26 October 2020

News Flash

जीवन विज्ञान : शरीराची लढवय्यी सेना!

बाहेरून येणारे रोगजंतू, विषाणू यांच्याशी लढण्यासाठी आपलं शरीर उभी करत असलेली यंत्रणा ही मोठी हुशारीची आणि अचूक आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं मागील महिन्यातच असं सांगितलं होतं की, त्यांच्या करोनावरील लशीच्या सुरूवातीच्या आणि मधल्या चाचण्यांमध्ये प्रतिकारक शक्ती चांगली दिसून आली आहे. कंपनीनं ६० हजार लोकांना लस दिली होती. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनला चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत वा नव्या वर्षाच्या सुरूवातील लस मिळण्याची आशा आहे.

डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

बाहेरून येणारे रोगजंतू, विषाणू यांच्याशी लढण्यासाठी आपलं शरीर उभी करत असलेली यंत्रणा ही मोठी हुशारीची आणि अचूक आहे. तिचं काम जाणून घेतलं, तर सध्याच्या ‘करोना’ संकटाच्या काळात आपलं शरीर कसं सतत विषाणूंविरोधातल्या लढाईसाठी सज्ज आहे, हे लक्षात येईल. प्रतिकारशक्ती वाढली की कमी झाली, हे रक्ताची विशिष्ट चाचणी करून कळतं. मात्र प्रतिकारशक्तीचं काम चोख चालावं असं वाटत असेल, तर शरीराचं आरोग्य राखण्यासाठी कष्ट घ्यायलाच हवेत. त्यासाठी प्रतििपड आणि प्रतिजन ही आपली शरीराची लढवय्यी सेना कसं काम करते त्याविषयी..

प्रतिकारशक्ती म्हटलं, की पांढऱ्या रक्तपेशी (डब्ल्यूबीसी) आणि ‘टी’ आणि ‘बी’ पेशी हे समीकरण ‘करोना’च्या दहशतीमुळे सर्वाना माहीत झालं आहे. तसं पाहायला गेलं, तर ‘बी’ आणि ‘टी’ या दोन्ही प्रकारच्या श्वेतपेशी या अस्थिमज्जेत तयार होतात; पण काही ‘बी’ पेशींना पुढील ‘उच्च शिक्षणा’साठी छातीतील ‘थायमस’मध्ये पाठवलं जातं. याला ‘प्रोसेसिंग’ म्हणतात आणि त्या बनतात ‘टी’ पेशी. त्या एवढय़ा हुशार, की त्यांना स्मरणशक्ती असते. लहान असताना झालेल्या गोवर, कांजिण्या, गालगुंड याच्याशी एकदा लढलं, की कायम ते लक्षात ठेवून पुन्हा कधी त्या विषाणूंना शरीरात प्रवेश मिळत नाही. रोगप्रतिकारक लसींचे ‘शॉट’देखील (डोस) या पेशींना हे शिकवण्याचं काम करतात.

इतर ‘बी’ पेशींना लिंफ द्रव केंद्रात (म्हणजे ‘नोड्स’मध्ये) ‘प्रोसेस’ केलं जातं. तिथे त्यांना आपल्या शरीराचं प्रथिन कोणतं आणि बाहेरून आलेलं प्रथिन कोणतं हे ओळखण्याची पद्धत शिकवली जाते. बाहेरून एखादं प्रथिन आलं, की या पेशी एक विद्राव्य प्रथिन रेणू बनवतात ज्याला ‘अँटिबॉडी’ म्हणजे ‘प्रतिपिंड’ म्हणतात आणि तो रेणू ‘इम्युनोग्लोब्युलिन’ (आयजी) म्हणून ओळखला जातो. या ‘आयजी’चे अनेक प्रकार आहेत. सर्वात जास्त असतो तो प्रकार ‘जी’ म्हणून ओळखला जातो. त्याचं नाव  ‘आयजी-जी’- जो ७५-८० टक्के  प्रमाणात मानवी रक्तामध्ये आढळतो. सर्वात कमी असतो तो ‘आयजी-ई’- फक्त ०.००२ टक्के . तसंच आईच्या दुधामधून मिळतो तो ‘आयजी-ए’. त्याखेरीज ‘आयजी-एम’, ‘आयजी-डी’ इत्यादी विविध प्रकारचे प्रतिपिंड असतात. सर्वसाधारण रक्त तपासणी करतात तेव्हा ‘आयजी-जी’ बघतात आणि प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला काही तरी रोग, अ‍ॅलर्जी वा संसर्ग आहे हे समजतं. हे प्रतिपिंड बाहेरील प्रथिनांना फक्त निष्प्रभ करतात आणि तेदेखील अगदी सोप्या पद्धतीनं. प्रथिनं ही हजारो छोटय़ा ‘अमिनो आम्लां’ची साखळी असून त्यांना त्रिमितीमध्ये विविध आकार असतात. हे आकार नष्ट करणं म्हणजे खूप ऊर्जा वापरणं. त्याऐवजी जर त्याच्या खाचेमध्ये बरोबर बसणारे छोटे तुकडे तयार करून या खाचा भरून टाकल्या तर काय होईल? हे शत्रू प्रथिन आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही, कारण प्रतिपिंडानं त्याचं शस्त्र (खाचा- अर्थात अ‍ॅक्टिव्ह साइट) निष्प्रभ केलेलं असतं. या त्रिमिती आकारामुळे तयार झालेल्या खाचा म्हणजे कल्पना करा, की त्रिकोण, चौकोन, अर्धगोल असे विविध आकार आहेत. या खाचा म्हणजे ‘अ‍ॅक्टिव्ह साइट’ आणि त्यात चपखल बसणारे छोटे तुकडे म्हणजे ‘प्रतिपिंड आयजी’. हे बालवाडीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या खेळासारखं आहे. अशा प्रकारे प्रतिपिंड या परकीय प्रथिनाला निष्प्रभ करतं अथवा एकत्र चोळामोळा (अ‍ॅग्लोमरेट) करतं. शिवाय हे काय आणि कसं केलं, ही माहिती ही ‘बी’ पेशी जन्मभर लक्षात ठेवते. पुन्हा हेच परकीय प्रथिन समोर आलं, की अतिशय झटपट स्वत:ला ‘क्लोन’ (हुबेहूब प्रतिकृती अथवा जुळे) करून मोठय़ा प्रमाणात आवश्यक ती प्रतिपिंडं बनवली जातात आणि शत्रूचा नाश के ला जातो.

प्रतिपिंड- ‘अँटिबॉडी’ म्हणजे काय हे समजून घेतल्यावर आता बघू या ‘प्रतिजन’- अर्थात ‘अँटिजेन’ म्हणजे काय. ‘ब्रिटानिका’ या विश्वकोशात अगदी हल्ली- २०२० जानेवारीत याचं वर्णन पुढीलप्रमाणे केलं आहे. याचे परकीय आणि स्वकीय असे दोन प्रकार आहेत- म्हणजे बाहेरील रोगजंतू, विषाणू, रसायनांमुळे निर्मित आणि स्वत:च्या शरीरानं तयार केलेले. विषाणू, जिवाणू, प्रोटोझोआ (एकपेशीय जीव), सर्पविष, काही अन्नप्रथिनं, सिरम (रक्तातील द्रव) आणि दुसऱ्या माणसाच्या लाल रक्तपेशी हे झाले परकीय प्रतिजन. त्यांचा नाश करण्यासाठी ‘लिम्फोसाइट्स’ अर्थात ‘बी’ पेशी प्रतिपिंड तयार करतात. प्रतिजन जेव्हा ‘बी’ पेशीच्या पृष्ठभागावर येतो तेव्हा ही हुशार पेशी पटापट स्वत:च्या जुळ्या बहिणी तयार करून मोठय़ा प्रमाणात प्रतिपिंड निर्मिती करते. स्वकीय प्रतिजन मात्र आपल्याच शरीरानं निर्माण केलेले असतात. सर्वसाधारण निरोगी शरीरातील ‘बी’ पेशींना आपलं कोण आणि परकं कोण हा प्रथिनातील फरक ओळखता येतो; परंतु काही वेळा ‘ऑटोइम्युन डिसऑर्डर’ झाल्यास शरीर स्वत:च्या प्रतिजन रेणूला नष्ट करण्यासाठी ‘स्व-प्रतिपिंड’ (ऑटो अँटिबॉडी) तयार करतं. अशा व्यक्तीला प्रथिनं नष्ट झाल्यामुळे खूप थकवा येणं, स्नायू गळून जाणं, वजन घटणं असे त्रास सुरू होतात.

आतापर्यंत आपण पाहिलं, की प्रतिजन म्हणजे काय आणि ‘बी’ पेशी या लिम्फोसाइट प्रकारच्या श्वेत पेशी प्रतिपिंड निर्मिती करून रोगजंतूंना कसं थोपवतात; पण आणखी एक खूप वेगळ्या, आकारानं मोठय़ा असलेल्या- जणू राक्षस पेशींचं पथकदेखील येथे लढायला येतं. ‘लिंफ’ (लसिका) प्रणाली वापरणाऱ्या या पांढऱ्या रक्तपेशींची रक्तामध्ये प्रत्यक्ष लढाई होते. या राक्षस पेशी स्नायू आणि टिश्यूंमध्ये (उती) घुसून रोगजंतू आणि प्रतिजन रेणूला निष्प्रभ करण्याच्या फंदात न पडता चक्क गिळून टाकतात आणि त्याचा स्वत:चं अन्न म्हणून वापर करतात. यांना ‘मॅक्रोफेज’ असं नाव आहे. यांचं काम आहे, ते म्हणजे परकीय रेणू, जंतू आणि शरीरातील मरणाऱ्या श्वेत पेशींना गिळून टाकून पचवून टाकणं. ‘मॅक्रोफेज’ याचा शब्दश: अर्थच मुळी ‘गिळणारी’ पेशी असा आहे. साहजिकच यांचा आकार खूप मोठा असतो

(सोबतची आकृती पाहा). अगदी रोजच्या वापरातील खाद्यपदार्थाचं उदाहरण द्यायचं तर प्रतिपिंड रव्याचा कण, तर प्रतिजन विषाणू तिळाएवढा, प्रतिजन जिवाणू मटकीच्या दाण्यासारखा – बराच मोठा आणि लांबट.

‘बी’ पेशी एखाद्या वाटाण्याएवढी, तर ‘मॅक्रोफेज’ सांडग्यासारखी मोठी, पसरट, वेडीवाकडी. ‘बी’ पेशी बिचारी रव्याच्या कणासारखे छोटे अनेक प्रतिपिंड तयार करून तिळाएवढय़ा आणि मटकीएवढय़ा शत्रूला नामोहरम करणार, तर एखादी ‘सांडगा’ पेशी येऊन क्षणात तीळ किंवा मटकीचा दाणा गिळून टाकणार! हे उदाहरण फक्त आकारमानाचा तुलनात्मक अंदाज येण्यासाठी दिलं आहं. प्रत्यक्षात जिवाणू ‘मायक्रॉन’मध्ये (मिलिमीटरचा १००० वा भाग) मध्ये मोजतात आणि म्हणून त्याला ‘मायक्रो-ऑरगॅनिझम’ नाव पडलं. तर  विषाणू आणि प्रतिपिंड त्याहून १० ते १०० पटीनं लहान असतात. म्हणजे ‘नॅनो’ आकाराचे. तर ‘बी’ श्वेत पेशी जिवाणूहून १० पट मोठय़ा असतात आणि ‘मॅक्रोफेज’ २०-५० पट मोठय़ा असतात. आणखी एक विशेष गोष्ट- इतर श्वेत पेशी काही मिनिटं, तास, दिवस, फार तर काही आठवडे जिवंत राहतात आणि या ‘मॅक्रोफेज’ पेशी चक्क ११ ते १५ वर्षं जगतात.

गेल्या दोन लेखांमध्ये आपण प्रतिकारशक्तीबद्दल पुष्कळ माहिती करून घेतली; पण प्रश्न असा आहे, की आपली प्रतिकारशक्ती मोजता येईल का? ताप आला तर थर्मामीटर, वजनासाठी काटा, रक्तदाबासाठी, रक्तातील ग्लुकोज मोजण्यासाठीदेखील आता मीटर आहेत. तसा ‘इम्युनिटी मीटर’- म्हणजे प्रतिकारशक्तीचं मोजयंत्र आहे का? अर्थात असं सोपं साधन नाही, पण आपण रक्ताची चाचणी करून याचा अंदाज घेऊ शकतो. सर्व प्रकारच्या श्वेत पेशींची संख्या रक्ताच्या अतिशय छोटय़ा थेंबात किती असते? एक मायक्रो-लिटर म्हणजे एक लिटर द्रव पदार्थाचे १० लाख छोटे-छोटे थेंब करणं. अशा एका थेंबामध्ये एकूण ५,००० ते १०,००० श्वेत पेशी असतात.  या मोजणीला ‘टोटल लुकोसाइट काऊंट’- ‘टी.एल.सी.’ म्हणतात. शास्त्रीय परिभाषेत या पेशींना ‘लुकोसाइट’ असंही नाव आहे. याचं गणित मांडलं, तर १ लिटर रक्तात

५ ते १० बिलियन (५०० ते १,००० कोटी) पेशी झाल्या. जेव्हा हा आकडा मायक्रो-लिटरमध्ये ४,००० पेक्षा कमी होतो, त्याचा अर्थ तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. फ्लू,नागीण, कांजिण्या आणि ‘कोविड’ अशा विषाणूंच्या प्रादुर्भावानं अथवा क्षयरोग, मुदतीचा ताप, अशा रोगजंतूंमुळे अशा प्रकारे ‘टीएलसी’ कमी होतो. तसंच ११,००० पेक्षा जास्त ‘टीएलसी’ म्हणजे शरीराला रोगजंतूंचा संसर्ग झाला आहे. सूज येणं, जखमेत आणि रक्तात पू (मृत पेशी) होणं अशा अवस्थेत हे होतं.

एकूण पांढऱ्या रक्तपेशी- म्हणजेच ‘टीएलसी’ पुन्हा दोन प्रकारांत विभागला जातो. यात ‘न्यूट्रोफिल’ पेशी ५५-७५ टक्के  असतील, तर ते चांगल्या प्रतिकारशक्तीचं लक्षण आहे. त्या कमी असतील, तर डॉक्टर प्रतिजैविक औषध (अँटिबायोटिक) देऊन शरीराला जणू बाहेरून सैन्य पुरवतात. ‘टी’ आणि ‘बी’ पेशी म्हणजे ‘लिम्फोसाइट’- त्या २८-३२ टक्के  असतील तर काही विशिष्ट रोगाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती आहे. यांचं रक्तातील प्रमाण खूप कमी झालं, तर प्रतिकारशक्ती कमी आहे. अशा प्रकारे कोणतेही औषधोपचार अथवा ‘अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ किंवा ‘न्यूट्रास्युटिकल’ पदार्थाचं सेवन करण्याआधी आणि हे उपाय/उपचार संपल्यानंतर जर रक्ताची ‘कंप्लीट ब्लड काऊंट’ (सीबीसी) ही चाचणी केली तर प्रतिकारशक्ती वाढली का, हे समजू शकतं. या पद्धतीच्या रक्त तपासणीला फार खर्च येत नाही. याखेरीज काही आधुनिक आणि पुढारलेल्या रक्त तपासण्यांकरिता जास्त खर्च येतो; पण अधिक अचूक आणि विशिष्ट माहिती मिळू शकते. खास करून ‘करोना’सारख्या रोगाचा संसर्ग झाला असता प्रतिपिंड ‘आयजी-जी’/ ‘आयजी-एम’, तसंच ‘टी’ पेशी मोजण्याचं तंत्र विकसित आहे.

थोडक्यात, ‘ब्लड काऊंट’ चाचणी करून प्रतिकारशक्ती मोजता येते; परंतु बहुतेक आकडय़ांची ‘रेंज ठरलेली असते. अर्थात चाचणी अहवालात नमूद के लेला मोजलेला आकडा हा ‘कितीपेक्षा जास्त’ आणि ‘कितीपेक्षा कमी’ असावा, हे लिहिलेलं असतं. त्यामुळे रुग्णाचे आणि निरोगी व्यक्तीचेसुद्धा

३ ते ५ वर्षांतील सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल एक फाइल करून सांभाळून ठेवावेत. म्हणजे त्या व्यक्तीची ठेवण, नेहमीचे तपासणीचे आकडे, याचा डॉक्टरांना अंदाज घेऊन योग्य उपचार देता येतात.

डॉक्टर हा देव अथवा जादूगार नाही. डॉक्टरांना अधिकाधिक माहिती आणि आरोग्याचा इतिहास दिला, तर अचूक औषध मिळण्याची शक्यता वाढेल आणि आपल्याला कमीत कमी त्रास होईल. आपल्या शरीराला, प्रत्येक पेशीलादेखील एक स्व-बुद्धी असते. माझं काम काय आणि मला काय हवं, काय नको हे त्यांना कळतं. चुकीच्या आहार-विहारामुळे अथवा प्रदूषण, गुणसूत्र इतिहास अशा कारणांमुळे शरीरात बिघाड झाल्यास शरीर स्वत:ला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतं आणि आपल्याला या बिघाडाचा संकेत देतं. त्याकडे वेळीच लक्ष दिल्यास काटय़ाचा नायटा होण्याचं टळतं. तेव्हा स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची सातत्यानं काळजी घेणं इष्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:16 am

Web Title: body immune system jeevan vidnyan dd70
Next Stories
1 यत्र तत्र सर्वत्र : इतिहासकार स्त्रिया
2 व्वाऽऽ हेल्पलाइन : अभ्यासक्रम चला, नवा येऊ द्या!
3 अपयशाला भिडताना : तटस्थ
Just Now!
X