News Flash

फिरकी

आयुष्यं कधी कधी खूप छान फिरक्या घेतं. एखादी गोष्ट खूप आवडायला लागते. ती कधीच जाऊ नये आयुष्यातून असं वाटायला लागतं.

| January 11, 2014 07:17 am

‘मला हे नाही मिळालं,’ असं वाटून माझं छोटुकलं मन कधीमधी रडवेलं होतं, तेव्हा मी त्या फुटक्या बांगडीपासून बनवलेल्या माझ्याच हसऱ्या चेहऱ्याकडे पाहते. त्यातल्या अर्धगोलाकार हसऱ्या ओठांवर माझी नजर स्थिरावते. मग मला पुन्हा एकदा त्या फिरक्या आठवायला लागतात. आयुष्यानं माझ्या घेतलेल्या मोहक, खटय़ाळ फिरक्या! खूप काही तुटताना जुडलेलं, नव्हत्याचं होतं झालेलं आठवायला लागतं..
आयुष्यं कधी कधी खूप छान फिरक्या घेतं. एखादी गोष्ट खूप आवडायला लागते. ती कधीच जाऊ नये आयुष्यातून असं वाटायला लागतं. पण तरीही तिची जायची वेळ येते. मग नाइलाजाने निरोपाची तयारी करत मन उदासून जातं. आणि अचानक.. अचानक ती निरोप घेतलेली निघून गेलेली गोष्ट परतूनच येते! माझ्या आयुष्यात आत्ता तसंच काहीसं घडतं आहे. वर्ष संपलं. वर्षांखेरीला माझा हा स्तंभही संपणार म्हणून मनाची तयारी केली. काळवंडणाऱ्या मनाची समजूत काढायला घेतली आणि अचानक ‘सुलट’ रस्त्याने जात जात आता दिसेनासा होणारा असं वाटत असलेला माझा.. नव्हे, ‘आपला’ स्तंभ ‘उलट’ फिरून मला परत भेटायला आला! त्याच्या नावासारखाच. अचानक कळलं की हा स्तंभ नवीन वर्षी पण असणार आहे, याला कारण तुमचा भरभरून प्रतिसाद.. तुम्ही मला नव्या वर्षांची ही जी भेट दिलीत, त्याबद्दल मला काय वाटतं आहे हे कुठल्या शब्दात सांगू? अपार आनंदासारखं काहीसं वाटतं आहे. मला काय वाटतं आहे ते सांगण्यासाठी एका सुंदर प्रसंगाची मदत घ्यावीशी वाटते आहे. सत्यजीत रेंच्या ‘अपराजितो’ या चित्रपटातला तो प्रसंग. या सिनेमाचा नायक ‘अपू.’ रें नी ‘अपू’ची गोष्ट सांगणारे तीन सिनेमे बनवले. त्याचं बालपण दाखवणारा ‘पाथेर पांचाली’, यौवन दाखवणारा ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ नावाप्रमाणे अपूचा संसार रेखाटणारा. हे तीनही चित्रपट बंगालीच नाही तर भारतीय चित्रसृष्टीचे मोहरे आहेत. ‘पाथेर पांचाली’मध्ये आपल्याला अपू, त्याची बहीण, वडील, जख्खड आजी असं गावातलं कुटुंब दिसतं. या चित्रपटात अपू लहान असतानाच त्याची आजी, बहीण दुर्गा मरण पावतात. जेव्हा या कथेचा पुढचा भाग ‘अपराजितो’ हा चित्रपट सुरू होतो तेव्हा मी जो प्रसंग सांगते आहे तो येईपर्यंत अपूच्या बालपणाच्या गावातल्या घरात आता फक्त त्याची आई उरली आहे. एकटी. अपू शिकण्यासाठी शहरात गेलेला, आई त्याच्या वाटेकडे सारखी डोळे लावून बसलेली असते. मला सांगायच्या असलेल्या त्या प्रसंगात अपू काही दिवसांसाठी गावी आलेला आहे. आईला भेटायला. तिला त्याच्याशिवाय आयुष्यच नाही. त्याचा जायचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतशी ती सैरभैर व्हायला लागते. अखेर जायच्या दिवसाआधीची रात्र येते. दुसऱ्या दिवशी पहाटे अपूची ट्रेन असते. अपू आईला ‘वेळेत उठव’ सांगून झोपतो. त्यानंतरची पहाट. आई हरवल्यासारखी सैरभैर घरभर काहीबाही कामं करत फिरते आहे. ती एका क्षणी अपूपाशी येते. मी हा सिनेमा पाहून काही र्वष झालीत. कदाचित एखाद दुसरी छोटी गोष्ट आठवून सांगताना इकडची तिकडे होईलही, पण मूळ मुद्दा जो मला सांगायचा आहे तो तिथल्या तिथेच असेल याची खात्री आहे. तर एका क्षणी आई अपूपाशी येते. अपूच्या चेहऱ्याचा क्लोज दिसतो. त्या क्लोजमध्ये आईचा हात हळूच येतो. थांबतो. तो हात त्याला उठवण्यासाठी त्याच्या दिशेने जातो. अगदी हळूच त्याला उठवल्यासारखं करतो. अपू उठत नाही. तो हात हळूच मागे जातो. आई त्याला परत उठवतच नाही. अपू उठतो तेव्हा त्याला उशीर झालेला आहे. ‘तू मला वेळेत उठवलं का नाहीस?’’ म्हणून तो धुसफुसत आवरतो आहे. आई चोरटय़ासारखी झालेली. तो घाईनं तिला नमस्कार करून स्टेशनच्या दिशेनं पळणार तोच कसनुसं होऊन आई म्हणते, ‘घेतलंस ना सगळं? एकदा बघतोस का नीट?’ यावर तो चटकन् तिला म्हणतो, ‘काही नको, वेळ नाही आहे मला!’ ती खालीच पाहत रहाते. त्याच्या डोळय़ाला डोळाच देत नाही. अपू धावत पळत स्टेशनवर पोचतो. त्यानंतर हळूहळू ट्रेन स्टेशनमध्ये शिरताना दिसते. त्याची ट्रेन चुकलेली नाही. मध्येच घराच्या दारातच थिजून उभी असलेली उदास, निर्जीव आई दिसते. तिला दुरून येणारा ट्रेनचा आवाज ऐकू येतो आहे. इकडे ट्रेन स्टेशनवर येऊन थांबते. सगळे भराभरा ट्रेनमध्ये चढण्यासाठी पळत सुटतात. अपू कुणीतरी थांबवल्यासारखा नुसताच उभा.. कुणीतरी त्याला म्हणतं, ‘चल, चल, ट्रेन निघाली!’ अपू सामान घेण्यासाठी वळतो. त्यानंतर पुन्हा एकदा अपूच्या घरासमोरचा एकाकी रस्ता दिसतो. तो रस्ता आपण आधीही पाहिला आहे. ह्य़ाच रस्त्यावर लहानपणचा ‘अपू’ दुडदुडला होता.. त्या रस्त्याकडे एकटक बघणाऱ्या आईला त्या धूळभरल्या रस्त्यावर दुरून येणारी एक अस्पष्ट आकृती दिसते. तिला आधी वाटतं भास होतो आहे. पण नाही.. तो तोच असतो. अपू! तो परत आलेला असतो. तो जातच नाही! नाहीच जात तो.. तिचा निर्जीव चेहरा हळूहळू त्यात कुणीतरी जीव ओतत असल्यासारखा उजळत जातो. अपू घरी येतो. म्हणतो, ‘माझी ट्रेन चुकली!’ ती म्हणते, ‘मग आता, तुझं कॉलेज?’’ तो बाहेरच्या सोप्यात बॅग फेकून निर्धास्त पहुडतो, हसून आईकडे बघतो आणि म्हणतो, ‘उद्या जाईन!’ त्यानंतर आईची भूमिका केलेल्या करुणा बॅनर्जी या महान बंगाली अभिनेत्रीनं चेहऱ्यावर जी भावना दाखवली आहे, त्याला ‘आनंद’ हा शब्द तोकडा आहे. त्या भावनेसाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. खरंच काय गोड असतं आयुष्य! नेता नेता एखादी गोष्ट अलगद पुन्हा पदरात टाकून जातं तेव्हा जे काही वाटतं त्याला कुठला शब्द वापरावा? कुठला?
असे कितीतरी ‘निसटणार’ असं वाटताना अलगद झेलले गेलेले क्षण आज पुन्हा एकदा नव्यानं तुमच्याशी जुडण्याची संधी मिळताना आठवत आहेत. ते क्षण ओंजळीत पकडूनच या नव्या वर्षांची सुरुवात करेन म्हणते, करुणा बॅनर्जीइतक्याच आनंदाने ओसंडणाऱ्या चेहऱ्यानं! गेलेलं सारखंच आठवतं. ते आठवत बसण्यात जाता जाता थबकलेलं, थांबलेलं, राहिलेलं काही बघण्याची फुरसतच राहत नाही. आज ती फुरसत काढीन म्हणते.. एका मित्राची आठवण येते आहे. आय.सी.यू.त होता. आता निरोपाची वेळ येऊन ठेपली आहे असं वाटत होतं. वयानं लहान होता. तो आय.सी.यू.त कोमात असल्यासारखा पडलेला असताना माझा नवरा त्याच्याशी बोलत राहायचा सतत. ‘परत ये. खूप काम करायचं आहे आपल्याला अजून’ अशा अर्थाचं. त्याच्या निरोपाची पूर्ण तयारी केलेल्या माझ्या हतबल मनाला वाटत होतं, ‘हा बोलतोय खरा, पण त्याला थोडंच ऐकू जात असेल?’ तो मित्र हळूहळू आश्चर्यकारकरीत्या बरा झाला. त्याची गाडी निर्वाणाच्या वाटेच्या शेवटच्या वळणावरून परत इहलोकाकडे वळली. आता तो ठणठणीत आहे. पुढे कधीतरी माझा नवरा त्याच्याशी फोनवर बोलताना म्हणाला, ‘बरा आलास परत!’ यावर तो मित्र पलीकडून म्हणाला, ‘आलो झालं! आय.सी.यू.त डोळे मिटून पडलो होतो तेव्हा बाहेरून तुझ्यासारखाच एक आवाज म्हणत होता, ‘परत ये’ म्हणून मी आलो!’ आमचा तो मित्र सरळ कुठली गोष्ट सांगत नाही. वळणावळणानं बोलतो. या त्याच्या बोलण्याचा अर्थ होता त्यानं ‘आय.सी.यू.’त माझा नवरा त्याच्याशी बोलत असलेले शब्द ऐकले होते आणि फक्त त्यामुळे जरी नाही तरी त्यामुळेही, तो परत आला होता..
माझी आई तिची आणि बाबांची एक आठवण सांगते. त्यांचं अजून लग्न झालं नव्हतं, ते फक्त मित्र-मैत्रीण होते तेव्हाची. आई नुकतीच बाबांच्या घरात येऊ-जाऊ लागली होती. एके दिवशी राखी पौर्णिमा होती. बाबांच्या सगळय़ा बहिणी बाबांना राख्या बांधत होत्या. आईही तिथं होती. बाबांच्या आईनं माझ्या आईला पण बाबांना राखी बांधायचा आग्रह केला. आईनं चक्क नकार दिला. दुसऱ्या दिवशी बाबा शिकायला कराडला जाणार होते. तिकडे निघून गेले. माझा मामाही काही कामासाठी कराडला जाणार होता. आईनं मामाबरोबर बाबांसाठी कराडला चिठ्ठी पाठवली. ‘माझ्या मनात तुझं स्थान मोठं आहे, पण ते भावाचं नाही’ अशा अर्थाची. आई शाळेत, नववीत असेल. ही चिठ्ठी म्हणजे तिनं बाबांना दिलेली तिच्या प्रेमाची ग्वाहीच होती. बाबांनी मामाबरोबर आईसाठी उलट चिठ्ठी पाठवली. आई आणि मामा साताराच्या ‘मोती चौक’ भागात राहायचे. मामानं चिठ्ठी देताक्षणी आईनं ती घराकडे जाता जाता रस्त्यातच वाचायला सुरुवात केली. त्यात बाबांनी, आईनं कसं अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं असं उपदेशामृत लिहिलं होतं. ते वाचून हा नकार आहे असं वाटून आईचे डोळे घळाघळा वाहायला लागले. तोच, ती रस्त्यानं चालत असताना अचानक तिच्या कानाशी एक गजराचं घडय़ाळ मोठय़ांदा वाजायला लागलं! तिनं दचकून पाहिलं तर बाबा! ते मामाबरोबर कराडहून आले होते, पण त्यांनी ते आईला कळू दिलं नव्हतं. आता बाबांचं ते येणं पाहून वाटतं तो गजर म्हणजे माझ्या बाबांनी आईला दिलेला मोठ्ठा होकार असणार, नव्हे होताच! नाहीतर हे लिहिणारा हात या जगात आता असता का!
अशा अनेक वेळांना आयुष्य एका उमद्या, खटय़ाळ प्रियकरासारखं वागतं. ते आपली सुंदर फिरकी घेत असतं आणि त्या फिरकीनंतरचा आपला आनंद पाहून तेही कुठुनसं हसत असतं असं वाटतं. आज, असे अनेक नकारांचे झालेले होकार आठवताना गेल्या वर्षांतले दोन ‘होकार’ मनापासून आठवत आहेत. काही मोठी स्वप्नं मी कधीच पूर्ण होणार नाहीत या तयारीनेच पाहिली होती. जी पाहता पाहताच मी त्यांचा निरोप घेत असताना आयुष्यानं मात्रं उलट फासे सुलट करून ती पूर्ण करून टाकली आहेत. एक म्हणजे अश्विनी भिडेसारखी महान गायिका मला गाणं शिकवायला ‘नाहीच’ म्हणेल अशी खात्री होती. तरी पण ‘एकदा विचारून बघू’ असं म्हणून तिला विचारलं आणि ती चक्क ‘हो’च म्हणाली! दुसरं म्हणजे, माझी दुखणारी पाठ, पाय, सायटिका हे या जन्मी बरं होणार नाही अशी माझी हताशेनं खात्री पटत चाललेली असताना अचानक चार महिन्यांपूर्वी परुळेकरसर माझ्या आयुष्यात आले. त्यांनी मला व्यायाम नुसता शिकवला नाही, तर व्यायामाची पूर्ण नावड असलेल्या मला व्यायामाची गोडी लावली आणि माझा आजार संपूर्णपणे घालवला! मला आता आयुष्यात कधीही पळता येणार नाही, जड वस्तू उचलता येणार नाहीत असं वाटून मी माझ्या निरोगी आयुष्याचा निरोप घेण्याची तयारी करत असतानाच सर आले आणि गोष्टी पालटूनच गेल्या! परवा कुठल्याशा सिनेमात ‘मी भरलेला सिलेंडर उचलते’ अशा प्रसंगाचे तीन रीटेक्स देऊनही पाठ दुखलीच नाही. दुसऱ्या एका सिनेमासाठी पळत पळत लोकल पकडायचा शॉट होता, तो देण्यासाठी धावत असताना माझ्या लक्षात आलं ‘‘मी पळू शकते आहे, माझा पाय मुळीच दुखत नाही आहे!’’ इतर कुणासाठी या साध्यासुध्या वाटणाऱ्या छोटय़ाशा गोष्टी असतील पण माझ्या दुखऱ्या, लंगडणाऱ्या पायासाठी हा सरांनी केलेला चमत्कार आहे. आयुष्यानं खूप काही मोलाचं ‘नव्हत्याचं’ ‘होतं’ केलं आहे..
माझी खूप आवडती मोरपंखी रंगाची बांगडी एके रात्री खळकन् फुटली. ‘आवडतं काही कायम थोडं टिकतं’ असं म्हणून मुकाट तिचे तुकडे उचलून घशातले आवंढे गिळत तिला निरोप दिला. सकाळी उठून पहाटे पाहिलं तर उशाशी एक कागद होता. त्यावर त्या फुटक्या बांगडीचे तुकडे चिकटवून एक हसरा चेहरा बनवला होता माझ्या नवऱ्यानं.. भुवया, डोळे, हसणारे ओठ आणि डाव्या बाजूला एक छोटासा ठिपक्यासारखा तुकडा, माझ्या गालावरच्या जन्मखुणेसारखा! माझी फुटलेली बांगडीसुद्धा आयुष्यानं मला परत दिली होती, कायमची! त्या कागदाभोवती एक छान फ्रेम करून मी ते बांगडी-चित्र माझ्या घरातल्या बाहेरच्या भिंतीवर लटकवलं आहे. ‘मला हे नाही मिळालं,’ असं वाटून माझं छोटुकलं मन कधीमधी रडवेलं होतं, तेव्हा मी त्या फुटक्या बांगडीपासून बनवलेल्या माझ्याच हसऱ्या चेहऱ्याकडे पाहते. त्यातल्या अर्धगोलाकार हसऱ्या ओठांवर माझी नजर स्थिरावते. मग मला पुन्हा एकदा त्या फिरक्या आठवायला लागतात. आयुष्यानं माझ्या घेतलेल्या मोहक, खटय़ाळ फिरक्या! खूप काही तुटताना जुडलेलं, नव्हत्याचं होतं झालेलं आठवायला लागतं.
मग फुटक्या बांगडीचं अर्धगोल हसू चेहऱ्यावर उमलायला लागतं आणि मी पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रेमात पडते.     
    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 7:17 am

Web Title: bowling spin
Next Stories
1 एक उलट.. एक सुलट : निरोप
2 अस्तु
3 नटी..आई !
Just Now!
X