30 September 2020

News Flash

देशभक्तीचा वारसा

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या कॅप्टन भगिनी या पितामह दादाभाई नौरोजींच्या नाती. किशोर वयातच शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या.

| October 12, 2013 01:01 am

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या कॅप्टन भगिनी या पितामह दादाभाई नौरोजींच्या नाती. किशोर वयातच शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या. १८-२० वर्षे वयाच्या या तरुणीवर विशेषत: त्यातल्या पेरीनबेनवर गांधीजींचा प्रचंड प्रभाव पडला. स्वत:चे कपडे त्या स्वत: सूत काढून विणून घेत. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी हातात कपडय़ाची पिशवी भरून घरोघरी जाऊन खादीची विक्री केली. दुखरे सांधे बरोबर घेऊन खादी व हिंदी भाषेचा आमरण प्रचार केला. १९३० ते १९४२ पर्यंतच्या बारा वर्षांच्या काळात सक्तमजुरी ते स्थानबद्धतेपर्यंतची सर्व प्रकारची शिक्षा भोगली. पेरीनबेन यांनी आपल्या आजोबांकडून मिळालेला देशभक्तीचा वारसा अखेपर्यंत जपला. त्या पेरीन नौरोजी-कॅप्टन या तेजस्वी शलाकेविषयी..
भा रतीय स्वातंत्र्यलढय़ाचे पितामह ही उपाधी लाभलेले नेते दादाभाई नौरोजी. दादाभाई लंडनमधून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेले होते. हिंदुस्थानची बाजू ते समर्थपणे ब्रिटिश पार्लमेंटच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मांडीत. दादाभाईंचे एकुलते एक पुत्र डॉ. आरदेशर नौरोजी. डॉ. आरदेशर कच्छच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. १८९३मध्ये ते अकालीच कालवश झाले. आरदेशर यांना आठ मुले होती. त्यापैकी तीन मुलगे व पाच मुली. हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ातील कामगिरीमुळे ‘कॅप्टन भगिनी’ नावाने प्रसिद्धी पावलेल्या पेरीन, गोशी व खुर्शीद या तिघी डॉ. आरदेशर यांच्या कन्या परदेशात जाऊन उच्चविद्याविभूषित होऊन आल्या होत्या, त्यातील पेरीनबेनची ही कथा.
पेरीन कॅप्टन १२ ऑक्टोबर १८८८ रोजी कच्छमधल्या मांडवी बंदरात जन्मली. पेरीन पाच वर्षांची होते न् होते तोच डॉ. आरदेशर मृत्यू पावले. कच्छच्या राजाने श्रीमती आरदेशर यांना कच्छमधील भूजला बोलवून घेऊन आपल्या राजपुत्राचे शिक्षण त्यांच्याकडे सोपविले. आपल्या मुलाचे शिक्षण इंग्रजीत होणे अपिरहार्य असले तरी त्यांना मातृभाषा गुजरातीही चांगली बोलता व लिहिता, वाचता आली पाहिजे, यावर श्रीमती आरदेशर यांचा कटाक्ष होता त्यामुळे स्वत:च्या मुलासाठीही त्यांनी एक गुजराती शिक्षक नेमला होता.
पेरीनबेनचे प्राथमिक शिक्षण गुजरातीत झाल्यावर ८ व्या वर्षी त्यांना मुंबईच्या सेंट कॅथ्रेडल गर्ल्स हायस्कूलमध्ये घातले. १९०३ मध्ये मॅट्रिक झाल्यावर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एक वर्ष तिथे पुरे झाल्यावर आजोबा दादाभाईंच्या प्रेरणेने पॅरिसमधील सरबॉन विद्यापीठामध्ये तिने फ्रेंच भाषा व वाङ्मय याचा अभ्यास केला. पेरीनला शिक्षिका व्हायचे असल्यामुळे तोही अभ्यासक्रम पुरा केला. संगीताची आवड व सुंदर आवाजाची देणगी लाभलेल्या पेरीनने पॅरिसमधील सुप्रसिद्ध ऑपेरा गायिकेकडे संगीताचे शिक्षण घेतले. गाण्यातील शब्दांचे उच्चार ती फ्रेंच मातृभाषा असलेल्या व कसलेल्या गायिकेसारखे करी.
पॅरिसमध्ये असताना पेरीनबेन मॅडम भिकाजी कामा यांच्या फार जवळ आली. दादाभाईनी स्वत: मादाम कामांना पेरीनकडे जातीने लक्ष देण्यास विनंती केली होती. मादाम कामांमुळेच पेरीनबेन शामजी कृष्ण वर्मा, सरदारसिंग राणा, वीर सावरकर या इंग्लंडमधील हिंदी क्रांतिकारकांच्या संपर्कात आली. मादाम कामा यांच्या विनंतीवरून पॅरिसहून लंडनपर्यंतच्या प्रवासात वीर सावरकरांच्या बरोबर राहिली. सावरकरांना लंडनला उतरल्याबरोबर अटक होणार होती, म्हणून सावरकर उतरल्यावर थोडय़ा वेळाने तिला उतरण्याची सूचना होती. पेरीनबेनने कुमारी आरदेशर या नावाने सावरकरांची तुरुंगात भेट घेतली. नेत्यांचे निरोप सावरकरांना देऊन त्यावरची त्यांची उत्तरे मादाम कामा व त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे अनमोल काम पेरीनबेनने केले. सावरकरांना फ्रान्सला परत पाठवावे म्हणून मादाम कामांनी जो ब्रिटिश सरकारबरोबर वैधानिक लढा दिला, त्यात पेरीनबेनची मादामना मोठीच मदत झाली.
पेरीनबेन व गांधीजींची भेट १९०६ मध्ये प्रथम लंडनमध्ये झाली. त्या वेळी गांधीजी आपल्या दक्षिण आफ्रिकेतील कामासाठी पाठिंबा मिळविण्यासाठी लंडनला गेले होते. गांधीजी व नौरोजी भगिनींची ओळख झाल्यावर त्यांनी नौरोजी भगिनींना दक्षिण आफ्रिकेत येऊन आपल्याबरोबर काम करण्याची विनंती केली. १९१५ साली परत त्यांची भेट जहांगीर पेटीट यांच्या मुंबईच्या घरी झाली. या भेटीनंतर काही काळ गेल्यावर नौरोजी भगिनींनी गांधीजींबरोबर काम करण्याचे ठरविले. जीवनाच्या अंतापर्यंत त्या काँग्रेसनिष्ठ राहिल्या. वास्तविक पेरीनबेनवर मादाम कामा व  त्यांचे क्रांतिकारी सहकारी यांचा खूप मोठा प्रभाव होता. हिंदूुस्थानात हेच काम करण्याच्या हेतूने ती आली होती. क्रांतिकारकांच्या व पेरीनच्या गाठी-भेटी ब्रिटिश सरकारच्या नजरेतून सुटल्या नव्हता. यामुळे त्या तीनही बहिणींच्या पत्रव्यवहारावर नजर ठेवली जात होती, पण पेरीनबेनवर आता गांधीजींच्या विचारांचा इतका गाढा प्रभाव पडला होता की ती व तिच्या दोन्ही बहिणी आमूलाग्र बदलून गेल्या होत्या.
सर्व प्रकारच्या चळवळीत स्त्रियांना सहभागी करून घ्यावे, असा पेरीनबेन गांधीजींकडे आग्रह धरी. पुढे दांडी यात्रेच्या वेळी पेरीनबेन व सरोजनी नायडू यांनी गांधीजींशी सतत युक्तिवाद करून मिठाच्या सत्याग्रहात भाग घेण्याची परवानगी मिळविली. या परवानगीमुळे या सत्याग्रहापासून मोठय़ा संख्येने स्त्रिया चळवळीत सामील होत गेल्या. यानंतरही गांधीजींनी सुरू केलेल्या अनेक सत्याग्रहात पेरीनबेन अग्रेसर राहिली. हिंसेपेक्षा अहिंसा हाच स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग आहे हे तिला पटले. अहिंसा, खादी व स्वदेशीचे व्रत तिने घेतले.
    पेरीन, गोशी व खुर्शीद या तीन नौरोजी भगिनींचे विवाह कॅप्टन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांशी झाले. त्यामुळे स्वातंत्र्यलढय़ात त्या कॅप्टन भगिनी म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. गंमत म्हणजे पेरीन व गोशीबेनचे पती सॉलिसिटर व कायद्याचे पालन करणारे तर त्यांच्या बायका कायदेभंग करणाऱ्या होत्या. मात्र त्यांनी आपल्या बायकांना त्यांच्या चळवळीतील सहभागाबद्दल कधीही रोखले नाही हे आश्चर्यमिश्रित कौतुकच आहे. उलट गोशी बेनचा नवरा सॉलिसिटर माणेकजी यांनी गांधीजींना काही महत्त्वाची कागदपत्रे बनविण्यास मदतच केली. कॅप्टन बंधू मात्र स्वत: चळवळीपासून अलिप्त होते.
मुंबईत सरोजनी नायडू व पेरीनबेन यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘स्त्री सभेने’ जसे देणग्या मिळविण्याचे काम केले, तसेच खादी विक्रीचेही काम केले. बारीक सूत विणून घेणे, भरतकामासाठी रंगीत धागे तयार करून घेणे ही कामे पेरीनबेनने मिठूबेन पेटीटच्या साहाय्याने केली. त्यांनी स्थापन केलेल्या सभेचे महत्त्वाचे काम म्हणजे स्त्रियांना राष्ट्रवादाची शिकवण व स्वावलंबनाचे दिलेले धडे. नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा मांडलेला ठराव पास झाल्यावर राष्ट्रीय सभेने रचनात्मक कामाबरोबरच काही आंदोलनात्मक ठोस काम करावे, असे ठरविले. कॅप्टन भगिनींनी या कामी पुढाकार घेऊन ‘देश सेविका संघ’ नावाची एक स्वयंसेविका संघटना सुरू केली. या स्वयंसेविकांचा खादीची केशरी रंगाची साडी व पांढरा पोलका असा गणवेष होता. या संघात सर्व जाती-धर्माच्या मुली असल्यामुळे साडी पाचवारीच (त्या वेळी त्या साडीला गोल पातळ म्हणत. १९४२ नंतर ही साडी महाराष्ट्रात सर्रास वापरली जाऊ लागली) असावी असे ठरले. या संघाची मुंबईत होणारी संचलने पाहायला मुंबईकर गर्दी करीत. या संघाच्या सर्व स्वयंसेविका मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे गजाआड गेल्या.
पेरीनबेन मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘वॉर कौन्सिलची’ अध्यक्षपदी नेमली गेली. मुंबईतील बायकांचे सत्याग्रहासाठी संघटना कौशल्यपूर्ण रीतीने तिने केले. राष्ट्रीय स्त्री सभा व देश सेविका संघ यांच्या कामामुळे या दोन्हीही संस्थावर बंदी आली. या बंदीच्या विरोधात पेरीन कॅप्टनच्या नेतृत्वाखाली गणवेषधारी स्वयंसेविकांचा मोर्चा मुंबई चौपाटीवरून आझाद मैदानावर गेला. स्त्रियांची शक्ती देशहिताकरिता वापरण्याचा हा नवा मार्ग पेरीन कॅप्टन, गोशीबेन कॅप्टन व सोफियाखान या महिलांनी सामान्य महिलांना दाखविला. या सर्व कामगिरीमुळे पेरीनबेनना २ जुलै १९३० ला अटक होऊन तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. मुंबईतील पकडल्या जाऊन शिक्षा होणाऱ्या पेरीनबेन व लीलावतीबेन मुन्शी या पहिल्याच महिला. त्यांना पकडताना ब्रिटिश शासन म्हणाले, ‘या बाया पुरुषाहूनही फार भयानक आहेत. त्यांना बाहेर राहू देता कामा नये.’ पेरीनबेनचा कामाला हे सरकारी विधान एक पुरस्कारच होता. गांधीजींनी १९३१मध्ये सुटून आल्यावर पेरीनबेनला लिहिले, ‘दारूच्या व परदेशी मालाच्या दुकानावर निदर्शने करताना िहसा होत आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून हे सर्व ताबडतोब थांबेल असे पहा.’ पेरीनबेननेही अशी दक्षता घेण्याचे वचन गांधीजींना दिले व ते पाळलेही.
१९३० ते ३२ या काळात पेरीनबेनला तीन वेळा शिक्षा झाली. विजापूरच्या कारागृहात १ वर्षांची शिक्षा भोगत असता तिला संधीवात झाला व तो शरीरात कायमचे घर करून राहिला. अशाही परिस्थितीत तिने १९३३च्या व्यक्तिगत नोंदणी कायद्याविरुद्ध सत्याग्रहात भाग घेतला. त्यातही तिला शिक्षा झाली.
१९३५मध्ये हिंदी भाषेचा प्रचार व्हावा या हेतूने ‘हिंदी प्रचार सभेची’ स्थापना झाली होती. सर्व देशामध्ये देशाची म्हणून एकच राष्ट्रभाषा असावी असे मादाम कामांचेही मत होते. त्यांचा नारा ‘एक देश, एक भाषा, एक आशा’ असा होता. पेरीनबेन मादाम कामांबरोबर काम करत असल्यापासून तिच्या मनात घर करून राहिलेल्या या नाऱ्याला या सभेमुळे व्यासपीठ मिळाले. या सभेची ‘मानद सचिव’ म्हणून पेरीनबेनची नेमणूक झाली. पेरीनबेनने या सभेचे काम अतिशय उत्साहाने केले. १९४५ साली काही मूलभूत तत्त्वांवरून गांधीजींनी ‘हिंदी प्रचार सभे’चे नाव ‘हिंदुस्थानी प्रचार सभा’ केले. या सभेचे मुख्यालय वध्र्याला होते. पेरीनबेनने गांधीजींच्या सांगण्याप्रमाणे याही प्रचार सभेचे काम केले. या प्रचार सभेने हिंदूी ही राष्ट्रभाषा असावी व ती देवनागरी व उर्दू अशा दोन्हीही लिप्यांत लिहिली जावी, असे ठरविले. पेरीनबेनने हिंदुस्थानी प्रचार सभेचे काम आपल्या आयुष्याच्या अखेपर्यंत केले. १९३५ सालीच गिरगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष म्हणून पेरीनबेनची फेरनिवड झाली.
१९३० व १९३२ मध्ये स्त्री सभा व देशसेविका संघ या पेरीनबेनने स्थापन केलेल्या दोन्हीही संस्था बेकायदेशीर ठरवून बंद करण्यात आल्या. रचनात्मक कामात स्त्रियांना ओढण्यासाठी पेरीनबेन व गोशीबेन यांनी ‘गांधी सेवासंघ’ स्थापन केले. विशेषत: खादी व ग्रामोद्योग याला चालना देण्याचे काम या संघाने केले. आजपर्यंत गांधी सेवासंघाचे काम चालू आहे. ग्रँटरोड मुंबई येथील बाबा चौकात खादी व ग्रामोद्योगाच्या सर्व वस्तूंचे केंद्र आहे. दरवर्षी गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधी सेवा संघातर्फे प्रदर्शन व विक्री होते. हे प्रदर्शन मणिभवन गावदेवी येथे २ ते १० ऑक्टोबपर्यंत भरते. खादीच आहे, असा विश्वासही बसणार नाही, अशा सुंदर साडय़ा, चादरी व शर्टिग हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे व ते पेरीनबेनच्या नंतर आजही आपल्याला दिसते.
हिंदूुस्थानातच राहण्याचा निर्णय घेऊन पेरीनबेन १९१० साली स्वगृही मुंबईला परतल्या. ब्रिटिश सरकार जुलमी आहे व एतद्देशियांना ते तुच्छतेने वागवते, हा अनुभव प्रथमच त्यांना मायभूमीला परतल्यावर आला. आल्या आल्याच त्यांनी दक्षिण भारताचा प्रवासी व निरीक्षण दौरा काढला. मद्रासहून मुंबईला परत येताना पेरीनबेन व गोशीबेन पहिल्या वर्गाच्या डब्यात चढल्या. तिथे त्या डब्यात आधीच येऊन बसलेल्या पाच ब्रिटिश महिला होत्या. त्यांनी पेरीनबेन व गोशीबेन यांना डब्यातून उतरायला फर्मावले. दोघींनाही फ्रान्स अगर इंग्लंडमध्येही अशी वागणूक कधीच मिळाली नव्हती. दोघींनीही आपले पहिल्या वर्गाचे तिकीट आहे व आपण गाडीतून उतरण्याचा प्रश्नच नाही असे ठणकावल्यामुळे त्या चिडल्या. खाली उतरून त्यांनी स्टेशनमास्तरकडे तक्रार केली. पण दोघींच्याकडे तिकीट असल्यामुळे स्टेशनमास्तर त्यांना उतरवू शकला नाही. ब्रिटिश महिला काय ते समजल्या व नाइलाजाने त्यांनी कॅप्टन भगिनींबरोबर मुंबईपर्यंतचा प्रवास केला.
पेरीनबेन व त्याच्या बहिणी यांच्या राजकीय सहभागाकडे मागे वळून पाहिले की असे वाटते की, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या मुली! पित्याचे छत्र नव्हते. पितामह दादाभाई नौरोजीसारख्या आजोबांनी अलोट प्रेम देऊन वाढविलेल्या, किशोर असतानाच परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या. त्यांच्या अंगी असलेल्या इतर सुप्त गुणांना वाट करून देण्यासाठीही (बागकाम व संगीत) शिक्षण मिळालेल्या या १८-२० वर्षे वयाच्या तरुणीवर गांधीजींचा प्रभाव पडला. ऐषआरामाचे जीवन तारुण्यात सोडणे हे किती तरी कठीण काम पण त्यांनी ते स्वेच्छेने स्वीकारले. स्वत:चे कपडे स्वत: सूत काढून विणून घेतले व त्यातून आपली सौंदर्यदृष्टी जोपासली. खांद्यावर खादी टाकलेली, हातात कपडय़ाची पिशवी भरून घरोघरी जाऊन खादीची विक्री केली. आमरण खादी व हिंदी भाषेचा प्रचार दुखरे सांधे बरोबर घेऊन केला. १९३० ते १९४२ पर्यंतच्या बारा वर्षांच्या काळात सक्तमजुरी ते स्थानबद्धतेपर्यंतची सर्व प्रकारची शिक्षा भोगली. मुंबईत हिंदी भाषेतील संशोधनाकरिता हिंदुस्थानी प्रचार सभेला पाच लाख रुपयांची देणगी मिळावी, ही मागणी त्यांनी भारत सरकारकडे लावून धरली होती. त्यांच्या मृत्यूनंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी ती देणगी हिंदुस्थानी प्रचार सभेला मिळवून दिली.
पेरीनबेन यांनी आपल्या आजोबांकडून मिळालेला देशभक्तीचा वारसा अखेपर्यंत जपला. १७ फेब्रुवारी १९५८ रोजी त्यांनी मुंबईतच आपला देह ठेवला. पेरीनबेन व त्यांच्या बहिणी यांनी ऐहिक सुखावर लाथ मारून स्वातंत्र्यलढय़ात स्वत:ला झोकून दिले. पण आज त्यांच्या पूर्वजांच्या जन्मभूमीत व स्वत:च्या कर्मभूमीत त्यांचं नामोनिशाण राहिले नाही. त्यांच्या मागे नाव लावणारे कोणी राहिले नाही. म्हणूनच उभारलेल्या कार्याची व त्यागाची ओळख करून देण्यासाठी हा लेखप्रपंच. पेरीनबेनच्या मृत्यूनंतर आपले पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद म्हणाले, `A loss to constructive work & to those of us who had rather a close association with Bapu’s work the loss in severe.’
पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आपल्या शोकसंदेशात म्हणाले,
‘She was one of the bravest persons I have ever known. Indeed her devotion & courage gave unexpected strength to the women’s movement in Bombay and created wholesome respect for sincerity of our struggle in the hearts of our opponents’
दादाभाई नौरोजी किंवा कॅप्टन भगिनींच्या परिवारातील आज कोणीच स्वतंत्र भारताचे भाग्य उजळण्याच्या कामात मदत करण्यासाठी हयात नाहीत हे आपले खरोखरच दुर्दैव!    
gawankar.rohini@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2013 1:01 am

Web Title: captain bhagini perinben nauroji
टॅग Chaturang
Next Stories
1 भाषिक रुजवणं!
2 सिल्डेनाफिल? नको गाफील!
3 कधी संपलं हे सारं?
Just Now!
X