ऊर्मिला पवार – pawar.urmila@yahoo.com

कोणताही इतिहासपट रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी त्या काळात जाऊन खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखांचा अभ्यास करून त्या साकार कराव्या लागतात. यासाठी पटकथेतील अचूकतेपासून पात्रांची वेशभूषा आणि मुख्य म्हणजे तो काळ पुन्हा जिवंत करावा लागतो. जुन्या गाजलेल्या व्यावसायिक हिंदी चित्रपटांपासून ‘गांधी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’,‘लगान’, ‘स्वदेस’ अशा अनेक महत्त्वाच्या चित्रपटांना आपल्या अभ्यासपूर्ण आणि कलात्मक दृष्टीने  ‘वास्तववादी’  बनवणाऱ्या ‘अकॅ डमी अ‍ॅवॉर्ड’ (ऑस्कर) विजेत्या वेशभूषाकार भानू अथैया यांचं नुकतंच निधन झालं.  मराठी कुटुंबात जन्मलेल्या भानू यांच्या आपल्या कामाप्रति असलेल्या ध्यासाबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. त्यांच्याबरोबर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’  या चित्रपटासाठी काम करायला मिळालेल्या कार्यकर्त्यां-लेखिका ऊर्मिला पवार आणि ‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबांची भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी  भानू अथैया या व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले पदर.

‘ऑस्कर’ विजेत्या भानू अथैया आज आपल्यात नाहीत. ‘ऑस्कर’  मिळवणारी पहिली भारतीय स्त्री म्हणून भारताचा गौरव त्यांनी अधिक उंचावला होता.  त्यांची आणि माझी कधी भेट होण्याची किंचितही शक्यता नव्हती. पण एक दिवस दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मला त्यांच्या वरळी येथील कार्यालयात बोलावून सांगितलं, की त्यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाचं कॉस्च्युम डिझायनिंग भानू अथैया करणार आहेत आणि चित्रपटातील दलित व्यक्तिरेखांच्या वेशभूषेसाठी मी त्यांना मदत करायची आहे. खरं तर तो चित्रपट डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित करत आहेत आणि भानू अथैया कॉस्च्युम डिझायनर आहेत, हे बातम्यांमुळे मला माहीत होतं. पण आता मी त्यांच्याबरोबर असणार आहे हे सगळं मला ‘ग्रेट’च वाटलं!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे हे कोकणातल्या रत्नागिरी तालुक्यातलं (आता ‘मंडणगड’). मीही रत्नागिरीतली. शिवाय आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाविषयीच्या ‘आम्हीही इतिहास घडवला’ या माझ्या पुस्तकामुळे असेल कदाचित, पण डॉ. जब्बारांनी ती कामगिरी माझ्यावर सोपवली आणि भानू अथैया यांना प्रत्यक्ष भेटायला मी आतूर झाले. त्या डॉ. जब्बार पटेल यांच्या कार्यालयात आल्या. माझ्या बाजूलाच खुर्चीवर बसल्या. जब्बारांनी आमची ओळख करून दिली. बॉबकट असलेल्या, गोल चेहऱ्याच्या, मध्यम वय आणि बांध्याच्या, पंजाबी ड्रेसमधल्या भानूताई आपले बारीक डोळे आणि त्याहून बारीक नजरेमुळे एकदम डोळ्यात भरल्या. माझ्याकडे पाहात जरासं हसून त्यांनी किंचित मान हलवली मग जब्बारांकडे मान वळवून अत्यंत मंजुळ आवाजात त्या काहीतरी बोलल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘चला आपण बाहेर थांबू.’’

‘अथैया’ असं अमराठी आडनाव पण उत्तम मराठी बोलताहेत हे पाहिल्यावर मी विचारलं, तेव्हा, ‘‘मी महाराष्ट्रातलीच. कोल्हापूरची.’’ एवढंच म्हणाल्या. त्या मितभाषीच वाटल्या. मग मीच त्यांना १९२७ ला महाडच्या सत्याग्रहात बाबासाहेबांनी स्त्रियांना उद्देशून जे भाषण केलं होतं त्याबद्दल सांगायला सुरुवात केली. आंबेडकरांनी या कोकणातील स्त्रियांना त्यांची गुडघ्याच्या वर, तीही विशिष्ट पद्धतीनं साडी नेसण्याची पद्धत, त्यांच्या गळ्यातल्या गळसऱ्या, हातातले कथलाचे गोट, हे सारं जातीदर्शक आहे, ते बदला आणि ब्राह्मण स्त्रिया नेसतात तसं नेसा, असं सांगितल्याचं सांगत होते. हे आणि नाशिक, सातारा, कोल्हापूरकडच्या कपडय़ांत कसे बारीक-बारीक बदल आहेत, ते सर्व थोडक्यात सांगत राहिले. डोळे बारीक करून त्या लक्षपूर्वक ऐकत राहिल्या. मग उठून निघताना म्हणाल्या, ‘‘ओके, आता होमवर्क करून या.’’ कसलं ‘होमवर्क’? मला नीटसं कळलं नसलं, तरी हातात घेतलेल्या कामाचंच ते आहे हे समजलं. पुढे  ‘होमवर्क’ हा शब्द त्यांच्याकडून मी बऱ्याचदा ऐकला.

खरं तर माणूस नैसर्गिक रूप घेऊन जन्माला येतो, पण त्याच्या अंगावरचे कपडे, अलंकार आणि वापरलेली चिन्हं त्याच्या अस्तित्वाचे, त्याच्या भोवतालचे अनेक अर्थ उलगडत त्याची ओळख देतात. काळ, वेळ, प्रसंग, प्रदेश, निसर्ग, त्याच्या भोवतीचा समाज, रूढी-परंपरा, समाजाची मानसिकता, त्या व्यक्तीची मानसिकता, आवड, स्वभाव, भाव, त्याची देहरचना, रंग, देहबोली, यातूनच त्या माणसाची व्यक्तिरेखा साकार होते. बाबासाहेबांचे घरातले, जवळचे, ते राहात त्या-त्या ठिकाणचे स्त्री, पुरुष, मुलं डोळ्यांपुढे आणायची होती. बाबासाहेबांनी महाड, नाशिक, सातारा, नागपूर या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन असंख्य लोकांच्या सभा घेतल्या होत्या, सत्याग्रह केले होते, लढे दिले होते. त्या काळानुसार प्रत्येक ठिकाण आणि परिस्थितीनुसार  खेडय़ापाडय़ातून आलेली ती माणसं कशी होती, त्यांचे कपडे कसे होते, ते कोणत्या पद्धतीनं कपडे घालत, नेसत, कोणते दागिने आणि जातीचिन्हं- म्हणजे पुरुष मनगटात काळा दोरा वापरत, हातात घुंगरांची काठी घेत,  बायका जातीनिहाय मोठं गोंदण आणि कुं कूही मोठं लावत, मुलांच्या गळ्यातले गंडे-दोरे वगैरे मला दाखवायचं होतं.

मी साडय़ांचे मोठे दोन बॉक्स मिळवले. त्यांच्या झाकणाच्या आत कोकणातल्या स्त्री-पुरुषांच्या कपडय़ांची चित्रं मला काढायची होती. खरं तर कोकणातल्या लोकांकडे गरिबीमुळे कपडे असे नव्हतेच. कमरेला लंगोटी आणि बायकांच्या अंगावर लुगडय़ाचा धडपा असायचा. पण इथे लोक सत्याग्रहासाठी घराबाहेर पडणार होते, त्यामुळे पुरुषांच्या अंगात कोपरी आणि स्त्रियांची गुडघ्याच्या वर साडी, डोक्यावर पदर, अशी चित्रं काढली. खोक्याच्या दुसऱ्या भागात बाजारातून निवडून आणून मण्यांच्या गळसऱ्या, मण्यांचं जाडसर मंगळसूत्र, नथ, कुडी, बुगडय़ा, पुतळ्यांची माळ, बोरमाळ, नात्यातल्या बायकांकडून आणलेले कथलाचे गोट, नाकातले चाप, दंडातली वाकी, पायांच्या बोटातली खटवं सुईदोऱ्यानं नीट बांधली. अशीच मग कोल्हापूरकरांचीही चित्रं काढली. पुरुषांचे डोक्याला मोठे फेटे, अंगात छाटी आणि स्त्रियांच्या टोपपदरी साडय़ा, चोळ्या दाखवल्या. चोळ्या, पोलकी ढगळ आणि हातानंच शिवलेली असत. नाशिकच्या लोकांचे कपडे साधारण तसेच होते, फक्त मुंडाश्याचा आकार थोडा लहान आणि स्त्रियांच्या साडय़ा इरकली असा बारीकसा बदल होता, पण थंडीमुळे अंगावर कपडे असत, ते दाखवले. काही अलंकार म्हणजे टोकदार वाकी, पायातले झांझर- म्हणजे वाजणारे गोल तोडे, मोठी जाडी खटवं, कोल्हापुरी साज वगैरे मिळवले. सातारा, कोल्हापूरकडच्या राजदरबारातील स्त्रियांचा प्रभाव म्हणून की काय, पण ‘खात्यापित्या घरातल्या’ दलित स्त्रियाही वापरत तसा चांदीचा कमरपट्टा मात्र मिळाला नाही.  नागपूरला धर्मातराच्या प्रसंगात तर सर्वाचे कपडे पांढरेच होते. ते कपडे प्रत्येकाकडे होतेच. १९५६ ला धर्मातर झालं तेव्हा दुकानात पांढऱ्या साडय़ा मिळाल्या नाहीत म्हणून बऱ्याच स्त्रिया धोतरच साडीप्रमाणे नेसून उपस्थित होत्या. ती स्थिती आता नव्हती. मी ते बॉक्स तयार करून भानूताईंना दाखवले, तेव्हा त्या हसून म्हणाल्या, ‘‘वा, छान होमवर्क झालं की.’’

मधल्या काळात आम्ही नायगाव आणि खार आदी ठिकाणी राहाणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या वारसदारांकडे जाऊन जुने फोटो बघून आलो. बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेत असताना इंग्लंडहून ज्या जमादार पोईपकरांना पत्र पाठवून १९१३ मध्ये चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीला- गंगूला त्यांनी शिकवावं असं लिहिलं होतं, ते जमादार माझ्या सासूचे चुलत आजोबा होते. सासूचे भाऊ धोंडीराम जाधव हे मुंबईत नायगावात राहात होते आणि त्यांच्याकडे जुन्या काळातले कुटुंबातले बरेच फोटो होते. ते आम्ही पाहून आलो. खारला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यां मुक्ताबाई कांबळे आणि केशवराव आडरेकर यांच्या पुढच्या पिढय़ांना आम्ही भेटलो. त्यांच्याकडेही अनेक फोटो होते. त्यात केशवराव आडरेकर आणि विठाबाई तिडेकर यांच्या लग्नाच्या वेळचा १९२९ मधला महत्त्वाचा ग्रुप फोटो होता. त्यात बाबासाहेब, रमाबाई आणि लक्ष्मीबाई आंबेडकरही आहेत. तो फोटो भानूताईंनी नीट निरखला. दादरला राजगृहात तळमजल्यावर तर बाबासाहेबांच्या फोटोंचं प्रदर्शनच होतं. तिथे बाबासाहेबांचे परदेशातले, भारतातले आणि चळवळीतल्या लोकांचेही पेहराव बघता आले. ते फोटो त्या दोन तास न थकता उभं राहून निरखत होत्या, काहीतरी टिपणं काढत होत्या. एक ‘ऑस्कर’ विजेती स्त्री तिथे आली आहे याची तिथे कुणाला कल्पना नव्हती. त्यांनीही ती येऊ दिली नाही. स्वत:चा मोठेपणा न दाखवणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होता.

फोर्टला खादी भांडारात जाऊन खादीचं कापड आणि दादरला ‘शहाडे-आठवले ’ दुकानात साध्या सुती साडय़ा, पोलकी आणि पुरुषांच्या कोपरीसाठी सुती कापड आम्ही पाहिलं. अत्यंत गरीब स्त्रिया फाटलेल्या दोन लुगडय़ांचे तुकडे दंड घालून एकत्र शिवून ते लुगडं वापरत, अशी मी त्यांना ‘टीप’  दिली तीही त्यांना खूप आवडली. काही लुगडी तशी जोडून घ्यायचं त्यांनी ठरवलं. कापड बोटांनी घासून घासून नजरेसमोर धरून जेव्हा त्या नीट बघू लागल्या तेव्हा मध्येच मी म्हटलं, ‘‘रंग घालून मांजरपाट वगैरे वापरता येतं ना?’’ त्यांनी माझ्याकडे तीव्र नजरेनं बघितलं आणि तशाच तीव्र आवाजात म्हणाल्या, ‘‘आताचे कॅ मेरे खूपच सेन्सिटिव्ह असतात. सूत न् सूत पकडतात.’’ भानूताईंकडे मी पाहातच राहिले. त्यांना कॅ मेरा कोणत्या कोनातून काय आणि कसं टिपतो त्याचं उत्तम ज्ञान होतं. बाबासाहेबांचे इंग्लंडमध्ये शिकतानाचे आणि गोलमेज परिषदेतले सर्वाचे कपडेही भानूताईंच्या चिकित्सक भिंगातूनच तयार केले गेले होते.

प्रत्यक्ष चित्रपट पाहाताना ते सारं अगदी आता आपल्या समोर घडत आहे ही भावना त्यांनीच प्रेक्षकांना दिली. सत्याग्रहाच्या प्रत्येक चित्रीकरणाच्या वेळी भानूताईंनी निवडलेल्या साडय़ा, कपडे, दागिने, घालून लोक समोर येत तेव्हा तो काळ, प्रसंग कपडय़ांतून उभा करण्याची भानूताईची अचूक दृष्टी जाणवत राही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, सभा, मिरवणुकीतल्या स्त्री-पुरुषांच्या, मुला-लेकरांच्या अंगावरील कपडय़ांमुळे खरोखरच ५०-६० र्वष मागे गेल्यासारखं वाटतं. छोटा भिवा, छोटय़ा रामूचं लग्न, रमाबाईंचं आजारपण, मृत्यू, अशा अनेक प्रसंगातील कपडय़ांमुळे ते प्रसंग अधिकच ठसठशीत झाले.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटासाठी काम करणाऱ्या एखाद्दुसऱ्या व्यक्तीपलीकडे कुणाला ‘ऑस्कर’ पुरस्काराखेरीज त्यांच्याविषयी फारसं माहीत नव्हतं. त्याच चित्रपटात डॉ. आंबेडकरांच्या पत्नीचं- रमाबाईंचं काम केलेली सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘‘त्यांना मी फारशी भेटलेले नाही. त्या मितभाषीच होत्या, पण आपल्या कामात त्या अतिशय अचूक होत्या. बाळंतीण रमाबाईंच्या- म्हणजे माझ्या कानाला बांधायला लहानसं फडकं त्यांना हवं तसं मिळेपर्यंत त्यांनी चित्रीकरण खूप वेळ थांबवलं होतं आणि सर्वाची तारांबळ उडाली होती हे चांगलं आठवतं. ’’ सोनाली सांगतेय त्या ‘फडकं’ प्रकरणाच्या वेळी मीही तिथेच होते. त्या प्रसंगाचं ‘होमवर्क’ न झाल्यानं त्या मनातून खूप अस्वस्थ होत्या नक्कीच. कोणतीही तडजोड करायला तयार नव्हत्या. भानूताई आपल्या विचारावर ठाम असत. गरोदर रमाबाई दाखवताना त्यांनी गडद रंगाची साडी नको, त्यातून पोट दिसणार नाही, म्हणून फिकट रंगाचीच साडी निवडली होती. तसंच दु:खासाठी काळपट, मातकट आणि सुखाला उजळ असं त्यांचं समीकरण होतं. जेव्हा त्या कपडेपट पाहायला येत तेव्हाही तिथे मांडलेल्या पेटय़ांतले कपडे त्या-त्या प्रसंगाप्रमाणे आहेत ना, हे कपडे उचलून नीट खात्री करून बघत. कपडेपट सांभाळणाऱ्या श्याम आणि कुणाला तरी काही सूचना देऊन मगच त्या जात. चित्रपटाच्या कामानिमित्त तिथे अनेक लोकांचा वावर असायचा. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कांचन नायक, मदन रत्नपारखी, विनोद देशपांडे, प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड, शिवदास घोडके, मनीषा कोरडे, सुरेश गावडे असे कॅ मेऱ्यामागचे लोक आणि त्या-त्या प्रसंगातील कलाकार म्हणजे डॉ. आंबेडकरांची भूमिका करणारे मल्याळम चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मामुटी, अभिनेत्री सोनाली कु लकर्णी, आसावरी घोटीकर, आप्पा बनसोडे, अशोक लोखंडे अशा बऱ्याच व्यक्ती आजूबाजूला असत. पण भानूताई कामाशिवाय कुणाशीही बोलल्या, कुणाला भेटल्या असं झालं नाही.

एकदा मी त्यांच्या ‘नेपियन सी’ येथील घरी गेले होते. त्या अत्यंत साधेपणानं राहात होत्या. घरातल्या भिंतींवर एक-दोन चित्रांच्या फ्रेम लावलेल्या होत्या.  त्या चित्रकार असल्यानं ती त्यांचीच कला होती. त्यांची मुलगी राधिका कोलकात्याला होती. त्यांची केअरटेकर  त्यांच्यासोबत राहात होती. मी तिथे गेले ते बाबासाहेबांच्या काळातल्या दलित स्त्रिया साडय़ा कशा पद्धतीनं नेसत ते नेसून दाखवायला. ती बर्मुडय़ासारखी उबरवटा , मांडय़ांपर्यंत कासोटा वगैरे नेसण्याची पद्धत मी फक्त पाहिलेली होती. मी ती नात्यातल्या बायांकडून शिकू न गेले होते आणि त्यांना तसं नेसून दाखवलं, तेव्हाही माझं ‘होमवर्क’ बघून त्या छान हसत ‘गुड’ इतकंच म्हणाल्या. त्यांनी हातात घेतलेल्या बायोपिक सिनेमातील व्यक्तींचा व्यवस्थित अभ्यास केलेला असायचा. डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेविषयी तर त्यांना प्रचंड आदर होता.

एकदा महाड येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटाच्या सेटवर त्या आणि मी एका झाडाखाली बसलो होतो. जवळच टीपॉयवर असलेल्या ग्लासातलं पाणी संपलं होतं. भीमबाबा नावाचे मध्यम वयाचे साधे गृहस्थ तिथे मदतनीस म्हणून काम करत होते. भानूताईंनी त्यांना पाणी आणायला सांगितलं. भीमबाबानी पाण्याची बाटली आणली. त्या त्यांना म्हणाल्या, ‘‘ओतून द्या.’’ भीमाबाबांनी बाटलीचं बूच काढून बाजूच्या झाडाच्या बुंध्यात पाणी ओतून दिलं आणि रिकामी बाटली आमच्या समोर धरली. तशा भानूताई शांत आवाजात, पण रागावून त्यांना म्हणाल्या, ‘‘तुमचं नाव भीमबाबा ना? मग नुसतं नावच घेऊन हिंडणार का? डोकं वापरणार की नाही? आपण चित्रपट कुणाचा करतोय हे तरी बघा.’’ हात उंचावून डोळे मोठे करून बोलणाऱ्या भानूताईंच्या बोलण्यात अनेक अर्थ सामावले होते.

व्यक्तीच्या अंगावरील वस्त्रच नाही, तर त्याचे अंतरंगही जाणण्याची विलक्षण क्षमता त्यांच्याकडे होती. इतरांच्याच नाही, तर स्वत:मधल्या क्षमताही त्या पुरेपूर ओळखून होत्या. कोणत्याही परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी आपली प्रतिभाच पुरेशी आहे, या कठोर आत्मविश्वानंच त्या विद्यार्थिदशेपासूनच वावरत होत्या. भानूताईंमधल्या या गुणांची, त्यांच्यातल्या कलेची जाणीव त्यांची आई कांताबाई आणि वडील अण्णासाहेब राजोपाध्ये यांना होती. त्यांच्या प्रोत्साहनानंच शालेय शिक्षणानंतर मुंबईत येऊन भानूताईंनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. अलीकडेच सिनेसृष्टीतील एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, ‘‘वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी चित्र काढत आले. पुढे मी फक्त काम, काम आणि कामच करत राहिले.’’

भानू म्हणजे सूर्य. मला त्यांचा फक्त किरणच दिसला होता. पण त्यांच्या कलेची प्रभा जाणवलेले, पाहिलेले सिनेसृष्टीतील गुरुदत्त यांच्यापासून आशुतोष गोवारीकरांपर्यंत अनेक दिग्गज होते.  त्यांच्या चित्रपटातल्या कलाकारांना त्या-त्या कथानकातल्या वास्तवाचं सौंदर्य भानूताईनी दिलं, त्यातून प्रत्येक चित्रपट अजरामर झाला. आता भानूताई गेल्यावर त्यांच्याविषयीच्या बातम्या वाचताना थक्क व्हायला होतं. एक-दोन नाही, तर शंभर हिंदी चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून त्यांनी काम केलं. त्यातल्या वहिदा रहमान, मुमताज, साधना वगैरेंसारख्या फ्रील आणि पट्टेवाल्या तंग साडय़ा नेसून महाविद्यालयातील कार्यक्रमांमध्ये मुली नृत्य करताना दिसत. पण आता समजतंय ती कला भानूताईंची होती. त्यांनी कॉस्च्युम डिझाइन केलेले अनेक चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट आहेत. ‘लगान’ या चित्रपटालाही ‘ऑस्कर’साठी नामांकन मिळालं होतं. या चित्रपटासाठी भानूताईंना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

त्यांचं काम थोरच होतं. १९५६ ते २०१५ पर्यंत सहा दशकं चित्रपट करत राहाणं, ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळवणं, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटासाठी त्याच तोडीचं कॉस्च्युम डिझाइन करणं, ‘र. धों. कर्वे’, ‘रणांगण’ अशा काही मराठी नाटकांमध्येही आपल्या कलेनं वास्तव घडवणं आणि आता लिलाव होत असलेली त्यांची अनेक चित्रं सामोरी येणं.  हे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांनी केलेलं अथक ‘होमवर्क’च आहे. इतकं सगळं करून, मेंदूतील टय़ुमर आणि आठ र्वष अर्धाग वायूनं एक अंग विकलांग झालेल्या अवस्थेत आपल्या मितभाषी स्वभावानुसार त्यांनी सारं चूपचाप सहन केलं.

जेव्हा त्यांनी ‘ऑस्कर’ मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ हा बहुमान स्वत:ला आणि आपल्या देशालाही मिळवून दिला, तेव्हा त्या थोडय़ांनाच परिचित झाल्या. पण आता आपल्या जाण्यानं, आपल्या कामानं त्या सर्वाचंच लक्ष वेधून गेल्या. अशा मनस्वी, बहुगुणी, ‘होमवर्क’ची शिकवण देणाऱ्या भानूताई- अर्थात भानूमती राजोपाध्ये-अथैया यांना भावपूर्ण श्रद्धांजली.