माझे बालपण पेणसारख्या छोटय़ा गावात गेले. कधी-कधी आमच्या आळीत एक काळी ऑस्टीन गाडी येत असे.  आपल्याकडेही अशी गाडी हवी असा विचार मनात येई. पुढे कळले की हा माणूस इंजिनीअर असून व्होकार्ट या कंपनीत मोठय़ा पदावर आहे.
अशी स्वप्न पाहात असताना १९४४ साली अचानक माझे आईवडील २७ दिवसांच्या फरकाने टायफॉइडच्या साथीत वारले. तेव्हा मी अवघा नऊ वर्षांचा होतो. आम्ही चार भाऊ, मी सर्वात लहान व घरात कोणीच मिळवते नाही. मोठय़ा भावाने कसाबसा संसार रेटला. त्याला सर्वाची साथ होती. बाकीचे तिन्ही भाऊ शालेय शिक्षण घेत होते व अभ्यासात मागे नव्हते. दुसऱ्या भावाला मी इंजिनीअर व्हावे असे वाटत होते व त्याने मला एस.एस.सी. झाल्यावर व्हीजेटीआयची प्रवेश परीक्षा देण्याचे सुचवले. कारण तो काळी गाडीवाला माणूस व्हीजेटीआयमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेला होता. माझे एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण मराठीत झाले होते व ही परीक्षा इंग्रजीतच द्यावयाची होती. त्यासाठी मला भावाने इंग्रजी पुस्तके विकत आणून दिली व मार्चच्या वार्षिक परीक्षेनंतर मी व्हीजेटीआयच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करू लागलो. त्यासाठी मी पेणहून ठाण्याला भावाकडे आलो होतो.
१९५४ साली परीक्षेच्या दिवशी मी सकाळी सातलाच ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तर कुर्ला-सायन दरम्यान मोठा अपघात झाल्याचे कळले. रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दुसरा कुठलाही पर्याय माझ्यासाठी उपलब्ध नव्हता. मी घरी आलो. माझी सायकल घेतली व माटुंग्याला सायकलीने निघालो. जून चे दिवस असल्याने वाटेत पाऊस लागला. कसाबसा साडेनऊ वाजेपर्यंत व्हीजेटीआयला पोहोचलो. परीक्षा नऊ वाजताची होती. मला एका सुटाबुटातल्या प्राध्यापकाने अडवले. माझी अर्धी चड्डी, त्यावर न खोचलेला शर्ट, पावसाने भिजलेले अंग व खेडवळ चेहरा पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग मी त्याला सायकलवरून ठाण्याहून माटुंग्याला आल्याचे सांगितले. त्याला कणव आली. त्यांनी मला प्राचार्याकडे नेले. माझी कथा ऐकून त्यांनाही कणव आली व त्यांनी अर्धा तास ग्रेस देऊन परीक्षेला बसण्यास परवानगी दिली.
 मला परीक्षेत उत्तम मार्क मिळाले व व्हीजेटीआयमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. पुढे मला चार वर्षांची स्कॉलरशिप मिळाली व माझे शिक्षण पुरे होण्यास कोणतीच अडचण आली नाही.
 मागे वळून पाहताना मी जेव्हा विचार करतो की त्या वेळी मी जर सायकलने जाण्याचा त्वरित निर्णय घेतला नसता तर माझे व माझ्या भावाचे मी इंजिनीअर होण्याचे स्वप्न अपुरे राहिले असते. पुढे मला नोकरीत चांगल्या ऑफर्स मिळत गेल्या.  पुढे १९९५ मध्ये मी सीमेन्समधून लॉजिस्टिक मॅनेजर या पदावरून निवृत्त झालो. मात्र त्या दिवसाची आठवण अजूनही ताजी आहे.