19 February 2020

News Flash

नात्यांची उकल : आनंदाची बकेट लिस्ट

आपापलं आयुष्य जगत असताना मला वैयक्तिकरीत्या त्यात काय काय करायचं आहे, याचा थोडक्यात आढावा

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

‘बकेट- लिस्ट’ असणं, ती पूर्ण करणं किंवा इतर महत्त्वाकांक्षा बाळगणं, त्या पूर्ण करणं चुकीचं आहे का? नक्कीच नाही. ते सगळं ठरवता येणं उत्तमच. ध्येय असणं, महत्त्वाकांक्षा असणं, हेसुद्धा योग्यच. परंतु त्याच्या मागे डोळे बंद करून, सगळ्या संवेदना संपवून, नुसतंच धावत राहणं यावर मात्र नक्कीच विचार झाला पाहिजे. आपण हे करताना त्याचा इतरांवर काय परिणाम होतोय हेसुद्धा पाहिलं पाहिजे. त्यापेक्षा आनंदाचीच ‘बकेट-लिस्ट’ केली तर?

‘‘तुझं काम झालं का? काम झालं की नक्की फोन कर. आम्ही तुला भेटायला आलोय. काम संपवायची घाई करू नकोस, आम्ही थांबतोय.’’ प्रचंड कामात बुडालेल्या दिवसाच्या शेवटी, खास वेळ काढून भेटायला येणाऱ्या स्नेह्य़ांचं कोंडाळं बघितलं की, त्या दिवसाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जातो. गप्पा-टप्पा करत घालवलेली दहाच मिनिटं पुष्कळ ऊर्जा देऊन जातात. त्यातही एक गोष्ट मनात घर करून राहते ती म्हणजे, केवळ आपल्यासाठी वाट वाकडी करून, आपापली दिवसाची घडी बदलत, त्या काही क्षणांच्या भेटीसाठी म्हणून जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न. अशा प्रयत्नांना तितकाच उत्तम प्रतिसाद नाही आला तरच नवल.

आपण सगळेच एकमेकांसोबत जगताना सवयीने आयुष्य पुढे ढकलत राहतो आणि या अशा कित्येक छोटय़ा छोटय़ा प्रसंगांत दडलेल्या महत्त्वाच्या आनंदाला मुकत राहतो किंवा तो आनंद आहे, तो देता येईल-घेता येईल हेही विसरत जातो.

याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आनंदाच्या बदललेल्या किंवा बदलत जाणाऱ्या परिभाषा. त्यातही मोठमोठय़ा, आकर्षक, चकचकीत बाबीत भरून राहिलेला आनंद शोधण्यासाठी आपली चाललेली धडपड आणि तो कसाही करून मिळाला किंवा मिळवला की मग पडणारा एक यक्षप्रश्न,

‘‘नेमकं काय वाटतंय या क्षणी?’’

कारण खूप आनंद होतोय हे म्हणावं तर बहुतांश वेळा केवळ ‘ती’ विशिष्ट गोष्ट घडली, पदरात पडली किंवा मिळवली, यानंतर येणारी स्वाभाविक भावना असते ती म्हणजे, ‘चला, झालं बुवा हे..’ थोडक्यात सुस्कारा सोडून हायसं वाटणं किंवा आपल्या मोठाल्या यादीतील ‘त्या’ गोष्टीसमोर ‘झालं’ अशी एक खूण. त्या प्रसंगात ती एक खूण तेवढी मनात रुजून राहते आणि उरलेली यादी अर्थात ‘बकेट-लिस्ट’ डोळ्यांसमोर नाचत राहते.

काही उदाहरणं डोळ्यांसमोर येतात.

* बराच काळ मातृ-पितृसुखाला मुकलेल्या व्यक्ती, जोडपी. त्यांना ज्या क्षणी हे लक्षात येतं की आता आपल्याला मूल होणार आहे, तेव्हा त्यांना वाटतं ते आश्चर्य आणि नंतर ‘झालं एकदाचं’ ही भावना. म्हणूनच अशी जोडपी जेव्हा सांगतात की, ‘डॉक्टर, मूल राहिल्यानंतर खूप आनंद होईल असं वाटलेलं. पण आता चार महिने झाले तरीही, ‘तसं’ काहीच वाटत नाहीये. तेव्हा ही प्रतिक्रिया खूपच बोलकी असते.

* एका प्रथितयश व्यावसायिकाची समस्या, ‘डॉक्टर माझ्याकडे सगळं आहे. तीन-चार घरं, परवा नवीन ‘ड्रीम-कार’ घेतली. परंतु मला त्यातही आनंद होतच नाही.

* विशीतली महाविद्यालयीन तरुणी-मला कळतच नाही काय झालंय. पण मला एकंदरीत बधिर झाल्यासारखं वाटतं. म्हणजे महाविद्यालय चांगलंय, खूप मित्र-मत्रिणी आहेत, आम्ही प्रत्येक शनिवारी-रविवारी खूप मजा करतो. पण मला वाटतं मला कशातच ‘आनंद’ होत नाही, मिळत नाही.

* सत्तरीचे आजोबा-नातवंडं, पतवंडं आहेत. पण तरीही सतत उदास वाटतं. आता असं वाटतं की बास. पुढे कशाला जगायचं?

ही सगळीच वेगवेगळ्या टप्प्यातली सगळं असून ‘आनंद’ नसण्याची बोलकी उदाहरणं. पण मग तो हरवला कुठे? किंवा आपण त्याला विसरून गेलो का? विसरलो असू तर कसं?

आता थोडंसं मागे जाऊ या. म्हणजे आपल्या शाळकरी वयात. अर्थात, अशा शाळा जिथे मुलं आणि शाळा, शिक्षक यांचंच एक नातं असायचं. त्या वयात, एखादा मित्र-मैत्रीण आजारी असेल आणि त्याच्या-तिच्या घरी अचानक धडकून, त्याला-तिला आज शाळेत काय घडलं हे सांगताना दोघांनाही कोण आनंद होत असे. शाळेतल्या अभ्यासाची वही ठेवताना आपण फार मोठी कामगिरी करतोय याचं समाधानही असे. असाच आनंद, शाळेतल्या आवडत्या शिक्षकांच्या तासाला, नुसतं त्यांना बघून होई. शेजारच्या दादाने त्याच्या नवीन सायकलवर एक फेरी मारू दिली याचाही. आज आईने डब्यात पोळी-भाजी ऐवजी मोदक दिले म्हणूनही. आपल्या मित्र-मत्रिणीला विशिष्ट विषयात, खेळात बक्षीस मिळालं म्हणून जोरजोरात टाळ्या वाजवतानाही तो आनंद ओसंडून वाहत जाई. किंवा आपलं भावंड बरेच दिवस आत्या-मामाकडे गेल्यानंतर त्याच्या अचानक आलेल्या पत्राचा तर फारच आनंद. आजोबांनी त्यांच्याकडचं पेन दिलं म्हणून, आजीने पानातली खिचडी आठवणीने वाटीत काढून दिली म्हणून, अचानक आलेल्या पावसात भिजायला मिळालं म्हणून; अशा कितीतरी गोष्टी..

या सगळ्या गोष्टी आठवल्या की, एक बाब लक्षात येते, ती म्हणजे बहुतांश वेळा या खूप काही मनाशी खूणगाठ बांधून न केलेल्या, सहजतेने घडणाऱ्या किंवा अगदीच अनपेक्षित नसल्या तरीही कित्येक वेळा अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी असतात.

आपलं गोळीबंद, आखीव-रेखीव आयुष्य जगत असताना, या छोटय़ा, संपूर्णपणे अजिबातच कृत्रिम नसलेल्या कित्येक बाबी आपण नकळत फाफटपसारा, अनावश्यक म्हणून वगळायला सुरुवात करतो आणि तिथेच आपला आनंद कुठे तरी लांबच लांब पळून जायला सुरुवात होते. यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे, जर वैयक्तिकरीत्या आपणच आनंदी नसू तर आपल्या सभोवतालचं वातावरण साहजिकच बेचव झाल्यासारखं होतं. पर्यायाने ‘कुठेच आनंद नाही’ अशी भावना तीव्र व्हायला लागते. त्यातही एखादं आनंदी व्यक्तिमत्त्व समोर आलं, की त्याच्या सहवासात, त्याच्या मागे एकच विचार, ‘याच्या आनंदाचं नेमकं गमक काय? कधी कधी त्याविषयी वाटणारी असूया मग त्या व्यक्तिमत्त्वातली, त्याच्या आयुष्यातली उणी-दुणी काढण्यात समाधान मानते. तिथेही सारं ठरवूनच. पर्यायाने आपण नकळत एका आनंदी नसणाऱ्या समूहाचा, समाजाचा घटक होऊन जातो. यात आपल्या आजुबाजूस असणारी नाती तरी कशी आनंदी राहतील? तीही मरगळून माना टाकल्यासारखी होतात.

याच्यावरचं उत्तर म्हणजे हे सगळं पुनरुज्जीवित करणं. त्यासाठी खूप छोटय़ा, सोप्या बाबींची गरज असते. पण त्या जाणीवपूर्वक करण्याचीसुद्धा. आता तुम्ही म्हणाल की, अरेच्चा, मगाशी आपण ‘सहजतेने घडतात म्हणून आनंददायी’ असं काही प्रसंगांना, बाबींना म्हणत होतो, परंतु आता जाणीवपूर्वक कशासाठी?

बरोबर! याचं उत्तर असं की, जे आपण हरवून बसलोय ते परत मिळवून, आपल्या आयुष्यात, नात्यात सहज प्रवाही होण्यापूर्वी त्याच्यावर जाणीवपूर्वक काम करणं गरजेचंच असतं. वर्षांनुवर्ष जोडीदार म्हणून सोबत राहताना कित्येकदा आपल्या जोडीदाराला आपण आनंद देतोय का हेच आपण विसरतो. इथे ऐहिक सुखे, सर्व प्रकारचं सोयीस्कर आयुष्य हा भाग वेगळा. तीच गोष्ट कित्येक वर्ष सोबत असणारे पालक-मुले यांच्यात किंवा स्नेह्य़ांबाबत. यात आपण स्वत:देखील आनंद घेतोय का हेसुद्धा महत्त्वाचंच. ज्या सोप्या गोष्टी करता येतील त्याची काही उदाहरणं –

* बाहेर पडत असताना ओळखीचे, शेजारचे असे कोणीही दिसले तर त्यांना थांबून ‘तुम्हाला कुठे सोडू का?’ विचारून, आग्रहाने तसे करता येईल. दरम्यान काही गप्पा होतील आणि बऱ्याच दिवसांत न घडलेला संवाद घडून येईल.

* शाळेतील, महाविद्यालयातील शिक्षक किंवा मार्गदर्शक, ठरलेल्या व्यक्ती, यांना जाऊन भेटता येईल. तिथेही त्यांच्याशी बोलताना आठवणींना उजाळा मिळेलच पण काही तरी नवीनसुद्धा शिकता येईल.

* वयस्क लोकांच्या ठरलेल्या, कदाचित कंटाळवाण्या आयुष्यात, त्यांना एखादे खूप आवडीचे पुस्तक देऊन किंवा त्यांना जवळच्या वाटणाऱ्या विषयांवर सहज म्हणून गप्पा मारता येतील, त्यांच्यासोबत त्यांना हव्या असणाऱ्या स्थळांना भेट देता येईल. जसे की त्यांचे गाव किंवा विशिष्ट जागा. तिथे त्या खुलून बोलत असताना ऐकणं आणि पाहणं हा एक अनुभवच.

* खूप दिवसांत न भेटलेल्या स्नेह्य़ांना बोलवून आपण सगळेच मेळावे घेतो, पण त्याहीपेक्षा, ‘तुझं बरं चाललंय ना?’ असं अध्ये-मध्ये विचारून बोलता, भेटता आलं तर?

* मुला-मुलींसाठी एखाद दिवशी न ठरवता सुट्टी घेऊन त्यांचं नेमकं काय चाललंय हे बघता येईल.

* कायम व्यग्र असलेल्या जोडीदारासोबतही असाच एखादा दिवस केवळ त्याच्यासोबत राहून घालवला तर त्यातूनही जवळीक निर्माण होईल.

* विकत घेतलेल्या महागडय़ा भेटवस्तूंपेक्षा, पाच-सात ओळींची हस्तलिखित चिठ्ठी, स्वत: बनवलेली छोटीच गोष्ट किंवा आठवणीने दुरुस्त केलेली, मोडकळीत पडलेली एखादी महत्त्वाची गोष्ट, यातून आपल्या आजुबाजूच्या कित्येकांना आनंद देता येईल.

* आपल्या चाललेल्या आयुष्यात सहभागी करून घेणं, त्याविषयी जेवढय़ास तेवढं न सांगता भरपूर मोकळेपणाने बोलून इतरांनाही त्याचा नकळत भाग बनवणं हेसुद्धा करता येईल. याचा खास उपयोग दोन पिढय़ांतलं अंतर सांधण्यासाठी नक्कीच होतो. म्हणूनच ‘आजीला काय कळणार?’ असा अजिबातच विचार न करता नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारी, अखंड बडबडणारी नातवंडं वयस्कांना स्वत:च्या मुलांपेक्षा जवळची वाटतात.’

* जोडीदाराला आवडतं म्हणून निटनेटकं ठेवलेलं घर किंवा एखाद्या दिवशी त्याच्या-तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन कॉफी घेत घालवलेला तासभर वेळ किंवा आवडत्या झाडाचं मुद्दाम आणून लावलेलं रोपटं, हेसुद्धा करता येईल. रोजच्याच आयुष्यात, नीट निरीक्षण केलं तर अशा किती तरी छोटय़ा गोष्टी सहज दिसतील. अर्थात, हे करताना त्या इतरांवर लादू नयेत. यातून मला माझ्या आयुष्यात काय हवंय किंवा माझी ‘बकेट-लिस्ट’ काय यासोबतच इतरांचं काय, याकडेही डोळसपणे पाहता येईल.

ही ‘बकेट-लिस्ट’ नेमकी काय असते?

आपापलं आयुष्य जगत असताना मला वैयक्तिकरीत्या त्यात काय काय करायचं आहे, याचा थोडक्यात आढावा. पाश्चात्त्य देशांतून आलेली ही संकल्पना खरे तर ‘मरण्याआधी तुम्हाला काय मिळवायचे आहे, काय करायचे आहे याची यादी.’ असे सांगते. त्याला आपल्याकडेही इतकं जास्त महत्त्व येण्याचं कारण म्हणजे ‘‘आपलं आयुष्य हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी सर्वार्थाने जितके ‘जास्त’ जगू तितके उत्तम!’’ हा मुळाशी असलेला आणि फोफावत जाणारा विचार. त्यातूनच मग सगळं काही मिळवणं, ‘सगळेच अनुभव मिळाले पाहिजेत.’ या विचाराने झपाटणं किंवा ‘सगळ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत.’ हे एकमेव ब्रीद समोर धरून चालत राहणं हे दिसतं. त्यातून जगताना येणारा ताण कित्येक पटींनी वाढतो. आपणच स्वत:ला घालून दिलेल्या निकषांमुळे ‘यादी’ प्रत्येक दिवशी बदलत राहते आणि आपण त्यातल्या गोष्टींपुढे खुणा करत धावत राहतो. तिथे शांतपणे, संयमाने विचार करत एक वैचारिक विश्रांती गरजेची आहे किंवा वळण गरजेचं आहे हेसुद्धा आपण विसरून जातो. या धावण्यात सुटून जातो तो ‘आनंद.’

पण मग अशी ‘बकेट- लिस्ट’ असणं, ती पूर्ण करणं किंवा इतर महत्त्वाकांक्षा बाळगणं, त्या पूर्ण करणं चुकीचं आहे का? नक्कीच नाही. ते सगळं ठरवता येणं उत्तमच. ध्येय असणं, महत्त्वाकांक्षा असणं, हेसुद्धा योग्यच. परंतु त्याच्या मागे डोळे बंद करून, सगळ्या संवेदना संपवून, नुसतंच धावत राहणं यावर मात्र नक्कीच विचार झाला पाहिजे. आपण हे करताना त्याचा इतरांवर काय परिणाम होतोय हेसुद्धा पाहिलं पाहिजे. त्यापेक्षा आनंदाचीच ‘बकेट-लिस्ट’ केली तर? नाही तर ‘आनंद’ विकत मिळेल का, अशी परिस्थिती निर्माण होईल.

आता विचार करून बघू या, साधारण महिनाभराच्या कालावधीत मी असा ‘आनंद’ स्वत:ला आणि इतर कोणाला दिला का?

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on September 7, 2019 12:03 am

Web Title: bucket list of happiness relationships abn 97
Next Stories
1 आभाळमाया : गझलेतलं ‘स्थिरयमक’
2 सगुण ते निर्गुण
3 आधी चितारू तुज मोरया.
Just Now!
X