संपदा सोवनी – sampadasovani@gmail.com

‘मुलांशी संवाद हवा,’ हे पालकत्वासंबंधीच्या कोणत्याही धडय़ाचं पालुपद असतं. ‘हे सांगणं सोपं आहे हो, पण तो करायचा कसा?’.. ‘आमच्याशी  नव्हता केला बुवा कुणी असा संवाद!’ ‘या ‘संवादा’त लैंगिक शिक्षणासारखे अडचणीचे विषयदेखील पालकांनीच काढायचे असतात का?’.. ‘हल्लीच्या मुलांना कितीही थांबवलं तरी ती मोबाइल हातात घेणारच, इंटरनेट बघणारच.. कशाकशाला चाप लावायचा आम्ही?’.. ‘इन्स्टाग्राम’वरच्या ‘बॉइज लॉकर रूम’चं प्रकरण फुटलं आणि त्यानं भेदरलेल्या पालकांसमोर ही अशी प्रश्नांची मालिकाच उभी राहिली. ‘लोकसत्ता-चतुरंग चर्चे’च्या माध्यमातून मानसोपचार आणि इंटरनेट तज्ज्ञांच्या मदतीनं या प्रश्नांच्या उत्तरांचा घेतलेला हा वेध.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?

लैंगिक शिक्षण हा नक्की काय प्रकार असतो?.. तुम्हाला कधी कुणी समोर बसवून ते दिलंय का?.. आठवा.. आपल्याकडे घरी आई-वडील हे असं काही बोलत नसतात!.. बरं मग शाळेत?.. मुलींना मासिक पाळी येण्याच्या वेळी त्यासंदर्भात जी माहिती देतात तेच लैंगिक शिक्षण म्हणायचं का? मग मुलग्यांना त्या वयात काय सांगतात?.. सुचतायत का काही उत्तरं? हे प्रश्नच असे आहेत, की कदाचित अनेक पालक आणि शिक्षकांनाही यावर फार काही बोलता येणार नाही.  लैंगिक शिक्षणाविषयी सुरू झालेले प्रश्न आताच्या काळात नेहमी इंटरनेटपर्यंत येऊन ठेपतात. अलीकडे घडलेलं  ‘बॉइज लॉकर रूम’ प्रकरण वाचलं असेलच तुम्ही. दक्षिण दिल्लीतल्या काही अल्पवयीन मुलांनी चालवलेल्या या खासगी ‘इन्स्टाग्राम ग्रुप’वर मुलींविषयी, स्त्री देहाविषयी चर्चा चालत असे. इथपर्यंत या प्रकरणात कुणाला फारसं वेगळं वाटणार नाही; पण या चर्चेनं ही पातळीही ओलांडली आणि आपल्याच वर्गातल्या मुलींवर सामूहिक बलात्कार करण्याच्या नियोजनापर्यंत चर्चा येऊन ठेपली. एका मुलीनं हे प्रकरण उघडकीस आणलं आणि मग अर्थातच हा प्रकार ‘व्हायरल’ झाला आणि मग जरा गंभीर चर्चा सुरू झाली. ती म्हणजे हे सगळं हाताळायचं कसं, याची. पालकत्वातलं पालुपद असलेला ‘पालक आणि मुलांमधला संवाद’ आता आणखी अवघड होत जाणार आहे आणि त्यातून सुटका नाही हेही यानिमित्तानं अधोरेखित झालं. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता-चतुरंग चर्चा’ या व्यासपीठाच्या पहिल्या ‘वेबिनार’मध्ये मानसोपचार आणि लैंगिक विषयांमधील तज्ज्ञ डॉ. राजन भोसले, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते आणि ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेचे सहसंस्थापक उन्मेष जोशी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. ‘चतुरंग’च्या संपादक आरती कदम यांनी त्यांना बोलतं के लं. त्या वेळी झालेल्या चर्चेचा हा संपादित अंश.

आरती कदम- पौगंडावस्थेत येणारं शारीरभान आणि लैंगिक विषयांबद्दल या वयात मनात येणारे प्रश्न याबाबत आधीच्या पिढय़ा आणि आताची पिढी यांच्यात काय बदल झालेला दिसतो?

डॉ. राजन भोसले-  मुलंमुली पौगंडावस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या शरीरात आणि मनात संप्रेरकांमुळे काही बदल घडू लागतात. अनेकदा शरीरात घडणाऱ्या बदलांबाबत त्यांना काहीशी माहिती असते, पण मनात घडणाऱ्या बदलांबाबत मात्र त्यांना काहीच कल्पना नसते. अचानक ही संप्रेरकं जेव्हा शरीरात संचारायला लागतात तेव्हा त्यांच्या मनात काही नवीन विचार आणि नवीन भावना, वासना निर्माण होऊ लागतात. त्यांना लैंगिक म्हणायचं हेही त्यांना माहीत नसतं. हल्ली आपल्याकडे पौगंडावस्था ही साधारणपणे वयाच्या ९ व्या वर्षांपासून सुरू होते. त्याच वेळी या मुलांच्या मनात या नव्या भावना झंझावातासारख्या येतात.. त्यांचा अर्थ काय लावायचा? त्या फक्त आपल्याच मनात येतात की इतरांच्याही मनात येतात? त्या यायला हव्यात की नकोत? याची उत्तरं मात्र त्यांना सापडत नाहीत. अशा वेळी मुलांची अवस्था ‘प्रेशर कूकर’मध्ये वाफ साठून राहिल्यासारखी होते. अशा वेळी कुतूहल शमवण्यासाठी विविध मार्गाचा वापर केला जातो. आताच्या काळात त्यासाठी इंटरनेट वापरलं जात असलं, तरी पूर्वीही अश्लील चित्रं पाहणं, डायरीत हिंसक, विकृत मजकूर लिहिणं, मित्रांमध्ये तशा गप्पा मारणं, लपून लैंगिक स्वरूपाच्या ‘क्लिप्स’ वा ‘स्लाइड्स’ पाहणं हे होतच असे. म्हणजे आता फक्त प्रकटीकरणाचा मार्ग बदलला आहे.

प्रश्न – पौगंडावस्था येण्याचं वय नक्की किती अलीकडे आलं आहे आणि या वाढलेल्या पौगंडावस्थेतल्या काळाचा मुलांवर  नेमका काय परिणाम होतो आहे?

डॉ. शुभा थत्ते- पूर्वीच्या काळी वयात येण्याचा टप्पा हा ‘टीनएज’ म्हणजे १३ र्वष व पुढे धरला जात असे. आता ते सर्व बदल ९ व्या-१० व्या वर्षांपासूनच दिसू लागतात. वयात येण्याचा शारीरिक टप्पा जरी अलीकडे आला तरी मानसिक टप्प्याचं मात्र तसं नाही. दहा-अकरा वर्षांच्या मुलांची शारीरिक वाढ ही वयात आलेल्या मुलांसारखी असते, आपल्या शरीरात होणारे बदल त्यांना माहिती असतात, त्यांचं वर्तनही त्या प्रकारचं दिसू लागतं. उदाहरणार्थ अगदी सहावी-सातवीच्या वर्गातही मुला-मुलींच्या जोडय़ा लावलेल्या असतात आणि एखाद्याला वा एखादीला जोडी नसेल तर त्यांना त्याची खंतही वाटत असते. हे बदल लवकर घडले, तरी मनात येणाऱ्या विचारांची आणि भावनांची ऊर्मी ताब्यात ठेवायला शिकणं- अर्थात ‘इम्पल्स कंट्रोल’ आणि आपल्या कृतीच्या परिणामांचा विचार करण्याचं भान या दोन गोष्टी मात्र उशिरा- म्हणजे १७ व्या-१८ व्या वर्षी येतात. ही मानसिक प्रगल्भता येण्याआधीच्या काळात मुलांना जे मनात येतं त्याबद्दल प्रयोग करून पाहण्याची इच्छा होते. ते नैसर्गिकदेखील आहे. अशा वेळी त्यांच्या ऊर्मीला वळण देण्याचं काम पालकांच्या हाती असतं. एखाद्या दहावीत असलेल्या मुलीच्या दप्तरात जेव्हा आईला कंडोमचं पाकीट सापडतं तेव्हा ते पालक हादरून जातात. अशी प्रकरणं येतात तेव्हा आधी पालकांना धक्क्यातून सावरावं लागतं आणि प्रकरण कसं हाताळायचं ते समजावून सांगावं लागतं.

प्रश्न –  लवकर वयात येणं आणि त्याच वेळी मोबाइल- इंटरनेटच्या माध्यमातून हाती आलेला माहितीचा महापूर याची सांगड घालणं मुलांना शक्य होत आहे का? 

उन्मेष जोशी- मुलांच्या हाती अगदी वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षांपासूनच मोबाइल फोन येतात. आमचं निरीक्षण असं आहे, की मोबाइल हाच ‘बेबीसिटर’ झाला आहे, कारण पालक खूप ‘बिझी’ झाले आहेत. मोबाइलची ओळखच अशी चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळे आपण काय बघायचं आणि काय नाही, याची अर्थातच मुलांना माहिती नसते. शाळांबरोबर गेली ९-१० र्वष काम करताना अशी अनेक प्रकरणं दिसली. एकदा दुसरी इयत्तेतल्या मुलीनं वर्गातल्या इतर मुलांच्या अनुपस्थितीत एका वर्गमित्राचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. शिक्षक अचानक वर्गात आल्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं. या मुलीनं तिच्या वडिलांच्या मोबाइल फोनमध्ये हे पाहिलं होतं. पालकांपेक्षा मुलांचा टी क्यू अर्थात ‘टेक्नॉलॉजी कोशंट’ खूप जास्त असतो. त्यातून ती अधिकाधिक गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांच्या हातात ‘गॅजेट्स’ देताना या इतर गोष्टींसंबंधी पालकांनी त्यांच्याशी बोलणं खूप आवश्यक असतं.

प्रश्न-  हाती लवकर इंटरनेट आलं आणि खूप गोष्टी माहिती झाल्या तरी मुलांच्या लैंगिक विषयांसंबंधीच्या जाणिवांमध्येही फरक पडलेला दिसतो का? त्यांची जाण पूर्वीच्या पिढय़ांच्या तुलनेत वाढली आहे का?

डॉ. राजन भोसले- आपल्या आयुष्यात इंटरनेट उशिरा आलं असलं, तरी सध्याच्या मुलांनी ते लहान वयापासूनच हाताळलं आहे. त्या माध्यमाबरोबरच ही मुलं मोठी होणार असल्यामुळे इंटरनेटपासून त्यांना दूर ठेवणं शक्यच नाही. तसंच त्यांनी काय पाहावं, काय पाहू नये यावर मज्जाव करणं तांत्रिकदृष्टय़ाही पालकांना शक्य नाही. अशा वेळी मुलं जे काही पाहतात त्याचा त्यांनी स्वत:वर काय परिणाम करून घ्यावा, याचं शिक्षण देण्याला खूप महत्त्व आहे. यालाच ‘कॉन्सिक्वेन्शिअल थिंकिंग’ किंवा ‘परिणामांचं तारतम्य’ असं म्हणतात. ते मुलांमध्ये लवकर विकसित करण्यासाठी पालक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची असते. मुलांना आपलं आपण हे भान प्राप्त होण्याची वाट पाहात थांबून चालणार नाही. शालेय शिक्षणात आणि पालकांकडून मुलांना मिळणाऱ्या शिक्षणात त्याचा समावेश असायलाच हवा. हे आपण साध्य करू शकलो, तर मुलांनी इंटरनेटवर अचानक काहीही पाहिलं, कोणतंही संकेतस्थळ उघडलं, तरी त्यातून काही तरी विचित्र अर्थ काढून मुलं विचलित होणं टाळता येतं. केवळ इंटरनेटला दोष देण्यापेक्षा पालक आणि मुलांमधला सुसंवाद संपला असण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. मुलं पालकांना न घाबरता त्यांच्याशी बोलू शकली पाहिजेत आणि पालकही त्यांना त्याविषयी समजावून सांगू शकले पाहिजेत. असं झालं तर इंटरनेट टाळता येणार नसलं तरी त्याचे दुष्परिणाम टाळता येतील.

प्रश्न – शारीरिक जवळीक वा शरीरसंबंध या गोष्टींविषयीच्या संकल्पना आता बदलल्या आहेत. मुलांना त्याविषयी प्राप्त होणारं ज्ञान पाहता त्यांच्यावर या बदलाचा परिणाम कसा होताना दिसतो आहे? 

डॉ. शुभा थत्ते- पूर्वी शारीरिक जवळिकीबद्दल जो सोवळेपणा होता, तो आता उरलेला नाही. आपण आता मित्रमैत्रिणींना भेटतानाही अगदी सहज त्यांच्या गळ्यात पडतो आणि त्यात कुणाला काही वावगं वाटत नाही. पूर्वीच्या तुलनेत संस्कृती कायम बदलत असते. त्यामुळे समाजातच ही संकल्पना बदलल्याचं स्वीकारायला हवं. मुलामुलींना शारीरिक जवळिकीच्या संधी आता वाढलेल्या आहेत. ही जवळीक वाईट आहे, असं त्यांना सांगण्याची गरज नसली, तरी मुलं त्या गोष्टीच्या मोहात पडू शकतात आणि त्यातून पुढे काही वेगळा परिणाम घडू शकतो याची माहिती मात्र त्यांना करून देणं गरजेचं असतं. आम्ही १९८२-८३ मध्ये केईएम रुग्णालयात स्त्रीरोग विभागाबरोबर एक पाहणी केली होती. त्यात वारंवार गर्भपात करण्यासाठी येणाऱ्या तरुणींच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही अगदी दोन-तीन वेळा गर्भपात करण्यास आलेल्या मुली दिसत. म्हणजे आधीच्या पिढय़ांमध्ये हे होतंच, शिवाय त्यातून आपला बचाव कसा करायचा हेही त्यांना माहिती नव्हतं. याचाच अर्थ या गोष्टी घडण्यापासून टाळणं शक्य नसतं. आपल्या कृतीचे लगेच घडणारे आणि दीर्घकालीन असे दोन्ही प्रकारचे परिणाम काय होतील याची जाणीव मात्र निश्चितपणे मुलांमध्ये जागृत करता येते.

प्रश्न- मासिक पाळीच्या निमित्तानं मुलींशी पौगंडावस्थेविषयी थोडं तरी का होईना, पण बोललं जातं. मात्र या वयातल्या बहुसंख्य मुलग्यांशी मात्र काहीच बोललं जात नाही. त्याचे  दुष्परिणाम दिसतात का?

उन्मेष जोशी- नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात महाराष्ट्रातल्या १८ जिल्ह्य़ांमधील १२०० मुलांबरोबर आम्ही एक सर्वेक्षण केलं. त्यातही मुलग्यांचं प्रमाण जास्त होतं. त्यातल्या जवळपास ४८ टक्के मुलांपर्यंत लैंगिकतेविषयी काहीच माहिती पोहोचलेली नाही, असं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे बहुतांश मुलांनी इंटरनेटवर ती शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावरून प्रयोग करून पाहण्यावर त्यांचा भर होता. उदाहरणार्थ, नववीतल्या मुलांनी आपापसात आणि इन्स्टाग्रामवरच्या ग्रुपवरही ‘सेक्स चॅट’ करणं. सशुल्क सेक्स चॅट करण्यासाठी पैसे नसल्यामुळे विनाशुल्क व्यासपीठांवर प्रसंगी आपली नग्न छायाचित्रं टाकूनदेखील मुलांनी ‘सेक्स चॅट’ केल्याचं उदाहरण आम्ही पाहिलं आहे. लैंगिक विषयांसंबंधातील ‘कंटेंट’ आता इंटरनेटमुळे सहज उपलब्ध होतो आणि मुलं असा कंटेंट एकमेकांना सहज देत असल्याचंही दिसून येतं.

प्रश्न (वाचक) – मुलांशी लैंगिक विषयांवर चर्चा सुरू करण्यात पालकांना खूप संकोच वाटतो. ही चर्चा नेमकी केव्हा सुरू करावी?

डॉ. राजन भोसले- मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची सुरुवात मूल जन्माला आल्यावर लगेच करायची असते. हे उत्तर वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण लहान बाळांनाही आपण जेव्हा आंघोळ घालतो, अंग पुसतो, कपडे घालतो, तेव्हा त्यांच्या जननेंद्रियांविषयी आपल्याच मनात काही पूर्वग्रह असतील तर आपला स्पर्शही त्या ठिकाणी आल्यावर संकोचामुळे बदलतो. इतक्या लहान मुलांना आपल्या शरीराची ओळख जरी नसली तरी शरीराच्या विशिष्ट भागापाशी आल्यावर आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा स्पर्श बदलतो हे त्यांना जाणवतं. इथेच आपण त्यांच्या जाणिवा चुकीच्या करून द्यायला सुरुवात करतो. आपण मुलांना भाषा शिकवताना इतर अवयवांची नावं नीट शिकवली तरी जननेंद्रियांसाठी असलेले शब्द त्यांना सांगतच नाही किंवा त्या अवयवांसाठी कुठली तरी वेगळीच, चुकीची नावं वापरतो. मुलींची पाळी सुरू होण्याच्या आधीच त्यांना शरीरात घडून येऊ पाहणाऱ्या बदलांची माहिती देणं आवश्यक असतं. अशा रीतीनं पौगंडावस्था येण्याच्या आधी मुलामुलींना त्याची कल्पना दिलेली असल्यास त्यांच्या मनाची त्यासाठी तयारी करता येईल. त्यामुळे हा संवाद मूल जन्मल्यापासून हळूहळू सुरू व्हायला हवा. ते झालं, तर मुलंही पुढे मोकळेपणानं पालकांशी बोलू शकतील. आपण संकोचापायी यातलं काहीच करत नसल्यामुळे मुलांना आपल्या मनातल्या शंका कुणाला, कशा विचारायच्या हे माहीत नसतं. मग आई-वडिलांपेक्षा इंटरनेटची मदत घेणं, आपल्यापेक्षा थोडेच मोठे असलेले मित्र, ओळखीचे लोक, नोकर मंडळी यांना विचारणं, याकडे त्यांचा कल असतो. त्यात अनेकदा मुलांना काही विचित्र अनुभव आल्याची उदाहरणंही आहेत. त्यामुळे मूल जन्मल्यापासून त्याच्या वयानुरूप त्याला लैंगिकतेविषयी ओळख करून देत जाण्यात पालकांची भूमिका मोठी आहे. पालक लहान असताना त्यांच्याशी कुणीच असं काही बोललेलं नसल्यामुळे ते स्वत:च बुचकळ्यात पडतात. पती-पत्नी लैंगिक संबंध करत असताना चुकून त्यांचं दुसऱ्या खोलीत झोपलेलं मूल अचानक खोलीत आलं आणि मुलानं काही क्षण ती गोष्ट पाहिली. या अपघातामुळे चपापलेल्या त्या पालकांनी मूल पुढे काही तरी प्रश्न विचारेल या भीतीनं त्याची रवानगी वसतिगृहात केली, असं एक उदाहरण माझ्या पाहण्यात आहे. त्यामुळे मुलांच्या आधी पालकांनाच मोठय़ा प्रमाणावर लैंगिक शिक्षण द्यायला लागणार आहे. मुलांशी कायमस्वरूपी संवाद जोपासण्याचं तंत्र त्यांना शिकावं लागेल.

प्रश्न – उन्मेष जोशी, मुलांशी आणि पालकांशी होणाऱ्या बोलण्यातून तुमचं याबद्दल निरीक्षण काय आहे?

उन्मेष जोशी- प्रत्येक पालक मुलांशी अशा प्रकारे बोलण्यासाठी सक्षम नसतात; पण अशा वेळी त्यांना बाहेरून मदत घेता येईल. विविध संस्था पौगंडावस्थेतील मुलांसाठी काम करतात. उदा. ‘अर्पण’ नावाच्या संस्थेनं लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांशी करायच्या या प्रकारच्या संवादाविषयी उत्तम पुस्तिका प्रसिद्ध केली असून ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. काही वेळा मुलं इंटरनेटवर लैंगिकतेविषयीची माहिती मिळवायला गेली आणि त्यातून पुढे त्यांचं लैंगिक शोषण झालं, अशी काही प्रकरणंही झाली आहेत. त्यामुळे लहान वयापासूनच पालकांनी मुलांना माहिती देण्याचं महत्त्व आणखीनच वाढतं.

गिरीश कुबेर- ‘लैंगिक शिक्षणाची काही गरजच नाही, योग्य वेळी मुलांना जे कळायचं ते कळतं आणि व्हायचं ते होतं, आमचं नाही का झालं,’ असं मानणाऱ्यांचाही एक वर्ग समाजात आहे. या प्रश्नाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं पाहावं?

डॉ. राजन भोसले- लैंगिक शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष लैंगिक संबंध कसा करायचा याचं शिक्षण नव्हे. आपल्यात जेव्हा लैंगिकता अवतरते तेव्हा त्याला सामोरं कसं जायचं, त्या भावनांचा अर्थ कसा काढायचा आणि दोन माणसांमधलं निरोगी नातं कसं जपायचं, याचं शिक्षण त्यात अपेक्षित आहे. लैंगिक संबंधांमधील कायद्याचा भाग हा फक्त मनुष्यप्राण्यात अस्तित्वात आहे, तसंच गर्भनिरोधकांच्या वापराविषयी किंवा लैंगिक संबंधांमधून पसरू शकणाऱ्या आजारांविषयीची माहिती मुलांना नैसर्गिकरीत्या अवगत होऊ शकत नाही. ती सांगावी लागते. आपण ज्या  प्रकारे मुलांना ‘टॉयलेट ट्रेनिंग’ देतो तसंच लैंगिक शिक्षणाचं आहे.

प्रश्न – मुलांचं इंटरनेटवर वेळ घालवण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातला बराच वेळ गेम्स खेळण्यात जातो ज्यात खूप हिंसा असते आणि मुलं हे गेम्स सर्रास खेळतात. त्यामुळे हिंसाचाराचं गांभीर्य नाहीसं होऊन मुलांना ते सहज वाटू शकतं. त्याचा परिणाम काय होऊ शकतो?

डॉ. राजन भोसले- मुलं कोणता आणि किती हिंसक गेम खेळतील यावर बंधनं घालणं शक्य नाही; पण हिंसेच्या बाबतीत मुलांना घरात कोणताही हिंसाचार अनुभवायला मिळतो का, हे वातावरण फार महत्त्वाचं ठरतं. उदा. वडिलांनी आईवर हात उचलणं, तिचा अपमान करणं, घरात आई-वडिलांमध्ये होणारी शिवीगाळ अशा हिंसाचाराचा मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो. याउलट घरातलं वातावरण नेहमी परस्पर सन्मानाचं, निरोगी असेल तर ते मुलांवर बिंबतं. अशा मुलांनी हिंसक गेम्स खेळले, तरी तो मनोरंजनासाठीचा एक खेळ आहे आणि प्रत्यक्ष आयुष्य वेगळं असतं, हा फरक मुलं करू शकतात. स्त्रियांशी कसं वागलं जातं, याचंही  शिक्षण आपण घरातल्या वर्तणुकीतून मुलांना नकळत देत असतो.

‘लोकसत्ता चतुरंग चर्चा’च्या या पहिल्या वेबिनारमध्ये प्रेक्षकांचे स्वागत ‘लोकसत्ता’च्या डेप्युटी कॉपी एडिटर स्वाती के तकर-पंडित यांनी के ले, तर स्वागत ‘लोकसत्ता’ संपादक गिरीश कु बेर यांनी के ले. या वेबिनारला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

‘बॉइज लॉकर रूम एक धडा’ या विषयावरील ‘लोकसत्ता चतुरंग चर्चा’ या वेबिनारमध्ये झालेल्या संपूर्ण चर्चेसाठीची यूटय़ूब लिंक https://www.youtube.com/watch?reload=9&v=4BGYz-WIUIg&feature=youtu.be