20 January 2021

News Flash

अस्वस्थ वेदनेची शांत अखेर

ऑस्ट्रियातल्या ‘लोवारा रोमा’ या एका भटक्या जमातीतील कुटुंबात सेजा स्तोजेकाचा जन्म झाला

सेजा स्तोजेका यांनी काढलेलं एक चित्र

अरुंधती देवस्थळी – arundhati.deosthale@gmail.com

नाझी अत्याचार आणि ‘ज्यूं’च्या नरसंहाराच्या हृदयद्रावक कहाण्या आपण अनेकदा वाचल्या, पाहिल्या आहेत. याच संकटात भरडल्या गेलेल्या आणि तब्बल तीन छळछावण्यांतला छळ सहन करूनही जिवंत राहिलेल्या सेजा स्तोजेका यांनी आपली ही कहाणी आयुष्याच्या उत्तरार्धात कागदावर उतरवली आणि चित्रांच्या माध्यमातून रेखाटली. ज्या देशात त्यांच्यावर अन्याय झाला त्याच देशानं त्यांच्या चित्रांना आदराचं स्थान दिलं. लवकरच त्यांच्या चित्रांचं फिरतं प्रदर्शन युरोपमधल्या वेगवेगळ्या शहरांतून होणार आहे आणि त्यातून मिळणारा पैसा रोमा समाजाच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे. त्यांची ही चटका लावणारी कहाणी..

कोवळ्या शैशवापासून देशोधडीला लागलेले आणि आता रापून मध्यमवयीन झालेले पाय चालताहेत परदेशांमधून मातृभूमीची वाट..खाचखळग्यांनी भरलेले आठेकशे किलोमीटर.. तीही तब्बल ५ र्वष..  तीन छळछावण्यांमधल्या रक्तरंजित आठवणींपासून सुटकेची दुवा मागत..  दरम्यान, निरपराध असूनही लाचार झालेल्या आई-वडिलांचं छत्रही  हरपलं..  पण तिला चालतच राहावं लागणार होतं.. कारण एवढंच, की हुकूमशहाच्या नजरेत ‘कमजात’ असल्यामुळे वंशहत्येच्या लायकीच्या ठरवलेल्या लोवारा जमातीत तिनं घेतलेला जन्म आणि तेवढय़ा एकाच कारणास्तव नशिबी आलेला क्रूर नाझी सैनिकांचा जीवघेणा द्वेष. इतका कडवा, की त्यांच्या यंत्रणेनं हालहाल करून ही जमातच समूळ चिरडून टाकायचा संकल्प केलेला!

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आऊश्वित्झ, राव्हेन्सब्रुक आणि बर्गेन-बेल्सन या तीन कुप्रसिद्ध छळछावण्यांमध्ये पाळीपाळीनं बालपण घालवून जिवंत राहाणं आणि ठिकठिकाणचे करडे पोलीस आणि सीमांवरल्या गार्डापासून कसंबसं स्वत:ला वाचवत मध्य युरोपातील जर्मनी, झेकोस्लोव्हाकियातली लहानमोठी शहरं, रस्ते तुडवत, शेवटी मायदेशी व्हिएन्नात परत चालत येणं हा सेजा स्तोजेका (Ceija Stojka) नावाच्या एका विमुक्त जमातीच्या अशिक्षित स्त्रीनं अनुभवलेला चमत्कार नाही तर काय आहे? या पाश्र्वभूमीवर पन्नाशीत बोलण्याची हिम्मत येणं आणि शिक्षणाचे कोणतेही संस्कार न लाभलेल्या रांगडय़ा बोटांमधून चित्रं आणि नंतर शब्दांच्या माध्यमातून आपली ‘आपबिती’  जगासमोर मांडायला तयार होणं, हेही धाडसाचंच. आंतरराष्ट्रीय यशाचं देखणं वलय प्राप्त व्हायला मात्र फार वाट बघावी लागली नाही. अविश्वसनीय कहाणी जगल्याबद्दलचं आणि ती कलेच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यासाठीचं  मिळत गेलेलं अपार कौतुक आणि कलेची भरघोस वाहवा हा आयुष्याच्या संध्याकाळी लाभलेला कृतार्थ उत्तरार्ध.

ऑस्ट्रियातल्या ‘लोवारा रोमा’ या एका भटक्या जमातीतील कुटुंबात सेजा स्तोजेकाचा जन्म झाला तेव्हा, म्हणजे १९३३ मध्ये जर्मनीत हिटलरची कमान उंचावली होती आणि नाझी युगाची अभद्र सुरुवात झाली होती. जन्मापासून तिनं एकाच भावनेचा सामना केला- अन्याय, भीती आणि क्रौर्यानं भारलेली दहशत, इतर काही अनुभवूच न देणारी!  प्रश्न विचारायचे नसतात, फक्त मान झुकवायची असते हे शिकवणारी. ‘आऊश्वित्झ’च्या काळात नाझींनी घडवून आणलेल्या काळ्या इतिहासात ज्यूंच्या बरोबरीनं तिच्या ‘रोमा’ भटक्या वंशाची केलेली निर्घृण कत्तल जगासमोर  काही प्रमाणात आली. मरणाऱ्या निरपराध रोमांची संख्या  ५ ते ७ लाखांच्या दरम्यान मानली जाते. ऑस्ट्रियातल्या रोमा लोकसंख्येपैकी फक्त १८ टक्के   वाचले, बाकी सगळे क्रूर अत्याचार आणि देशातून हकालपट्टी झेलत मरणोन्मुखी पडले. मृतांचे अंदाजे आकडे कळले पण त्यामागच्या कैदेतल्या हृदयद्रावक कहाण्या आणि गांजलेल्यांचे अनुभव फारसे बाहेर आले नाहीत. ज्यू वंशाबद्दल असलेला विखारी नाझी आकस सर्व जगानं तीव्र स्वरात धिक्कारला आणि शर्मिद्या जर्मनीनंही असं काही देशात परत घडू न देण्याची शपथ घेतली. पण प्रगत मानल्या जाणाऱ्या युरोपियन देशांत रोमा जमातीच्या सुरक्षेबद्दल कायदे यायला विसाव्या शतकाचं शेवटचं दशक उजाडलं.

सेजाला भेटायचा योग मला आलाच. सेजा, मी आणि आम्हा दोघींची एक मैत्रीण एका १०० र्वष जुन्या कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. व्हिएन्नाचा सुप्रसिद्ध चीज केक तिनं आग्रहानं माझ्यासाठी मागवला होता. आमच्या बोलण्याचा विषय होता अर्थातच सेजाच्या ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’मधल्या आठवणी. ती सांगत होती, ‘‘माझं वाढीचं ते वय, त्या वेळी भूकही कशी कडकडून लागते ना. नाझींना आमचा वंशच भरडून टाकायचा होता. छावणीत उपासमार हा छळाचा अतिसौम्य प्रकार होता. मी झाडाची सालं, पानं, चामडय़ाचे तुकडे शोधून शोधून खायची. कधी कुणी फेकलेला ब्रेडचा किंवा गोड बिस्किटाचा तुकडा हाती लागला तर मन फुलून यायचं..’’ ती अगदी शांत सहजपणे सांगत होती.. पण ते वाक्य माझ्या मनात रुतूनच बसलं. आज सेलेब्रिटी बनलेल्या  तिच्या नजरेला नजर देववेना आणि तिने

मुद्दाम मागवलेला चीज केकही खाववेना.  कसा तरी  संपवला, चव तर कळली नाहीच. त्यानंतर आयुष्यात कधी चीज केक खाऊ शकले नाही..

छळछावणीबद्दलच्या आठवणी तिनं लिहून ठेवल्या आहेत. ती लिहिते, ‘‘आम्हाला ‘गॅस चेंबर’च्या धुरानं वेढलेल्या स्मशानभूमीजवळ दोरखंडानं बांधून  ठेवलेलं होतं. त्या छावणीसमोरून जाणाऱ्या वाटेला आम्ही ‘नरक हायवे’ म्हणायचो. कारण तो गॅस चेंबरकडे नेणारा रस्ता  होता. सांगण्यासारखं खूप दाटलंय मनात. पण माझे लिहिते हात डोक्यातल्या वादळापुढे तोकडे पडतात.’’ १९४५ मध्ये ब्रिटिशांच्या मध्यस्थीनं छळछावण्यांतील कैद्यांची मुक्तता झाली खरी, पण बाहेर पडल्यावर कुठे जायचं हा मोठा प्रश्न होता. कोवळ्या वयात इतकं  टोकाचं क्रौर्य पाहिल्यानं कु णावर विश्वास बसणार तरी कसा? ती परंपरागत भटकण्याच्या वारशानुसार वेगवेगळ्या गावांतून फिरत राहिली, वेगवेगळी नावं धारण करून. फ्रँ कफु र्ट ते व्हिएन्नामधलं ८०० किलोमीटरवरचं अंतर तिनं दोन भावांबरोबर लपतछपत पायी पार केलं. सोबतीला होता हातावर निळ्या शाईनं गोंदलेला कैदी क्रमांक- जो आयुष्यभर वागवावा लागणार होता.

ती व्हिएन्नात परतली खरी पण मनावरचं भयाचं सावट जायला वयाची पन्नाशी उलटावी लागली. याला एक कारण, की रोमा जमातीत स्वत:च्या दु:खाबद्दल किंवा वाटय़ाला आलेल्या अन्यायाबद्दल कु ठेही वाच्यता करायची नाही, नशीब समजून ते स्वीकारायचे, असा अलिखित दंडक होता. तो मोडून आपली कहाणी जगाला सांगायची हिंमतच नव्हती, अगदी आता आपण सुरक्षित आहोत ही भावना मनात स्थिरावल्यानंतरही. त्यामुळे कु ठल्याही नोंदी, खाजगी कागदपत्रं वगैरे अस्तित्वात असणं आणि असल्यास इतर कु णाच्या हाती लागणं अशक्यप्राय होतं. मानवी हक्कांसाठी ही कोंडी फोडण्याचं काम धैर्याचं. मुला-नातवंडांना तरी चांगलं जगता यावं, म्हणून सेजानं पुढाकार घेतला आणि आजवर तिच्या स्वत:च्या मुलांनाही न सांगितलेली कहाणी तिच्या पुस्तकातून मांडायला सुरुवात

के ली. छळछावण्यांचा अन्याय संपला असला तरी पुढचं आयुष्य तिलाच उभं करायचं होतं. त्यासाठी काही र्वष दारिद्रयाचा सामना करायला दारोदार कापड आणि विणलेल्या सतरंज्या विकत गुजराण केली. पण त्याच वेळी व्हिएन्नातल्या छोटय़ाशा अपार्टमेंटमध्ये अस्वस्थ मनानं बसून, बोटांनी, लोकांनी फेकलेल्या तुटक्या ब्रशने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काटक्यांनी मनातली खदखद बाहेर काढणारी चित्रं काढायला सुरुवात केली. १९८८ ते २०१२ या कालखंडात १२०० हून अधिक चित्रं तिनं काढली. त्यात बार्बेड म्हणजे काटेरी- तारांची कुंपणं, काळा धूर ओकणाऱ्या चिमण्या, सुक्या गवताचे भारे, कावळे, रेल्वेचे रूळ, नाझी स्वस्तिक आणि बिन चेहऱ्याची माणसं ही पुन:पुन्हा काढलेली रेखाटनं होती. त्याच दरम्यान ती लिहा-वाचायला शिकली आणि वह्य़ांत आठवतील तशा नोंदी करायला सुरुवात केली होती.

लिखाणाच्या सुरुवातीबद्दल सेजा निव्र्याजपणे म्हणते, ‘‘माझ्या मनातलं खदखदणारं ऐकायला कु णी श्रोता नव्हता पण ज्याच्यावर लिहीत होते तो कागदच ते सारं धीरानं ऐकू न घेत होता.. मनात दाबून ठेवलेल्या किंकाळ्या त्यानं शोषून घेतल्या, मला परत एकसंध व्हायला मदत केली.’’

चित्रांचे सरळसरळ दोन भाग करता येतात- प्रकाशातली चित्रं (आनंदी क्षणांची) आणि काळोखातली चित्रं (दु:खाची). दु:खाच्या चित्रांत माणसांच्या तनमनात भिनलेलं दु:ख. खोलवर रुतलेली वेदना वाहती करणारी ही सगळी चित्रं आणि जमतील तशा खरडून ठेवलेल्या नोंदीचा सुगावा जर्मन वृत्तचित्रकर्त्यां कारीन बर्जरला लागला आणि तिनं तीन माहितीपटांद्वारे सेजाची कहाणी जगापुढे आणली. मग सेजा आणि तिच्या दोन्ही भावांनीही आपापली कहाणी मांडणारी पुस्तकं लिहिली. सेजाच्या १९८८, १९९२ आणि २००५ मध्ये लिहिलेल्या अशा तिन्ही पुस्तकांचे वेगवेगळ्या युरोपियन भाषांमध्ये अनुवाद झाले आणि चित्रं  जगभरातल्या आर्ट गॅलरी आणि संग्रहालयांमध्ये तिच्या कहाणीसह जाऊन पोहोचली. पॅरिसमध्ये तर अघटितच घडलं. सुप्रसिद्ध कला संग्राहक आंतोन दि गालबर्टना २०१३ मध्ये सेजाची चित्रं आणि समग्र कहाणी हाती लागली. तेव्हा ते तोटय़ात चाललेली त्यांच्या मालकीची ‘ल मॅझोनरुं’ ही कलासंस्था बंद करण्याच्या मार्गावर होते. पण ही चित्रं आणि सेजाच्या संघर्षांनं ते इतके भारावून गेले, की संस्थेला तिलांजली देण्याचा विचार बदलून

त्यांनी सहा महिने सेजाची चित्रं, पुस्तकं आणि तिच्यावरच्या फिल्म्स यांना बहाल करून टाकले. सेजाची चित्रं तिच्या

मनात खोल रुतून बसलेल्या संताप आणि शरमेनं धगधगत आहेत, असं त्यांना जाणवलं होतं.

‘‘इतकं सगळं घडूनही सेजा कडवट झालेली नव्हती हे विशेष. आपण काही विशेष केलं असंही तिला जाणवत नसावं. वाटय़ाला आलेल्या आयुष्याची चिरफाड न करता त्याला तोंड देणं, ही तिच्या लेखी एक सहज बाब होती. त्यामुळेच कदाचित तिची विनोदबुद्धी आणि इतरांसाठी चांगलंच चिंतण्याचा स्वभाव शाबूत होता,’’ असं कारीन तिच्या एका मुलाखतीत सांगते.  मिळालेल्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेची सेजानं कधी कल्पना न केल्यानं तिला कशाचाही हव्यास नव्हता. २००१ मध्ये या स्वशिक्षित कलाकाराला तिच्या देशानं कलेसाठीचं राष्ट्रीय सुवर्णपदक देऊन गौरवलं. तेव्हाही, ‘‘माझी चित्रं या बहुमानाला पात्र ठरली यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. कलेचे कुठलेच मानदंड मला अजूनही नीटसे माहीत नाहीत. पण दुसऱ्या महायुद्धाच्या पर्वातील सिंती नरसंहाराच्या संदर्भासकट  माझी वेदना या चित्रांनी लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्यातून जर्मनी आणि ऑस्ट्रियात अन्याय खोडून काढण्यासाठी ठोस उपाय अमलात आलेले माझ्या हयातीत बघायला मिळाले, तर सगळं भरून आल्यासारखं वाटेल,’’ एवढंच तिला हवं होतं. ते मिळालंही. प्रचंड किंमत आधीच मोजली गेली होती. वेगवेगळ्या देशांकडून तिला सन्मानित करण्यात आलं. टेट, मोमा, म्युनिक पिनाकोथेकसारख्या अनेक प्रसिद्ध संस्थांमध्ये तिची चित्रं लावली गेली. ज्या देशात तिचं अस्तित्व बालपणीच छळवणूक करून संपवण्याचा निंदनीय प्रयत्न करण्यात आला होता, त्या देशात पन्नासेक वर्षांनी तिची चित्रं सन्मानपूर्वक राष्ट्रीय कलासंग्रहालयात मांडली जावीत हा केवढा मोठा योगायोग!

काही महिन्यांपूर्वी तिच्या सहा चित्रांचा अमेरिकेत लिलाव झाला, किमती जाहीर झाल्या नाहीत, पण  त्यातून रोमांच्या कल्याणासाठी ऑस्ट्रियात एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुढल्या वर्षी निधी जमवण्यासाठी तिच्या पेंटिंग्जचं एक फिरतं प्रदर्शन युरोप व अमेरिकेतल्या  वेगवेगळ्या शहरांतून भरवण्यात येणार आहे.

स्वत:चं लिखाण आणि चित्र तिच्यावरच्या अन्यायावरचा उताराच ठरला असावा म्हणूनच २०१३ मध्ये तिनं शांतपणे अखेरचा श्वास घेतला. इतक्या वर्षांचं अस्वस्थ आयुष्य अखेर शांत झालं. आता उरली आहेत ती तिची चित्रं आणि तिची धगधगती आत्मकथा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:45 am

Web Title: ceija stojka dd70
Next Stories
1 यत्र तत्र सर्वत्र : फॅशन जगत
2 जीवन विज्ञान : चोथायुक्त आहार
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : तू बुद्धी दे!
Just Now!
X