News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : ‘चलता हैं’ची चलती!

रोजच्या जगण्यातल्या अनंत गोष्टी आपण ‘चलता हैं’ म्हणत खपवून घेतो

सगळं चालतंय.. चालून जातंय.. चालवून घ्या. साधं टाचणीला टोक नाही? चालतं.

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

वेळ आणि शब्द पाळणं, आपल्या कामाचा दर्जा उत्तमच असणं, या गोष्टी आता किती जणांना महत्त्वाच्या वाटतात? ‘मी करतो ते काम नेहमी चोखच असतं,’ असं आपल्यापैकी किती जण खरोखरीच म्हणू शकतात? रोजच्या जगण्यातल्या अनंत गोष्टी आपण ‘चलता हैं’ म्हणत खपवून घेतो; किंबहुना सगळेच हा मंत्र म्हणत असल्यामुळे त्यात काही वावगं आहे, असं वाटणंच बंद झालंय. माईंना मात्र हे मान्य नाही. ‘‘अचूकतेचा आग्रह म्हणजे ‘उगाचच कीस पाडणं’ केव्हापासून झालं?’’ असा रोखठोक सवाल विचारण्यासाठी त्यांनी वत्सलावहिनींच्या ‘व्वा हेल्पलाइन’ला फोन लावला..

दरवाजाची घंटा वाजली तेव्हा माई उत्साहानं तो उघडायला गेल्या. दरवाजाची वरची कडी- ‘टॉवरबोल्ट’ बरेच दिवस नादुरुस्त होती. अनेक फोन, निरोप, दुरुस्ती करण्याची आश्वासनं, घरच्यांची चिडचिड, बाहेरच्यांची टोलवाटोलवी, एवढय़ानंतर सुतार खरोखरच आला की काय? माईंनी हर्षभरानं दरवाजा उघडला तर बाहेर नातू उभा. ‘मॅथ्स’ची टय़ूशन संपवून आलेला. ‘‘आज लवकर संपला क्लास?’’ माईंनी विचारलं. तोवर नातू खांद्यावरची धोकटी पलंगावर भिरकावून क्रिकेटची बॅट हातात तलवारीसारखी धरून घराबाहेर पडण्याच्या पवित्र्यात!

‘‘बॅग नीट ठेव ती. ते वर्कबुक वेडंवाकडं दुमडतंय.’’ माई.

‘‘चालतं गं आजी.’’

‘‘बुटाची लेस नीट बांध. पडशील.’’

‘‘चालतं गं आजी.’’

‘‘वेळेवर घरी ये. आई संध्याकाळी डॉक्टरांकडे नेणारे ना?’’

‘‘उशीर चालतो गं आजी.’’ असं म्हणत नातू स्वत:च चालता झाला.

‘चालतं’, ‘चलता हैं’, ‘चलेगा’, वगैरेंच्या त्याच्या जपापुढे आपली मात्रा चालत नाही हे माहीत असूनही माईंना हसू आलं. अजून लहान आहे पठ्ठय़ा. योग्य वेळी, जरूर ते काम चोख करण्याचं महत्त्व बेटय़ाला अजून समजायचंय, असं स्वत:लाच समजावत त्यांनी पुन्हा कडीच्या कारागिराची वाट बघायला सुरुवात केली. आपल्याकडे सध्या इंजिनीअर्स पैशाला पासरी मिळतात, हातात हत्यार धरून प्रत्यक्ष काम करणारे सहजासहजी मिळत नाहीत, मिळाले तर धड काम करत नाहीत. वेळ, शब्द, कामाचा दर्जा, वगैरे फालतू गोष्टी तर कु णीच पाळत नाही, हे माहीत असूनही ‘‘कुणी तरी येणार येणार गं’’ म्हणत राहिल्या. त्या आशावादी होत्या.

काही वेळानं खरोखरच सुतारनामक देवदूत आला. दोन्ही हात खिशात घालून, तोंडात गोळी चढवून, मंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून दुष्काळी भागाची पाहणी करावी अशा थाटात त्यानं कामाची पाहणी केली आणि त्रासिकपणे विचारणा सुरू केल्या, ‘‘पकड आहे का?’’, ‘‘स्क्रू भेटेल का?’’, ‘‘खिळा राहिला.. चुका तरी असतील ना?’’

‘‘खूप आहेत. आयुष्यभर केल्या आहेत. अजून करते आहे.’’ माई ‘गुन्हा कबूल’ थाटात म्हणाल्या.

त्यावर त्या इसमानं व्हरांडय़ात जाऊन तोंड ‘मोकळं’ केलं आणि जाता-येता वाटेत दिसल्या त्या वस्तू- म्हणजे लोखंडी बत्ता, पातेलं उचलायचा चिमटा, माईंच्या सुनेच्या सॅण्डलची टोकदार टाच वगैरे उचलून माफक ठोकाठोकी करून धडामकन् कडी एकदाची ‘बशिवली’.

इतपत धसमुसळेपणामुळे तीही नाहकच ‘वाकडय़ात शिरली’. म्हणजे वरचं खोचणं अंमळ उजवीकडे असताना खालची कडी डावीकडे झुकली. साहजिकच ती वर बसवणं झटापटीचं झालं. दर वेळेला कडी सरकवताना ती खडबडणार, घासणार, म्हणून माईंनी कारागिराच्या हे लक्षात आणून दिलं.

‘‘चालतंय हो आजी. एवढी ‘अलैनमेण’ (अलाइनमेंट!) करून घ्याची आडजस्ट.’’

‘‘अहो, पण तुम्ही बसवतानाच काळजी घ्यायची ना?’’

‘‘भौतेक घरांमध्ये ‘टावरबोल’(टॉवरबोल्ट) असेच भेटतात आता. तो काय शोपीस आहे का तवा?’’

‘‘नाहीये शोपीस. म्हणजे आमच्या कडीचं कौतुक केल्याशिवाय आम्ही चहा देणार नाही, असं काही आम्ही पाहुण्यांना म्हणणार नाहीयोत. तरीपण.. थोडी सफाई ठेवली असतीत तर?’’

‘‘चालतंय हो. उगा डोक्याला हेडेक करू नका. कडी डोक्यात तर पडणार नाहीये ना? मग? चालवून घ्याचं.’’ तो शांतपणे म्हणाला.

कडी डोक्यात पडणार नाहीये, आपण डोक्यावर पडलेलो नाहीये, फार डोकं झिजवावं एवढा महत्त्वाचा विषय नाहीये, हे माहीत असूनही माईंना सगळा ढिसाळपणा ‘चालवून घेणं’ कठीणच गेलं. सारखं सगळं चालवून का घ्यावं लागतं आताशा? काहीच ‘परफेक्ट’ का नसतं? असं पुन्हा कितव्यांदा तरी वाटल्याशिवाय राहिलं नाही.

तेवढय़ात सोसायटीतली ‘हौशी कार्यकर्ती’ पोरं कुठल्या तरी वर्गणीचं माहितीपत्रक घेऊन आली. दोन सुटेसुटे कागद होते. एक माहितीचा, दुसरा वर्गणीदारांच्या नावाचा आणि रकमेचा. ‘‘एक टाचणी लावून एकत्र ठेवायचेत ना रे दोन्ही.’’ माई म्हणाल्या.

‘‘चालतं हो आजी!’’ हे पुरतं ऐकण्यापूर्वीच माईंनी टेबलावरची एक टाचणी हातात घेऊन दोन्ही कागदांचा समेट घडवण्याचा प्रयत्न केला. टाचणीच्या डोक्यापाशी छान रंगीत मणीबिणी बसवलेला होता, पण टोक बेपत्ता. कोमल हृदयाची असल्यानं तिला कु णाला टोचायला आवडत नसावं. तिच्या दोनचार बहिणीही तिच्यासारख्याच टोक गमावलेल्या होत्या. शेवटी एकीनं दोन कागदांना आरपार भोसकून दाखवलं. तोवर ती पोरं वर्गणीची रक्कम आणि दोन कागदांची पताका घेऊन पसारही झालेली होती, ‘एवढं साधंही चालवून घेता येत नाही होय तुम्हाला?’ असा कटाक्ष टाकून.

संध्याकाळचं बाहेर पडताना सोसायटीच्या फाटकाजवळ इस्त्रीवाल्याला इस्त्रीचे कपडे देण्याचं त्यांचं जुनंच वळण होतं. आजही हातातला गठ्ठा त्याला देताना त्यांनी बजावलं, ‘‘चादरी जाड आहेत रे. नीट सगळ्याला इस्त्री कर. नुसती चौघडीवरून फिरवू नकोस..’’

‘‘चलता हैं ना मॅडम.. एकेक दिन में ८०-१०० कपडा उतारता हूँ ना मैं..’’

‘‘म्हणून काय चुरगळे, चुण्या तशाच ठेवणार का रे?’’

‘‘इस्त्री बोले तो इस्त्री देता हैं ना मेडम.. जादा कायकू देखने का..’’ तो हसत टोलवत राहिला, पण ‘मी चांगली इस्त्री करीन,’ असं काही शेवटपर्यंत म्हणाला नाही. ‘मी करतो तीच चांगली आहे. घ्या चालवून.’ यावर ठाम राहिला.

सरावानं माई चौकात आल्या. चौकाला एका ह.भ.प. महाराजांच्या नावाची पाटी होती. पाटीवर त्यांच्या मठाची दिशा दाखवणारा बाण होता. गेले कित्येक दिवस पाटी घरंगळून थोडी लटकल्यानं आता तो बाण जमिनीकडे निर्देश करत होता. महाराज भूमिगत झाले असू शकतात.. एक वेळ, समाधीही घेऊ शकतात ते, पण वाटेवरच्या वाटसरूनं त्यांच्या शोधात किती खोलात शिरावं बरं?

एवढी मोठी पाटी, एवढी ढोबळ चूक, एवढय़ा मोक्याच्या जागी असल्यानं ती सहज दुरुस्त केली जाईल असं माईंना बरेच दिवस वाटत आलं होतं. आज तिच्याबाबत आपणच पुढाकार घ्यावा म्हणून चौकातल्या पोलिसाला त्यांनी जवळ  जाऊन म्हटलं, ‘‘अहो मामा, त्या पाटीकडे बघा ना एकदा..’’

‘‘पाटी? ते आपलं डिपार्टमेंट नाही मावशीबाई. दुसऱ्याच्या डिपार्टमेंटमध्ये आपण नाक घालत नसतो.’’

‘‘कबूल आहे. मग ज्यांच्या डिपार्टमेंटचं आहे त्यांना सांगा.’’

‘‘जाव द्यावं मावशीबाई. काय फरक पडतो? चालतंय.’’

सगळं चालतंय.. चालून जातंय.. चालवून घ्या. साधं टाचणीला टोक नाही? चालतं. रेघांच्या कागदाच्या वहीत कोरी पानं निघतात? चालतं. प्लंबर साधा वॉशर बदलताना ढीगभर कचरा करून जातो? चालतं. वीजवाला वायरचं टोक उघडं ठेवतो? चालतं. छोटय़ा-छोटय़ा कामांबाबत ढिसाळपणा असतो म्हणावं तर मोठय़ा कामांनाही वाली नसतातच सापडत. चालतं. महागडं मशीन वॉरंटीच्या काळात दुरुस्ती करण्याची वेळ आली तर कंपनी माणूस पाठवायला जीव काढते. चालतं. विद्यापीठाकडून महत्त्वाच्या परीक्षेतल्या उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठाच्या गठ्ठा हरवतो. चालतं. मिठाईवाल्याकडला खवा दूषित असल्यानं एका मिठाईचे सगळे ग्राहक उलटय़ा, जुलाब होऊन बेजार होतात. चालतं. सरकारी इस्पितळात योग्य वेळी प्राणवायू न मिळाल्यानं   कु णी तरी दगावतं. चालतं. माणसं वेळ, शब्द आणि कामाचा दर्जा याबाबत कमालीची ढिसाळ असतात. चालतं. रीतसर दिडक्या मोजून करून घेतलेल्या कामाचीही हमी नसते, मग मोफतच्या कामाबद्दल काय अपेक्षा करावी? किती सहनशील आहोत आपण सगळे एक समाज म्हणून! सहनशील? की शीलभ्रष्ट? माई चालता चालता स्वत:शीच बोलून गेल्या आणि चमकल्या. बापरे! केवढा तीव्र शब्द आला मनात? छे.. तसं काही नाही. उगाचच आपलं..

रोजच्याप्रमाणे त्या बागेत गेल्या, त्यांच्या अड्डय़ावर. तिथे गप्पा व्हायच्या, आवडलेल्या पुस्तकांची देवाणघेवाण व्हायची. आजही एकीनं त्यांना उत्साहानं एक पुस्तक काही दिवसांसाठी देऊ केलं, तर ते हातात घेताच त्याच्या ‘ब्लर्ब’वरची एक शुद्धलेखनाची ढोबळ चूक त्यांच्या डोळ्यात खुपली. तोंडून निघून गेलं, ‘‘काय हे? ‘प्रतिक्रिया’ हा शब्द कसा लिहिलाय इथे?’’

‘‘जाऊ द्या हं माई! तुम्हाला चुका काढायची सवयच आहे. पुस्तक छान आहे ते वाचा. बाकी इतपत चुका चालायच्याच.’’

‘‘का? अहो.. ब्लर्बवर.. एवढी ठळक चूक.. कु णाच्याच लक्षात आली नसेल? लिहिणारा, डी.टी.पी.वाला, छापणारा.’’ माई म्हणाल्या.

‘‘चालतं हो. इतका कीस पाडत नाही आता कोणी.’’

दर्जाचा आग्रह म्हणजे कीस पाडणं? सगळ्या प्रमादांना उत्तर म्हणजे चालवून घेणं? ‘चलता हैं’ची अशी चलती कधीपासून आणि का झाली असेल बरं? माईंनी हा प्रश्न वत्सलावहिनींनाच विचारायचा ठरवला, तर त्या वेगळ्याच मूडमध्ये होत्या. हसत म्हणाल्या, ‘‘काय आहे, जेव्हापासून ट्रकच्या मागे ‘चलता हैं’ असे शब्द लिहायला सुरुवात झाली असेल, तेव्हापासून ही वृत्ती बळावली असेल. ‘चलता हैं’ दिसतं ना समोर.’’

‘‘आर यू किडिंग? आय अ‍ॅम सीरियस वत्सलावहिनी.’’ माई.

‘‘चलता हैं!’’

‘‘काय? तुम्हीही.. पण तुम्हीच बघा. आपल्याला किती सवय झालीये या ‘चलता हैं’ची?’’

‘‘काही काही ट्रकवाले मागे ‘हे असंच चालायचं’ असंही लिहितात.’’ वत्सलावहिनी.

‘‘तुम्हाला ट्रक विद्यापीठाच्या बाहेरच यायचं नसेल तर राहू द्या. मी फोन बंद करते. हे असंच चालायचं, हेच ऐकायचं ना शेवटी?’’

‘‘एकेका काळाचा एकेक धर्म बनत जातो मॅडम. एखाद्या काळात ध्येयनिष्ठेची नशा असते, एखाद्यात त्यागाचं कौतुक, तसं आता चालढकलीचं युग आलं म्हणायचं.’’

‘‘पण का? हे बदलता येणार नाही का?’’

‘‘असं आहे, कामचुकारपणा सगळ्याच माणसांना सगळ्याच काळांमध्ये आवडणारा आहे, पण एका टप्प्यावर आपल्याला          पाप-पुण्याचं भय होतं. ‘चुकीचं केलं तर पाप लागेल’ वगैरे. एखाद्या टप्प्यावर सत्तेचा धाक होता.’’

‘‘म्हणजे चुकारपणा केला तर राजा शिरच्छेद करेल वगैरे?’’

‘‘करेक्ट. आणखी एकदा आपण परकीयांना वचकून राहिलो. सत्ताधारी ते, श्रीमंत ते, अनोळखी ते, त्यांना ओलांडणं नको.’’

‘‘याचा माझ्या समस्येशी काय संबंध वत्सलावहिनी?’’

‘‘येत्येय तिथेच! तर झालंय काय, आता समाजात कुणालाच कुणाचा धाक उरलेला नाही. पाप-पुण्याच्या कल्पना मोडीत निघाल्या. सत्ता, कायदा केव्हाही विकत घेता येतो किंवा झुंडीनं झुगारता येतो हे अनुभवाला आलं. सगळ्यांनीच मनाला येईल ते आणि तेवढंच करायचं ठरवलं तर ‘चलता हैं’ची चलती माजणारच ना?’’

‘‘अच्छा? म्हणजे तुमच्या ट्रकच्या मागेही ‘हे असंच चालायचं’ कायमचं रंगवून ठेवलंय वाटतं? पण हे चुकीचं नाही का? बदलायला नको का? मी एखादं काम करतो ते सर्वोत्तम असतं, माझ्यासारखं हे काम दुसरा कु णी करूच शकणार नाही, अशी निरागस अहंता माणसात नसावी का?’’ माई म्हणाल्या.

‘‘असावी की. ‘प्राइड ऑफ वर्कमनशिप’ हेच म्हणताय ना तुम्ही?’’

‘‘हं.. काही प्रमाणात.’’

‘‘मग एकच मार्ग. आज संस्कारक्षम वयातल्या मुलांवर हे बिंबवत राहा. त्यांचा तो निरागस अहंकार जपा, वाढवा. काम चांगलंच केल्याचा स्वत:चा स्वत:ला जो आनंद मिळतो तो त्यांना कळू द्या. मगच कदाचित.. एरवी.. चलता हैं!’’ वत्सलावहिनी हसत म्हणाल्या. माईंच्या डोळ्यांपुढे त्यांचा नातू उभा राहिला!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 1:50 am

Web Title: casual attitude waa helpline dd70
Next Stories
1 अपयशाला भिडताना : निमित्त
2 निरामय घरटं : निसर्गनियम
3 पडसाद : उर्मिला पवार यांचेही योगदान महत्त्वपूर्ण
Just Now!
X