास लाभला. ‘सौभद्र’, ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’ या नाटकांचा सत्कार त्यांनी घडवला. हे अप्रत्यक्ष शिक्षण सुरू होतं.
डॉ. अ. ना. भालेरावांच्या प्रेरणेतून १९४५ साली मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक महोत्सव साजरा झाला. त्याच वेळी मुंबईच्या गोदीत बॉम्बस्फोट झाले होते. सर्व कलाकारांनी मंडप उभारले. अनेक नाटकं त्यात झाली त्यात आम्ही ‘वधुपरीक्षा’ केलं. त्यात नायिका विहिरीत उडी मारते. मालती नायिका होती. तिनं भिजायला नकार दिला. पण तिचे वडील व डॉ. भालेराव यांनी तिने रंगमंचावरच्या विहिरीत उडी मारल्यावर तिला पाण्याने भिजवली व माझ्या हाती दिली. तिला बाहेर काढून मी जोशात गाणं म्हटलं. तीन ‘वन्स मोअर’ मिळाले आणि धूसफूस करणाऱ्या मालतीचं हृदयपरिवर्तन झालं. १९४८ साली आम्ही विवाह केला.
१९४८च्या दरम्यान लता मंगेशकरांनी ‘संयुक्त भावबंधना’चा घाट घातला. मालकांची मुले एकत्र येऊन नाटक करतात अशी कल्पना त्यामागे होती. ‘बलवंत’च्या
मा. दीनानाथांची कन्या लता, चिंतामणरावांचे सुपुत्र चित्तरंजन आणि बापूरावांचा मुलगा चंदू म्हणजे मी! मी प्रभाकरची भूमिका केली तर लताबाईंनी लतिकेची तर चित्तरंजनांनी घनश्याम. तुफान प्रयोग रंगले. आजच्या दादरच्या शिवाजी मंदिरच्या मागे एक मंडई होती. तिथे दुपारी ‘प्रगल्भ सौभद्र’चा प्रयोग होता. त्यात बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आदी होते. त्यापाठोपाठ आमचं ‘भावबंधन’ होतं. भावबंधन अफाट रंगलं. त्यावेळी लताबाईंचा जो षड्ज लागला तो आजही कानात आहे. बालगंधर्व, हिराबाई व लताबाई यांच्या षड्जाला मी विसरूच शकत नाही. शुद्ध, सात्त्विक, दैवी प्रतिभेचं ते देणं होतं ते! त्याच सुमारास ‘महल’ आला, ‘आयेगा आनेवाला’मुळे लता रंगमंचापासून दूर गेली.
१९५१-५२ साली शांतारामबापूंनी ‘अमर भूपाळी’ करायचं ठरवलं व त्यात मला होनाजी बाळांची भूमिका दिली. ‘राजकमल’मध्ये ज्याने त्याने आपापलं काम करायचं, पण का कोण जाणे, मला सर्वत्र मुक्तसंचार असे. वसंत देसाईंचं संगीताचं काम मी शेजारी बसून पाहायचो, रेकॉर्डिंगचं तंत्र शिकलो. शांताराम बापूंकडून एडिटिंगचं तंत्र शिकलो. बापूरावांचं तंत्रज्ञानाचं वेड माझ्या रक्तातच उतरलं होतं ना! शांतारामबापूंचं अचूक प्लॅनिंग असायचं. एकदा वसंत देसाई रेकॉर्डिग करत होते, ‘झनक झनक पायल बाजे’चं! आमीर खाँसाहेबाचं रेकॉर्डिग होतं आणि खाँसाहेबांची तान संपल्यानंतर, कोरस आपली ओळ नीट उचलत नव्हते. मी वसंतरावांच्या बाजूलाच होतो. त्यांनी अचानक मला विनंती केली, ‘‘तुम्ही कोरसमध्ये गालका?’’ मी अर्थातच तयार झालो. कलाकारानं कलेशी इमान राखावं. तो कलेपेक्षा मोठा असू शकत नाही.
१९५५ मध्ये साहित्य संघाने ‘होनाजी बाळा’ नाटक करायचं ठरवलं. हळदणकरांसोबत मला घ्यायला काहींचा विरोध होता. डॉ. भालेरावांनी माझी खात्री दिली. पुढचे पंधरा दिवस मी दिवसरात्र मेहनत केली व गाण्याबरोबरच्या संवादांवर भर दिला. सर्वाना समाधान वाटले. आपण आपलं काम चोख केलंच पाहिजे. बोडसांनी शिकवलं होतं. घाबरायचं नाही. त्याच बळावर पुढे पं. राम मराठे आणि प्रसाद सावकारांसोबत ‘जय जय गौरीशंकर’मध्ये उभा राहिलो. ते मोठे गायक होते.
१९५६ मध्ये आमच्या ‘ललित कलादर्श’चं काम माझ्याकडे आल्यानंतरचं पहिलं स्वतंत्र नाटक आम्ही केलं, ‘स्वामिनी!’ त्यातली नांदी राम मराठेच्या आवाजाचे रेकॉर्ड करून वापरली. रेडिओवरच्या अनाऊन्समेंटसकट ती वाजायची. नंतर आम्ही बाळ कोल्हटकरांचं ‘दुरितांचे तिमिर जावो’ आणलं. पहिले काही प्रयोग जबरदस्त झाले. मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, लीला मेहता, दत्ताराम बापू, मालती अशी जबरदस्त कलावंत मंडळी होती. ते नाटक १९९८ पर्यंत आम्ही केलं. त्यातला ‘दिगू’ मला साहित्य संघाबाहेर प्रत्यक्ष भेटायचा. नाटकात मी जसे हातवारे करून बोलायचो, तसाच तो प्रत्यक्षात होता.
‘दुरितांचे..’ वर विद्याधर गोखलेंनी ‘लोकसत्ता’ मधून खूप टीका केली होती. पण त्यांनी एक अत्यंत सुंदर नाटक लिहिलं होतं, ‘पंडितराज जगन्नाथ.’ आम्ही ते करायचं ठरवलं. गोखले अण्णांची प्रतिभा एवढी विलक्षण की नाटकाच्या मर्यादेत ती सामावणे कठीण! या नाटकाचे अनेक वेळा पुनर्लेखन करावे लागले. प्रत्येक वेळी अण्णा त्यात काही ना काही अद्भुत भर घालायचेच! या नाटकाचं संगीत वसंत देसाईनी करावं असं वाटलं. त्यांना वेळ नव्हता. मी त्यांच्यासाठी दोन वर्षे थांबलो. त्यांना वेळ मिळाल्यावर ‘पंडितराज’चं अद्भुत संगीत त्यांनी बांधलं. एकही पैसा न घेता! द.ग. गोडसेंसारख्या प्रतिभावंताने या नाटकाची वेषभूषा केली होती. पु. श्री. काळय़ांनी नेपथ्य केलं. वसंतराव देसाईंना लक्ष्मीशंकर यांचा प्लेबॅक मी वापरला. त्यांनी नाटकाची तालीम बघून विनामोबदला ते रेकॉर्डिग केलं आणि याच नाटकात माझा पहिला प्लेबॅक मी वापरला. त्याचा पहिला प्रयोग बिर्ला मातोश्रीला केला. तिथलं हे कदाचित पहिलं मराठी नाटक!
‘पंडितराज जगन्नाथ’च्या वेळची गोष्ट. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीच्या प्रयोगात पंडित जवाहरलाल नेहरू येणार असं सांगितलं. सहाचा प्रयोग होता. वेळ जवळ आली. पण पंडितजीं येईनात. यशवंतरावांनी मला थोडं थांबायला सांगितलं होतं. पण मी ६ वाजता प्रयोग सुरू केला, पंतप्रधान थोडय़ा वेळाने आले. पहिला अंक संपल्यावर ते आत आले आणि मला विचारलं, ‘‘आप रूके नही’’ त्यावर मी नम्रपणे पण ठामपणे म्हणालो, ‘‘पंतप्रधान म्हणून जशी आपली भारताच्या नागरिकांशी बांधीलकी आहे, त्याप्रमाणे माझ्या नाटकाला येणाऱ्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाशी. वेळेवर आलेल्या प्रेक्षकांना दिलेल्या वेळेवर नाटक सुरू करणं याच्याशी माझी बांधीलकी आहे, म्हणून मी सहाच्या ठोक्याला नाटक सुरू केलं.’’ त्यांनी माझं वेळ पाळल्याबद्दल कौतुक केलं. थोर माणूस!
‘पंडितराज जगन्नाथ’नंतर आम्ही ‘जय जय गौरीशंकर’ रंगमंचावर आणलं. त्याच सुमारास प्रायोगिक रंगभूमीला उत्तेजन देण्यासाठी आम्ही आमची एक स्वतंत्र शाखा उघडली होती. ‘बहुरूपी’, ‘हा खेळ असा’,‘पडछाया’ सारखी नाटकं रंगभूमीवर आणली. पण ती चालली नाहीत. १९६८ मध्ये ललित कलादर्शचा ‘हीरक महोत्सव’ आला. त्यावेळी ‘कटय़ार काळजात घुसली’ शाहीर साबळे यांचा वग-‘असुनी खास मालक घराचा’ आणि तेंडुलकरांचं ‘झाला अनंत हनुमंत’ ही नाटकं सादर झाली. या हीरक महोत्सवाच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली होती. ती म्हणजे कोयना भूकंपाची. कोल्हापुरातून जनरेटर वगैरे आणून सोहळा केला होता. पण तो तोटय़ात गेला. त्यावेळी ६५ हजार रुपयांचे कर्ज झाले होते. लोकांना पैसे द्यायचे होते. गिरगावात तबेला भाग आहे. तिथे काही माणसं व्याजी पैसे देत असत. तिथले सावकार, दादा लोकही आमची नाटकं पाहायला येत असत. आमचे मॅनेजर पांगे तबेलामध्ये व्याजी पैसे घ्यायला गेले. त्या मंडळींनी चौकशी केली व पैसे उपलब्ध करून दिले. नंतर मला कधी विचारलंही नाही की ते पैसे परत कधी करणार. अनेक वर्षांनी ते पैसे मी परत करू शकलो.
‘ललित कलादर्श’ ही संस्था नेहमी प्रयोगशील राहील याची दक्षता आम्ही घेत असू. नवनवीन नाटके, कलाकार, लेखक रंगभूमीवर यावेत असा आमचा प्रयत्न असे. ‘शाबास! बिरबल शाबास!’ ‘रक्त नको मज प्रेम हवे’ ‘आनंदी गोपाळ’, ‘बावनखणी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’ अशी अनेक नाटकं ‘ललित कलादर्श’ने दिली. मुंबई शहरानं १९६८ साली हँगिंग गार्डनवर ‘ललित कलादर्श’ संस्थेचा सत्कार केला व १९८३ मध्ये ऑपेरा हाऊस चौकाला संस्थेचं नाव दिलं. २००३ मध्ये संगीत नाटक कला अकादमीनं पुरस्कार दिला. रंगभूमीची आम्ही जमेल तशी सेवा केली. रंगभूमीनेही रसिकांसह आम्हाला प्रेम दिलं.
१५ नोव्हेंबर २००८ ला रंगमंचावर शेवटचा आलो, ‘ललित कलादर्श’च्या शतसांवत्सरिक सोहळय़ात. माझ्या जन्मापासून आजवर या संस्थेशी माझी नाळ जोडलेली आहे. मनात रंगभूमीचा प्रवास आजही सुरू आहे. आम्ही शासकीय मदत कधी मागितली नाही. रसिकांजवळ प्रेम व माया मागितली. ती भरभरून मिळाली. प्रत्येक गोष्टीचा ठेवा जतन व्हायला हवा, म्हणून मी नेहमी आमच्या नाटकाचं, अन्य प्रयोगांचं, सांगीतिक कार्यक्रमांचं रेकॉर्डिग करून ठेवलं. ते ध्वनिमुद्रण चित्रफीत मुद्रण मी साहित्य संघाच्या हवाली केलं. १९०७-०८ पासूनची अनेक छायाचित्रं माझ्या संग्रही आहेत. ती एकत्रित अभ्यासली तर मराठी रंगभूमीचा तो चित्रांकित इतिहास ठरू शकेल. ललित कलादर्शसह अनेक संस्थांकडे त्यांचा छायाचित्रांकित ठेवा असेल तो जपायला हवा, असं मला मनापासून वाटतं. आपल्या देशात जतनाकडे दुर्लक्ष केलं जातं. फार वाईट वाटतं. पण एक देदीप्यमान कालखंड मी जगलो. त्या कालखंडाचा मी साक्षीदार आहे, हे माझं भाग्यच! ज्या रंगभूमीवर गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, चिंतामणी कोल्हटकर, बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब फाटक, लता मंगेशकर, नूतन पेंढारकर (अनंत दामले),भार्गवराम आचरेकर, मा दत्ताराम, मामा पेंडसेंप्रमाणे अनेक दिग्गजांचा वावर होता. तिच्यावर वावरायचं भाग्य मला लाभलं. मी कृतार्थ आहे. तृप्त आहे. या तृप्तीवर वझेबुवा, बाबुराव देसाई यांचं कुटुंब, माझी आजी, आई (वहिनी)आणि माझी बहीण शकून परळकर, वसंतराव देसाई, विद्याधर गोखले, डॉ. अ. ना. भालेराव यांच्या मायेची पाखर आहे, मालतीच्या समर्थ मायेची जोड आहे, हा सारा प्रवास वाटा-वळणांचा होता. पण तो राजरस्त्यात रूपांतरित झाला याचंच समाधान आहे.
शब्दांकन – नीतिन आरेकर -nitinarekar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2015 1:01 am

Web Title: bhalchandra pendharkar
Next Stories
1 जिंदगी जो अभी धूप है, अभी साया
2 गच्चीवरची बाग – पुठ्ठय़ांची खोकी व सुपारीची पाने
3 संक्रमण काळातील सोबती
Just Now!
X