साहित्यप्रांतातील काव्य, ललित लेखन, एकांकिका, मुलाखती वगैरे विविध प्रकार हाताळूनही माझी अंतरीची ओढ, ज्याला पॅशन म्हणू या, ती आहे फक्त कथालेखन करणे!
‘वसा’ हा माझा पाचवा कथासंग्रह. या संग्रहातली ‘वसा’ ही कथा माझी आवडती कथा आहे. या कथेतील नायक मला प्रत्यक्ष गवसला आहे. त्याला मी फोनवरून बोलताना ऐकलं, की, ‘अहो, तुम्ही कुणी माझं ऐकत नाही तर मी तरी कशाला हा चांगुलपणाचा, लोकसेवेचा वसा चालू ठेवू?’ त्यांच्या या एका वाक्यावरून माझ्या डोक्यात ‘वसा’ ही कथा ‘क्लिक’ झाली. या कथेद्वारे आज समाजात इतकी सज्जन, चारित्र्यवान, चांगली माणसं असतानाही ती सामाजिक अन्यायाविरुद्ध, आवाज उठवताना, किंवा काही ठोस कृती करताना का दिसत नाहीत असा प्रश्न लोकांपुढे मांडला आहे. या कथेचा नायक एका मासिकाचा संपादक आहे. वाचकांचा या कथेसाठी मला फोनद्वारे भरभरून प्रतिसाद मिळाला.
खरं तर वाचकांची पत्रं, फोन, एसएमएस यातून त्यांची दाद  जेव्हा मला मिळते तेव्हा खरोखरच माझी लेखनाची उमेद वाढते. परंतु साहित्यिक ह. मो. मराठे आणि साहित्यिक  कै. रवींद्र पिंगे यांच्या प्रतिसादाचा उल्लेख मला माझ्या कथालेखनाच्या संदर्भात कृतज्ञतेने करायलाच हवा.
मोनिका प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘वसा’ कथासंग्रहामधील ‘पडद्याआड’ ही कालनिर्णय (सांस्कृतिक) दिवाळी अंकातील कथा थोडय़ा गूढ अंगाने लिहिली गेली आहे. आम्ही गोव्याला गेलो असता तिथून ‘वेल्हा गोवा’ शॉपमधून सिरॅमिकच्या निळसर, शेंदरी रंगाच्या चौरसाकृती साच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये खिडक्या, गज, पडदे यांच सुंदर हुबेहूब आर्टवर्क केलेली एक फ्रेम आणली होती. आमच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर आम्ही ती फ्रेम लावली. मी जेव्हा जेव्हा ती फ्रेम बघायचे तेव्हा तेव्हा मला वाटायचं तो पडदा दूर झाला, तर काय असेल पडद्याआड? यातूनच ही कथा जन्माला आली.
तिन्हीसांजेची कातरवेळ, तान्ह्य़ा  बाळाच्या अंगाचा सुगंध, धुपाचा वास, त्या हुरहुरत्या संध्याकाळी घरात लावलेले विजेचे पिवळसर उजेड देणारे उबदार दिवे, बहरलेली बाग, रिमझिम पाऊस, समुद्र, माती.. या आणि अशा अनेक गोष्टी माझ्या काळजाचा ठाव घेतात, नकळत कागदावर हळुवार, हळवं, असं लिहिलं जातं. तेव्हा मला अनुभूती येते, ही लेखनाची ऊर्मी आहे, धुंदी आहे, त्यात आपसुकपणे आपण लिहीत जातो. लेखन करताना होणारा सक्तीचा एकांतवास मला माझ्याचजवळ नेण्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतो. शक्य तो सकारात्मक, उत्साहवर्धक कथालेखन करायचं हा मी माझा लेखनधर्म मानते. सुदैवाने मला चांगले संपादक, प्रकाशक, वाचक आणि समीक्षकही भेटले. ज्यांच्यामुळे सतत लिहीत राहण्यात मौज वाटते. या ‘वसा’ कथासंग्रहातील सर्व कथा पूर्वप्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना वेळोवेळी वाचकांची चांगली दाद मिळाली आहे. यापुढेही अशीच दाद मिळावी, वाचकांचं प्रेम मिळावं हीच इच्छा आहे.