News Flash

आहे हे असं आहे!

किशोरवय आणि म्हातारपण हे दोन टप्पे सर्वात जास्त ताणाचे, निराशेचे असतात असं बहुतेकांचं म्हणणं असतं.

| May 23, 2015 01:01 am

किशोरवय आणि म्हातारपण हे दोन टप्पे सर्वात जास्त ताणाचे, निराशेचे असतात असं बहुतेकांचं म्हणणं असतं. प्रत्यक्षात संशोधनात मात्र तसं आढळत नाही. मुळात असे ठोकताळे निर्माण होण्यामागे आपल्याच विचारांची गुंतागुंत असते.

बिरबल-बादशहाची सुप्रसिद्ध गोष्ट आठवते ना? डोळ्यांत आणि कानांत अंतर किती? मोजलं तर खरं चारच बोटांचं, पण प्रत्यक्षात किती प्रचंड! एखादी सांगोवांगीची गोष्ट ऐकून विश्वास ठेवणं आणि प्रत्यक्ष आपण पाहून- अनुभवून पडताळा घेणं यात किती फरक असतो! अगदी असंच आयुष्याबद्दलच्या ‘ठोकताळ्यांच्या’ बाबतीतही घडतं. प्रतीकच्या बाबतीतही असंच घडलं.
 तो जेव्हा हॉस्टेलला शिकायला गेला तेव्हा त्या कॉलेजमधल्या घडणाऱ्या रॅगिंगच्या कथा ऐकूनच अर्धा खचून गेला होता. रोज रात्री झोपल्यावर बारीकसा आवाज ऐकूनही त्याला धस्स होई. कुणी तरी आपलं रॅगिंग करायला येणार असाच विचार मनात येई. पण प्रत्यक्षात तसं कधीच झालं नाही. हळूहळू त्याची धास्ती कमी झाली. नंतर लक्षात आलं की, ८-१० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा इतका गवगवा झाला आणि इतक्या काल्पनिक दंतकथा जन्माला आल्या होत्या की त्यामुळे त्या कॉलेजवर रॅिगग कॉलेजचा शिक्का बसला.
 तर ‘आहे हे असं आहे! ’ बऱ्याचदा आपल्या मनात असलेली एखादी दु:ख किंवा आनंद देऊ शकेल असं वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात तशी असेलच असं नाही. हेच पाहा ना..
‘तो काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला राजपुत्र! त्याला कसलं दुख?’
‘अमुक अमुक जातीच्या लोकांचं बरं असतं, पूर्वजांची पुण्याई आहे ना!’
‘अगं बाई, यूएसला गेलाय का मुलगा? चनच की आता!’
‘तुम्हा तरण्या लोकांना काय कळणार म्हातारपणची दु:खं? तुमचं आपलं बरंय!’
अशी वाक्यं आपण वेगवेगळ्या स्वरूपात नेहमी ऐकत किंवा म्हणत असतो. एखादी अगदी विपरीत परिस्थिती (नसíगक आपत्ती) वगळता खरं तर आयुष्यातील सर्वसाधारण परिस्थिती सरसकट अनेकांचा आनंद किंवा दु:ख ठरवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि तरी आपल्यातील प्रत्येकाला कधी ना कधी वाटतंच, ‘उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी?’
 थोडक्यात, ‘दुसरा माणूस माझ्यापेक्षा जास्त आनंदी आहे. कारण त्याच्या नशिबात अमुकतमुक आहे!’
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार करतानाही बहुतेकांचं म्हणणं असतं की, किशोरवय आणि म्हातारपण हे दोन टप्पे सर्वात जास्त ताणाचे, निराशेचे असतात. प्रत्यक्षात संशोधनातून मात्र हे सर्व आडाखे, मतं खोडून निघण्यासाठीचे असंख्य पुरावे मिळतात, असं दिसतं. मुळात असे ठोकताळे निर्माण होण्यामागे आपल्याच विचारांची काही गुंतागुंत असते. असे गुंते होतात कशामुळे ते पाहणं विचारांना खूप चालना देणारं आहे.
* भावनांनी भारलेली भविष्यवाणी- काही विशेष घटना जेव्हा घडण्याची अपेक्षा असते, तेव्हा त्यात भावनांचे रंग नकळत मिसळले जातात. त्यामुळे त्या घटनांचे परिणामही आपोआप थोडे अतिरंजित स्वरूपात कल्पिले जातात आणि वस्तुस्थिती थोडी वेगळी असली तरी आपला चष्मा आधीच बनला असल्यामुळे आपले भावनिक प्रतिसादही त्या चष्म्यानुसार दिले जातात.
सुलभानं जेव्हा घर बदलून दुसऱ्या भागात घ्यायचं ठरवलं तेव्हा अनेकांनी तिथल्या शेजार-पाजाराबद्दल काळजी व्यक्त केली. आधीच्या शेजाऱ्यांशी एवढं सख्य होतं, की त्यांना सोडून जाण्याच्या कल्पनेनंच तिला फार वाईट वाटत होतं. तसे शेजारी अख्या जगात नसणार अशीच तिची धारणा होती. त्यामुळे नव्या घरी राहायला आल्यावर शेजारच्या मधुराबद्दल तिला उगाचच परकेपणा वाटू लागला. दूर दूर राहून तिनं तो अजूनच पोसला. त्याबद्दल नवऱ्याकडे, मुलांकडे नाराजीही व्यक्त केली. ‘बाकी सगळं छान आहे, पण शेजारी मात्र फारच फटकून वागतात बाई!’ असं मनाला आणि जनांना सांगणं सुरू झालं. पण लगेचच्या पावसाळ्यात सुलभा पावसात भिजून तापानं फणफणली आणि घरी काळजी घ्यायला कुणी नव्हतं तेव्हा मधुरानं आणून दिलेला आल्याचा चहा, मारलेल्या चकरा आणि गरमागरम सुपाची ट्रीट यामुळे तिची नाराजी कुठल्या कुठं निघून गेली. ‘भावनिक अतिरंजना’मुळे आपणच स्वत:ला किती त्रास करून घेतला हे तिच्या लक्षात आलं.
* अतिकेंद्रितपणा- आपण ‘आत्मकेंद्रितता’ हा शब्द ऐकलेला असतो. तो मुख्यत: स्वत:तच बुडून जाणाऱ्या, सगळ्या गोष्टींना फक्त ‘स्वत:च्या’ फायद्या-तोटय़ाच्या तराजूत तोलणाऱ्या व्यक्तींसाठी वापरला जातो. अतिकेंद्रितता तशीच आपल्या विचारांवर- भावनांवर परिणाम करते. एखाद्या प्रसंगाचा भावनिक परिणाम किती झाला याचा अंदाज घेताना त्यातल्या एखाद्याच पलूचा बाऊ करणं घडतं. आपण खूप अस्वस्थ होतो, चिडतो, निराश होतो, पण त्याच वेळी त्या घटनेतील अन्य काही पलूही त्रासदायक परिणाम कमी करू शकतात याकडे आपलं सोईस्कर किंवा नकळत दुर्लक्ष होतं. जसं नमिताबरोबर ब्रेक-अप झालं त्यामुळे प्रसाद खूपच खचला. ऑफिसमध्येच रोज तिच्याबरोबर ऊठबस असल्याने कामावर लक्ष लागेना. नमिताबरोबरचे वाद, भांडणं सारखी डोक्यात घर करून राहिली. हाच पलू खूप फोकसमध्ये आल्याने त्याचं दडपण, नकारात्मकता वाढली. पण त्याच दिवसात विनयनं- त्याच्या मित्रानं दिलेला मानसिक आधार, कामात मिळालेलं नवं आव्हान या गोष्टीं मात्र त्यानं लक्षातच घेतल्या नाहीत. त्यामुळे जो उतारा आपोआप मिळाला असता तो लांबच राहिला.
आपल्याला एकूणच दु:खाचा अनुभव नकोसा वाटतो. कारण आपण आपल्या ‘सहनशक्तीची’ लिटमस टेस्ट कधी घेतलेलीच नसते. आपल्या दृढतेवर आपला पक्का अविश्वास असतो. त्यामुळे मग मनात काही वाक्यं कोरलेली असतात.
छे! मला नाही बुवा झेपणार असलं काही!’ ‘आता जर झालं नाही तर संपलंच सगळं!’ ‘मला हे कसं काय सहन करता येणार?’ इत्यादी. विजयलाही त्याच्या वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या ‘मृत्यूचा’ विचार मनात येऊन भयंकर असहाय वाटायचं. वडील प्रत्यक्ष जाण्यापूर्वी तो मनानं किती वेळा खचला होता ते त्याचं त्यालाच माहीत. पण त्या प्रसंगाला तोंड द्यायची वेळ आली तेव्हा त्याचा संयम आणि धीर पाहून इतरांना तर अचंबा वाटलाच, पण त्याला स्वत:लाही वाटला. काही काळानंतर पत्नीशी बोलताना त्याने कबुलीही दिली, ‘मला खूप चिंता होती, या प्रसंगाला सामोरे जाण्याची. पण त्या कमानीखालून गेल्यानंतर आता वाटतं, की ते इतकं भयंकर नव्हतं- मी आधीपासून मनाची तयारी केलीच होती बहुधा. आणि त्यांचे अजून हाल होण्यापेक्षा जे झालं तेच इष्ट असं आता वाटतंय!’
अगदी छोटय़ा घटनांमध्येही काही वेळा आपला विचार काही भ्रमांवर (काल्पनिक गोष्टींवर) बेतलेला असतो. एका प्रयोगात हॉस्टेलमध्ये नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्हाला कुठली खोली हवी? साधारणपणे कोपऱ्यातील, गॅलरी असलेली, मोठय़ा खिडक्यांची, जेवणघराजवळची वगरे निकषांवर काही खोल्या जास्त ‘डिमांड’मध्ये होत्या. त्या खोल्या मिळणं म्हणजे आनंद/ समाधान या भावनांची प्राप्ती, असं कल्पनेतील सूत्र होतं आणि ते चाचणीत मोजलंही गेलं. नंतर काहींची मागणी पूर्ण झाली तर काहींची झाली नाही. जेव्हा त्या मुलांनी कल्पिलेला आनंद आणि प्रत्यक्षात काही काळानंतरचा आनंद यांचा आढावा घेतला तेव्हा काही मजेदार निष्कर्ष आले-
हवी ती खोली मिळाली त्यांचा त्याबद्दलचा आनंद पूर्वीपेक्षा कमी झाला होता. (थोडक्यात दुरून डोंगर साजरे!) ज्यांना हवी ती खोली मिळाली नव्हती त्यांना मिळालेल्या जागेबद्दल जेवढं वाईट वाटेल असं वाटलं होतं त्यापेक्षा खूपच दु:ख कमी झालं. (सुसरबाई तुझीच पाठ मऊ) सर्वात शेवटी असं लक्षात आलं की, त्या सर्वाचं समाधान खोलीच्या लोकेशनपेक्षा तिथे (वसतिगृहात) निर्माण झालेल्या सामाजिक संबंधामुळे जास्त घडत/ बिघडत होतं. म्हणजे बऱ्याचदा आपल्या अशा ‘कल्पकते’मुळे आपणच त्रास वाढवून घेतो.
 काही गोष्टींबद्दल आपण फसवा हळवेपणा दाखवतो. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या बाबतीत ‘ऋतुसमाप्ती’ (मेनोपॉज) मन:स्वाथ्याचं वयामुळे येणारं एक हळवं पर्व मानलं जातं. अगदी वैद्यकीय क्षेत्रातील लोकही त्याला दुजोरा देतात. तसंच घरातील पुढची पिढी लांब-लांब राहायला गेली असेल तर ५५-६०चं वयही भावनिक ताणाचं, एकटेपणामुळं उदासी दाटून येणारं मानलं जातं. पण गेल्या दशकातील यावरचं संशोधन काही वेगळंच चित्र दाखवत आहे. एखाद्या स्त्रीचा मेनोपॉजकडे, या बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर ती त्याचा त्रास किती करून घेते हे ठरतं, असं अभ्यासातून सिद्ध झालय. त्याचप्रमाणे ज्यांची मुलं घरटय़ापासून लांब गेली आहेत असे आई-बाबा समाधानी असतात, इतकंच नाही तर नसतानासुद्धा आपल्या आयुष्याला नवा अर्थ देण्यासाठी (मनापासून- असहायतेनं नव्हे) अनेक गोष्टी अनुभवत असतात, असं दिसतं.
 तरुण लोकांच्या भावनिक आंदोलनांचं रूप दिसतं तर वय वाढत जातं तसं हे रूप एखाद्या खळखळत वाहणाऱ्या नदीसारखं संथ जलाशयासारखं होतं. त्यामुळे वयस्कर लोकांचं मन:स्वास्थ्य तरुणांपेक्षा खूप कमी हेलकावे खाणारं असतं ही वस्तुस्थिती आहे.
प्रत्येक वयाच्या लोकांची आयुष्यात मिळवायच्या समाधानाची व्याख्या फक्त बदलत जाते. (यालाच तर आपण प्रगल्भता म्हणतो!) ते सर्व सारखेच समाधानी/ आनंदी असू शकतात, पण कारणं खूप वेगळी असतात. प्रश्न येतो तो एक पिढी आपली समाधानाची व्याख्या दुसऱ्या पिढीवर लादायचा प्रयत्न करते (कुठल्याही बाजूने) तेव्हा!
प्रौढ/वृद्ध लोक साधारणपणे त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण कमी संघर्षांचं राहील असा प्रयत्न करतात. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवून किंवा त्यांच्यावर छाप मारून त्यांना बदलण्यापेक्षा ते बऱ्यापकी आनंद देणारी नाती जपण्याचा प्रयत्न करतात. (अर्थात सन्माननीय अपवाद वगळता!) तर तरुण लोक नात्याबित्यांच्या घोळात फार न अडकता त्यांची ‘मंझील’ गाठण्यात खूश असतात.
थोडक्यात, आपल्या सरधोपट ठोकताळ्यांना छेद देणारे अनेक निष्कर्ष या आनंदाच्या शोधयात्रेमध्ये आपले डोळे चांगलेच उघडतात. तेव्हा मंडळी, आहे हे असं आहे- आपली पारंपरिक मतं किंवा काल्पनिक अंदाज काही का म्हणेनात! आपण तरी नक्की शास्त्रशुद्ध अभ्यासांतील निरीक्षणांवर (काही काळ!) विसंबायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2015 1:01 am

Web Title: causes of stress in life of old adult and youth
Next Stories
1 जायचे ठरले तेथे जाऊच जाऊ
2 प्रेमाचा पॉवर गेम
3 नात्यांचे नाजूक बंध
Just Now!
X