आशावादी, प्रयत्नवादी राहण्याइतकेच समाधानी राहणे, ज्यात आपल्याला समाधान मिळते ते शोधणे महत्त्वाचे आहे. आपल्या स्वभावातील, संस्कारातील कमतरता दुसरा कुणी पाहू शकला नाही तरी आपल्याला तर ती दिसते, कळते. म्हणूनच परिपूर्णतेचा ध्यास घेतला पहिजे. त्याने आपोआप आत्मसंतुष्टता येईल.
माणसाची सर्व आभूषणं मौल्यवान व शोभिवंत असतात, तरीही राजमुकुट परिधान करणं हे परमोच्च भाग्याचं चिन्ह मानलं जातं. तसंच समाधानाचंही आहे. सर्व गुणांमधला तो मुकुटमणी मानला जातो. समाधानी माणसाची वृत्ती अनासक्त असते. कबीरजी म्हणतात,
चाह गई, चिंता मिटी
मनवा बेपरवाह
जाको कछु न चाहिए
वो शाहन का शाह॥
 समाधान ही खरी तर आत्म्याची शालीनता आहे. या नश्वर जगात खरं तर सर्वसुखी कोण असतं? पण आहे त्यातही समाधानी राहणारा सुखी होतो. समाधानाची अनुभूती होण्याचं स्थान म्हणजे आपलं मन. म्हणूनच या मनाला जिंकणाराच केवळ संतुष्ट राहू शकतो. समाधान ही जीवनातील सर्वोच्च प्राप्ती आहे. म्हणतात ना, समाधान हेच सर्वात मोठं धन. एखादी व्यक्ती सर्व बाबतीत संपन्न असूनही जर तिला समाधान नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. समाधान खरं तर जीवन जगण्याची कला म्हटली पाहिजे. संतुष्ट आत्माच स्वयंप्रिय, लोकप्रिय व परमेश्वरप्रिय बनू शकतो. कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीत त्याची ‘स्व-स्थिती’ तशीच टिकून राहते. जो स्वत: संतुष्ट, समाधानी असतो, तो इतरांच्या नशिबाशी, इतरांना होणाऱ्या आनंदाशी कधीच तुलना करीत नाही. जे आपल्या वाटय़ाला आलं, त्यातच सदैव राजी राहतो, ‘नाराज’ कधीही होत नाही. त्याची सद्भावना हीच असते-
साई इतना दिजिए, जाये कुटुंब समाय,
आप भी भूखा न रहे, साधू ना भूखा जाय।
खरा समाधानी माणूस कधीही लोभ धरत नाही. स्वत:च्या पडत्या काळातही दुसऱ्यांच्या उत्कर्षांने त्याच्या मनात चलबिचल होत नाही. कारण तो जाणतो की संतोषाचे फळ गोड अर्थात सदा-सर्वकाळ जीवनात मधुरता प्रदान करणारं असते.
एकदा एका गावात दुष्काळ पडला. लोक भुकेने तडफडू लागले. अन्न-पाण्यावाचून त्यांचे हाल होऊ लागले. लहान लेकरे आपल्या आईजवळ खाण्यासाठी हट्ट करायची. गावच्या पाटलाला हे पाहवेना. त्याने गावच्या मुलांसाठी रोज भाकरी वाटायला सुरुवात केली. तो भाकरी वाटू लागला की गावची मुलं धक्का-बुक्की करत जमा होत. एक मुलगी मात्र सर्वात शेवटी रांगेतून आपल्या वाटय़ाची भाकरी शांतपणे घेई व निघून जाई. त्या मुलीला आईशिवाय कुणीच नव्हते. मात्र त्या दोघी जे आहे त्यात समाधानाने राहात.
   एके दिवशी मुलगी भाकरी घेऊन घरी आली. आईने पाहिले तर भाकरीत सोन्याचे दोन मणी. आईने लागलीच ते मणी पाटलांना परत देऊन येण्यास सांगितले. मुलगी भाकरी व सोन्याचे मणी घेऊन तशीच पाटलांकडे आली व घडलेली सर्व हकिगत तिने पाटलांना सांगितली. पाटीलांना माहीत होते की हिच ती मुलगी धक्का-बुक्की न करता सर्वापेक्षा मागे राहून शांततेने भाकरी घेते. तिचा खरेपणादेखील त्यांना खूप भावला. ते म्हणाले, ‘‘मुली, तू हे मणी घेऊन जा. हे तुझ्या समाधानाचे फळ आहे.’’ मुलगीदेखील हुशार होती. ती म्हणाली,‘‘ काका, मला माझ्या आईने लहानपणापासून शिकवले आहे. आपल्याला जे देखील मिळेल त्यात संतुष्ट राहावे. त्यामुळे खरे संतोषाचे फळ म्हणजे मला गर्दीत धक्के खावे लागत नाहीत.’’  पाटलांना लक्षात आले की इतकी लहान असूनही या लेकराला किती समज आहे. ती मणी घेऊन जाण्यास तयारच होईना. तेव्हा पाटलांनी तिच्या आईला बोलावून घेतले. पाटील निपुत्रिक होते. त्यांनी मुलीला आपल्या संपत्तीचे वारस केले. अशा प्रकारे त्या मुलीला तिच्या समाधानाचे मोठे बक्षीस मिळाले. म्हणूनच म्हणतात, भौतिक धनसंपत्तीपेक्षा संतोषधन खूप श्रेष्ठ आहे.
 आज माणूस व्यर्थ इच्छांच्या मागे धावताना दिसतो. जे आपल्याजवळ नाही, त्याचाच तो पाठलाग करताना दिसतो. स्वत:बद्दलच्या अपेक्षांचे व इतरांबद्दलच्या अपेक्षांचे ओझे घेऊनच तो वावरताना दिसतो आणि समाधानापासून दूर जाण्याची कारणं कोणती असतील तर ती म्हणजे अमर्याद इच्छा व न संपणाऱ्या अपेक्षा.
  गडगंज संपत्तीचा धनी असलेल्या सावकाराला त्याच्या पुढच्या पिढीची चिंता सतावीत होती. या चिंतेने तो आजारी पडला. एका शुभचिंतकाने त्याला एका ऋषींकडे जाण्याचा सल्ला दिला. सावकार स्वत: फार कंजूष  होता. परंतु आपणास ऋषींपासून ‘लाभ’ होणार या इच्छेने आपला ‘लोभ’ त्याने बाजूला ठेवला. फळांची एक करंडी घेऊन तो ऋषींकडे आला. त्यावेळी ऋषीं तपसाधनेत लीन होते. सावकाराने ऋषींना प्रमाण केला व फळांची करंडी पुढे ठेवीत म्हणाला, ‘‘महाराज माझी ही छोटीशी भेट स्वीकार करा.’’ ऋषींनी डोळे उघडून त्या सावकराकडे व करंडीकडे दृष्टिक्षेप टाकला. झोपडीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका फळाच्या करंडीकडे इशारा करीत ऋषी सावकाराला म्हणाले, ‘‘बाळा, भगवंताने माझ्यासाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. तेव्हा मला आता या करंडीची गरज नाही. परंतु तू येथे कशासाठी आला आहेस. माझ्याकडून काही मदत हवी असेल तर जरूर सांग.’’ ऋषींच्या या वक्तव्याने सावकाराचा विवेक जागृत झाला. त्याने पाहिले, साधूजवळ फळांची एक टोपली असताना त्याला दुसऱ्या करंडीचा मोह झाला नाही. मी मात्र माझ्याकडे वारेमाप संपत्ती असतानाही अधिक धनाची आसक्ती ठेवीत आलो व त्यामुळे दु:खी झालो. त्याने ऋषींचा चरणस्पर्श केला व म्हणाला, ‘‘महाराज, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. खरे सुख समाधानात आहे, त्यागात आहे, हव्यासात नाही.’’
समाधान हीच आत्म्याची खरी संपत्ती, समाधान हीच आत्म्याची आनंदमयी अवस्था. संतुष्टतेचा परीसस्पर्श झाला की मानवी जीवनाला सोन्याची झळाळी येते. अशा प्रकारचा संतुष्ट व्यक्ती आपल्या निरपेक्ष, निस्वार्थ वृत्तीने, दृढनिश्चयी स्वभावाने त्याच्यासह इतरांच्याही जीवनात प्रसन्नतेची पहाट फुलवतो.
एक मूर्तिकार मूर्ती बनवण्यात व्यस्त होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने पाहिले तर त्याला दिसले की तो जी मूर्ती बनवत होता, अगदी तशीच दुसरी मूर्ती जमिनीवर आडवी ठेवली होती. त्या व्यक्तीने कुतुहलाने विचारले, एकाच मंदिरासाठी दोन मूर्त्यां हव्या आहेत का? मूर्तिकाराने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिले. ‘नाही, एकच हवी आहे.’ ‘मग एक मूर्ती असताना आपण दुसरी का बनवत आहात?’ त्याने पुन्हा प्रश्न विचारला. ‘पहिल्या मूर्तीच्या नाकात थोडी उणीव आहे.’ मूर्तिकार म्हणाला. त्या व्यक्तीने पुन्हा प्रश्न केला, ‘याची स्थापना कुठे करायची आहे?’ मूर्तिकाराने सांगितले, ‘वीस फूट उंच स्तंभावर.’ त्यावर तो माणूस म्हणाला, ‘एवढय़ा उंचीवर असलेल्या या मूर्तीच्या नाकात असलेली छोटीशी उणीव कोणाला कशी बरी दिसेल?’ मूर्तिकाराचे हात थांबले. तो हसला व म्हणाला, ‘मला दिसेल.’
  म्हणूनच आशावादी, प्रयत्नवादी राहण्याइतकेच समाधानी राहणे, ज्यात आपल्याला समाधान मिळते ते शोधणे महत्त्वाचे आहे. आपल्या व्यक्तित्वाची संपूर्णत:च आपल्याला समाधानी बनवते. आपल्या स्वभावातील उणीव न कळल्याने दुसऱ्यांनी तिचा स्वीकार केला तरी त्या उणिवेची जाणीव आपल्याला तर होईलच ना? आपल्या स्वभावातील, संस्कारातील कमतरता दुसरा कुणी पाहू शकला नाही तरी आपल्याला तर ती दिसते, कळते. म्हणून कुणी बोलो अथवा न बोलो आपण आपल्यातील परिपूर्णतेचा ध्यास घेतला पहिजे. त्याने आपोआप आत्मसंतुष्टता येते.
   वृक्ष जमिनीच्या आधाराने उभा राहतो. जर तो जमिनीपासून वेगळे होण्याचा विचार करेल तर इतरत्र त्याचे अस्तित्व टिकेल का? त्याचप्रकारे मानवी जीवनाची स्थिरता व समाधान यांचा आधार आहे- त्याग, दया, परोपकार, पवित्रता, सभा हे गुण. या सद्गुणांची जोपासना जेवढी जास्त, या गुणांची वृद्धी जास्त, तेवढे आपण मनाने स्थिर, संतुष्ट व एकाग्र राहू शकू.    
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारा प्रकाशित होणाऱ्या ओम शांती मीडिया या आध्यात्मिक प्रवचनांचा हा अनुवाद.)

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…