12 November 2019

News Flash

आम्ही चालवू हा ज्ञानवारसा

महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांच्या बौद्धिक संपन्नतेचा वारसा त्यांच्या तीन पिढय़ांनी जपला.

| November 30, 2013 01:01 am

महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांच्या बौद्धिक संपन्नतेचा वारसा त्यांच्या  तीन पिढय़ांनी जपला. त्यांच्यातील पांडित्य, साक्षेपी व्यासंग, सखोल संशोधनाची आस पुढच्या सर्व पिढय़ांपर्यंत झिरपली. दुसरी पिढी डॉ. गोविंद पांडुरंग आणि डॉ. प्रभाकर पांडुरंग काणे यांची तर पुढे आयआयटीमधून डॉक्टरेट केलेल्या डॉ. शांताराम यांनी आणि त्यांच्या डॉ. रवी आणि देवेंद्र या मुलांनीही हा ज्ञानवारसा पुढे नेला.
सन १९४९. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी, मुंबई विद्यापीठाच्या  तत्कालीन कुलगुरूंना आदरपूर्वक निमंत्रण पाठवलं आणि म्हटलं, ‘श्रीमान् प्रारंभी आपली नेमणूक दोन वर्षांसाठीच होती, ती आज संपली. परंतु आपण आपलं मार्गदर्शन पुढे चालू ठेवावं ही विनंती आहे.’ महनीय कुलगुरूंनी यापुढील लेखनाला, वाचनाला आणि वकिली व्यवसायाला पुरेसा वेळ मिळावा आणि म्हणून या पदातून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी अर्थातच आपला आग्रह चालू ठेवला अन् ते बोलून गेले, ‘सर, आजवर आपण विनावेतन कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली, पण आता आपल्यासाठी दरमहा अडीच हजार रुपये मानधनाची सोय करत आहोत.’ यावर  कुलगुरूंचा नकार अधिकच ठाम झाला. अन् ते तिथून उठून गेले. नंतर आपल्या मुलाशी बोलताना त्यांनी सांगितलं, ‘मानधनाचा मुद्दा आल्यानंतर मी निर्णय बदलला असा संदेश जाऊ नये म्हणून मी नकार दिला नाहीतर कदाचित मी मुदतवाढ घेतली असती.’ चार भिंतीतल्या संभाषणातूनही चुकीचा संदेश पसरू नये यासाठी पराकोटीची दक्षता बाळगणारे हे विद्वान, कर्तव्यदक्ष कुलगुरू म्हणजे महामहोपाध्याय, ‘भारतरत्न’ सन्मानित भारत विद्येचे अभ्यासक,  धर्मशास्त्रपारङ्गत, हिंदू कायद्याचे भाष्यकार डॉ. पां. वा. काणे.
कोकणातील वेदशास्त्रपारङ्गत अशा मध्यमवर्गीय काणे कुटुंबातल्या या विद्यार्थ्यांनं अतिशय मेहनतीनं स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, बी. ए. ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम, मग एल. एल. बी., ‘झाला वेदान्त’ पारितोषिकासह एम.ए. आणि पुढे ‘हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल. एल. एम. असा त्यांचा विद्यासंपादनाचा अश्वमेधच चालू होता. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास आणि सामाजिक अभिसरणाचं भान या तीन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून महामहोपाध्याय काण्यांचे ग्रंथ सिद्ध झाले ते म्हणजे ‘धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास.’ त्यांचं प्राचीन भाषा, वाङ्मय, काव्य, महाकाव्य, अलंकारशास्त्र याचं प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपराचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचं एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झालं. त्याचं हे प्रचंड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग, ही तैलबुद्धी अन् सखोल संशोधनाची आस पुढच्या पिढय़ांपर्यंत किती आणि कशी झिरपली हे बघणंही औत्सुक्याचे आहे.
‘सांगे वडिलांची कीर्ती’ म्हणत त्याच क्षेत्रात जाणाऱ्या पुत्र-पौत्रांचं लवकर नाव होतं. पण अगदी वेगळ्या क्षेत्रात जाऊनही काणे घराण्यांचं नाव उज्ज्वल करणारी दुसरी पिढी म्हणजे
डॉ. गोविंद पांडुरंग आणि डॉ. प्रभाकर पांडुरंग काणे. दोन्ही मुलांचा ओढा विज्ञानशाखेकडे. त्यांना हवा तो अभ्यासक्रम निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य वडिलांनी दिलं. फक्त जे निवडाल ते  विचारपूर्वक निवडा आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग शिकण्यासाठी करा, यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच प्रभाकर यांनी रॉचेस्टर विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पीएच.डी. मिळवली आणि आयआयटीत शिकवलं. तर गोविंद यांनी लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून, इंधन वायूंच्या ज्वलनाच्या अभ्यासासाठी पीएच.डी. मिळवली.
डॉ. गोविंद पांडुरंग काणे हे सुरूवातीला केमिस्ट्री घेऊन एम.एस्सी झाले. पण रसायनशास्त्रातल्या प्रारंभानंतर त्यांच्या विज्ञानप्रेमानं त्यांना केमिकल टेक्नॉलॉजी आणि केमिकल इंजिनीअरिंगकडे वळवलं. हे नव्यानं वाढणारे विषय शिकवत. मुंबई विद्यापीठात रीडर, प्रोफेसर आणि नंतर युडिटीसीचे डायरेक्टर म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. एवढंच नव्हे तर झपाटय़ानं औद्योगिक प्रगती करणाऱ्या देशातल्या उद्योगांना, कोणत्या संशोधनाची गरज आहे ते हेरून, विद्यार्थी घडवले हे डॉ. गोविंद काणे यांचं मोठं योगदान मानलं जातं.
तो काळ, देशातल्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीचा पाया घालण्याचा होती. टी. टी. कृष्णम्माचारी त्यावेळी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री होते. त्यांनी डॉ. गोविंद काणे यांना आग्रहानं वैज्ञानिक सल्लागार (रासायनिक उद्योग) म्हणून दिल्लीला नेलं आणि देशातल्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीजच्या विकासात सहभागी होण्याची संधी डॉ. काणे यांना मिळाली. अत्यंत परखड, निस्पृह विद्वान म्हणून दिल्लीत डॉ. गोविंद काणे यांचा शब्द मानला जाऊ लागला. मोठमोठय़ा कारखानदारांना सल्ला देताना ते सांगत, ‘‘बुद्धिमान आणि मेहनती कर्मचाऱ्यांना उत्तम पगार द्या म्हणजे भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही.’’ डॉ. गोविंद काणे यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं.
महामहोपाध्याय काण्यांनी आपल्या मुलांना जे स्वातंत्र्य दिलं तेच डॉ. गोविंद यांनी आपल्या मुलांना दिलं. त्यामुळे त्यांचं पूर्ण कुटुंब हे उच्चविद्याविभूषित आहे, तेही विविध विद्याशाखांमध्ये. संशोधनाचा वसा मात्र मुंबईच्या आयआयटीमधून डॉक्टरेट केलेल्या डॉ. शांताराम यांनी आणि त्यांच्या डॉ. रवी आणि देवेंद्र या मुलांनी जपला आहे. डॉ. शांताराम यांना आपल्या आजोबांचा, महामहोपाध्याय काण्यांचा भरपूर सहवास मिळाला. अचाट स्मरणशक्ती, प्रखर बुद्धिमत्ता, असामान्य आकलनशक्ती तर आजोबा आणि वडिलांकडून मिळालीच, पण दीघरेद्योग आणि संशोधनाला आवश्यक चिकाटी, परिश्रम, ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यावर बाकी मोह बाजूला सारणं यांचं प्रात्यक्षिक रोजच्या जीवनात त्यांच्यासमोर होतच होतं. या साऱ्या पुंजीसह
डॉ. शांताराम यांनी आपल्या नोकरीच्या कालखंडात अमेरिकेतील अ‍ॅमोको केमिकल्स, भारतात घरडा, स्वदेशी आणि नोसिलमध्ये संशोधन-विकासाचा प्रमुख म्हणून मोलाची कामगिरी बजावली. हे नित्यकर्म करतानाच नैसर्गिक पदार्थ, त्यांचे गुणधर्म, त्यांचं विश्लेषण-संश्लेषण हेही डॉ. शांताराम यांच्या कुतुहलाचे विषय होते. त्यातून त्यांच्या मानवी आणि वनस्पतींचं शरीरविज्ञानशास्त्र आणि जीवनरसायनशास्त्र यांचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. आणि या अभ्यासाच्या मार्गावर त्यांना आपल्या आयुर्वेदातल्या प्राचीन ज्ञानखजिन्यानं भुरळ घातली. एका नव्या पद्धतीनं केलेल्या तेलार्काची. एक थेंबसुद्धा गुणकारी ठरतो हे त्यांनी स्वत: पत्नी आणि मुलांवर प्रयोग करून सिद्ध केलं. म्हणजे एका बाजूनं डॉ. शांताराम पुन्हा आपल्या आजोबांच्या प्राचीन विद्यासंशोधनाशी नातं सांगू लागले तर दुसऱ्या बाजूला नॅनो टेक्नॉलॉजीचं आधुनिक शास्त्र त्यांच्या परिचयाचं होतंच. त्यातूनच त्यांनी अर्कस्वरूपाची औषधं विकसित करून त्यांचा प्रसार-प्रचार करण्याचं व्रत घेतलं. संस्कृत ग्रंथ आणि धर्मशास्त्रांच्या परिशीलनातून हिंदू समाजजीवन आणि कायदेपद्धतींवर भाष्य करणाऱ्या महामहोपाध्याय काणे यांनी भारतीय राज्यघटना राज्यसभा लिहिणाऱ्या घटना समितीला मोलाची मदत केली होती. ते हिंदू कोड बीलासाठी सल्लागार होते. त्याची आठवण इथे आवर्जून करावीशी वाटते.
प्रकांड पांडित्याचा उपयोग समाजाच्या दैनंदिन जीवनात होण्यासाठी काणे घराण्याच्या तीनही पिढय़ांचं योगदान होत असतानाच डॉ. शांताराम यांच्या दोन्ही मुलांनी शाळेतच आपलं वेगळेपण दाखवलं. डॉ. शांताराम आणि त्यांच्या पत्नी सुनीती यांनी लहान वयापासूनच मुलांच्या आकलनशक्तीवर विश्वास ठेवत उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन त्यांच्याकडून करून घेतलं. त्यामुळे रवी आणि देवेंद्र या दोन्ही मुलांनी लहानपणापासून स्वतंत्र वाचन, त्यावर आपली मतं नोंदवणे, भाषणं देणे सुरू केले.
देवेंद्र याला इतिहास आणि पॉलिटिकल सायन्समध्ये विशेष रस. त्यानं ५ वीत असताना ‘मला आवडलेला पेशवा, का व कसा’ या विषयावर मोठा निबंध लिहून साऱ्यांना चकित करून सोडलं. आज देवेंद्र अमेरिकेत आहे. वकील आहे. तिथल्या बृहन्महाराष्ट्र मंडळींची घटना लिहिण्यात मोलाची मदत करून त्यानं पणजोबांशी पुन्हा धागा जोडला आहे. स्टॅनफर्ड आणि एनआयटीमध्ये शिक्षण घेऊन डॉ. रवी शांताराम यानं आपल्या घराण्याची संशोधनाची ध्वजा वैश्विक पातळीवर नेली आहे. तो  अमेरिकेत रेनसेलर पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूटमध्ये प्रोफेसर आहे.
जगावर प्रभाव पाडू शकणाऱ्या १०० वैज्ञानिकांच्या यादीत त्याचा समावेश आहे. डॉ. रवीच्या संशोधनाचं उद्दिष्ट अतिसूक्ष्म (नॅनो) घटक वापरून जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातले मूलभूत प्रश्न सोडवणं हे आहे. हे संशोधन चार क्षेत्रांत सुरू आहे.
पहिल्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या दातेरी परमाणुशृंखला बनवून (मल्टी व्हॅलंट मॉलेक्यूल) अँथरॅक्स किंवा एड्ससारख्या रोगांना प्रतिबंध करणे किंवा इतर निरोगी पेशींना उत्तेजित करणे. दुसऱ्या क्षेत्रात विशिष्ट व्हायरसमधला डीएनए शोधून त्याचा जीन थेरपीसाठी उपयोग करण्यावर भर आहे.
तिसऱ्या क्षेत्रात अतिसूक्ष्म घटक आणि इतर जैविकं यांचा संयोग करून, जीवाणू आणि विषारी पदार्थाना ओळखण्यासाठी नव्या पद्धती शोधण्याचं काम चालू आहे आणि चौथ्या क्षेत्रात अतिसूक्ष्म घटकांचा वेगवेगळ्या वापरातल्या गोष्टींच्या पृष्ठभागांवर भर देऊन, त्यांना जंतूप्रतिकारक किंवा अन्य क्षमता मिळवून देण्याची धडपड चालू आहे.
डॉ. शांताराम काणे याची तिसरी पिढी. आयुर्वेद, होमिओ, चक्र, सुजोक आणि आहारशास्त्र यांची सांगड घालून सूक्ष्म औषधं विकसित करून ते आजुबाजूच्या माणसांचं जीवन सुखकर करत आहेत तर चौथ्या पिढीच्या डॉ. रवींचं योगदान पुढील अनेक पिढय़ांसाठी मौलिक ठरणार आहे.
डॉ. रवींच्या आई, सुनीती काणे या एक साक्षेपी वाचक, संस्कृत आणि संगीतप्रेमी. आपल्या आई-वडिलांकडून त्यांनी हा वारसा घेतला. काणे घराण्यात तो अधिक जोपासला गेला. गेली काही वर्षे सुनिती या उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करत आहेत. ‘चिकन सूप फॉर द इंडियन सोल’च्या त्यांच्या अनुवादानं खपाचा उच्चांक गाठला होता. वाङ्मयावर प्रेम करणाऱ्यांना भाषेचा अडसर जाणवू नये हाच त्यांचा उद्देश आहे.
लोकोपयोगी कामाचा त्यांचा वसा त्यांची सून सुजाता रवी अमेरिकेत जपते आहे. डाएटिशिअन आणि फिजिशिअन्स म्हणून काम करताना भारतीय आरोग्यविज्ञानाची सांगड ती अत्याधुनिक आरोग्यसेवेशी घालते आहे.
असामान्य बुद्धिमत्ता ही एकारलेली, समाजजीवनाशी फटकून असते या समजुतीला छेद देणाऱ्या या काणे घराण्याच्या चार पिढय़ा. बुद्धी, प्रतिभा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि लोकसेवेची अजोड सांगड घालणाऱ्या अशाच आहेत.    
vasantivartak@gmail.com

First Published on November 30, 2013 1:01 am

Web Title: bharatratna pandurang vaman kane and his family