News Flash

आहारवेद : कोबी

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते.

 

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी पासून रोपे तयार करून लागवड केली जाते. पांढरट-हिरवा व लाल जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत.

औषधी गुणधर्म

कोबी हा मधुर, वीर्यवर्धक, शीतल, दीपक, पाचक, वातप्रकोपक व कफनाशक आहे. कोबीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व हे घटक जास्त प्रमाणात आहेत तर ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्वही थोडय़ा प्रमाणात आहेत. त्याचबरोबर प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थही आहेत.

उपयोग

० कोबी मधुर गुणात्मक, शीत वीर्यात्मक, दीपक, पाचक असल्यामुळे एखाद्या प्रसूती झालेल्या मातेला दूध कमी येत असल्यास कोबीचा आहारात वापर करावा. यामुळे मातेचे दूध नक्की वाढते.

० आतडय़ांचा व आमांशयाचा आंत्रव्रण (अल्सर) टाळण्यासाठी कोबीचा रस सेवन करावा.

० कोबीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीरातील रक्तपेशीचे आरोग्य सुधारून रोग प्रतिकारशक्ती वाढते.

० वाढत्या वयातील मुलांची वाढ चांगली होऊन शक्ती प्राप्त होण्यासाठी कोबीचा आहारात समावेश करावा.

० कोबीत असलेल्या टार्टारिक अ‍ॅसिडमुळे जेवणातील साखर व पिष्टमय पदार्थ यांचे चरबीत होणारे रूपांतर थांबते व त्यामुळे वजन घटण्यास मदत होते. म्हणून स्थूल व्यक्तींनी बांधेसूद शरीर राहण्यासाठी रोज कच्चा कोबी १०० गॅम खावा.

० कोबीमध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) बरेच असल्याने आतडय़ांना उत्तेजना मिळून ती स्वच्छ होतात व मल पुढे सरकून शौचास साफ होते. म्हणून बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोबी किसून त्यावर थोडे मीठ, काळी मिरी व िलबू पिळून खाल्ल्यास पचन व्यवस्थित होऊन पोट साफ होते.

० त्वचेवर जखमा, पुरळ, इसब, अ‍ॅलर्जी झाली असेल तर कोबी बारीक वाटून लावल्यास हे आजार लवकर आटोक्यात येतात.

० त्वचा भाजून जखम झाली असल्यास कोबीच्या गड्डय़ांची बाहेरील मोठी पाने गरम पाण्याने स्वच्छ धुवून त्वचेवर मऊ कापडाने बांधावीत. यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

० सर्दी झाली असेल तर कच्चा कोबी किसून तो उकळल्या पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी. यामुळे सर्दीचा त्रास दूर होतो. रक्त किंवा आमवाताने सांध्यांना सूज आली असेल तर त्या ठिकाणी कोबीची पाने गरम करून बांधावीत. यामुळे दुखणाऱ्या सांध्याला आराम मिळतो.

० कोबी रस व गाजर रस एकत्र करून चिमूटभर िहग घालून सेवन केल्यास डोळ्यांच्या तक्रारी दूर होतात.

० कोबी हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. गर्भाशय सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे कोबीचे सेवन करावे. तर कोबीची भाजी आवडत नसेल तर भोजनानंतर कोबीचा अर्धा ग्लासभर रस थोडेसे िलबू पिळून घ्यावा. यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होऊन आरोग्य सुधारते.

० कोबीचे सूप रोज रात्री प्याल्यास त्वचा कांतिमय होऊन बांधा सुडौल राहतो.

सावधानता

कोबीला अनेक वेळा कीड लागलेली असते किंवा कीड लागू नये म्हणून जास्त प्रमाणात कीटकनाशकाचा वापर केलेला असतो. अशा वेळी गरम पाण्याने कोबी दोन-तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. तसेच कोबी निवडताना पोकळ गड्डय़ांपेक्षा कठीण, घट्ट गड्डा निवडावा. हा कठीण घट्ट गड्डा उत्कृष्ट प्रतीचा असतो.
– डॉ. शारदा महांडुळे (sharda.mahandule@gmail.com)

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 2:50 am

Web Title: cabbage 2
Next Stories
1 गच्चीवरची बाग : इतर उपयुक्त वरखते
2 चायोटे (चू चू)
3 पोटासाठी..  आन् पोरांसाठी..
Just Now!
X