डॉ. मीना वैशंपायन – meenaulhas@gmail.com

आपल्याला स्वत:चं नाव प्रिय असतंच. कारण आपलं नाव हे आपल्या अस्तित्वाची खूण आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. मात्र साहित्यविश्वात अनेकांनी टोपणनावानं आपलं लेखन वाचकांसमोर ठेवलं. यामागची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली तरी स्त्रियांच्या बाबतीत मात्र अनेकदा स्त्री म्हणून आपल्या लेखनाचं मूल्यांकन होऊ नये हे मुख्य कारण असे आणि दुसरं कारण बंडखोर साहित्य लिहिणं. परदेशी आणि भारतीय साहित्यातल्या अशाच काही स्त्री लेखिकांविषयीचा हा लेख.  ‘रीक्लेम हर नेम’ या इंग्लंडमध्ये जाहीर झालेल्या  योजनेत नुकतीच जगभरातील  २५ निवडक लेखिकांची टोपणनावांनी लिहिलेली पुस्तकं  त्यांच्या मूळ नावानं पुनप्र्रकाशित करण्यात आली आहेत, यानिमित्तानं.

‘कोणत्याही पुस्तकाची परीक्षा त्याच्या मुखपृष्ठावरून करू नये’ या सुभाषितवजा वाक्याची लेखिका आणि लेखकाच्या स्वामित्वहक्कासंबंधी करार करणारी पहिली लेखिका जॉर्ज इलियट- म्हणजेच मेरी अ‍ॅन इव्हान्स. तिच्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी लंडन येथे तिचं घर, स्मृतिस्थान बघायला आवर्जून गेले होते. महाविद्यालयीन अभ्यासात तिच्या कादंबऱ्या (‘सायलस मारनर’, ‘द मिल ऑन द फ्लॉस’, ‘मिडलमार्च’ आदी) वाचल्या होत्या. त्यामुळे ‘जॉर्ज इलियट’ हे तिचं टोपणनाव आहे हे माहीत होतं; पण तिथे गेल्यावर दिसलं, की तिच्या इच्छेनुसार तिच्या थडग्यावरही ‘हिअर लाइज द बॉडी ऑफ जॉर्ज इलियट, मेरी अ‍ॅन क्रॉस’ असंच कोरलेलं आहे.  हे पाहून फारच आश्चर्य  आणि कुतूहलही वाटलं होतं.  पुढे तिची माहिती मिळवली, पण त्यानं मनात प्रश्नच निर्माण केले.

हे सारं आज आठवण्याचं कारण म्हणजे इंग्लंडमध्ये जाहीर झालेली लेखिकांसंदर्भातली एक सन्मान योजना! सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने पाश्चात्त्य देशांमधल्या ग्रंथव्यवहाराच्या दृष्टीनं जरा गडबडीचेच असतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ‘नोबेल’, ‘बुकर’, ‘इंटरनॅशनल बुकर’ किंवा कादंबरीसाठी असणारे ‘विमेन्स प्राइझ फॉर फिक्शन’ यांसारख्या प्रतिष्ठेच्या ग्रंथपुरस्कारांची घोषणाही याच महिन्यांमध्ये होत असते. ‘विमेन्स प्राइझ फॉर फिक्शन’चं यंदाचं हे पंचविसावं वर्ष. हे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी ‘रीक्लेम हर नेम’ ही नवीन योजना जाहीर झाली. पूर्वीच्या काळी- विशेषत: एकोणिसाव्या शतकात अनेक स्त्रियांचं लेखन प्रसिद्ध झालं आणि त्यांचं लोकांनी, मोठमोठय़ा लेखकांनी कौतुक केलं, तरी प्रत्यक्ष पुस्तकांवर लेखिकांचं  टोपणनाव असे. आता इतक्या वर्षांनी तरी त्यांच्या पुस्तकांवर त्यांचं मूळ नाव यावं, त्या लेखिकांना त्याचं रास्त श्रेय दिलं जावं, या हेतूनं ‘बेलीज’ या कंपनीनं ही योजना सुरू केली. या आयोजकांतर्फे बरंच संशोधन करून ज्या स्त्रियांनी पुरुषाचं वा लिंगनिरपेक्ष (उभयलिंगी) नाव टोपणनाव म्हणून घेतलं, अशा पंचवीस लेखिका आणि त्यांच्या एकूण लेखनातील महत्त्वाचं पुस्तक निवडलं गेलं. ही पंचवीस पुस्तकं काही काळ उपलब्ध नव्हती. त्यामुळे ती सर्व पुन्हा छापून त्यांना नवं रंगरूप दिलं गेलं. या पुस्तकांची नवीन मुखपृष्ठं आणि आतील रेखाचित्रं ही ब्राझील, रशिया, जॉर्डन, जर्मनी या देशांमधील स्त्री चित्रकारांनीच तयार केली आहेत. काही काळापर्यंत इंटरनेटवरून ई-बुक स्वरूपात ही सर्व पुस्तकं घेता, वाचता, पाहता येत होती, शिवाय या पंचवीस पुस्तकांचे संच ब्रिटनमधील ग्रंथालयांना भेट म्हणून विनामूल्य देण्यात आले.

विस्मरणात गेलेल्या, जात असलेल्या लेखिकांच्या पुस्तकांचं असं पुनप्र्रकाशन करणं, त्यांच्या लेखनावर त्यानिमित्तानं चर्चा घडवून आणणं, या बाबी एकूणच ग्रंथप्रसार, वाचनसंस्कृतीला चालना देणाऱ्या ठरतात. ताजी बातमी अशी, की ‘विमेन्स प्राइझ फॉर फिक्शन’ या स्पर्धेत मॅगी ओ’फॅरेल या प्रसिद्ध आयरिश  लेखिकेच्या शेक्सपिअरच्या कुटुंबावर आधारित ‘हॅमनेट’ या कादंबरीला २०२० चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

वर उल्लेख के लेल्या पंचवीस पुस्तकांपैकी काही ब्रिटिश, तर काही फ्रें च, अमेरिकी  लेखिकांची पुस्तकं आहेत. जपान, इराण, चीन यांसारख्या देशांतील लेखिकांचीही पुस्तकं यात आहेत. या निवडक पुस्तकांमध्ये बहुतेक कादंबऱ्या असल्या तरी कथासंग्रह, कवितासंग्रह, चरित्र यांचाही अंतर्भाव आहे. काही लेखिका दीर्घायुषी होत्या आणि त्यांनी विपुल लेखन केलं आहे, तर दुसऱ्या बाजूला जपानची इचियो हिगुची (मूळ नाव- नात्सु हिगुची) ही केवळ चोविसाव्या वर्षी अपार दारिद्रय़ आणि त्यामुळे झालेल्या कुपोषणामुळे मृत्यू पावली. एवढय़ाशा आयमुष्यातही तिनं लिहिलेल्या कथा शहरातल्या वेश्या जीवनाशी आणि एकूण स्त्री जीवनातल्या दु:खाशी निगडित आहेत. त्यातून जाणवणाऱ्या तिच्या प्रतिभेची जाणीव झाल्यानं सन्मान म्हणून ‘येन’ या जपानी चलन नोटेवर तिचा फोटो छापला गेला; पण आपल्या लेखनविषयामुळे तिनं लिंगनिरपेक्ष नाव स्वीकारलं आणि पुस्तकावर तिचं नाव आलं नाही.

डोरिस केर या ऑस्ट्रेलियन लेखिकेनं सर्कसमधील स्त्री जीवन आणि विदूषक यांच्यावर कथा-कादंबऱ्या लिहिताना दोन वेगवेगळी टोपणनावं घेतली. आयुष्यभर स्त्रीसमानतेसाठी लढत असतानाही तिला स्वत:ला सतत अन्याय आणि पक्षपात यांना तोंड द्यावं लागत होतं. अ‍ॅन पेट्रीसारख्या आफ्रिकन-अमेरिकन लेखिकेची गाजलेली ‘मारी ऑफ द  के बिन क्लब’ ही कादंबरी इतकी वाचकप्रिय होती, की त्याच्या लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या. एकेकीची कहाणी वेगळी आणि कधी चटका लावणारी, तर कधी मनोरंजन करणारी. हे सारं वाचताना गंमतही वाटत होती आणि तत्कालीन आणि एकूणच स्त्रियांच्या लेखनासंबंधी मनात अनेक प्रश्न उभे राहात होते. या सगळ्या लेखिका आणि त्यांची पुस्तकं याबद्दल इथे लिहिणं शक्य नाही; पण त्यांच्या बरोबरीच्या इतर पाश्चात्त्य आणि भारतीय लेखिका, त्यांची वृत्ती आणि त्यांनी केलेली वा न केलेली ‘नामांतरं’ यासंबंधी काही निरीक्षणं मांडता येतील.

इतक्या मोठय़ा प्रमाणावर स्त्रियांनी टोपणनावं का घेतली असावीत? महान प्रतिभावंत विल्यम शेक्सपिअरचं सुप्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, ‘‘कुणाच्याही, कशाच्याही नावात काय विशेष आहे?’’ परंतु आपल्याला आपलं स्वत:चं नाव तर प्रिय असतंच. कारण आपलं नाव हे आपल्या अस्तित्वाची खूण आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. सहसा आपण आपलं नाव सोडायला तयार नसतो; पण कधी कधी या आपल्या नावाचा मोह सोडूनही परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतंच की! एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्य देशांतही स्त्रियांना दिले गेलेले अधिकार खूपच मर्यादित होते. त्यांच्या वर्तनावर, हिंडण्या-फिरण्यावर, कपडय़ांच्या निवडीवर र्निबध होते. व्हर्जिनिया वुल्फ ही प्रसिद्ध लेखिका म्हणते त्याप्रमाणे विद्यापीठाच्या हिरवळीवरून चालण्याचीदेखील त्यांना परवानगी नव्हती. बऱ्याच जणींचं शिक्षण घरीच होत असे. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या दशकापर्यंत त्यांचा बौद्धिक आणि उच्च, संमिश्र वर्तुळांतील वावर हा मर्यादित होता. अशा सामाजिक वातावरणामुळे स्त्रीच्या बौद्धिक क्षमतेविषयी बऱ्याच चुकीच्या समजुती पसरल्या होत्या. स्त्रियांचं लेखन हे केवळ ‘बायकी’ विषयांशी संबंधित असेल, मग ते कशाला वाचा, असा समज. स्त्रीचं अनुभवविश्व हे अगदीच मर्यादित. पुरुषांप्रमाणे तिला बाह्य़ जगाचं आकलन, ज्ञान नाही. (‘स्त्रीणां अशिक्षितपटुत्वम्!’) त्यामुळे तिचं लेखनही हिणकस असणार, असा आणखी एक समज. यामुळे आपण एखादं पुरुषी टोपणनाव घेतल्यास आपलं लेखन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचेल, असा विचार करून प्रकाशकांनी लेखिकांना टोपणनाव स्वीकारायला भाग पाडलं, असं काही लेखिकांनी नमूद केलं आहे. त्यामुळे पुरुषी टोपणनाव घेण्याची एक पद्धत रूढ झाली. या निवडक लेखिकांचा काळ आणि तत्कालीन समाज अगदीच वेगळा; पण अगदी आधुनिक एकविसाव्या शतकातली लेखिका जे. के. रोलिंग हिनंही असं स्पष्टपणे नमूद केलं आहे, की आपली पहिली कादंबरी छापताना प्रकाशकाच्या आग्रहानुसार आपण जोआन्ना रोलिंग हे आपलं नाव बाजूला सारत केवळ आद्याक्षरं घेऊन जे. (जोआन्ना), के. (कॅथलीन) रोलिंग असं लिंगनिरपेक्ष नाव स्वीकारलं.

‘रीक्लेम हर नेम’ या संकल्पनेतील या पंचवीसपैकी अग्रगण्य लेखिका म्हणजे इंग्रजी वाङ्मयात जिच्यासाठी मानाचं पान मांडलं जातं ती ‘जॉर्ज इलियट’. तिनं आपलं टोपणनाव आपला प्रियकर जॉर्ज लुईस याच्यावरून घेतलं. तिच्या कादंबऱ्या अनेक समकालीन पुरुष लेखकांपेक्षा किती तरी पटीनं दर्जेदार आहेत आणि विकल्याही गेल्या आहेत. ‘मिडलमार्च’ ही कादंबरी इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीवर आधारित  आहे. पितृसत्ताक समाजानं लादलेल्या बंधनांमुळे घेतलेलं टोपणनाव म्हणजेच तिचं अस्तित्व आणि तिची ओळख  ठरली. तिलाही त्यात समाधान वाटत होतं.

असाच काहीसा प्रकार जॉर्ज सान्द (George Sand) म्हणजे फ्रेंच लेखिका अमान्तिने ऑरोर द्यूपॅ हिच्या बाबतीत झाला. तिच्या लेखनाला इतका प्रतिसाद मिळाला, की लोकप्रियतेच्या आणि पुस्तकविक्रीच्या बाबतीत तिनं व्हिक्टर ह्य़ूगो आणि चार्ल्स डिकन्स यांनाही मागे टाकलं. पुरुषी पेहराव करणं, धाडसी कृत्यं करणं, याची तिला आवड होती. ग्रंथालयं आणि संग्रहालयांमध्ये जेव्हा स्त्रियांना प्रवेशबंदी होती तेव्हा पुरुषी पेहरावात ती तिथे प्रवेश मिळवी. हे करता यावं म्हणून तिनं स्वयंनिर्णयाने टोपणनाव घेतलं. या उदाहरणांवरून असं वाटतं, की पितृसत्ताक संस्कृतीच्या विरोधात बंडखोरी करण्यासाठी टोपणनावांचा उपयोग करून आपलं आविष्कार स्वातंत्र्य स्त्रियांनी मिळवलं असावं. याबरोबरच आणखी एक कारण असं होतं, की परंपराप्रिय अशा तत्कालीन इंग्लंडमध्ये प्रणयप्रधान वा स्त्री-पुरुषांमधील मुक्त वर्तनाची वर्णनं करणाऱ्या कादंबऱ्या लिहिण्यासारखी कृती घरंदाज, खानदानी कुटुंबांमध्ये त्याज्य मानली गेली होती. (‘खानदान की इज्जत’ वगैरे!). त्यामुळे आपल्या निर्मितीक्षमतेची जाणीव असूनही समाजाचं दडपण असल्यानं स्त्रियांनी टोपणनावाचा पर्याय स्वीकारला.

हे खरं असलं, तरी या यादीबाहेरील किती तरी तत्कालीन नामवंत पाश्चात्त्य लेखिकांनी इतर पर्यायांचा मार्ग चोखाळला. उदा. ‘प्राइड अँड प्रेजुडिस’ची लेखिका जेन ऑस्टेन हिच्या सर्व कादंबऱ्या प्रचंड यशस्वी झाल्या, पण त्यातील एकाही कादंबरीवर तिचं नाव नव्हतं. तिनं कोणतंच टोपणनाव न घेता केवळ  ‘लेखिका- एक स्त्री’ (‘बाय अ लेडी’) एवढंच लिहिलं होतं. त्यामुळे तिचा या पुरस्कारात समावेश नाही.  जेनच्या बाबतीत एक नक्की, की आपलं नाव छापलं नाही, तरी तिनं आपलं स्त्रीत्व लपवलं नाही. म्हणूनच नंतर तिच्या पुस्तकांवर तिचं नाव प्रसिद्ध होऊ लागलं. स्त्रीवादी लेखिका मेरी वूलस्टोनक्राफ्ट  किंवा कवयित्री एलिझाबेथ ब्राऊनिंग यांनी आपल्याच नावानं लेखन प्रसिद्ध केलं. त्यांना कोणतंही दडपण आलं नसेल? ब्रॉन्टे भगिनींनी (शार्लेट, एमिली आणि अ‍ॅनी ब्रॉन्टे) देखील एकत्रित किरकोळ लेखनासाठी पुरुषी टोपणनावं घेतली; पण एरवी आपल्याच नावे लेखन प्रसिद्ध केलं.

साहजिकच मनात येतं, त्या काळात भारतीय भाषांमध्ये काय स्थिती होती? एकोणिसाव्या शतकात सुधारकांनी आपल्याकडे स्त्री-शिक्षणाचा श्रीगणेशा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांच्यासारख्या तडफदार स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या. या दोघींचं लेखन तत्कालीन समाजाला रुचणं कठीण होतं. मात्र ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा अतिपरखड निबंध किंवा पंडिता रमाबाईंचं ‘स्त्रीधर्मनीती’ हे पुस्तक त्यांच्याच नावे प्रसिद्ध झालं ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. या दोघींनी सामाजिक दडपणांचा बाऊ केला नव्हता तरी तेव्हाही स्त्रिया टोपणनावांनी साहित्य प्रसिद्ध  करत होत्या हे खरं आहे. बहुधा असं असावं, की स्त्रिया लेखनासाठी जो वाङ्मयप्रकार निवडत होत्या त्यावर त्यांचा हा निर्णय अवलंबून असेल. कथा, कविता, कादंबरी हे वाङ्मयप्रकार तुमची निर्मितीक्षमता, कल्पनाशक्ती यांची अधिक मागणी करतात. त्यातील भावपूर्ण, नवरसपूर्ण वर्णनं वाचून आपल्याबद्दल गैरसमज होईल आणि आपल्याविषयी चुकीची मतं तयार होतील, अशी भीती या लेखिकांना वाटत असावी.

आपण वर्णन केलेले प्रसंग हे स्वानुभवावर आधारित आहेत असा लोकांचा गैरसमज होईल अशीही भीती त्यांना वाटत असावी. त्यामुळे वैचारिक लेखन करणाऱ्या स्त्रियांपेक्षा कवयित्री, कथा-कादंबरीकार स्त्रियांनी टोपणनावानं केलेलं लेखन मोठय़ा प्रमाणावर दिसतं. हे लेखन म्हणजे आपण नाही तर  निराळं व्यक्तित्व/ ओळख आहे, असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. पुरुष लेखकांच्या बाबतीतही सर्वत्र असं दिसतं, की एकाहून अधिक वाङ्मय प्रकारात लिहिणाऱ्यांनी गद्य आणि पद्य लेखनासाठी नावांची ठरावीक योजना केलेली आहे. (वाचकांना वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), गो.वि. करंदीकर (विंदा), रा.ग. गडकरी (बाळकराम, गोविंदाग्रज), चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांची चटकन आठवण येईलच.)

यातील अनेक स्त्रियांनी असं लिहिलं आहे किंवा सांगितलं आहे, की अमुक एक विशिष्ट नाव घेतल्यानं आपलं सारं व्यक्तिमत्त्व त्या नावाप्रमाणे बदलतं. व्हायोले पझे (Violet Paget)ऊर्फ ‘वर्नन ली’ (Vernon Lee) ही फ्रें च लेखिका बहुधा पुरुषी पेहराव करी. अभिनेता वा अभिनेत्री यांच्या बाबतीत बोलताना जसा आपण ‘भूमिकेत शिरणं’ असा शब्दप्रयोग करतो तसं तिला वाटे, असं ती म्हणे. पुढे पुढे तर ती बाहेर वावरताना आपली ओळख ‘वर्नन ली’ अशीच करून देई. जणू मूळ नावाचा विसर पडत असे.

वर्षभरापूर्वीच ज्यांचं निधन झालं त्या पंजाबी लेखिका कृष्णा सोबती यांनीदेखील ‘हशमत’(अर्थ- गौरव, सन्मान) असं पुल्लिंगी टोपणनाव घेऊन काही प्रासंगिक, स्फुट लेखन केलं आहे. आपल्या या लेखनप्रक्रियेविषयी त्या म्हणतात, ‘‘हा हशमत कधी माझ्या लिहिण्याच्या टेबलवर येऊन माझ्या मनाचा ताबा घेतो तेच मला कळत नाही. तो आला की माझ्या भाषेचा पोत बदलतोच, पण माझं हस्ताक्षरही आपोआप बदलतं. जणू काही परकायाप्रवेशच.

आपली अर्धनारीनटेश्वराची कल्पना मला स्वानुभवानं पटते. माझ्यात दोन वेगळी व्यक्तित्वं वास करतात असं मला वाटतं. मी स्वत:च स्वत:च्या निर्मितीचं गूढ उकलताना पाहते, साक्षीदार असते.’’ म्हणजे ही प्रक्रिया लेखकाला काहीशी नकळत होते?

आपल्या मराठी समाजाचा अभिमानबिंदू असणाऱ्या कथा-कादंबरीकार, बंडखोर लेखिका विभावरी शिरुरकर म्हणजेच मालतीबाई बेडेकर यांच्या बाबतीतही असंच झालं. ‘विभावरी’ या बहुचर्चित टोपणनामधारी लेखिका. त्यांनीही प्रकाशकाच्या सल्लय़ावरून टोपणनाव घेणं मान्य केलं. त्यांनी लिहिलं तो काळ प्रणयप्रधान आणि ध्येयवादी कादंबऱ्यांचा काळ. त्यात प्रौढ कुमारिका, स्त्रीच्या नैसर्गिक लैंगिक भावना, स्त्रियांचा सर्व बाजूंनी होणारा कोंडमारा याबद्दल स्पष्टपणे लिहिणाऱ्या मालतीबाई. लेखिकेचं नाव जाहीर झालं असतं तर त्यांची काही खैर नव्हती. कदाचित नोकरीही गमवावी लागली असती. त्यामुळे त्यांनी टोपणनाव स्वीकारलं. पुढे ते उघड झालंच; पण ‘कळ्यांचे नि:श्वास’, ‘हिंदोळ्यावर’ अशा  कादंबऱ्या, कथा विभावरी शिरुरकर नावानं, तर ‘मनस्विनीचे चिंतन’सारखं वैचारिक लेखन मालती बेडेकर या नावानं लिहिलं. विशेष म्हणजे  वयाच्या ८८ व्या वर्षी लिहिलेली ‘खरे मास्तर’ ही कादंबरी पुन्हा विभावरी नावानं लिहिली. लेखिका सानिया (सुनंदा कुलकर्णी-बलरामन) मात्र एकाच नावानं सारं लेखन करतात.

इथे मालतीबाईंच्या प्रामाणिक आणि मूल्यसुसंगत स्वभावाची आठवण सांगावीशी वाटते. ‘समांतर साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदावरून भाषण करताना, आपण टोपणनाव घेऊन तत्कालीन परिस्थितीशी तडजोड केली आणि आपल्या लेखनधर्माशी प्रामाणिक राहिलो नाही असं त्यांना वाटत होतं. भाषणात त्या म्हणाल्या, ‘‘समाजाच्या दडपणाखालून सच्चेपणानं लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे विरळाच. त्यांनी १८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष तुलना’ नावाचं पुस्तक लिहिलं. ते पाहिलं की त्याच्यानंतर पन्नास वर्षांनी ज्या भ्याडपणानं मी ‘कळ्यांचे नि:श्वास’ लिहिलं त्याच्या आठवणीनं मी शर्मिदी होते. मी लिहिलं आणि बुरख्यात दडून बसले, अनेक र्वष!’’ इतक्या प्रामाणिकपणाला सलामच करायला हवा.

समाजाचं दडपण मुळीच न मानता समाजातील दुष्ट रूढींचा प्रतिकार करणाऱ्या मल्याळी लेखिका ललिताम्बिका अंतर्जनम् याही तडफदार आणि निर्भय होत्या. त्यांची ‘अग्निसाक्षी’ ही कादंबरी समाजाच्या डोळ्यात अंजन घालू पाहणारी, स्त्रीजीवनाची विकलावस्था स्पष्ट करणारी असूनही त्यांनी टोपणनाव न घेता परखडपणे लेखन केलं. मात्र त्याच समाजातील, पण अलीकडच्या काळातील कमला दास हिनं तीन टोपणनावं घेतली. आपल्या आत्मकथेसाठी आणि कवितांसाठी माधवी कुट्टी हे नाव, तर इंग्रजीतील गद्य लेखनासाठी कमला दास आणि कमला सुरैया.

भारतीय भाषांचा विचार करता मराठीतील लेखिका टोपणनावांचा पर्याय फारशा निवडत नाहीत असं दिसतं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काही जणींनी अशी नावं घेऊन लेखन केलं. लेखिका मुक्ताबाई विठ्ठल दीक्षित यांनी कृष्णाबाई असं, तर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांनी केवळ ‘ता’ अशा नावांनी थोडं लेखन केलं. कधी मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘लक्ष्मीतनया’ वगैरेसारखी नावं घेतली जात. बंगाली कवयित्री  राधाराणी (देव) यांनी ‘अपराजिता’ या नावानं बऱ्याच कविता लिहिल्या. त्यांच्यावर रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव होता; पण राधाराणी या नावानं लिहिलेल्या कविता पारंपरिक विषय, आशय असणाऱ्या, नदीच्या संथ पात्रासारख्या आणि अपराजिता या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कविता विषय धीटपणे आणि मुक्तपणे मांडणाऱ्या, बेबंद प्रपातासारख्या आहेत असं दिसतं. नावामुळे बदलणारं व्यक्तित्व आणि त्यातून होणारा स्वतंत्र आत्माविष्कार हे परस्परपूरक आणि परस्परावलंबीही ठरत असावेत.

इतर भारतीय भाषांमध्ये स्त्रियांनी अलीकडेदेखील टोपण नावं घेऊन प्रभावी लेखन केलं आहे. उदा. त्रिपुरसुंदरी या तमिळ भाषिक लेखिकेचं बरंचसं वास्तव्य दक्षिण आफ्रिकेत झालं. ती डॉक्टर म्हणून तिथे काम करत असतानाही तिची नाळ मूळ भूमीशी जोडलेली होती. तिनं लक्ष्मी या टोपण नावानं जवळजवळ ४० र्वष कथा-कादंबऱ्या लिहिल्या. १९८४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या लक्ष्मी यांचं लेखन स्त्रीकेंद्री आहे आणि त्यांची लोकप्रियता अफाट आहे.

मल्याळममधील आणखी एक महत्त्वाची लेखिका अ‍ॅनी तैय्यील. तिनं स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत, आपल्या तडफदार वक्तृत्वाने सभा गाजवल्या आणि ‘जोसेफ’ हे पुरुषी टोपण नाव घेत साहित्याच्या सर्व प्रांतांत संचार केला. राजकारणात सहभाग घेत असल्यानं त्यांना व्यावहारिकदृष्टय़ा वेगळ्या नावाची गरज वाटली असावी किंवा त्यांच्यातील धाडसी वृत्तीला ते मानवलं असावं.

स्त्रियांवरील अत्याचार आणि कडेकोट बंधनं यांचा सामना ज्यांना अजूनही करावा लागतो आहे अशांमध्ये उर्दू भाषक स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर आहेत.  पूर्वीपासून त्यांनी आपली सर्जनशील वृत्ती बुरख्याआड दडवली तरी ती जिवंत मात्र ठेवली. अठराव्या शतकात लतफुन्नीसा उर्फ इम्तियाझ ही कवयित्री लोकमानसात अमर झाली आहे ती तिच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण कवितांनी. गझल, कव्वाली, खंडकाव्य, युद्धवर्णनपर असे अनेक काव्यप्रकार त्यांनी हाताळले. विशेष हे, की विरह, प्रणय या भावनांबरोबरच धार्मिक वृत्तीही त्यांच्या काव्यात दिसते. या आविष्कारासाठी त्यांनी पुरुषी नाव घेणं साहजिकच.

साहित्य क्षेत्रातील जॉर्ज ऑर्वेल, मार्क ट्वेन, आयन रॅन्ड, व्लादिमीर नोबोकोव्ह, सिल्विया प्लाथ यांसारखी कित्येक नावं कधी ना कधी टोपणनावांनी लिहीत होती. मेरिलिन मन्रो, कॅरी ग्रॅन्ट, कर्क डग्लस यांसारख्या कलावंतांची मूळ  नावं वेगळी होती हे आपण जाणतोच. आपल्या व्यक्तित्वाला, सर्जनशीलतेला ज्यामुळे निर्मितीच्या दृष्टीनं फायदा होईल ते आपलं नाव, असा विचार यांनी केला असावा. जे. के. रोलिंगनं गेल्या ५-६ वर्षांत पाच गुप्तहेरविषयक कादंबऱ्या लिहिल्या, त्या रॉबर्ट गालब्रेथ नावानं. हॅरी पॉटर मालिकेचा शेवट केल्यानंतर आलेली कुंठितता घालवण्यासाठी तिनं हा मार्ग स्वीकारला आहे, असं ती म्हणते.

स्त्रियांनी टोपणनावं का घेतली याविषयी बोलताना व्हर्जिनिया वुल्फ  म्हणते, ‘‘प्रत्येक कलावंत हा आपल्या मनाच्या अंतर्गत कलहाचा बळी असतो. आपल्या लेखनातून तो कलह ते मांडू पाहतात, सोडवू पाहतात आणि मग त्यासाठी कधी तरी अशा काही बाह्य़ गोष्टींचा (टोपणनावासारख्या) उपयोग करतात; पण ते साध्य होतं का?’’

काय वाटतं तुम्हाला?