दिवाळी जवळ आली की प्रत्येक घरात उत्साह संचारतो. पण हा माहोल आलिप्तपणे स्वीकारणारा ‘डय़ूटी फर्स्ट’ म्हणत त्यातच आनंदाचे, सौख्याचे चार क्षण शोधणारा असाही वेगळय़ा करिअरमधल्या स्त्रियांचा एक वर्ग आहे. घरापासून, जिवलगांपासून दूर, समाजातील लोकांमध्ये, त्यांच्या सुखदु:खामध्येच आपला आनंद शोधणाऱ्या या काही जणी. कशी असते त्यांची दिवाळी?
‘‘पंधरा किलोमीटरचा त्या दिवशी रुट मार्च होता. तो करून एवढी थकले होते की, अंगातला युनिफॉर्म बदलण्याचेही त्राण उरले नव्हते. भयंकर भूक लागलेली. तसंच घामाने चिंब होऊन थंडगार पुरी-भाजीचं पॅक्ड डिनर अधाशासारखं आम्ही सगळे खात बसलेलो. एवढय़ात फायिरगचे आवाज येऊ लागले. सगळेच चपापलो. घास घशात अडकला. कारण आज आमच्या कॅम्पवर फायिरगचा दिवस नव्हता. मग लक्षात आलं हा तर फटाक्यांचा आवाज! सिव्हिल एरियातून येतोय! त्यावेळी लक्षात आलं, अरे आज दिवाळी आहे. मग मात्र आम्हाला सगळय़ांनाच हसू फुटलं. मी तेव्हा चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीत होते. तिथे आमच्याजवळ ना घडय़ाळ असतं ना कॅलेंडर! त्यामुळे आमच्यासाठी सगळे दिवस सारखे, पण त्यांतही एक वेगळीच मजा होती.’’
‘‘कमिशन झाल्यानंतरची माझी पहिली दिवाळी होती. लेहमधल्या ‘कारू’ या छोटय़ाशा गावांत! जेमतेम पन्नास माणसांचं हे गाव! दिवाळीत ऑफिसर्स आणि जवानांचा मिळून एकत्र ‘बडा खाना’ असतो. पण त्यासुमारास बरेचदा लेहचे रस्ते बंद असतात. मग या ‘बडय़ा खाना’च्या सामानाची लिस्ट दोन दिवस आधीच चंदिगडला रवाना होते. मग त्यात इतर सामानाबरोबर आम्ही आवर्जून फटाके लिहायचो आणि ‘बडा खाना’ नंतर सगळे मिळून खूप सारे फटाके उडवायचो. आम्हाला दिवाळीची खास सुट्टी नाही. ‘भाईदूज’ला सुट्टी असली तरी आम्ही करणार काय? कारण प्रोटोकोलप्रमाणे आम्ही सहकाऱ्यांबरोबर भाऊबीज नाही साजरी करू शकत. मला आठवते, माझी लग्नानंतची पहिली दिवाळी! मी ‘कारू’मध्ये होते. तिथे ४५०ची स्ट्रेंथ होती. आणि बेसवर फोनच्या अवघ्या दोन लँडलाइन्स! सगळय़ांनाच घरी बोलण्याची उत्सुकता! मी नवी नवरी! मला नवऱ्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या. पण सगळेच लागले ओरडायला. ‘मॅडम बहुत देर तक बात करती है।’  बहुत देर म्हणजे किती? जेमतेम दहा मिनिटं! त्याच्या पुढच्या दिवाळीत माझा नवरा काँगोत होता. तोही मिलिट्रीत आहे. मी बाळाबरोबर इथे होते. त्याच्या आठवणीने माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता. मी स्वत: दिवाळीचा संपूर्ण फराळ करून त्याला तो कुरियरने पाठवला. ते पॅकेट त्याला मिळालं, पण करंज्या खवट झालेल्या. चकली, लाडवांचा चुरा झालेला. तरी त्याने माझी समजूत काढली. अगं एवढय़ा लांब ऐन दिवाळीत तुझ्या हातचा फराळ मिळाला ना, खूप झालं! तर दिवाळीचा आनंद आम्ही असा शोधतो. छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून मजा येते.’’ मेजर कांचन कुलकर्णीची ही अनोखी दिवाळी!
   दिवाळी जवळ आली की प्रत्येक घरात उत्साह संचारतो. सगळीकडे फक्त आनंद, दिव्यांनी  लखलखणारा भोवताल आणि सोबतीला आपली जवळची माणसं! पण इतरांसाठीचा हा सगळा माहोल आलिप्तपणे स्वीकारणारा आणि त्यातच आनंदाचे, सौख्याचे चार क्षण शोधणारा असाही एक स्त्रियांचा-वेगळय़ा करिअरमधल्या स्त्रियांचा एक वर्ग आहे. कशी असते त्यांची दिवाळी? अशा अनेक जणींचा शोध घेताना दिवाळीला लाभलेला वास्तवाचा एक वेगळाच पदर अलवारपणे उलगडत गेला. मनाला अंतर्मुख करत गेला.
    पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर दिवाळीचा हलकाफुलका मूड पकडत दिवाळीतला कामाचा ताण विसरून छान गप्पा मारतात. ‘‘माझं सध्या पोिस्टग आहे तुळजापुरला. त्यामुळे मी तुळजापुरात, नवरा सांगलीत आणि मुलगा आईकडे. अशी आमची त्रिस्थळी अवस्था! त्यामुळे दिवाळीत मला नेहमीच प्रश्न पडतो की आपलं नेमकं घर कुठलं? लक्ष्मीपूजन नक्की करायचं कुठे? ते करायचं ठरवलं तरी सुट्टी मिळणार कशी? इथे लक्ष्मी पूजनाच्या रात्री सगळे जण जागरण करतात. घराची दारं रात्रभर उघडी असतात. ज्या घरात दार उघडं आणि घरभर प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी प्रवेश करते, असा लोकांचा पारंपरिक विश्वास! त्यासाठी आमचं पेट्रोिलग एकदम कडक असतं. तुळजापूर हे शक्तिपीठ आहे. इथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी गावात ‘भेंडोळे’ मिरवत नेतात. हा सगळा आगीशी खेळ असतो. त्यामुळे डोळय़ांत तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. अर्थात लोक सण साजरे करतात तेव्हा आम्ही रस्त्यावर! पेट्रोिलगला! खूपदा वाटतं, सगळय़ा बायका छान साडय़ा, दागिने घालतात आणि आपण मात्र युनिफॉर्ममध्ये!’’
‘‘गेल्या दिवाळीत मला नव्या ड्रेसची घडी मोडायची होती. वातावरणातला ताण थोडा कमी होताच मी घरी गेले. तो नवीन ड्रेस घातला. आई घरात होती. तिच्या पाया पडले, पुन्हा पटकन युनिफॉर्म चढवून डय़ूटीवर हजर! अशी माझी दहा मिनिटांची दिवाळी! खूपदा आम्ही गमतीने म्हणतो, आपण युनिफॉर्म तरी सिल्कचे घालू या दिवाळीला! आमचं कुटुंब मोठं! दिवाळीत सगळे नातलग एकत्र जमतात. पण आम्हाला सुट्टीच मिळत नसल्याने माझं न येणं  सगळय़ांनी गृहीत धरलंय.
 कोणी कितीही नाकारलं तरी स्त्रीसुलभ मृदुता, ऋजुता कुटुंबाची ओढ आमच्याही मनात असतेच. त्यामुळे खरोखर सगळीकडे दिव्यांचा लखलखाट असताना स्वत:चं घर मात्र अंधारात बुडालेलं पाहिलं आणि दार उघडून घरात शिरलं की फार एकटं एकटं वाटतं. पण तरीही डय़ूटी करताना दुसऱ्यासाठी जगण्याचं जे समाधान, जो आनंद मिळतो तो अनमोल आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने रुटीन धकाधकीच्या आयुष्यातून जेव्हा कुटुंबासाठी वेळ मिळतो तीच आमची दिवाळी आणि पोटभर आयतं जेवण मिळणं हाच आमचा दिवाळीचा फराळ!’’
 अशीच ‘डय़ूटी फर्स्ट’ची जबाबदारी पार पाडताना अनेकदा स्त्री असणंही विसरून जावं लागतं. ‘‘वडवली नाक्यावर केमिकलचा टँकर पलटी होऊन सर्वत्र धूर पसरलेला. सकाळपासूनच ट्रॅफिक जॅम होता.’’ पोलीस अधिकारी (ट्रॅफिक) सुषमा पाटील सांगतात. ‘‘पाऊस पडतच होता. सहा वेळा मी अंगावर ड्रेस वाळवला. जेवण नाही. बाथरूमला जाणं नाही. ट्रक, खाजगी गाडय़ांना मोठय़ा मुश्किलीने त्या जंक्शनमधून मी बाहेर काढत होते. दहा-बारा तासांनंतर ट्रॅफिक नीट मार्गी लागला, तेवढय़ात एक अनोळखी माणूस माझ्याजवळ आला. त्याने हात मिळवला ‘‘हॅप्पी दिवाली!’’ म्हटलं आणि एकदम लक्षात आलं, ‘अरे! आज भाऊबीज! आपले दोन्ही भाऊ केव्हाचे घरी येऊन वाट बघत बसले असतील. आपण तर दिवसभरात साधा वडापावसुद्धा खाल्लेला नाही. पण तरीही मनाला एक मोठं समाधान होतं. आज या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या शेकडो भावांना बहिणीपर्यंत पोहोचवायला आपण मदत केलीय! मग आपलेच दोन भाऊ महत्त्वाचे आहेत का?.. आपली संस्कृती म्हणून बारा-पंधरा तास डय़ूटी करून घरी गेल्यावर मी मुलासाठी दिवाळीचे चार पदार्थ बनवते. डबे भरून ठेवते, पण ते द्यायला मात्र मी कधीच घरी नसते याची खंत जरूर वाटते. कारण दिवाळीत मुलाच्या शाळेला सुट्टी असते, पण आम्ही मात्र डय़ूटीवर असतो. दिवाळीच्या दिवशी त्याला घरात एकटं ठेवून निघताना खूप वाईट वाटतं. खूपदा मनात येतं, संध्याकाळी घरी यावं कंदील लावावा. दारात रांगोळी काढावी. मैत्रिणींबरोबर मजा करावी. पण आमची दिवाळी कायम रस्त्यावर! पण ही खंत, विचार काही वेळच राहाते. मग पुन्हा वाटतं, आज आपल्या हाताखाली चार-पाच स्टाफ घेऊन आपण रस्त्यावर उभे असतो म्हणून चौकात शांतता नांदते. लोक लहान मुलांना घेऊन शॉपिंगला बाहेर पडलेले असतात. रस्ते लहान, खराब, पाìकगच्या गाडय़ांनी व्यापलेले! मग रस्ता मोकळा करून त्यांना दिवाळीच्या खरेदीचा, फिरण्याचा आनंद मिळवून द्यायचा हे किती छान आहे! बरेचदा दिवाळीत म्हातारीकोतारी मंडळी, लेकुरवाळय़ा आया रस्त्यावर रिक्षासाठी तासन्तास रखडत असतात. मग आपल्या वर्दीचा ‘रुबाब’ दाखवून रिक्षावाल्याला दम देऊन त्यांना रिक्षा मिळवून दिल्या की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कष्टाचं चीज झालं असं वाटतं. पाय दुखायचे थांबतात, अंगात उत्साह संचारतो. ऐन दिवाळीच्या छान नव्या साडीऐवजी युनिफॉर्म घालायला लागतो तेव्हा थोडी रुखरुख वाटते. पण त्यावेळी वाटतं, या युनिफॉर्ममुळेच तर आपल्याला ओळख मिळते. आर्थिक स्वातंत्र मिळतं. ट्रॅफिक ऑफिसर आश्विनीलाही फटाके उडवायला खूप आवडतात. पण दिवाळीत ते कधीच जमत नाही. पण ट्रॅफिक मोकळा करण्याचं काम करता फटाके उडवण्याचा सार्वजनिक ठिकाणी होणारा कार्यक्रम ती मनापासून एन्जॉय करते.
  अर्थात अशाही काही जागा आहेत जिथे दिवाळीच्या जल्लोषाचा स्पर्शही होत नाही. अशा ठिकाणी काम करणाऱ्यांचं काय? आकाशवाणी डय़ूटी ऑफिसर उमा दीक्षित सांगतात, ‘‘डय़ूटी आकाशवाणीतल्या बंदिस्त स्टुडिओत! तिथे आवाज आतबाहेर जात नाही. त्यामुळे निरव शांतता असते. त्यामुळे ना बाहेरच्या फटाक्यांचा आवाज येत ना लोकांचा उत्साह जाणवतो. धर्मनिरपेक्षतेचा प्रोटोकोल असल्याने धार्मिक वातावरण निर्मितीला परवानगी नाही. त्यामुळे ना कुठे कंदील, ना रांगोळी! ना फराळ! मला आठवतं, माझं नुकतंच लग्न झालं होतं. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सगळे उठण्यापूर्वी पहाटे चारला उठून साडी नेसून मी निघालेसुद्धा मॉर्निग डय़ूटीला! सासुबाईंना धक्काच बसला. म्हणाल्या, ‘‘हे काय, दिवाळीच्या दिवशी तू ऑफिसला चाललीस?’’ पण डय़ूटी ऑफिसरला शिफ्ट डय़ूटीज् सक्तीच्या असतात. तरीही आपण सरकारी कारभारातला एक महत्त्वाचा हिस्सा आहोत. सुट्टीच्या काळात-संपूर्ण आकाशवाणीची जबाबदारी ‘डय़ूटी ऑफिसर’ म्हणून आपल्यावर आहे. ही भावनाच एवढी मोठी असते की दिवाळीच्या माहोलमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता नाही आलं तरी तो कर्तव्यपूर्तीचा आनंद आपोआप मनात झिरपू लागतो.’’    
चित्रा आणि संगीता पाटील या कोळणी मायलेकीसुद्धा हा आनंद पुरेपूर उपभोगतात. ‘‘दीपावलीच्या सनाला सकाळी अडीच वाजता उठून उटणं लावूनशान आमी आंघोली करतो. आणि साडेतीनला डॉकला जायला घर सोडतो! दिवसभर म्हावरं इकून संध्याकाली घरी गेलं की फराल बनवितो. आमच्या कोलीवाडय़ात आजुबाजूला घरांत फराल देयाची पद्धत अजून हाय! लक्ष्मीपूजन आमचा मोठा सन! मासळी विकून झाली की आम्ही बसलेली जागा धुऊन टाकतो. फला धुतो. नारल आनी साखर, पेढे फल्यावर ठेऊन फल्याची आनी पेटीची पूजा करतो. इथली पोरं बर्फ आनतात. पानी भरून ठेवतात. त्यांना आम्ही फराल देतो. दिवाली देतो. पण खरं सांगू? आमची दिवाली गिऱ्हाईकावर! आमचं पोट हातावर! दिवालीत लोक फिरायला जातात. गावाला जातात. मग दिवालीत कवाकवा बोहनी बी होत नाही. मच्छी विकली गेली तरच सामान विकत घेऊन आमी पोरांसाठी फराल बनवतो. दिवाली बाकीच्या लोकांसाठी कंदीपण येवो. मासलीविक्री चांगली होईल तीच आमची दिवाली.’’
वर्षांतील तीनशे पासष्ट दिवस चालणारा व्यवसाय म्हणजे हॉटेल! मालवणमधील सुप्रसिद्ध हॉटेल चैतन्यच्या मालक सुरेखा वागळे त्यांच्या दिवाळीतील आठवणी जागवतात. ‘‘मालवणमध्ये पाडव्याच्या दिवशी पालखी असते. मोठी जत्रा असते. पूर्वी मालवणात पावभाजी, रगडापॅटीस, भेळ, शेवपुरीची दुकानं नव्हती. म्हणून आम्ही पाडव्याची पालखी जाईपर्यंत हे स्नॅक्स लोकांना खिलवायचो. एकदा काय झालं, मालवणमध्ये त्यावर्षी दिवाळीत खूप टुरिस्ट आले. माझं हॉटेल निवासी. ते पूर्ण भरलेलं होतं. पाडव्याच्या दिवशी ‘चैतन्य’मध्ये स्नॅक्स असतात. जेवण नसतं हे आम्ही त्यांना परोपरीनं समजावलं. पण ते ‘चैतन्य’मधल्या जेवणाचे सगळे भोक्ते! रात्री अकरापर्यंत लोक जेवणासाठी ताटकळत बसले. शेवटी पालखी गेली. अकरा वाजता आमचं स्नॅक्स काऊं टर बंद झालं. त्यानंतर खूप दमलेली असतानाही मी पुन्हा स्वयंपाकघरात घुसले. रात्री बारा वाजता सगळय़ांना स्पेशल जेवण करून वाढलं. खरं सांगायचं तर गेल्या त्रेपन्न वर्षांत बाहेरची दिवाळी मी कधी पाहिलीच नाही. कधी नवीन कपडेलत्ते घातले नाहीत. घरात दिवा नाही की दिवाळीचा फराळ नाही. अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा कशीबशी पूजा करून हॉटेलच्या किचनमध्ये घुसायचं. भाऊबीजेला तर गंमतच असते. हॉटेल आणि माझं माहेर जवळजवळ. त्यामुळे सगळय़ांची ओवाळणी झाली की वहिनी हॉटेलवर बोलवायला येते. ‘चल ये पटकन!’ की लगेच एप्रन बदलायचा. साडी तीच. किचनची! पटकन माहेरी जायचं. भावांना ओवाळायचं की हॉटेलवर परत! आजवर माहेरी जाऊन भावंडांबरोबर शांतपणे भाऊबीज केल्याचं मला आठवत नाही. अनेक वेळा ठरवूनही मुलांसाठी मी घरी कधी फराळ नाही करू शकले. हॉटेलमधल्या मुलांसाठी जो फराळ बनवते त्यातलाच घरी नेते. दिवाळीत बरेचसे कामगार रजेवर जातात. गावाला जातात. तरी एकही दिवस हॉटेल बंद नाही ठेवता येत. कारण सकाळ असो की रात्र, लोकांना जेवणाची वेळ झाली की जेवण लागतंच. अर्थात मला याची खंत नाही. जर मी हा व्यवसाय स्वीकारला आहे तर मग मला चारचौघांसारखं आयुष्य नाही मिळणार! काही रोजचे ग्राहक असतात त्यांना मुंबईत घर नसतं. त्यांना जेवणाबरोबर मी घरगुती फराळाचं पाकीट दिलं की त्यांच्या चेहऱ्यावर जी आपुलकीची भावना दिसते तो आनंद निराळाच! त्यामुळेच मला ऊर्जा मिळते, चैतन्य लाभतं.’’
डॉ. स्नेहलता देशमुख व्यवसायाने पेडीअ‍ॅट्रीक सर्जन. म्युनिसिपल हॉस्पिटलला काम करत असताना त्यांची क्वार्टर्स हॉस्पिटलच्या आवारात होती. त्यामुळे गंभीर आजारी असलेलं बाळ दाखल झालं की तात्काळ वॉर्डमध्ये धाव घ्यावी लागे. त्या सांगतात.‘‘तो धनत्रयोदशीचा दिवस होता. मी रांगोळी काढायला घेतली. ठिपके काढले. तेवढय़ात कॉल आला. एक दिवसाचं बाळ होतं. त्याची अन्ननलिका व श्वासनलिका जुळलेली होती. त्याचं ऑपरेशन करायचं होतं. क्षणभर मनात विचार आला रांगोळी पूर्ण करून जावं का? तेवढय़ात माझे यजमान दारात आले. त्यांना मी हा विचार सांगितला. ते पटकन म्हणाले, ‘‘तुझी कलाकुसर ऑपरेशन थिअटरमध्ये दाखव. ती खरी रांगोळी. मी पटकन उठले. हॉस्पिटलमध्ये गेले. ऑपरेशन तीन तास चाललं. तोवर जेवणाची वेळ टळून गेली. दिवाळीच्या दिवशीसुद्धा मी मुलांबरोबर नव्हते. पारंपरिक मानसिकतेमुळे घरात दिवासुद्धा लागला नाही, याची मनाला हुरहूर लागली. पण ज्या दिवशी ते मूल बरं होऊन घरी गेलं त्या दिवशी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि मला दिवाळीचा खरा अर्थ कळला. दिवाळीत मी मुलांना सांगायची, मोठय़ा आवाजाचे फटाके उडवू नका. तेव्हा ते फारसं मनावर घ्यायचे नाहीत, पण जेव्हा त्यांनी फटाक्यानं भाजलेलं मूल पाहिलं तेव्हापासून त्यांनी कधीही फटाक्यांचा हट्ट नाही केला. माझे वडील सायन हॉस्पिटलला सुपरिटेंडंट होते. दिवाळीत माझी आई आचारी बोलावून बुंदीचे लाडू-चिवडा करायची. नर्सेस क्वार्टर्समध्ये जाऊन तिथल्या नर्सेसना ते वाटायची. ती म्हणायची, त्या नर्सेस रुग्णांसाठी दिवसभर राबतात. त्यांना दिवाळीचा फराळ नको द्यायला? हेच आईचे संस्कार माझ्यावर झाले. त्यातूनच आपली आई आपल्याला हवीशी असताना बाळाला बरं करायला जाते हा विचार माझ्या मुलांमध्ये रुजला. ती समजूतदार झाली. मनात माणुसकीचा असा दिवा ठेवणं हीच माझ्या दृष्टीने खरी दिवाळी!’’
     थिअेटर नर्स सिस्टर कल्पना यांनाही अशा अनेक दिवाळय़ांची आठवण येते. ज्यावेळी त्या ऑपरेशन थिएटरमध्येच असायच्या. त्यांचीही दिवाळीची आठवण आहेच. ‘माहेरी दिवाळीपार्टी खूप आधीपासून ठरली होती. मी तिथे जाण्यासाठी नवीन साडी नेसले. आम्ही सगळे घरांतून बाहेर पडलो. कुलूप लावता लावता कॉल आला. बाई प्रसूतीसाठी आली होती. क्षणभर वाटलं, एवढा छान बेत ठरलाय. आत्ताच का ही बाई यावी? सगळय़ांना भेटण्याची खूप ओढ होती. पण डय़ूटी फर्स्ट. यजमान म्हणाले, ‘‘आधी तू तिथे जा. तिथे तुझी गरज आहे. मग सरळ युनिफॉर्म चढवला आणि एकदम मूड पालटला. प्रसूती झाली. एक जीव जन्माला आला. बाहेर येऊन बघते तर मोबाइलवर २१ मिसकॉल होते. सगळे माझी वाट बघत होते. तेवढय़ात त्या तरुणीची आई माझ्याजवळ आली. म्हणाली, ‘‘सॉरी सिस्टर, तुम्हाला आमच्यासाठी तातडीने यावं लागलं. सणाच्या दिवशीही  तुम्ही हसतमुखाने वावरता. काम करता हे बघून खूप बरं वाटलं.’’ त्यांचे शब्द ऐकले आणि मी भरून पावले. अर्थात आपले कुटुंबीयसुद्धा तितके समजूतदार हवेत. माझा मुलगा तर मी ऑपरेशनहून आपल्यावर त्रागा करण्याऐवजी उत्सुकतेने विचारतो, ‘ममी सिझर की नॉर्मल?’’
प्रदर्शन, फेस्टिवल शॉपी भरवण्यात अग्रणी असणाऱ्या उद्योजिका मीनल मोहाडीकर. त्या सांगतात, ‘‘प्रदर्शनात दिवाळीशी संबंधित उत्पादन मालाला खूपच उठाव असतो. त्यामुळे माझ्या सर्वच दिवाळय़ा घराबाहेर साजऱ्या होतात. मग मी म्हणते, आपण ज्या गावात आहोत तेच आपलं घर. तिथेच आपली दिवाळी! मग तिथेच कंदील लावायचे. रांगोळय़ा काढायच्या. कधी कधी दिवाळी संपता संपता आपल्या घरी परतावं तर घरात दिवासुद्धा लागलेला नसतो. घरात गोडधोड नसतं. दारात रांगोळी नसते. पण गेली दोन र्वष आमच्या उद्योगिनींनी दुबई, शारजात प्रदर्शनं भरवली आणि तिथल्या भारतीयांना यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, गरब्याच्या माध्यमातून एकत्र आणलं. तेव्हा अतिशय आनंदाने तिथले लोक म्हणाले, ‘‘आम्हाला पाल्र्यात, पुण्यात असल्यासारखं वाटलं! आता इतरांच्या आनंदात असा आनंद शोधणं हीच आमच्यासाठी खरीखुरी दिवाळी झालीय!’’
  अ‍ॅनेस्थेसिस्ट डॉ. संध्या बुवा यांचं कामही आपत्कालीन सेवेशी निगडित! त्या सांगतात, ‘‘दिवाळीचा पाडवा होता त्या दिवशी. घरात बरेच नातलग जमलेले. जेवणाची जोरदार तयारी चालू होती. अकराच्या सुमारास मोबाइल वाजला. नंबर पाहताच लक्षात आलं, आता निघावं लागणार! आता प्रसूतीचा क्षण कॅलेंडर बघून थोडाच येणार? बरं ही नैसर्गिक प्रक्रिया! ती थांबवू शकत नाही की लांबवू शकत नाही. शिवाय ऑपरेशन आटोपलं की निघालं असं नाही होत. रुग्ण पूर्ण नॉर्मल होईपर्यंत अ‍ॅनेस्थेसिस्टला थांबावंच लागतं. म्हणजे जवळजवळ तो पूर्ण दिवस गेलाच! पण सासुबाईंनी पुढची सगळी जबाबदारी स्वीकारली आणि मी मोकळ्या मनाने हॉस्पिटलला गेले. मला नेहमी वाटतं, की घरच्या मंडळींना आपल्यासाठी किती तडजोडी कराव्या लागतात! मी स्वच्छेने हा व्यवसाय स्वीकारला त्यामुळे माझ्या मनाची तयारी असतेच. पण घरच्यांच्या मनाची तयारी असणं आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारणं हे फार महत्त्वाचं! सणासुदीला जेव्हा मला बोलवलं जातं तेव्हा मनात नेहमी एकच विचार येतो. गंभीर रुग्णांसाठी जर आपल्याला बोलावलं गेलंय तर प्राधान्य त्यालाच द्यायला हवं. मौजमजा काय फक्त दिवाळीतच करायची असते? स्वत:चं खाजगी आयुष्य बाजूला ठेवून आपले श्रम व ज्ञान दुसऱ्यासाठी वापरून रुग्णाला व्याधीमुक्त करणं हीच खरी दिवाळी! ’’
 असा आनंद वा स्वत:च्या आयुष्यातले आवडीचे, छंदाचे क्षण कसे हातून निसटतात त्याचं बोलकं उदाहरण म्हणजे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उल्का नातू! गायिका आरती अंकलीकरांच्या गाण्याच्या त्या जबरदस्त चाहत्या! त्यांच्यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमात पहिल्या रांगेतलं तिकीट काढलं. कार्यक्रम रंगात आला आणि डिलिव्हरीची केस आली. त्या हॉस्पिटलकडे पळाल्या. सगळं आटोपून त्या घराच्या रस्त्याला लागल्या तेव्हा त्यांना वाटेत कार्यक्रमाहून प्रेक्षक परतताना दिसले.
स्वत:च्या व्यवसायातला गंभीर मूड स्वीकारताना अनेकदा न्यायवैद्यक तज्ज्ञ     डॉ. वसुधा आपटे यांनाही तारेवरची कसरत करावीच लागते. त्या सांगतात, ‘‘नरक चतुर्दशीचा दिवस होता तो. पहाटे उठून, अभ्यंग स्नान करून घरी सर्वाबरोबर फराळ करून मी घरून निघाले. मला त्या दिवशी सुट्टी नव्हती. रुग्णालयात पोहोचले तर दोन मृतदेह शवचिकित्सेच्या प्रतीक्षेत होते. पहिला मृतदेह होता एक तरुण महिलेचा. मृतदेहाबरोबर आलेले कागद काळजीपूर्वक वाचताना माहिती मिळत गेली. ती २५ वर्षांची विवाहित स्त्री होती, गरोदर होती. भल्या पहाटे उठून तिने घर स्वच्छ झाडले- तिच्या रोजच्या सवयीनुसार ती कचरा खाली टाकण्यासाठी चाळीच्या गॅलरीच्या कठडय़ाशी आली. मोडलेला कठडा आदल्याच दिवशी काढून ठेवलेला होता आणि नवा बसवला नव्हता हे पहाटेच्या अंधारात तिला दिसले नाही, आठवले नाही आणि ती दुसऱ्या मजल्यावरून खाली फरसबंदी अंगणात पडली. तिच्या गर्भाशयात सात महिने पूर्ण झालेला सुदृढ गर्भ होता.
 शवचिकित्सा अहवाल पूर्ण करून मी बाहेर पडल्याबरोबर बाहेर थांबलेल्या स्त्री-नातेवाईक माझ्याजवळ आल्या व गर्भावस्थेतले मूल मुलगा होता का मुलगी हे विचारू लागल्या. मुलगा हे समजल्यावर आधी शांत असलेल्या त्या स्त्रिया ‘मुलगा गेला, वंशाचा दिवा गेला’ असे म्हणत रडायला लागल्या. अशा विपरीत परिस्थितीतही समाजमानसावर पगडा असलेल्या विचारसरणीचा प्रत्यय आला. दुसरी शवचिकित्सा होती फटाक्यांनी भाजलेल्या १२ वर्षांच्या मुलाची. मजा करता करता झालेल्या सजेची. योग्य खबरदारी घेतली असती तर टळू शकली असती अशा दुर्घटनेची. सणाच्या दिवशी आपला आनंद, उत्सव बाजूला ठेवून अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतंच.’’
भाजी विकणाऱ्या कुसुम पारधरे यांना या दिवशीही व्यवसायाची गणितं मांडावी लागतात. त्यांचे यजमान पंचवीस वर्षांपूर्वी वारले. कुसुमताईंनी तिथेच भाजी विकायला सुरुवात केली. गिऱ्हाईकं जोडली, टिकवली. त्या म्हणतात, ‘‘माझ्या पडत्या काळात या गिऱ्हाईकांनीच मला प्रेम दिलं. त्यांना वेळेवर चांगली भाजी मिळावी म्हणून मी रोज न चुकता पहाटे पाचच्या ठोक्याला जांभळी नाक्यावर जातेच. ही माझी गिऱ्हाईकं न चुकता दिवाळीत माझ्या मुलांना खाऊ द्यायचे. नवीन कपडे घ्यायचे. आज मी त्यांना सांगते, तुमच्या आशीर्वादाने माझं चांगलं चाललंय. तर तुम्ही हीच मदत एखाद्या गरिबाला द्या. गिऱ्हाईकांचं प्रेम, त्यांचा आनंद हीच माझी दिवाळी.’’
व्यवसाय कोणताही असो. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती स्त्रीमध्ये उपजतच असते. त्यामुळे तक्रारीचा सूर न लावता ती प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टीने पाहते. शेवटी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणते तेच खरं! ‘‘सगळय़ांनी एकत्र येऊन आनंद साजरा करायला दिवाळीचा मुहूर्त लागत नाही, नाही का?
chaturang@expressindia.com