मंजुला नायर

varsha100vd@gmail.com

इंटरनेटवरची दादागिरी वा बुलिंग फारच गंभीर रूप घेऊ लागली आहे. तीनमधील एक मूल त्याचा बळी ठरतो आहे. आपलं स्वत:चं मूल नेहमीच बळी पडणाऱ्यांच्या भूमिकेत नसून ते अशा प्रकारचा गुन्हादेखील करू शकतं हे त्यांच्या पालकांना काही केल्या कधी पटतच नाही. त्यामुळे इतर अनेक मुलांच्या वाटय़ाला अपमान, मनस्ताप, नैराश्य येतं. म्हणूनच आपली मुलं ज्या ‘व्हच्र्युअल’ जगतात राहतात, त्या आभासी जगताचे नियम पालकांनी आणि शिक्षकांनी समजावून घेणं आता जरुरीचं झालेलं आहे. मुलाचं सुरक्षित ऑन आणि ऑफलाइन जगणं तुमच्याच सजग पालकपणात आहे.

भारतामध्ये दर तीन मुलांपैकी एकाला इंटरनेटवरच्या दादागिरीला सामोरं जावं लागतं, असं नुकतंच एका संशोधनात आढळून आलेलं आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात ही दादागिरी चालत असते. अगदी ८-९ वर्षांची लहान मुलंसुद्धा यात गुंतलेली दिसतात. म्हणजेच मुलं स्वतंत्रपणे आपल्या किंवा पालकांच्या स्मार्ट उपकरणांवरून इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा वापर करू लागण्याच्या काळापासूनच हे घडायला सुरुवात होत असते. अशा दादागिरीला ‘बुलिंग’ ही तांत्रिक संज्ञा असली तरी याला सामान्यत: रॅगिंग असंही म्हटलं जातं. असं रॅगिंग जेव्हा ऑनलाइन जगतात घडतं तेव्हा त्याला ‘सायबर-बुलिंग’  म्हणतात.

काही काळापूर्वी ‘मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन’नं जगातल्या २५ देशांमध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. हे सर्वेक्षण अशा ऑनलाइन दादागिरीचं प्रमाण किती आहे, याबद्दल समजून घेण्यासाठी करण्यात आलेलं होतं. त्यात चीन आणि सिंगापूरखालोखाल तिसऱ्या स्थानावर भारत असल्याची माहिती समोर आली आहे. आणखी एका सर्वेक्षणात, ज्यात ८-१७ वर्षांच्या ७,६०० मुलांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यातही असेच निष्कर्ष आढळून आले. ‘इंटरनेटवरची दादागिरी नेमकं कशाला म्हणायचं याबाबत वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये, इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या लोकांचीही मतं वेगवेगळी दिसून येतात. शिवाय, दादागिरीसाठीची ‘सायबर-बुलिंग’ ही संज्ञा जगभरात सगळीकडेच मान्य केली जाते असंही नाही.’

खरं तर आपण सगळेच लहानाचे मोठे होत असताना म्हणजे ऑफलाइन जगतातसुद्धा भांडणं आणि वर्गामधलं आपलं स्थान मजबूत असावं यासाठी चालू असणाऱ्या चढाओढींना सामोरे गेलेलो असतोच. खेळाच्या मदानावर केली जाणारी ढकलाढकली असो किंवा वर्गात चिडवलं जाणं असो, आपल्यापैकी बहुतेकांना याचा अनुभव कधी ना कधी आलेला असतो. ही काही फारशी मोठी गोष्ट नाही, असंच आपल्याला वाटत असतं. मात्र जेव्हा ही गोष्ट ऑनलाइन जगतात घडते, तेव्हा तिचा डिजिटल रूपातला पुरावा कायमस्वरूपी टिकून राहतो.

डिजिटल जगतामध्ये सतत नवनव्या वेबसाइट्स, अ‍ॅप्स आणि उपकरणं उदयाला येत असतात. लहान आणि किशोरवयीन मुलं नियमितपणे अशा गोष्टी वापरतात. त्यांच्या बाबतीत नकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यताही असतेच. या वयोगटातली मुलं गोपनीय पद्धतीनं चालणाऱ्या ‘चॅट रूम’मध्ये असणं सर्रास दिसून येते. अनेकदा एखाद्या नकारात्मक मनोवृत्तीच्या गटातही ती सहभागी असलेली दिसतात. ऑफलाइन जगतातल्या दादागिरीचं पर्यवसान पुढं ऑनलाइन जगतातल्या दादागिरीमध्ये झाल्याचं आपल्याला अनेकदा दिसून येतं. कधीकधी याउलटही घडत असतंच म्हणा, पण काही असलं तरी मुलांचं ऑनलाइन वर्तन आणि ऑफलाइन वर्तन यामध्ये हमखास कुठला तरी दुवा सापडतोच.

सायबर दादागिरीची व्याख्या करायची झाली तर ती ‘इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा छळ करणं, बदनामी करणं, अपमान करणं, तिला त्रास देणं, तिची चेष्टा करणं, टिंगल करणं, तिला लाज वाटेल असं किंवा धमकावणारे संदेश पाठवणं,’ अशी करता येईल. अशा दादागिरीची सुरुवात करणारी व्यक्ती ही त्या मुलाच्याच समाजगटातली असते. सहसा दादागिरी करणाऱ्या मुलाचं त्या समाजगटातलं स्थान वरचं असतं. हे केवळ ओळखीच्याच नव्हे, तर अनोळखी व्यक्तींबाबतही दिसून येतं.

सायबर दादागिरीचे प्रकार

सायबर दादागिरीचे अनेक प्रकार असतात आणि त्यामागची वेगवेगळी कारणं असतात; पण एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास देण्याचा किंवा धमकावण्याचा सगळ्यात अधिक प्रमाणात आढळणारा मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचं ‘फेक प्रोफाइल’ तयार करणं किंवा तिचं अकाऊंट हॅक करणं. या मार्गाचा वापर करून तुलनेनं दुबळ्या मुलांवर गुंड मुलं सत्ता गाजवत असतात. दुसऱ्यांचा छळ करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यांना त्रास देण्यासाठी मागावर राहणं किंवा त्यांचे फोटो ‘मॉर्फ’ करून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोचवणं आणि त्यायोगे एखाद्या व्यक्तीच्या मनात दहशत निर्माण करणं. (या साऱ्या गोष्टी आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिलेल्याच आहेत.)

दादागिरीचा आणखी एक प्रकार म्हणजे आपल्या गटातल्या एखाद्या मुलाला किंवा काही जणांना बहिष्कृत करणं. टगी मुलं मुद्दामच इतरांना स्वत: स्थापन केलेल्या गटातून वगळतात. अशा रीतीनं वगळल्या गेलेल्या मुलाच्या भावना आपल्याला वाळीत टाकल्याची भावना तयार होते व त्याचं मानसिक खच्चीकरण होतं. मग या गटात आपल्याला घेतलं जावं याकरिता ते मूल काय वाट्टेल ते करायला तयार होतं. गटामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या मुलानं केलेल्या खटाटोपामुळं आणखीनच नव्या गुंतागुंतीच्या परिस्थिती निर्माण होतात. यामध्ये स्वत:ला इजा करून घेणं, हिंसाचार, स्टंटबाजी, वयाशी सुसंगत नसणाऱ्या मागण्या करणं यांसारख्या गोष्टी या सत्तास्पर्धेतल्या रस्सीखेचीचा भाग असतात.

आपल्या मित्रमत्रिणींनी स्वत:ला गटात सामील करून घेणं, त्यांनी आपल्याला स्वीकारणं ही कुठल्याही मुलासाठी अत्यंत मोलाची गोष्ट असते. एकीकडे घरी पालक आपल्या मुलाला शाळेमध्ये सगळ्यांशी प्रेमानं वागायला, हिंसेचा वापर न करायला आणि सहानुभूतीनं वागायला शिकवत असतात. दुसरीकडं मात्र मुलाच्या मनात आपल्या मित्रमत्रिणींसोबत वागताना वेगळंच मानसिक द्वंद्व सुरू असतं. घरी जे शिकवलं जात असतं त्याच्या बरोबर उलटं इथं घडत असतं. आपल्या अवतीभवतीच्या मित्रमत्रिणींच्या प्रभावामुळं मुलांना मोठय़ा प्रमाणावर तणावाला आणि आव्हानांना सामोरं जावं लागतं.

‘व्हॉटसअ‍ॅप’ किंवा ‘इन्स्टाग्राम’सारख्या समाजमाध्यमांचा वापर करून केल्या जाणाऱ्या ‘ग्रुप चॅट’मध्ये मुलं अत्यंत भयावह पद्धतीनं पोस्ट किंवा मेसेजेस लिहीत असतात. त्यांतली भाषा अत्यंत शिवराळ असते, शिवाय आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती तशी मुद्दामच वापरलेली असते. एकदा मुलांच्या एका गटानं एका गुप्त चॅट ग्रुपमध्ये आपल्याच वर्गातल्या अरुणला सामील करून घेतलं होतं. ही सारी मुलं १२ वर्षांची होती. सगळ्यांनी अरुणची टिंगल करणं, त्याच्याबद्दलच्या ‘मिम्स’ तयार करणं आणि अश्लील स्वरूपाच्या अफवा पसरवणं सुरू केलं. इतकंच नव्हे, तर त्याचं नावही एका मुलीसोबत घ्यायला सुरुवात झाली. आता आपण नेमकं काय करावं किंवा कुणाची मदत घ्यावी हे अरुणला कळेना. अशा परिस्थितीत एखाद्या मुलानं जर प्रौढ व्यक्तींना याबद्दल सांगितलं, तर त्या मुलाला त्याच्या मित्रमत्रिणींच्या गटात अत्यंत दुबळा आणि लाचार समजलं जातं. त्यामुळं अशा छळाला सामोरं जाव्या लागणाऱ्या मुलाला हा लढा स्वत:च्या बळावर एकटय़ानंच द्यावा लागतो. अरुणच्या बाबतीत तर ऑनलाइन चॅटमधला हा छळ पुढंपुढं वर्गातल्या प्रत्यक्ष रॅगिंगमध्ये रूपांतरित होत गेला. त्याला आणि त्याचं नाव जिच्यासोबत जोडलं गेलं होतं, त्या मुलीची वर्गातही चेष्टा करायला सुरुवात झाली. अखेर अरुणची सहनशक्ती संपली. त्यानं असा छळ करणाऱ्या मुलांपैकी एकावर पेनानं हल्ला केला. या हल्ल्यात त्या मुलाचा डोळा थोडक्यात वाचला. शिक्षकांनी अरुणची चांगलीच खरडपट्टी काढली. तो एक हिंसक, दुर्वर्तन करणारा मुलगा आहे, असा शिक्का लगेच त्यावर मारण्यात आला. शाळेनं त्याच्या पालकांना बोलावून घेतलं. त्या वेळी झालेल्या चर्चेच्या वेळी अरुण ढसढसा रडू लागला. तेव्हा कुठं त्याच्याबाबतीत घडलेला गुंडगिरीचा प्रकार उघडकीला आला.

अशाच प्रकारे साराचाही तिच्या वर्गातल्या अन्य मुली छळ करत असत. साराचं एकंदर दिसणं आणि खास करून तिच्या रंगावरून तिची टिंगल केली जात असे. (यालाच ‘बॉडी शेमिंग’ असंही म्हणतात.) हा प्रकार बराच काळ चाललेला होता. अखेर साराची सहनशक्ती संपली. तिनं स्वत:ला इजा करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं कोणाच्या तरी हे चटकन लक्षात आलं. तिच्यावर तातडीनं वैद्यकीय उपचार करण्यात आले. ज्या मुलींनी तिचा छळ केला होता त्यांच्या विरोधात शाळेनं कठोर पावलं उचलली. थोडक्यात, सांगायचं तर अशा प्रकारे दादागिरी करणं, हे आपल्या समाजात एकुणात जरी मान्य नसलं, तरी सायबरजगतात चालणाऱ्या गोष्टींबद्दल पालकांमध्ये एकूणच किती अज्ञान आहे, हे शिक्षणतज्ज्ञांना आणि संगणकतज्ज्ञांना वारंवार दिसून येत असतं.

वाचकहो, आमच्या दृष्टीनं असणारी चिंतेची बाब म्हणजे ‘पालकांना’ याबाबत वाटणारी घृणा, भीती, तिटकारा आणि अविश्वास! आपलं स्वत:चं मूल नेहमीच बळी पडणाऱ्यांच्या भूमिकेत नसून ते अशा प्रकारचा गुन्हादेखील करू शकतं हे त्यांना काही केल्या कधीच पटतच नाही. पालकांनी नेहमीच नव्या तंत्रज्ञानाबद्दल आणि संशोधनाबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. निदान त्यांनी अशी दादागिरी (इ४’’८्रल्लॠ) म्हणजे काय हे स्वत: जाणून घेतलं पाहिजे. आपल्या मुलांनादेखील तशा प्रकारचं वर्तन ओळखायला मदत केली पाहिजे.

दादागिरी कधी म्हणता येतं?

* तुमची वारंवार चेष्टा करत असणं आणि तुम्हाला वाईट वाटेल अशा प्रकारे वागणं.

* तुम्हाला त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं किंवा करणं.

* तुमची टिंगलटवाळी करणं. (शाब्दिक, फोटोंच्या माध्यमातून)

* तुम्हाला एखाद्या गटात सामील करून न घेणं किंवा अन्य व्यक्तींच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मक भावना तयार करणं.

* तुम्हाला इजा होईल अशा प्रकारचं कृत्य करणं (ऑनलाइन, प्रत्यक्ष जगतातील शारीरिक हिंसा, शाब्दिक किंवा भावनिक हिंसा)

दुसऱ्याला त्रास देण्याचे किंवा त्याचा छळ करण्याचे अनेक मार्ग असतात. शिवाय असा छळ करणारे लोक दर वेळी नवनव्या युक्त्या शोधूनच काढत असतात.

अशा वेळी काय करावं?

* पालकांनी हे तंत्रज्ञान शिकून घेणं.

* जे मूल दुसऱ्यांना त्रास देत आहे, त्याला मदतीची गरज आहे हे जाणून घेणं.

* सायबर जगतातील धोक्यांबद्दल मुलांशी खुलेपणानं बोलणं.

* जेव्हा मूल भीती व्यक्त करेल तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घेणं. त्याला बोलतं करावं.

* आपलं मूल आणि त्याचं वर्तन यांना तुमच्याइतकं दुसरं कुणीच चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत नाही. आपलं मूल तणावाखाली असण्याच्या लक्षणांकडे लक्ष द्या.

* मूल छळाला सामोरं जात असेल तर त्याला गप्प राहायला न सांगता अशा छळाविरुद्ध आवाज उठवायला सांगा.

* जर कोणी मुलाला ऑनलाइन जगतात त्रास देत असेल, तर त्या व्यक्तीला प्रतिसाद देऊ नका. त्या व्यक्तीला अनफ्रेंड किंवा ब्लॉक करा.

* आपलं मूल आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम होईल यासाठी त्याला प्रोत्साहन द्या.

* जेव्हा मूल अशा दुर्वर्तनाबद्दल शिक्षकांना किंवा पालकांना कल्पना देतात, तेव्हा ती शूरपणानं वागत आहेत याची त्यांना जाणीव करून द्या.

प्रिय पालकहो, आपल्या मुलांना ऑनलाइन जगतात सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या इंटरनेट वापरावर नियंत्रण व देखरेख ठेवणारी सॉफ्टवेअर वापरा. अर्थात अशा यंत्रणा मुलांना त्रासदायक ठरणार नाहीत याचीही जरूर काळजी घ्या. आपली मुलं ज्या ‘व्हर्च्युअल’ जगतात राहतात, त्या आभासी जगताचे नियम पालकांनी आणि शिक्षकांनी समजावून घेणं आता जरुरीचं झालेलं आहे. मुलं इंटरनेटवर किंवा समाजमाध्यमांवर काय काय करू शकतील, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक नि:शुल्क सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ती वापरून पालक अश्लील किंवा हिंसक आशय नियंत्रित करू शकतात, काही वेबसाइट्स ब्लॉक करू शकतात आणि आपली मुलं इंटरनेटवर नेमकं काय करत आहेत, हे पाहूदेखील शकतात. या प्रक्रियेमध्ये आपण माहिती कशी मिळवायची, हे समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

सध्याच्या आभासी जगतात प्रत्येक पालकानं आपल्या मुलाला साहाय्य करणं, त्याबद्दल जाणून घेणं आणि संवाद साधण्याची आज अभूतपूर्व गरज निर्माण झालेली आहे. तुम्ही स्वत:सुद्धा जर सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करत असाल, तर त्यातूनच तुमच्या मुलासमोर तुम्ही एक चांगला आदर्श ठेवत असता, हे ध्यानात घ्या.

आपल्या आजूबाजूच्या मुलांना जरूर सांगा – दादागिरी कधीच सहन करू नका. सुरक्षित वाटणं हा तुमचा हक्क आहे. तुम्हाला जर सुरक्षित वाटत नसेल, तर आपल्या पालकांना-शिक्षकांना त्याबद्दल सांगा आणि त्यांची मदत घ्या.

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी