रोहिणी हट्टंगडी – chaturang@expressindia.com

संपूर्ण चित्रपटसृष्टीला फॅशनच्या नव्या परिभाषा शिकवणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेत्या भानू अथैया यांच्या निधनाची बातमी आली आणि साहजिकच मन ३५-४० र्वष मागे गेलं. १९८२ मध्ये आमच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या वेशभूषेसाठी त्यांना ‘ऑस्कर’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. खरं तर त्या आधीपासूनच हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘वक्त’, ‘आरजू’, ‘आम्रपाली’, ‘गाईड’, ‘तिसरी मंजिल’, ‘मेरा साया’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या त्या कॉस्च्युम डिझायनर (वेशभूषाकार) होत्या. अर्थात ‘गांधी’ चित्रपटासाठी जेव्हा माझी निवड झाली तेव्हा मला त्यांच्याविषयी इतकी माहिती नव्हती. कारण मीही तशी नवीनच होते या क्षेत्रात.

मला आठवतं, त्या वेळी त्या सोफाया कॉलेजजवळ राहायच्या. मी त्यांच्या घरी गेले तेव्हा पाहिलं तर त्यांच्या इमारती- खाली पार्किंगच्या जागी त्यांचा सगळा ‘सेटअप’ होता. त्याचं प्रचंड काम चालू होतं. ‘गांधी’ चित्रपटाच्या निमित्तानं मला ते सगळं जवळून अनुभवता आलं. ‘गांधी’चित्रपटाच्या आधीही त्यांनी अनेक चित्रपटात काम केलेलं होतं आणि भानू अथैया हे नाव कॉस्च्युम क्षेत्रात खूप गाजलंही होतं. मुळात त्या चित्रकार होत्या. उत्तम स्केचेस करायच्या. त्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थिनी. चित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही मासिकांमधून ‘फॅशन इलस्ट्रेटर’ म्हणून काम करायला सुरुवात केली. अनेक ‘फॅशन बुटीक’साठीही त्यांनी काम केलं. बुटिकमध्ये काम करत असताना त्यांची डिझाइन्स अनेक कलाकारांना आवडली आणि त्यातून चित्रपटासाठी कपडे डिझाइन करण्याच्या संधी त्यांना मिळायला लागल्या. त्यामुळे ‘गांधी’ चित्रपटापर्यंत त्या या क्षेत्रात येऊन गाजल्याही होत्या. आम्ही ‘एनएसडी’तून (राष्ट्रीय नाटय़ विद्यालय) बाहेर पडून ४-५ र्वष झाली होती. ‘एनएसडी’ची पाश्र्वभूमी असल्यामुळे वेशभूषेचा अभ्यास केलेला होता. पण भानू अथैया कॉस्च्युम स्केचच्या ज्या ‘प्लेट्स’  बनवत असत त्या आणि आम्ही बनवत असलेल्या ‘प्लेट्स’मधे जमीनअस्मानाचा फरक होता. वेशभूषा म्हटल्यावर अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार त्या करत असत. माझ्याही हळूहळू लक्षात यायला लागलं, की वेशभूषा करताना त्या किती बारकाईनं विचार करायच्या आणि वेशभूषा या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे ते.

‘गांधी’ चित्रपटाच्या वेळी जेव्हा ‘ट्रायल’साठी मी त्यांच्या घरी जात असे, तेव्हाच त्यांच्या अभ्यासूपणाची झलक मला दिसली. त्यांच्या घरात प्रचंड पुस्तकं आणि भरपूर डिझाइन्स असत. ‘गांधी’ चित्रपटाची वेशभूषा करताना प्रत्येक पात्राच्या वेशभूषेत कालानुरूप कपडय़ांचे ‘पॅटर्न्‍स’ (पद्धती) कसे बदलत गेले, वेगवेगळ्या वयात ही सगळी पात्रं कसे कपडे घालतील, यामध्ये खरं तर एक सूक्ष्म रेषा होती. पण भानू यांनी ती अतिशय सुरेख सांभाळली. यासाठी त्यांनी त्या काळाचा खूप अभ्यास केला. त्या वेळेचे काही चित्रपट, पुस्तकं, खूप फोटो यांच्यावर त्यांनी संशोधन केलं. महात्मा गांधी आणि कस्तुरबांचे तर गठ्ठेच्या गठ्ठे फोटो त्यांच्याकडे मी पाहिले होते. अगदी सरदार पटेलांपासून गांधीजींपर्यंत प्रत्येकाच्या वेशभूषेचा बारकाईनं अभ्यास त्यांनी केला होता. म्हणजे सरदार पटेलांची वेशभूषा सुरुवातीला वेगळी होती. त्यांना नेसवलं गेलेलं धोतर आधीच्या काळातलं वेगळं आणि नंतरच्या काळातलं वेगळं होतं किंवा गांधींच्या वय र्वष २७ ते ७५ या वेगवेगळ्या वयातल्या वेगवेगळ्या वेशभूषा, त्यांची धोतर नेसायची पद्धत, सगळं वेगळं. बरं त्या वेळी धोतर नेसवावं लागत असे. तेही त्यांना उत्तम जमत असे.

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतरचा एक प्रसंग आहे. बोटीवरून खाली उतरल्यानंतर पुढच्या प्रसंगात गांधीजी, गोपाळ कृष्ण गोखले यांना एक पार्टीत भेटतात. बॅरिस्टर जीना, सरदार पटेल, नेहरू, सगळे त्या समारंभात असतात. त्या प्रत्येकाची वेशभूषा महत्त्वाची होती – नेहरू तर अगदी सुटाबुटात होते, त्या पार्टीत गांधीजींनी धोतर आणि शेतकऱ्याचा अंगरखा जसा असतो तसा अंगरखा घातलाय आणि कस्तुरबांनी बारीक बुट्टी असलेली साडी नेसलीय. खरं तर असा एक फोटो त्यांच्याकडे होता आणि अशा साडीतला कस्तुरबांचा तो एकमेव फोटो होता. तो फोटो समोर ठेवून तशी बुट्टीवाली साडी खास भरतकाम करून त्यांनी तयार करून घेतली.  इंग्रजी ‘एम्’ अक्षरासारखी ती बुट्टी होती. ती साडी कस्तुरबांच्या त्या व्यक्तिरेखेला इतकी शोभली, की माझी मीच खूष झाले होते त्यांच्यावर.

भानू यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती. म्हणजे फोटोनुसार दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी आणि कस्तुरबांचे कपडे पारशी शैलीचे आणि ‘सिल्की’ पोताचे दिसतात. भारतात परतल्यावर ते खादीकडे वळले होते. त्यांनी दिलेल्या वेशभूषेतून हा फरक चांगलाच जाणवतो. गांधीजी आणि कस्तुरबा ट्रेनमधून भारतभर फिरले त्या प्रसंगामधली आमची वेशभूषाही वेगळी होती. तीही त्यांनी उत्तम साकारली. खरं तर प्रत्येक व्यक्तिरेखेचा त्यांनी विचार करून त्यानुसार आम्हाला वेशभूषा दिल्या. या सगळ्या वेशभूषेतून काळ दिसला. तो काळ समर्थपणे डोळ्यांसमोर उभा राहिला. शिवाय आपण फोटोत असलेले कपडे व्यक्तिरेखेला घालायला दिले म्हणजे सगळं झालं असं नव्हतं, तर त्या कलाकारालाही ते कपडे योग्य दिसतायत की नाही याचाही योग्य विचार त्या करत असत. मला आठवतं, दक्षिण आफ्रिकेत असताना तरुण कस्तुरबा दाखवताना त्यांनी मला ‘कट’वाला ब्लाऊज दिला होता किंवा नंतरच्या काळातला ब्लाऊज वापरताना पदर घेतल्यावर तो थोडा ढगळ दिसला पाहिजे, पण उगाच अघळपघळ दिसू नये, याची काळजी त्यांनी घेतली होती. म्हणजे कस्तुरबांच्या या सगळ्या साडय़ा आणि ब्लाऊज यातून त्यांनी व्यक्तिरेखेचं बाईपण जपलं होतं.

प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी हा विचार होता. आमचे सगळे कपडे नीट, प्रत्येकाच्या मापानुसार शिवून घेतलेले होते. अगदी छोटय़ा-छोटय़ा व्यक्तिरेखांचासुद्धा खूप बारकाईनं त्यांनी विचार केलेला होता. अनेकदा त्यांचं काम नसतानाही त्या सेटवर येऊन बसायच्या. त्या पूर्णपणे आमच्यात असायच्या. काही प्रसंगांच्या वेळी तर खूप चर्चाही झाल्या आहेत. विदेशी कपडय़ांची होळी करण्यासाठी गांधीजी जनतेला आवाहन करतात त्या प्रसंगाच्या वेळी ‘गांधीं’ना कुणीतरी जानवं घालायला दिलं. गांधीजी जानवं का घालतील? असा प्रश्न उपस्थित झाला आणि चर्चा सुरू झाली. मला आठवतंय, आमच्या सेटवर भानू अथैयांची एक भलीमोठी ट्रंक होती. त्यात अनेक पुस्तकं, फोटो भरलेले होते. भानू यांनी या जानव्याच्या प्रसंगाच्या वेळी त्या ट्रंकेतून सगळी पुस्तकं काढून संदर्भ शोधले, त्यावर चर्चा केली आणि जानवं काढून टाकलं. मुळात व्यक्ती म्हणून त्या अतिशय शांत स्वभावाच्या, मृदुभाषी, प्रेमळ होत्या. उगाचच कुणावर तरी आवाज चढवून बोलल्या असं मी कधीच ऐकलं नाही.  माझ्याशी त्या मराठीतच बोलत असत. कोल्हापूरच्या अण्णासाहेब राजोपाध्ये यांची

ही मुलगी. वडिलांकडून चित्रकलेचा वारसा त्यांना मिळाला. हिंदी चित्रपटातले गीतकार आणि कवी सत्येंद्र अथैया यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.

‘लेकिन’ चित्रपटासाठी १९९१ मध्ये आणि २००१ मधे ‘लगान’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘लगान’साठी तर पुन्हा एकदा त्यांना ‘ऑक्सर’ मिळता मिळता राहिला. त्या वर्षी त्यांना ‘ऑक्सर’साठी नामांकन मिळालं होतं. त्यांच्या बाबतीत हे सगळं लिहिताना खूप बरं वाटतं आणि त्यांनी माझ्यासाठी कॉस्च्युम्स केलेत याचं समाधानही. ‘गांधी’नंतर पुढे एकाच चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाली. भीष्म सहानींचा तो चित्रपट होता. त्यात अमोल पालेकरांच्या सेक्रेटरीचं मी काम केलं होतं. त्या वेळी त्यांनी मला स्कर्ट आणि जर्सी  दिली होती. अगदी परफेक्ट फिटिंग, कपडय़ांना एकही सुरकुती नव्हती. होजिअरीचा कपडा त्यांनी त्यासाठी वापरला आणि पायात घालायला पेन्सिल हील्सचे सॅन्डल दिले होते.त्यानंतर आम्ही भेटलो होतो ते ‘सिनेआर्टिस्ट असोसिएशन’चा कार्यक्रम होता त्यात. आमचा दोघींचा एकत्र सत्कार झाला होता. तसंच त्यांच्या पुस्तक प्रकाशनालाही आम्ही भेटलो होतो. ‘ द आर्ट ऑफ कॉस्च्युम डिझाइन’ हे त्यांचं पुस्तक म्हणजे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.

एक अतिशय अभ्यासू वेशभूषाकार मराठी स्त्री आणि त्यांनी ‘गांधी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी देशाला वेशभूषेचा पहिला ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळवून दिला, या सगळ्या प्रवासाची मी साक्षीदार आहे याचा मला नक्कीच आनंद आहे आणि समाधानही.

शब्दांकन- उत्तरा मोने