भगवद्गीता ही अनेक उपनिषदांचे सार आहे. गीता ब्रह्मविद्या आहे, गीता योगशास्त्रही आहे. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्माचे ज्ञान देणारी किंवा त्याविषयींचे अज्ञान दूर करणारी. ज्ञानाचे सिद्धांत व व्यवहार यांचा योग साधणारी आहे, म्हणूनच ती समजून घेणे गरजेचे आहे.
भगवद्गीता ही महाभारताच्या भीष्म पर्वात सांगितली गेली आहे. फक्त ७०० संस्कृत श्लोक असलेले हे तत्त्वज्ञान छंदोबद्ध असल्याने गेय आहे म्हणून त्याला गीता म्हणतात. हे श्लोक प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून स्रवले म्हणून त्यांना भगवद्गीता म्हटले. कारण इतरही गुरुगीता, रामगीता, उद्धवगीता अशा गीता उपलब्ध आहेत.
भगवद्गीता ही आपल्या हिंदू धर्माचा मुख्य गं्रथ म्हणून गणली गेली. असे असूनही इतर धार्मिक ग्रंथांप्रमाणे गीतेची सुरुवात ओंकाराने अथवा मंगलाचरणाने होत नाही. कारण ती कथेच्या ओघात व विशिष्ट परिस्थितीत सांगितली गेली आहे. गीतेचे ७०० श्लोक अठरा अध्यायांत विभागले गेले आहेत. लक्षात घेण्यासारखे म्हणजे महाभारताची पर्वेही अठराच आहेत. महाभारतीय कौरव व पांडवांचे युद्धही अठरा दिवस चालले होते आणि तेही अठरा अक्षौहिणी या सैन्यसंख्येत! अधिक गंमत म्हणजे माणसाच्या शरीराची तत्त्वेही अठराच आहेत- ती आहेत ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेन्द्रिये, ५ सूक्ष्ममहाभूते व मन, बुद्धी, अहंकार! असे अठरा आकडय़ांचे महाभारताशी नाते आहे.
गीतेच्या प्रत्येक अध्यायात एकेक खास विचार किंवा विषय मांडला आहे. त्यानुसार त्या अध्यायाला नाव दिले आहे. प्रत्येक गीताध्यायाच्या शेवटी एक ओळ बघायला मिळते- इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु बह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे.. योगो नाम.. अध्याय:॥’ या ओळीला ‘पुष्पिका’ असे म्हणतात. या पुष्पिकेत सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता ही अनेक उपनिषदांचे सार आहे. गीता ब्रह्मविद्या आहे, गीता योगशास्त्रही आहे. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्माचे ज्ञान देणारी किंवा त्याविषयीचे अज्ञान दूर करणारी. ज्ञानाचे सिद्धांत व व्यवहार यांचा योग साधणारी. हे सर्व ज्ञान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातून सांगितले गेले आहे. संवाद म्हणजे दोन व्यक्ती किंवा दोन पक्षांत जी सर्वागीण चर्चा होते ती. गीतेमध्ये नारायणस्वरूप सर्वज्ञानी गुरू श्रीकृष्ण तर नरस्वरूप अज्ञानी शिष्य अर्जुन यांच्यात हा संवाद घडलाय.
गीता का, केव्हा व कशी सांगितली गेली याचा विचार केल्यावर असे लक्षात येते की, ही घटना तशी अकस्मातच घडली. योजून, शांतपणे, गुरूने शिष्याला हे ज्ञान दिलेले नाही. हे वैश्विक, जीवन जगण्याचे चिरंतन ज्ञान कसे भगवंतांकडून सांगितले गेले ते पाहू.
पांडवांचे राज्य द्युतात जिंकून घेऊन कौरवांनी त्यांना १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास सांगितला. १३ वर्षे गेल्यानंतर पांडव जेव्हा स्वत:चे राज्य मागायला आले तेव्हा दुयरेधनाने सरळ नकार दिला. अर्धे राज्य काय, पाच गावे काय, सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही देणार नाही असे कौरवांनी सांगितले. हा संपूर्ण अन्याय होता. अधर्म होता. युद्ध होण्यासारखी स्थिती निर्माण झाली. हे युद्ध टाळायचे खूप प्रयत्न करूनही युद्ध अटळ ठरले. युद्धाची तयारी झाली. ११ अक्षौहिणी सैन्य कौरवांचे होते तर ७ अक्षौहिणी पांडवाचे. सैन्ये येऊन समोरासमोर ठाकली. अर्जुनही उत्साहाने सर्व तयारीनिशी हातात गांडीव घेऊन आला. श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथ्य करणार होता. रणांगणावर आल्यावर त्याने श्रीकृष्णाला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्यास सांगितले. रथ मध्ये उभा केल्यावर अर्जुनाने समोरचे सैन्य न्याहाळले आणि एकाएकी- अर्जुन मोहग्रस्त झाला. त्याला समोर गुरू, आजोबा व इतर आप्त दिसले. या सर्व पूजनीय व आपल्या माणसांशी युद्ध करून त्यांना मारायचे हे अर्जुनाला पटेना. त्याच्या  हातातून गांडीव गळून पडले.
अर्जुनाने, आपल्या माणसांना मारून रक्ताने माखलेली सिंहासनाची गादी मिळवण्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी असे श्रीकृष्णाला सांगितले. युद्धाचे भयंकर परिणाम व पूजनीय आप्तांना मारण्याचे घोर कर्म कसे वाईट असते हे तो बोलू लागला व युद्ध न करण्याचे त्याने ठरवले. युद्धाचे दुष्परिणाम, कुळाची दुरवस्था व समाजाचे अध:पतन इत्यादी तत्त्वज्ञान अर्जुनच कृष्णाला सांगू लागला. त्याला अर्जुनाचा प्रज्ञावाद म्हणतात. काही वेळाने अर्जुन भानावर आला व त्याने कृष्णाला विचारले, ‘सद्यस्थितीत युद्ध करणे हे कर्तव्य त्याचबरोबर गुरुजनांशी पूजनीय अशा मोठय़ा मंडळींशी आदराने वागून त्याचे कल्याण इच्छिणे हेही कर्तव्यच. अशा वेळी माझा ‘धर्म’ कोणता? मी तुला शरण आलो आहे. तूच मला काय करू ते सांग.’
या अर्जुनाच्या प्रश्नामुळे गीतातत्त्वज्ञानाचा जन्म झाला. अर्जुन या शब्दाचा अर्थच मुळी ‘सरळ मनाचा’ असा होता, तर ‘ज्ञान- वैराग्य- ऐश्वर्य- यश- श्री- औदार्य’ या षड्गुणांनी युक्त तो भगवंत. गीतेत फक्त भगवंत बोलतात, श्रीकृष्ण उवाच असे कुठेही येत नाही. अर्जुनाच्या या प्रश्नामुळे, ‘‘जीवनसंघर्ष कसा टाळायचा, स्वधर्म म्हणजे काय? मानवी जीवनाचे ध्येय काय असले पाहिजे व ते कसे गाठायचे असे सर्व तत्त्वज्ञान भगवंतांनी सांगणे सुरू केले- गीतातत्त्वज्ञानाचा चिरंतन ओघ सुरू झाला.
गीतेच्या बाबतीत असा एक मोठा प्रश्न सर्वसामान्य विचारतात की, रणांगणावर दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकली असताना गीता सांगितली गेलीच कशी? तोपर्यंत शत्रुपक्ष गप्प कसा बसला? त्याला उत्तर असे आहे की, तो काळ नीतिनियमांनी वागण्याचा होता. अगदी युद्धाच्या वेळीसुद्धा प्रतिपक्ष तयार होऊन त्यांनी तसे सांगितल्याशिवाय कुणी हल्ला करीत नसत. काही विचारवंतांच्या मते भगवंतांनी अर्जुनाला युद्धप्रवृत्त करण्यापुरते ज्ञान त्या वेळी दिले असणार व बाकीचे नंतर लिहिण्यात आले असेल असे म्हणतात. असे अनेक निरनिराळे विचारप्रवाह आहेत.
प्राचीन काळापासून गीतेवर निरनिराळय़ा विचाराच्या विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून भाष्ये लिहिली. प्रत्येक पंडितांनी आपापले वाद मांडले. परंतु मराठीतील भावार्थदीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी या अद्भुत भाष्याचे स्थान यत्किंचितही ढळलेले नाही. संस्कृतातली गीता समजावी म्हणून माउलींनी तिच्यावर मराठी साज चढवून तिला खूप सजवली, पण ती मराठी भाषाही सध्याच्या काळात समजेनाशी झाली. पू. मामा दांडेकरांना सध्याच्या मराठीत आणावी लागली. आतापर्यंत गीतेची जगातील असंख्य भाषांत भाषांतरे झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात कर्मयोगाचे तत्त्वज्ञान उचलून धरीत ज्ञान व कर्म दोन्ही आवश्यकच आहेत असे प्रतिपादन केले.
 आजच्या काळात जगताना आपल्याला या गीतेचा नेमका काय अर्थ लागतो किंवा आजच्या काळात गीता कशी अनुभवता येईल, हे पाहणे हा या सदराचा हेतू आहे. कारण सर्व जगाने गीतेला उचलून धरले आहे. याचे कारणच गीता ही मानवी जीवनाशी संबंधित आहे. कुठल्याही एका विचारपंथाच्या दिशेने न जाता मनुष्य व त्याच्या जीवनातील संघर्ष, त्याची आध्यात्मिक उन्नती व आत्मोद्धार हे गीतेचे प्रमुख मुद्दे असल्यामुळे गीता कालातीत ठरली आहे. गीतेच्या या बाह्य़रंगातून गीतेच्या अंतरंगात शिरून अभ्यास केल्यावरच गीतेची महानता आपल्या लक्षात येईल.

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान