एप्रिल २००२ला मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन दादरहून जळगावला आलो. शिक्षण क्षेत्राशी २१ वर्षे जोडलेला असल्यामुळे या क्षेत्राशी निगडितच काम करण्याची इच्छा होती. त्यानुसार एका शिक्षण संस्थेत शालेय विभागाचा ‘शिक्षण समन्वयक’ म्हणून काम करू लागलो. संस्थेचे अध्यक्ष  नंदकुमार बेंडाळे यांनी माझ्यावर विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षक प्रबोधनाचं काम सोपवलं. जबाबदारी मोठी होती मात्र आवडीचं काम असल्याने उत्साह संचारला. यासह छोटय़ा पण ‘अभ्यासू’ पुस्तिका लिहिण्याचाही त्यांनी प्रस्ताव मांडला.
 दररोज सकाळी ९ ते साडेबारा व दुपारी ३ ते ६ या वेळेत मी एकूण ६ शाळांमध्ये फिरतो व विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व ‘साहित्य’मय कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यासपीठावरून माझं म्हणणं मांडतो. एवढंच नव्हे तर जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ांत शिक्षण कार्यकर्ता म्हणून फिरतो, विविध विषयांवर चर्चा करून विद्यार्थ्यांशी संवाद साधतो.
दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांसह पालकांसमोर ‘घर आणि शाळा’ यांची सांगड घालू पाहणारी व दैनंदिन अभ्यासासंबंधी मार्गदर्शनपर ठरू पाहणारी व्याख्यानमाला चालवतो. ही माझ्या दृष्टीने खूपच आनंददायक बाब ठरतेय, नव्हे मला ते ‘सारे’ अनुभव समृद्ध करत आहेत.
गेल्या ३४ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात असल्याने मी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मराठी वर्तमानपत्रांमध्ये शिक्षणासह साहित्यविषयक लिहितोय.
 त्यामुळे वाचणं, लिहिणं हा आवडता छंद झाला आहे. या छंदामुळे जळगावसह महाराष्ट्रातील जवळपास ६० ते ७० साहित्यिकांशी माझी ‘मैत्री’ आहे. त्याद्वारे मी वाचलेल्या पुस्तकांची देखील ‘देवाणघेवाण’ करतोय. त्यात माझ्या राहत्या घरी जवळपास सहा लाख रुपये किमतीची (मराठी) गं्रथसंपदा असल्यामुळे ‘तरुण वाचक’ माझ्याशी सतत चर्चा करत वाचते, लिहिते होतायत, ही खूप समाधानाची बाब आहे. दररोज विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व ‘शिक्षण’ या सगळ्यांशी आनंददायक देवाणघेवाण होत असल्यामुळे माझी स्वेच्छानिवृत्ती खरंच एन्जॉय करतोय.