‘..प्लीज प्लीज, आत्ता ते विचार नकोत ना. आत्ता मला फक्त आणि फक्त एका चांगल्या झोपेची गरज आहे. देवा, प्लीज हे सारे विचार थांबू देत.’ असे म्हणत ती उशीजवळचा मोबाइल हातात घेते, वेळ पाहते. साडेतीन वाजलेत.. तिला झोप हवीय, पण विचार पिच्छाच सोडत नाहीएत..
रात्रीचे बारा वाजलेत. उद्या सकाळी लवकर उठायचंय, असं म्हणत गायत्री मोबाइलमधला गजर बदलते, तो सेव्ह करता क्षणीच त्यावर मेसेज झळकतो, This alarm has been set for 5 hours and 30 minutes from now. फक्त साडेपाच तास सुखाची झोप आपल्या हाताशी आहे. झालं! हा मेसेज पाहूनच तिची झोप उडते कदाचित. असं होणार अशी थोडी कल्पना म्हणा किंवा भीती मनात कुठे तरी असतेच. आजकाल झोपेने आपल्याशी काय वैर धरलंय कळत नाही असं म्हणत ती गादीवर अंग टेकते.
झोप यावी म्हणून करावे असे सारे उपाय आसपास असतात. उशाशी एखादे पुस्तक असते, बामची बाटली असते, डोळ्यावर ठेवण्यासाठी गुलाबपाण्याच्या पट्टय़ा असतात, मंद संगीत असते. जेमतेम पाच तास झोप मिळणार आहे तर आज पुस्तक हाती नको घ्यायला, असे म्हणत ती डोळे मिटू पाहाते. उद्याचा सारा दिनक्रम एकदा डोळ्यासमोर येतो आणि एकंदरच दिवस फार दगदगीचा असणार याची खात्री पटते. आता तरी झोपायला हवे म्हणत ती कूस बदलते.
 ‘‘आज सखीचा फोन आला होता. शेवटी ती आणि रोहन घटस्फोट घेणार आहेत. तिच्या बाजूने ती बरोबर असेल, नव्हे, आहेच पण आपण एकदा रोहनशीपण बोलायला हवे का? त्याच्याशी आपलं नातं थोडं जवळचं नाही का?’’
 पण क्षणभरच. तेच तेच विचार पुन्हा पुन्हा पिंगा घालू लागतात. ‘पण त्याने कुठे या घडामोडींची आपल्याला कल्पना दिली आहे अजून? मग आपण का त्याच्याशी आपणहून या विषयावर बोलायला जावे?’ ती कूस बदलून हे विचार झटकण्याचा प्रयत्न करून पाहाते. पण ते जमत नाहीच. मग थोडय़ा वेळाने उठते, किचनमध्ये जाऊन ग्लासभर पाणी पिते. पुन्हा येऊन आडवी होते.
 ‘पण खरं तर मुळात तो आपला मित्र आहे, सारं बालपण एकत्र घालवलेलं, घट्ट मत्री टिकून राहिली. तारुण्यात प्रवेश करतानाही कधी त्यात बदल झाला नाही. सखी तर मागून आली त्याची बायको म्हणून.’
‘एकदा दोघांशी एकत्रितपणे बोलावे का? मित्र म्हणून इतका हक्क आपल्याला नक्कीच आहे. आपण त्या दोघांच्या भल्याचाच विचार करतोय ना?..’
 ‘काय स्वत:ला देव समजतेस का गं? उठसूट इतरांचा विचार तुझ्या दृष्टिकोनातून करशील आणि तू ज्या गोष्टी तुला योग्य वाटतील त्यात त्यांचे भले होईल अशीही समजूत बाळगशील?’
 ..झाली सुरू स्वगताची मालिका. कुठून कुठे वाहात जातो आपण या विचारांत? आत्ता या क्षणी इतर
काही नाही तर शांत झोप गरजेची आहे. पण..
 ‘‘पण त्यांनी सर्व बाजूंनी विचार केलाय का? गंधारचा विचार केलाय का? दोघांच्या आई-वडिलांचा? एकमेकांचा?’’
 ‘‘लहान कुक्कुली बाळं आहेत का ती? गेली १५ वष्रे एकमेकांसोबत आहेत ना ती? लग्नाआधीची पाच आणि आता लग्नानंतरची दहा. त्यांच्या भूमिकेत दोघे बरोबरच असतील ना?’’
 ‘‘पण तरीही, हे असे नको घडायला! मग काय दोघांनी करावे काय? असेच मनाविरुद्ध एकमेकांसोबत आयुष्य काढावे का?’’
 सखी आज म्हणाली, ‘‘इतकी वष्रे याच आशेवर आहे मी, की केव्हातरी गोष्टी बदलतील, पण आता हळूहळू गोष्टी माझ्या हाताबाहेर जात चालल्या आहेत. आजकाल मी माझ्या रोहनवरच्या प्रेमाची खूप मोठी किंमत मोजते आहे असे मला वाटायला लागले आहे आणि फक्त या प्रेमापोटीच हे सारे इथेच कुठे तरी थांबावं असं मला वाटतंय. व्यसनांपायी रोहनमधला कलाकार विझत चालला आहे आणि मी काहीही करू शकत नाही हेच माझ्यासाठी इतके त्रासदायक आहे की त्यापायी हा एकमेकांपासून असे दुरावण्याचा त्रास तितका मोठा वाटणार नाही.’’
 ‘खरं आहे तिचं म्हणणं, पण तरीही घटस्फोट नको, दुसरा काही तरी मार्ग निघू देत. रोहन सहन नाही करू शकणार सखीचं अशा रीतीने त्याच्यापासून वेगळे होणे. मी ओळखते त्याला. कोलमडून पडेल बिचारा.’
 ‘हे त्याला इतके दिवस कळत नाहीये का? सखी इतके दिवस अनेक आघाडय़ांवर लढते आहे, रोहनचं असं दारूच्या आधीन होणे, त्यापायी त्यानं त्याचं गाणं थांबवणं, तिची नोकरी, त्याच्या आईचे आजारपण, गंधारची शाळा, अजून काय अपेक्षा करावी. प्रेमापायी काय काय तिने सोसावे अशी अपेक्षा आहे?’
.. ती पुन्हा उठते, दिवाणखान्यातील घडय़ाळावर नजर टाकते. रात्रीचे दोन वाजलेत अजून फक्त साडेतीन तास आपण झोपू शकतो. पुन्हा ती किचनमध्ये शिरते, बिस्किटांचा डबा उघडून त्यातली दोन हातात घेते, ग्लासभर पाण्याबरोबर ती घशाखाली उतरवते तेव्हा तिला आठवते की, आपण रात्री जेवलोच नाहीये. कामाचा ताण आणि या अशा जिवाला घोर लावणाऱ्या गोष्टी..
 आता कदाचित झोप लागेल, सकाळी फ्रेश वाटेल. बोलू या आठवडय़ात रोहनशी. उद्या आणि परवा एवढी महत्त्वाची मीटिंग पार पडू देत. प्रोजेक्टच्या दृष्टीने हे दोन दिवस फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्या करिअरसाठी पण! आज ऑफिसमधून निघताना सगळी उद्याच्या मीटिंगची तयारी करून निघालो म्हणून ठीक. मात्र आता झोप लागायला हवीच. ती आडवी होते, शेजारी तिचा नवरा सारंग गाढ झोपेत असतो. ही अजून टक्कजागीच आहे याचा त्याला थांगपत्ताच नसलेला. त्याचे बरे असते, अशी झोप येत नाही असे झाले की सरळ उठून टेरेसवर पोहोचायचे आणि एकामागून एक सिगारेटी ओढत राहायच्या.
 पुन्हा डोळे मिटले जातात, पुन्हा मनात विचारांचा धागा पोहोचतोच. सखीच्या जागी आपण असतो तर? उद्या इतर कोणत्या कारणांनी अशी वेळ आपल्यावर आली तर? कसे सामोरे जाणार आपण त्या टप्प्याला?
 ‘अगं, पण असे का होईल? इतके सारे छान तर चालले आहे ना? घर, गाडी, छानशी नोकरी, शिवाय कोणाची जबाबदारी नाही, कोणालाही हेवा वाटेल असे चालले आहे नं? अचानक नाही घडत गं अशा घटना.’
‘हो, ना! अचानक नाहीच घडत अशा गोष्टी, नाराजीचे धागे कधी तरी कुठे तरी खोलवर रुजलेले असतात, जेव्हा सारे ठीक असते तेव्हा ठीक असते, पण कदाचित एखादी क्षुल्लक वाटणारी घटना तळातल्या हा गाळ वर आणते आणि सारे काही बदलून जाते. सखी आणि रोहनही अगदी असेच हेवा वाटावा अशी एकमेकांत गुंतलेली जोडी होती ना काही काळापर्यंत. पण आज या वळणावर आहेतच ना उभे?’
 आठवतंय का शेवटचे आपण एकटे घरी कधी राहिलो होतो? पाच वर्षांपूर्वी जेव्हा सारंग प्रोजेक्टच्या कामासाठी सिंगापूरला थोडे दिवस होता, त्यानंतर कधीच नाही. म्हणजे? मनातल्या मनात आपण एकटे कसे राहणार आहोत याची कल्पना करायला लागलोय का? म्हणजे आपल्यातही असे घडू शकते?’
 ‘आपल्यातही धुसफूस होतेच कधी कधी. शब्दाने शब्द वाढतो, दोघे दुखावले जातो, काही दिवसांचा अबोला, त्यामुळे येणारी अस्वस्थ शांतता घरात, तसंही घरात तिसरे आहेच कोण बोलायला? गंधारसारखा एखादा आपल्या घरी असता तर? आयुष्य नक्कीच थोडे वेगळे असते. गेल्या नऊ वर्षांत किती वळणे आपल्या या नात्याने पण पाहिली. आपलाही प्रेमविवाहच होता ना. आज अनेकदा एका घरात राहूनही आपल्याला एकटे का वाटावे? हे खरे आहे की आपल्या मनाचे खेळ आहेत? कुठे आणि कसं गुंतावे या मनाने काही सांगताच येत नाही.’
 ‘कशा रीतीने घेऊ आपण उद्या अशी वेळ आलीच तर? चिडू, भांडू, वाद घालू, प्रेमाने त्याला समजावू की शांतपणे घटस्फोटाच्या कागदांवर ‘ठीक आहे, कुठे सही करू?’ असे विचारू? मध्ये एकदा विराजने दिलेला सल्ला आठवतो? नक्की काय समजायचं होतं मी?’
‘..प्लीज प्लीज, आत्ता ते विचार नकोत ना. आपण इतका टोकाचा विचार मुळात करतोच का आहोत? हे विचार थांबायला हवेत हे कळत असून का ते इतके अस्वस्थ करताहेत. उद्या अत्यंत  महत्त्वाची कामं असतानाही.. आत्ता मला फक्त आणि फक्त एका चांगल्या झोपेची गरज आहे. देवा, प्लीज हे सारे विचार थांबू देत. असे म्हणत ती उशीजवळचा मोबाइल हातात घेते, वेळ पाहते. साडेतीन वाजलेत. आपले दिवस-रात्र कसे घडय़ाळाशी जोडले गेलेत म्हणत पुन्हा एकदा झोपायचा प्रयत्न करते. साइड टेबलवरून बामची बाटली घेऊन बामचे एक बोट कपाळावर फिरवते,  व्यंकटेश स्तोत्र मनातल्या मनात म्हणू लागते. लहानपणी आईने लावलेली सवय अजून कायम आहे. ‘वेंकटेशो वासुदेवो प्रद्युम्नो मितविक्रम’ पासून सुरू  होऊन ‘रमानाथो महीभर्ता’पर्यंत पोचून गाडी थांबते आणि विचारचक्र पुन्हा कसे आणि कधी चालू होते ते तिलाही कळत नाही.
 ‘मध्यंतरी सारंग थोडा नाराज होता, ज्या वेळी त्याची सलग तीन वर्षांकरिता असलेली ऑनसाइटची संधी हुकली तेव्हा. एके संध्याकाळी विराजला म्हणजे त्याच्या परम मित्राला घेऊनच आला होता. विराजला भविष्य पाहता येते, आपला विश्वास नाही, पण सारंगचा आहे. बराच वेळ दोघेजण याच विषयावर बोलत राहिले. सोबत दारू होतीच. आपले काही काम नाही तिथे, असे समजून आपण किचनमधील कामे संपवत राहिलो. काही वेळाने विराज बर्फ घेण्याच्या निमित्ताने आत आला. म्हणाला, ‘‘गायत्री, मी आत्ता सारंगसोबत तुझीही पत्रिका पाहिली, मला माहीत आहे तुझा विश्वास नाही या गोष्टींवर. सारंगचा प्रश्न ऑनसाइट पोिस्टगचा, तो आज न उद्या सुटेलच, जाईलच तो त्याच्या इच्छित स्थळी, पण मला तुला एक सल्ला आवर्जून द्यायचा आहे तो म्हणजे ‘नातं जप’. हे ऐकून एक सेकंद हादरलोच आपण मनोमन. तितक्यात सारंग आत आला आणि विराजने विषय बदलला. मग आपणही तो विचार बाजूला सारला.’
 ‘असे का केले असेल त्याने? आपल्यालाच का? हाच सल्ला त्याने सारंगला दिला असेल का? आपला ज्योतिष, भविष्य पाहणे यावर विश्वास नाही हे माहीत असूनही मलाच का असे सांगितले असेल? सारंगच्या मनातही असे काही विचार येत असतील का? जे आपल्याला नाहीत पण विराजला माहीत आहेत आणि ज्यामुळे विराज असे म्हणाला असेल? कधी तरी सारंगशी बोलले पाहिजे यावर. पण आत्ता झोपले पाहिजे,’ म्हणत ती पुन्हा दुसऱ्या कुशीवर वळते.
 तिच्या या हालचालीने थोडी झोप चाळवलेल्या सारंगने तिला झोपेतच विचारले, ‘‘उद्या सकाळी लवकर जायचंय ना तुला? झोपली नाहीस का अजून?’’
 ‘‘नाही रे,  झोपच येत नाहीये.’’
 ‘‘येईल येईल, शांतपणे डोळे मीट बरं.’’ असे म्हणत झोपेतच एका हाताने तो तिला कपाळावर थोपटू लागतो.
 त्याचा हा आश्वासक स्पर्श जाणवताच, उगीचच इतके नको ते विचार मनात घोंघावत होते असं काही आपल्या बाबतीत होणार नाहीये, असा विचार मनात येऊन एक हलकेसे स्मित चेहऱ्यावर घेऊन ती निद्रेच्या अधीन केव्हा आणि कशी झाली ते तिलाही कळले नाही..

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….