|| डॉ. नितीन पाटणकर

इनफ्लेमेशन म्हणजे, शरीराची प्रतिक्रिया अर्थात प्रतिदाह. शरीराच्या आत कुठेही इजा झाली किंवा जंतूंचा संसर्ग झाला तर तो शरीरभर पसरू नये म्हणून निसर्गाने जन्मजात सोय निर्माण करून ठेवली आहे. आजच्या काळातील बहुतेक रोगांमध्ये प्रतिदाह हा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचे योग्य नियंत्रण करण्यासाठी जीवनसत्त्व आणि क्षार लागतात. मात्र अनेकांच्या मनात ‘एका लिंबातून दिवसभरासाठीचे ‘क’ जीवनसत्त्व मिळते, एक कप दुधातून ‘ड’ जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम पुरेशा प्रमाणात मिळतात.’ अशा अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. म्हणूनच हे नवीन सदर ‘सूक्ष्म अन्नघटक.’ जे जीवनसत्त्व आणि क्षार याविषयीचे तुमच्या मनातले गैरसमज दूर करायला मदत करेल आणि त्याचे फायदे तुमच्यापर्यंत पोहोचवेल.

इनफ्लेमेशन या शब्दासाठी प्रतिदाह हा शब्द आता प्रचलित होत आहे. पूर्वी इनफ्लेमेशनला सूज किंवा दाह म्हणत असत. सूज म्हटले की पायावरील सूज डोळ्यांसमोर येई आणि दाह म्हटले की भाजणे डोळ्यांसमोर येई. मग डॉक्टरांची पंचाईत होत असे. तुमच्या शरीराला आतून सूज आहे, असे सांगावे लागे. म्हणून प्रतिदाह हा शब्द मी वापरायला सुरुवात केली गेली. पटकन दुसऱ्या शब्दाशी साधम्र्य दिसले नाही तर मग त्या शब्दाच्या उगमापासून अर्थ शोधला जातो.

इनफ्लेमेशन म्हणजे, शरीराची प्रतिक्रिया. शरीराच्या आत कुठेही इजा झाली किंवा जंतूंचा संसर्ग झाला तर ती इजा किंवा संसर्ग पसरू नये म्हणून अंगभूत किंवा जन्मजात काही सोय निसर्गाने निर्माण करून ठेवली आहे. यामध्ये शरीरातील रासायनिक द्रव्य, पेशी यांचा सहभाग असतो. या रोग किंवा इजेला प्रतिबंध व्हावा, इजा किंवा रोग यांच्या पसरण्याला प्रतिरोध व्हावा, इजा होऊन किंवा जंतूंपासून तयार झालेल्या रसायनांपासून होणाऱ्या परिणामांना प्रतिसाद देऊन त्यांचा त्रास नाहीसा व्हावा म्हणून शरीरात ज्या क्रिया होऊन त्यातून कळ (पेन), सूज (स्वेलिंग), उष्णता (हीट) आणि लालसरपणा येणे हे परिणाम दिसतात त्याला प्रतिदाह असे म्हणता येईल. दुरुस्ती किंवा प्रतिनिर्मिती ही यातील नंतरची पायरी.

प्रतिदाह म्हणजे प्रतिबंध, प्रतिरोध, प्रतिसाद, याद्वारे शरीराने दिलेली प्रतिक्रिया. प्रतिदाह हा अत्यावश्यक सेवांमध्ये बसेल इतके त्याचे महत्त्व आहे. प्रतिदाह अत्यंत उपयोगी असला तरी त्याचा एक दुर्गुण आहे. घरी दोन दिवसांकरिता पाहुणा यावा आणि मग त्याने   मुक्काम लांबवत न्यावा तसे काहीसे हा वागतो. त्यामुळे घराची घडी विस्कटून जाते. हृदयरोग होण्यामागे धमनीकाठिण्य (ऑर्थोरायटिस) हे मुख्य कारण आहे. रक्तवाहिन्यांच्या भिंतीत कोलेस्टेरॉल आणि मेदाम्ले (फॅटी अ‍ॅसिड्स) यांचे कण जाऊन बसतात. हे कण तिथे गेले की ते तिथे त्रास द्यायला सुरुवात करतात. वागण्यातला गोडवा किंवा स्निग्धपणा हवेहवेसे असले तरी रक्तातील किंवा शरीरातील गोडवा, स्निग्धपणा प्रमाणातच असले तर ठीक.

पूर्वी एक काळ असा होता जेव्हा वर्षभर टिकणारी लोणची घरी तयार व्हायची. तेव्हा लोणची हा घरगुती पदार्थ होता. तो ‘पिकल’ झाला. त्याचे ब्रँड झाले, त्याचे पॅकिंग होऊ लागले. पूर्वी चिनीमातीची बरणी हा प्रकार घरोघरी असे. तर त्या चिनीमातीच्या बरणीत लोणचे साठवून ठेवीत. वर चांगला एक पेर दोन पेरभर तेलाचा थर ठेवीत. त्यावर मग बरणीचे तोंड फडक्याने घट्ट बांधीत. तो तेलाचा थर प्रिझव्‍‌र्हेटिव्ह आयसोलेशन आणि व्हॅक्यूमची सर्व कामे करीत असे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील फॅट ही सूक्ष्म पेशींसाठी मारक (टॉक्सीक) असते. अशी फॅट (ज्यात कोलेस्टेरॉल पण आले) जर रक्तवाहिन्यांच्या भिंतीत चुकून शिरलीच, तिथे ती पेशींना त्रासदायक ठरते. अशी फॅट जर रक्तवाहिन्यांच्या भिंतीत शिरून त्रास देऊ लागली, इजा पोचवू लागली तर शरीर त्या इजेला त्या जागेपुरतेच सीमित ठेवण्यासाठी ‘प्रतिदाह’ वापरतात.

रसायने, विविध पेशी असे सर्व त्या ठिकाणी बोलावले जाते. मूळ फॅटपेक्षा या फौजफाटय़ाचा आकारच मोठा असतो. शेवटी या घुसलेल्या फॅटभोवती फायबरसारख्या पदार्थाची कॅप्सूल बनते. फॅटच्या कणांना ‘मॅकरोफाज’ नावाच्या पेशी खाऊन टाकतात. हे सर्व आता शरीराच्या बाहेर फेकले जायला तयार असते. हे सर्व होत असताना रक्तवाहिन्यांच्या भिंतीसुद्धा याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वरून पेशींचे आवरण तयार करतात. ‘मिटता कमलदल, होई बंदी हा भृंग’ अशी अवस्था होते. यालाच रक्तवाहिन्यांमध्ये ‘प्लाक’ तयार झाला असे म्हणतात. यामुळे रक्तवाहिनी त्या ठिकाणी थोडी आकुंचित राहते. त्यामुळे वाहणाऱ्या रक्ताला घर्षण करून पुढे जावे लागते. त्यामुळे पुन्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतीला इजा होते आणि प्रतिदाह वाढत राहतो.

मधुमेह असेल, संधिवात असेल किंवा इतर काही. रोगाचे मूळ वेगवेगळे, त्याचे परिणाम वेगवेगळे असले तरी त्यापासून बचाव करण्यासाठी प्रतिदाह चेतवला जातोच. बरेचदा मूळ रोग मर्यादित असतो, पण प्रतिदाह सुरू झाला की त्याला पटकन थांबवता येत नाही आणि त्यातून रोगाची व्याप्ती आणि तीव्रता वाढते. औषधांमुळे मूळ रोगावर इलाज होतो पण प्रतिदाह शांत होत नाही आणि त्यामुळे त्रास चालू राहतो. कधी कधी तर ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असा प्रकार होतो. रोगावर कमी औषधे लागतात पण प्रतिदाह आणि त्याचे परिणाम हे कमी करण्यासाठी जास्त औषधे, जास्त मेहनत लागते.

आपल्याला प्रतिदाह कमी करण्यासाठी जीवनसत्त्व आणि क्षार यांचा वापर करावा लागतो. बरेचदा औषधे घ्यायला लोक तयार असतात पण सोबत जीवनसत्त्व आणि क्षार हे औषध म्हणून घ्यायला मन तयार होत नाही. याचे कारण बहुतेकांची वाचन, मनन, चिंतन आणि ‘गुगलन’ करून अशी समजूत असते, की सर्व जीवनसत्त्वे आणि क्षार हे आपल्या आहारात असतातच. त्यामुळे ते बाहेरून घ्यायची त्यांची तयारी नसते.

आजच्या काळातील बहुतेक रोगांमध्ये प्रतिदाह हा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचे योग्य नियंत्रण करायला जीवनसत्त्व आणि क्षार लागतात. ‘एका लिंबात दिवसभराचे क जीवनसत्त्व मिळते, एक कप दुधातून, ड जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम पुरेशा प्रमाणात मिळतात.’ अशा अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. म्हणूनच मी या सदरातून ‘सूक्ष्म अन्नघटक’ यावर लिहिणार आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक कोणती जीवनसत्त्वे किंवा क्षार (मिनरल) महत्त्वाची असतात. वाचकांनीही त्यांच्या मनातील जीवनसत्त्व आणि क्षारविषयक शंका आमच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यावर नक्कीच प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करू. तेव्हा आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

nitinp810@gmail.com