आज सेबीने मोठय़ा कंपन्यांमध्ये एका तरी स्त्री संचालिकेची नेमणूक अनिवार्य केली आहे. मात्र यापूर्वीच अनेक कंपन्यांवर संचालकपदी असणाऱ्या अनेकींनी आपली निवड सार्थ ठरवली आहे. अशाच काही नेतृत्वांचा हा परिचय.

स्त्रीसबलीकरणाच्या हेतूने भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने भांडवली बाजारात नोंदलेल्या सर्व कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळात किमान एका महिलेची नियुक्ती करण्याची मुदत वाढवूनदेखील अनेक कंपन्यांना एका स्त्रीला संचालक मंडळात स्थान देणे जमले नव्हते. आपल्या ताळेबंदात बक्कळ रोकड बाळगणाऱ्या अनेक कंपन्यांना साधन संपत्ती हाताशी असूनही सुयोग्य व्यक्ती सापडू नये हे नक्कीच खेद वाटावा असे आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला ‘अपोलो’ हॉस्पिटलच्या पृथा रेड्डी, ‘टॅफे’च्या मल्लिका श्रीनिवासन, ‘कल्याणी फोर्ज’च्या रोहिणी गौरीशंकर कल्याणी अशा अनेक स्त्रिया त्या त्या कंपन्यांचे चेहरे आहेत.
मल्लिका श्रीनिवासन या ‘टाटा स्टील’ व ‘टाटा ग्लोबल ब्रेवरेजेस’च्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय उद्योग विश्वात मागील शतकात, नव्वदच्या दशकात असेच चित्र काही कंपन्यांच्या बाबतीत दिसत होते. तेथील स्त्री नेतृत्व ठळकपणे दिसत आहे. त्यातील काही निवडक स्त्री संचालिकांचा हा आढावा.
अगदी सुरुवातीपासून विचार करायला गेलं तर पद्मविभूषण सुमती मोरारजी यांचा उल्लेख करावा लागेल. मुंबईच्या मुख्य टपाल कार्यालयाच्या समोरून (छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून) बॅलार्ड इस्टेटकडे जाणाऱ्या रस्त्याला ‘नरोत्तम मोरारजी रस्ता’ या नावाने ओळखले जाते. भारतीय नौकानयन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे हेच ते नरोत्तम मोरारजी! ‘सिंदिया स्टीम अ‍ॅण्ड नेव्हिगेशन’ कंपनीचे पहिले जहाज ५ एप्रिल १९१९ रोजी इग्लंडला रवाना झाले. हीच भारतीय नौकानयन उद्योगाची मुहूर्तमेढ ठरली. या नरोत्तम मोरारजींच्या स्नुषा सुमती मोरारजी या यांच्या सासऱ्याने स्थापन केलेल्या ‘सिंदिया स्टीम अ‍ॅण्ड नेव्हिगेशन’ कंपनीच्या संचालक होत्या. ही गोष्ट आहे १९२३ सालातली. बहुधा संचालक म्हणून नेमणूक झालेल्या त्या पहिल्या भारतीय स्त्री असाव्यात.
नरोत्तम मोरारजींचे एकुलते एक पुत्र शांतीकुमार यांच्या निधनानंतर १९४६ साली त्या कंपनीच्या अध्यक्ष बनल्या आणि १९९२ पर्यंत कंपनीच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून १९७१ मध्ये सरकारने ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नव्वदच्या दशकापासूनच वरिष्ठ पदांवर स्त्रियांच्या नेतृत्वाने आघाडी घ्यायला सुरुवात केली होती. पहिल्या आठवतात त्या तर्जनी वकील. या ‘एक्झीम बँके’च्या अध्यक्ष होत्या. निवृत्तीनंतर अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांवर त्यांनी काम केले आहे. इतर उद्योगांपेक्षा बँकिंग क्षेत्रात परिस्थिती अंमळ बरी म्हणावी लागेल. रंजना कुमार या ‘कॅनरा बँके’च्या अध्यक्ष होत्या. त्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष. आज देशातील सर्वात मोठय़ा बँकेच्या अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य आहेत. चंदा कोचर, शिखा शर्मा, विजयालक्ष्मी अय्यर हे भारतीय बँकिंग उद्योगातील महत्त्वाच्या स्त्री संचालिका आहेत, त्यांच्या आधी ललिता गुप्ते या आयसीआयसीआय बँकेच्या उपव्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत पोहोचल्या होत्या, हेही अनेकांना माहीत असेल.
खासगी क्षेत्राचा विचार करता एक महत्त्वाचं नाव समोर येतं ते लीला पूनावाला यांचं. ‘अल्फा लाव्हल, टेट्रा पॅक’च्या माजी अध्यक्ष असलेल्या लीला पूनावाला याही कधी काळी ‘अल्फा लाव्हल’च्या चेहरा होत्या. आजही अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांवर त्या कार्यरत आहेत.
एक काळ असा होता जेव्हा सिमॉन टाटा व ‘लॅक्मे’ हे समीकरण होते. ‘लॅक्मे’या सौंदर्य प्रसाधनाच्या उत्पादनांच्या नाममुद्रेला टाटांनी जन्म दिला. रतन टाटा यांच्या सावत्र आई व नवल टाटांच्या द्वितीय पत्नी सिमॉन टाटा यांची ‘लॅक्मे’च्या संचालक मंडळावर १९६२ साली नेमणूक झाली. सुरुवातीच्या काळात ही कंपनी ‘टॉमको’ म्हणजे टाटा ऑइल मिल्सची एक उपकंपनी होती. पुढे ही कंपनी एक स्वतंत्र कंपनी म्हणून अस्तित्वात आली. सिमॉन टाटा या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व १९८२ मध्ये अध्यक्ष झाल्या. १९९६ मध्ये टाटा उद्योग समूहाने ‘लॅक्मे’ ही नाममुद्रा व उत्पादने तत्कालीन ‘हिंदुस्थान लिव्हर’ला विकण्याचा निर्णय घेईस्तोवर त्या ‘लॅक्मे’च्या अध्यक्ष होत्या. १९८९ मध्ये त्यांची नेमणूक टाटा इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर झाली. टाटा इंडस्ट्रीज ही ‘टायटन’, ‘टाटा ग्लोबल ब्रेवारेजेस’ अशा अनेक टाटा कंपन्यांची मातृसंस्था आहे. ‘लॅक्मे’ विकल्यानंतर टाटांनी ‘ट्रेंड लिमिटेड’ची स्थापना केली. किरकोळ व्यापारातील एक प्रतिष्ठित नाममुद्रा असणाऱ्या या ट्रेंडच्या त्या ३० ऑक्टोबर २००६ पर्यंत अध्यक्ष होत्या.
नंतरच्या काळातलं आणखी एक महत्त्वाचं नाव विनीता बाली. त्या व्यावसायिक संचालक आहेत. भारतातील खाद्यपेय बाजारपेठेतील ‘रसना’, ‘कॅडबरी’, ‘कोका-कोला’, ‘ब्रिटानिया’ यासारख्या यशस्वी नाममुद्रांच्या यशात विनीता बाली यांचे मोठे योगदान आहे.
अनेक कंपन्या स्त्री संचालकाची नेमणूक करणे टाळत असताना ‘इन्फोसिस’सारख्या कंपन्यांनी सक्ती नसतानादेखील संचालक मंडळात वेळोवेळी अनेक स्त्रियांना प्रतिनिधित्व दिले आहे. यातील एक ठळक नाव म्हणजे रमा बिजापूरकर. रमा बिजापूरकर हे मार्केट रिसर्च क्षेत्रातील एक व्यक्तिमत्त्व.
कंपनीत काम करत असताना अचानक जबाबदारी पडली आणि ती त्यांनी समर्थपणे निभावून नेली अशाही काहीजणी आहेत. त्यातलं एक नाव अनु आगा. त्या १९८५ मध्ये ‘थरमॅक्स’ दाखल झाल्या व पुढे मनुष्यबळ खात्याच्या प्रमुख झाल्या. मात्र पतीचे अकाली निधन झाल्यावर अनु आगा यांनी ‘थरमॅक्स’ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. कंपनीच्या अध्यक्ष आल्या. आर्थिक उदारीकरणानंतर उपलब्ध झालेल्या संधीचे त्यांनी सोने करीत ‘थरमॅक्स’ला एक अव्वल अभियांत्रिकी कंपनी म्हणून नावारूपाला आणले. भारतीय उद्योग महासंघाच्या एका समितीवर त्यांनी प्रतिनिधित्वही केले. आता त्यांच्या कन्या मेहेर पदमजी या कंपनीचा कारभार पाहात आहेत. सरकारने त्यांच्या कार्याची दखल म्हणून २०१० मध्ये त्यांना पद्मश्री देऊन गौरव केला. आज अशा अनेक जणी वरिष्ठपद भूषवताना दिसत आहेत.
खरं तर भारतीय उद्योग क्षेत्रात, बँकिंग क्षेत्रात अनेक वरिष्ठ पदांवर स्त्री नेतृत्व ठळकपणे दिसते आहे. त्यांनी आपापल्या कर्तृत्वाने त्या त्या कंपनीला महत्त्व पात्र करून दिलं आणि आपली निवड सार्थ ठरवली. आज ‘सेबी’ने महत्त्वाच्या कंपन्यांवर स्त्री संचालक असणे सक्तीचे केले असल्याने स्त्री सक्षमतेचा तो महत्त्वाचा पाया ठरणार आहे.
shreeyachebaba@gmail.com

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान