25 September 2020

News Flash

ब्रुसेल्स ते मिलान

मीदेखील त्यांना वारंवार दिलासा देण्यासाठी सांगत होते की, काही तरी घडेल.. ट्रॅफिक आता सुटेल.. आपल्याकडे अजून दहा-पंधरा मिनिटं आहेत. अजूनही आपल्याला विमान मिळू शकेल. पण

| August 23, 2014 01:01 am

मीदेखील त्यांना वारंवार दिलासा देण्यासाठी सांगत होते की, काही तरी घडेल.. ट्रॅफिक आता सुटेल.. आपल्याकडे अजून दहा-पंधरा मिनिटं आहेत. अजूनही आपल्याला विमान मिळू शकेल. पण मनातून मात्र मी धास्तावलेलीच होते. काही तरी चमत्कार होईल आणि आम्ही एअरपोर्टला पोहोचू यासाठी देवाकडे मनातल्या मनात प्रार्थना करीत होते..
ही गोष्ट आहे गेल्या वर्षी घडलेली.. आमची युरोप टूर अगदी अखेरच्या टप्प्यावर आलेली होती. बेल्जियममधील ब्रसेल्स शहरातील ‘मेनेक्वीन पी’ या जगप्रसिद्ध पुतळ्याला जवळून निरखित मी, माझे पती आणि मुलगा क्षितिज आपापल्या कॅमेरा, मोबाइलने बराच वेळ फोटोसेशन करीत रेंगाळत राहिलो, कारण आमच्या ग्रुपची युरोपवारी उद्याला संपणार होती. बेल्जियम चॉकलेट्सची महक आणि स्वाद अनुभवत.. आता कुणाकुणाला कोणती चॉकलेट्स द्यायची हे आठवून आठवून बराच वेळ खरेदी चालली. संध्याकाळच्या सावल्या हळूहळू लांबत चाललेल्या आणि आमची मनेदेखील. चर्चच्या पायऱ्यांसमोर उभे राहून सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले आणि आमच्या टुर गाइड मिनी मॅडमनी सांगितलं की, उद्या सकाळी आपल्या टुरची सांगता होत आहे. सकाळी दहाच्या मुंबईसाठीच्या फ्लाइटने परतीचा प्रवास सुरू होणार आहे. एअरपोर्टवर वेळेत पोहोचण्यासाठी उद्या सकाळी सहा वाजता हॉटेलजवळून बस निघणार आहे. सगळ्यांनी वेळेवर बसमध्ये हजर राहिले तरच आपण वेळेत ब्रसेल्स एअरपोर्टवर पोहोचू. वस्तुत: आमच्या ग्रुपची सगळी मंडळी उद्या भारतात परतणार होती, परंतु आमचा मात्र पुढचा कार्यक्रम त्यापेक्षा वेगळा होता. आम्ही तिघे जण ब्रसेल्सहून इटलीमधील मिलान शहरासाठी फ्लाइट घेणार होतो. माझा भाचा अजिंक्य स्वित्र्झलडमध्ये डॉक्टरेटचा अभ्यास करतोय, तो आम्हाला मिलान येथे न्यायला येणार आणि त्याच्यासोबत आम्ही त्याच्या घरी ‘बेलिंझोना’ येथे चार दिवस राहून ‘स्वित्र्झलड’मध्ये राहण्याचं सुख अनुभवून आमची युरोपवारी सुफल संपूर्ण करावी असं ठरवून आलेले होतो.
रात्री आमची बस हॉटेलच्या दिशेने निघाली तेव्हा मिनी मॅडमच्या सूचनेचा अर्थ कळायला लागला, कारण अर्धा तास झाला.. एक तास झाला, हॉटेल यायचं नाव घेत नव्हतं, कारण ते ब्रेसेल्समध्ये नसून जवळच्या दुसऱ्या शहरात होतं. म्हणून उद्या एवढय़ा सकाळी निघावं लागणार होतं. हे सगळं लक्षात आल्यावर मला चिंता वाटू लागली. आमची फ्लाइट सकाळी ८ वाजून २० मिनिटांची म्हणजे आम्ही एअरपोर्टला उशिरात उशिरा सव्वासातला तरी रिपोर्ट करणे जरुरीचे आहे. तेव्हा इतक्या दूरवरून वेळेत पोहोचू ना? काही समस्या तर उद्भवणार नाही ना? तरी मनाचं समाधान करून घेतलं की सकाळी सहा वाजता निघालो तर वेळेत पोहोचणं अशक्य नाही. तरीही न राहवून शेवटी हॉटेलवर पोहचल्यावर मी रिसेप्शनिस्टकडे चौकशीदेखील केली की जरूर पडली तर स्वतंत्र टॅक्सी मिळेल का? परंतु तसा तो महागाचा सौदा होता आणि तशी फार काळजी करण्याची स्थिती नव्हती.
दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच सगळे हॉटेलच्या रिसेप्शन एरियामध्ये हजर होते. आम्हाला न्यायला येणारी बसच थोडी उशिरा आली. मिनी मॅडमला आमच्या फ्लाइटची कल्पना असल्यामुळे तिने सुचविल्याप्रमाणे आमचे सर्व लगेज, लगेज कम्पार्टमेंटमध्ये दरवाजाजवळच ठेवून दिले. बस आता निघणार इतक्यात ग्रुपमधल्या एका  कुटुंबाच्या लक्षात आले की त्यांचे पासपोर्ट सोबत नाहीत आणि बहुधा ते हॉटेलवरच राहिले असावेत. त्यांच्या पुढच्या धावपळीत आमच्या काळजीत भर टाकणारी जास्तीची पंधरा मिनिटं गेली. अखेर बस एकदाची निघाली.
मे अखेरीचे दिवस होते; परंतु युरोपात तेव्हा वातावरण मात्र पावसाळी, पण आल्हाददायक होते. पहाटे तर अधिकच छान वाटत असे. अशा प्रसन्न सकाळी बस हायवेला लागली, ट्रॅफिक तुरळक होते त्यामुळे बस नेहमीप्रमाणे छान स्पीडने चालली होती. आमचं मनात कॅल्क्युलेशन सुरू झालेले होते. अशाच वेगात जात राहिलो तर आपण सव्वासात वाजेपर्यंत एअरपोर्टवर पोहोचणारच. बस ‘ब्रसेल्स’च्या दिशेने छान वेगात चालली होती. आमचं एक लक्ष रस्त्यावर आणि एक लक्ष बसमधल्या डिजिटल घडय़ाळावर होतं. घडय़ाळात सात वाजत आले होते. हळूहळू लक्षात येत होतं की, रस्त्यावर गाडय़ांची संख्या वाढतेय आणि बसचा स्पीड कमी होत चाललाय. आतापर्यंत युरोपात बसने इतका प्रवास केला, परंतु अशा तऱ्हेचं मंदावलेलं ट्रॅफिक कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं. समोर रस्त्यावर गाडय़ांच्या वाढत चाललेल्या रांगा आता अगदी हळूहळू सरकताना दिसत होत्या आणि समोरचं घडय़ाळ मात्र आता सव्वासातच्या पुढे धावत होतं. मी यांच्याकडे पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली होती.
ज्या वेळेस आपण एअरपोर्टला पोहोचायला हवं होतं ती वेळ होऊनही गेलीय आणि आपण अजूनही रस्त्यातच आहोत. इथून एअरपोर्ट कितीसा दूर आहे याचा काहीही अंदाज लागत नव्हता. इतक्यात अजिंक्यचा फोन आला की, मी आता घरून निघालोय आणि मिलानच्या मालपेन्सा एअरपोर्टवर मी दहा वाजेपर्यंत पोहोचतोय, तिथे आपण भेटू. अजिंक्यच्या आवाजात उत्साहात जाणवत होता. कारण गेले वर्षभर आम्ही त्याच्या घरी यावं यासाठी तो आग्रह करीत होता. त्याला फोनवर उत्तर देणाऱ्या यजमानांच्या आवाजात मात्र काळजीचा सूर होता. त्यांनी अजिंक्यला सांगितलं की, आम्ही आता एअरपोर्टला असायला हवे होतो; परंतु हायवेवरच्या ट्रॅफिक जाममुळे अजून रस्त्यातच आहोत आणि ट्रॅफिक फारच स्लो मूव्हिंग आहे आणि आम्हाला तर आता काळजी वाटायला लागलीय की, अशी परिस्थिती काही काळ राहिली तर आम्ही कदाचित विमान सुटेपर्यंतदेखील एअरपोर्टवर पोहोचू की नाही. समोरच्या घडय़ाळाचा काटा आता साडेसातच्या पुढे सरकत असताना आम्ही हताशपणे पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. आमची ही परिस्थिती ऐकून अजिंक्यही हबकून गेला, तरीही फोनवर वारंवार सांगत होता की, ‘तुम्ही पॅनिक होऊ नका, जे, जसं होईल ते मला कळवा. अगदी विमान चुकलं तरी घाबरू नका.’ आपण त्यातून मार्ग काढू त्याने फोन ठेवला. मला माहिती आहे की, अजिंक्यला विमान चुकण्यापेक्षा त्यांच्या बी. पी. ची काळजी वाटत होती. त्यासाठी मीदेखील त्यांना वारंवार दिलासा देण्यासाठी सांगत होते की, काही तरी घडेल.. ट्रॅफिक आता सुटेल.. आपल्याकडे अजून दहा-पंधरा मिनिटं आहेत. अजूनही आपल्याला विमान मिळू शकेल. पण मनातून मात्र मी धास्तावलेलीच होते. काही तरी चमत्कार होईल आणि आम्ही एअरपोर्टला पोहोचू यासाठी देवाकडे मनातल्या मनात प्रार्थना करीत होते. पुढच्या काही क्षणात आमच्यासाठी जणू चमत्कार व्हावा तसा ट्रॅफिकचा वेग हळूहळू वाढतोय, असं लक्षात यायला लागले, पण अजून किती वेळ? असे विचार डोक्यात घोळत असताना बसने अलगद राइट टर्न घेतला आणि समोर ब्रसेल्स एअरपोर्टचा पार्किंग एरिया दिसला. आम्ही दोघं ताडकन उठून उभे राहिलो. मिनी मॅडमचा निरोप घेताना तिने आवर्जून सांगितलं की, तुम्ही तुमच्या बॅगा घेऊन पळा. बस पुढे जाऊन थांबली, तेव्हा आठ वाजायला पाच मिनिटं होती. बसमधून बाहेर पडलो, बॅगा ओढल्या आणि आम्ही तिघे लिफ्टच्या दिशेने पळत सुटलो. सगळ्यांना बाय बाय करताना धड मागे वळूनही पाहता आलं नाही. डिपार्चर एरिया दुसऱ्या मजल्यावर होता. मुलाने पाहिलं तर काऊंटर नं. २९ तोही उजवीकडे पाच विंग पलीकडे होता. पळत पळत काऊंटरसमोर आलो. आमच्या पुढे एक वयस्क जोडपं होतं. मी दुरूनच सांगितलं की, आम्ही मिलानला जाणार आहोत. काऊंटरवरच्या मुलीने त्या वयस्क जोडप्याला विनंती केली आणि आम्हाला पुढे बोलाविलं. आमच्या बॅगा स्वीकारून बोर्डिग पास इश्यू केले त्या क्षणी मनावरचा ताण उतरून गेला. खूप हलकं वाटायला लागलं. अगदी फ्लाइट चुकण्याच्या संकटातून आपण खरोखर वाचलोय हा आनंद मनात वागवीत सिक्युरिटी चेकसाठी पळालो. एअरपोर्टवर विमान जवळच उभं होतं. स्टाफने दाखविलेल्या मार्गाने आम्ही विमानाकडे निघालो आणि आमच्या मागे तो मार्ग त्यांनी बंद केला. आम्हीच शेवटचे प्रवासी होतो ना. विमानात जागेवर बसलो, डोळे मिटून घेतले आणि क्षणात अनेक प्रश्न मनात दाटून आले. जर आपलं विमान चुकलं असतं तर.. किती कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं त्याची कल्पनाही नकोशी वाटत होती. अजिंक्यची आठवण आली. आता विमानात असल्यामुळे फोनवर त्याच्याशी बोलून संकट टळल्याची खबर देता येत नव्हती. आपण मिलानला भेटल्यावर तो कसा आनंदित होईल याची कल्पना करून आम्ही मनोमन सुखावत होतो. ब्रसेल्स ते मिलान हा आमचा विमान प्रवास आजपर्यंतच्या इतर विमान प्रवासापेक्षा विलक्षण सुंदर झाला. आमची उल्हसित मनं आणि विमानाच्या खिडकीतून दिसणारं बर्फाच्छादित आल्प्सचं विहंगम दृश्य सारं काही अजूनही मन:पटलावर तसंच ताजं आहे आणि आयुष्यभर राहील यात शंकाच नाही.    ल्ल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 1:01 am

Web Title: brussels to milan by flights
Next Stories
1 टोकियो स्टोरी – मुंबई स्टोरी
2 हिपॅटायटिस ‘सी’
3 ‘दिव्य दृष्टी’
Just Now!
X