डॉ. राजन भोसले

चौदावं वर्ष हे पौगंडावस्थेतून जात असतानाचं एक असं वर्ष आहे, की ज्या काळात शरीरामध्ये नव्याने संचारणाऱ्या संप्रेरकांचा एक महापूरच जणू मुलांच्या शरीरात ओसंडून वाहत असतो. हे संप्रेरक व्यक्तीच्या विविध अंगप्रत्यांगांवर व शरीरधर्माच्या विभिन्न पलूंवर प्रभावी असे परिणाम घडवून आणत असतात. पौगंडावस्थेतून जाताना संप्रेरकांच्या या झंझावाती संचाराबरोबर स्वत:ला जमवून घेण्यात शरीराला कधी कधी एक-दीड वर्ष तर कधी कधी चारेक वर्षसुद्धा लागू शकतात; पण त्याच काळात गरज असते ती मुलांची मानसिक तयारी करून घेण्याची..

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

मिरचंदानी दाम्पत्य श्रीमंत, पण दोघांचंही शिक्षण जेमतेम दहावीपर्यंतच झालेलं. त्यांचं लग्न थोडं उशिराच म्हणजे पस्तिशीच्या सुमारास झालं. मूल व्हायलाही उशीरच झाला. त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा दयानंद झाला तेव्हा मिरचंदानी स्वत: चाळीसचे झाले होते. मुलाचं संगोपन करण्यात दोघांचा सहभाग व पुढाकार असे. दोघेही थोडे ‘अँग्झायटी प्रोन’ म्हणजेच चटकन कशाचीही खूप चिंता, काळजी करण्याच्या सवयीचे. दयानंद जन्मत: शरीराने थोडा नाजूक होता; पण बुद्धीने मात्र तो हुशार व चाणाक्ष होता. बोलका, उत्साही, मित्रांमध्ये सहज रमणारा, वाचनाची आवड, अभ्यासात चांगला व वर्गात हुशार मुलांमध्ये गणला जायचा.

दयानंद नववीत असतानाच त्याची उंची झपाटय़ाने वाढू लागली. अचानक एके दिवशी त्याचा आवाज फुटला, हातापायांवर झपाटय़ाने केस येऊ लागले. त्याचं पौगंडावस्थेत पदार्पण झालं असल्याची ही लक्षणं आहेत हे स्पष्ट दिसत होतं. पौगंडावस्थेत होणारे हे शारीरिक बदल एका बाजूला होत असतानाच त्याच्या वागण्या-बोलण्यात व स्वभावातही बराच बदल दिसून येऊ लागला. पौगंडावस्थेतून जात असताना अनेक मुलं थोडी उद्धट, उर्मट, तर कधी अतिउत्साही होत जातात. आईवडिलांपेक्षा मित्रांमध्ये अधिकाधिक रमणं, जास्तीत जास्त घराबाहेर राहण्याकडे कल असणं, नवनवीन कपडे घालण्याची सतत इच्छा होणं, असे अनेक बदल मुलांमध्ये दिसून येतात. दयानंदमध्येसुद्धा अशा प्रकारचे बदल दिसून येत होते. आपलं तारुण्यात पदार्पण होतंय याचा आनंद व उत्साह त्याच्या वागण्या-बोलण्यात व राहणीमानात स्पष्ट दिसत होता.

घरची श्रीमंती असल्याने व आईवडिलांचा एकुलता एक असल्याने त्याच्या तारुणसुलभ उत्साहाला घरातून कधीच आळा घातला गेला नाही. शिवाय अभ्यासात हुशार व शिक्षणाकडे असलेला त्याचा ओढा आईवडिलांना सुखावून जात असे. मुलं उच्छृंखल असतील तर त्यांच्यावर बंधनं टाकण्याची गरज पालकांना कधीकधी वाटू लागते; पण दयानंदच्या बाबतीत तशी गरज मिरचंदानी दाम्पत्याला कधी वाटली नाही. म्हणूनच त्याच्यावर विनाकारण बंधनं टाकण्याची चूक त्यांनी पालक म्हणून अजिबात केली नाही. उलट त्याला नियमित पॉकेटमनी देणं, कधी मित्रांबरोबर पार्टी-पिकनिक करायची असेल तर त्यासाठी त्याला पुरेसे वेगळे पैसे देणं, हवं असल्यास घरची गाडी व ड्रायव्हर त्याला वापरू देणं, या व अशा सर्व सोयी आईवडील त्याला आनंदाने पुरवत असत. या सोयीसवलतींचा गैरफायदा दयानंदनेसुद्धा कधी घेतला नाही. त्याला पोहण्याची आवड होती. त्यासाठी जवळच्या क्लबचं सभासदस्यत्व त्यांनी घेऊन ठेवलं होतं.

सर्व काही अगदी सुरळीत व अपेक्षित असं चाललं असतानाच, अचानक नववीच्या दुसऱ्या सहामाहीत दयानंदमध्ये एक नवीन बदल दिसून येऊ लागला. तो गप्प गप्प राहू लागला, उदास दिसू लागला. घरातच जास्त राहणं, बाहेर फारसं न पडणं, एकटं विचार करत बसणं, मित्र नकोत, नातेवाईक नकोत, असं त्याचं वागणं होऊ लागलं. रविवारी वडिलांबरोबर हमखास पोहायला जाणारा दयानंद पोहायलासुद्धा नको म्हणू लागला. नेहमी थोडे ढिले, ढगळ व तेच-तेच कपडे घालणं, खोलीची दारं-खिडक्या सतत बंद ठेवत राहणं, असं तो करू लागला. अभ्यासात त्याचं मन रमेना. त्याच्यात होणारे हे सर्व बदल साहजिकच आईवडिलांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला फॅमिली डॉक्टर व त्यानंतर त्यांनीच सुचवलेल्या एका मनोविकारतज्ज्ञ डॉक्टराकडे मिरचंदानी दयानंदला घेऊन गेले. मनोविकारतज्ज्ञांनी त्याला ‘टीनेज डिप्रेशन’ म्हणजेच ‘पौगंडावस्थेत येणारं नैराश्य’ असं निदान केलं व त्याच्यासाठी ‘अँटी-डिप्रेसन्ट’ पद्धतीची औषधं सुरू केली. ती औषधं घ्यायला सुरुवात करतात दयानंदमध्ये असला-नसलेला उत्साहसुद्धा लुप्त झाला. सतत मरगळ, सुस्ती व झोप येऊ लागली. भूक प्रचंड वाढली व त्याचं वजनही वेगाने वाढू लागलं. त्याच्या वागण्या-बोलण्यात कसलीही सुधारणा दिसणं तर दूरच, पण त्याऐवजी तो अधिकाधिक चैतन्यहीन व निरुत्साही दिसू लागला.

तीन महिने असेच गेले. योगायोगाने पूर्वी शेजारी राहणारे व मिरचंदानींशी जवळचा स्नेह असलेले डांगेकाका व काकू पुण्याहून मिरचंदानींच्या भेटीस आले. दयानंद लहान असताना तो सात वर्षांचा होईपर्यंत डांगे कुटुंब मिरचंदानींच्या शेजारच्या घरात अनेक वर्षांपासून राहत असे. दोन्ही कुटुंबांमध्ये विलक्षण घरोबा व जवळीक होती. सहा वर्षांपूर्वी पुण्याला शिफ्ट झाल्यानंतरही डांगेकाका व काकूंचं येणंजाणं मिरचंदानींकडे नियमित होत असे. घरी आल्यानंतर बोलता-बोलता दयानंदचा विषय निघाला व मिरचंदानींनी डांगेंना दयानंदची सद्य:परिस्थिती सांगितली. त्यावर ‘मी दयानंदशी एकटा बोलू का?’ असं अगदी सहजपणे डांगेकाकांनी सुचवलं. मिरचंदानींनी लगेच त्याला ‘हो’ म्हटलं व डांगेकाका दयानंदला पूर्वीप्रमाणे वरच असलेल्या इमारतीच्या गच्चीवर घेऊन गेले. डांगेकाकांच्या प्रसन्न सहवासात कुठे तरी लहानपणीच्या जुन्या आठवणी, जुनी जवळीक, जुना जिव्हाळा दयानंदच्या भावविश्वातले कोमल सूर हळुवारपणे छेडून गेला व जे आईवडील व डॉक्टरांनाही शक्य झालं नव्हतं ते डांगेकाकांच्या प्रेमळ व समंजस सहवासात होऊन गेलं. प्रथमच दयानंदने आपल्या मनात काही दिवसांपासून बोचत असलेली एक वैयक्तिक विवंचना काकांना बोलून दाखवली.

‘‘काका, काही महिन्यांपासून माझी छाती दोन्ही बाजूला मुलींप्रमाणे वाढत चालली आहे. शर्ट काढताच ती स्पष्टपणे फुगीर दिसते. मला स्त्रियांना असतात तसे स्तन येऊ लागले आहेत. त्यामुळे मी कुणासमोरही शर्ट काढायचं टाळतो. सतत ढिले व ढगळ शर्ट घालतो, जेणेकरून ही गोष्ट उठून दिसणार नाही व कोणाच्या लक्षात येणार नाही. त्यामुळेच पोहायला जायचं मी टाळतो. ‘आता आपलं काय होणार’ असं सारखं माझ्या मनांत येतं.’’ हे सांगता-सांगता दयानंदचा कंठ दाटून आला. काकांनी मायेने त्याला जवळ घेत त्याची पाठ थोपटली व त्याला धीर देत म्हणाले, ‘‘अरे, आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. या गोष्टीवरही नक्कीच उपाय असणार. आपण शोधून काढू. काही काळजी करू नकोस.’’

डांगेकाका व दयानंदमध्ये या संवेदनशील विषयांवरची ही नाजूक चर्चा इतक्या अलगदपणे उकलली जाण्याची ही प्रक्रिया, जी अगदी सहज घडून गेली त्याचं शास्त्रशुद्ध वर्णन समुपदेशनशास्त्रात ‘एंटरिंग इनटु फ्रेम ऑफ रेफरन्स’ अशा शब्दांत केलं आहे. हे कसब काही जणांमध्ये नैसर्गिकपणे असतं. समुपदेशनाच्या अधिकृत प्रशिक्षणांमध्ये मात्र हे कौशल्य विशेष महत्त्व देऊन आवर्जून शिकवलं जात. या घटनेनंतर लगेचच डांगेकाकांनी आपल्या परिचयाच्या डॉक्टर मित्राशी या विषयावर चर्चा केली. त्यावर त्या डॉक्टरांनी या प्रकाराला ‘गायनॅकोमॅस्टिया’ असं म्हणतात, असं त्यांना सांगितलं. या विकारामध्ये पुरुषाचे स्तन स्त्रीप्रमाणे विकसित होत जातात. कधी कधी याची कारणं थोडी गंभीरही असू शकतात. अशी माहिती देत असतानाच त्यांनी मुंबईच्याच एका नामांकित डॉक्टरांचं नाव सांगून त्यांचा याबाबत सल्ला घ्यावा, असं लगेचच डांगेंना सुचवलं.

मिरचंदानी दयानंदला घेऊन त्या डॉक्टरांकडे गेले. ‘‘दयानंदला ‘गायनॅकोमॅस्टिया’ हा विकार झाला असून त्याला डिप्रेशनची औषधंही चालू आहेत’’ अशी प्राथमिक माहिती त्यांनी या डॉक्टरांना दिली. ही माहिती देताच डॉक्टरांनी अगदी पहिलाच व खूप सूचक, महत्वाचा असा एक प्रश्न दयानंदला स्मित देत विचारला, ‘‘तुझं वय किती दयानंद?’’ ‘‘चौदा.’’ दयानंद उत्तरला. दयानंदचं उत्तर ऐकताच डॉक्टर म्हणाले, ‘‘दयानंदला गायनॅकोमॅस्टिया हा विकार नाही व त्याला नैराश्याच्या औषधांचीसुद्धा अजिबात गरज नाही!’’

इतक्या चटकन डॉक्टर या अनुमानापर्यंत कसे पोहोचले हे मिरचंदानींना कळेना. त्यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण केलं. ‘‘चौदावं वर्ष हे पौगंडावस्थेतून जात असतानाचं एक असं वर्ष आहे, की ज्या काळात शरीरामध्ये नव्याने संचारणाऱ्या संप्रेरकांचा एक महापूरच जणू मुलांच्या शरीरात ओसंडून वाहत असतो. हे संप्रेरक व्यक्तीच्या विविध अंगप्रत्यांगांवर व शरीरधर्माच्या विभिन्न पलूंवर प्रभावी परिणाम घडवून आणत असतात. अनेकदा शरीरातले काही टिश्यू (पेशीपुंज) या संप्रेरकांनी प्रभावित होत असतानाच कधीकधी ‘ओव्हर रिअ‍ॅक्ट’ करतात म्हणजेच प्रतिसादाच्या मर्यादा ओलांडून अभिव्यक्त होतात. अशा अतिसंवेदनशील व अतिप्रतिक्रियाशील टिश्यूंपैकी एक म्हणजे ‘स्तनांचा पेशीपुंज’ (ब्रेस्ट टिश्यू).

पौगंडावस्थेतून जाताना संप्रेरकांच्या या झंझावाती संचाराबरोबर स्वत:ला समायोजित (अ‍ॅडजस्ट) करण्यात शरीराला कधी कधी एक-दीड वर्ष, तर कधीकधी चारेक वर्षसुद्धा लागू शकतात. या काळात शरीराला निर्विघ्नपणे या स्थित्यंतरातून जाऊ द्यावं लागतं. दयानंदच्या बाबतीत म्हणाल तर त्याचं ‘चौदावं वर्ष’ हे वयच ही गोष्ट सूचित करतंय. सुमारे आठ ते दहा टक्के मुलांमध्ये या वयात मुलगा असूनही त्यांचे स्तन फुगीर दिसू लागतात. यासाठी कुठल्याही उपाययोजनांची खरं तर गरज नसते. स्तनांचा हा फुगीरपणा वर्ष-दीड वर्षांनी स्वत:हून कमी होतो. याला ‘गायनॅकोमॅस्टिया’ म्हणत नाहीत. ‘गायनॅकोमॅस्टिया’ हा एक अगदी वेगळा प्रकार आहे व त्याची कारणंही वेगळी असतात. गायनॅकोमॅस्टिया हा अपरिवर्तनीय (इर्रिवर्सिबल) असतो. त्याची अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागते.’’

डॉक्टरांचं स्पष्टीकरण ऐकूनही मिरचंदानी साशंक दिसत होते; पण त्यांनी पुढे काही म्हणायच्या आत डॉक्टरांनी स्वत:च ‘मी आता दयानंदची तपासणी करतो’ असं म्हटलं व हळुवारपणे दयानंदची यथासांग तपासणी केली. तपासणी करताच दयानंदकडे पाहून सहज स्मित करत डॉक्टर म्हणाले, ‘‘दयानंद अगदी नॉर्मल आहे. त्याला कुठल्याही उपाययोजनांची गरज नाही. वर्ष-दीड वर्षांत त्याच्या स्तनांचा उभार आपोआप कमी होईल.’’

‘‘दयानंदला नैराश्याची औषधं सुरू करणं याला तर घोडचूकच म्हणावं लागेल.’’ डॉक्टर ठासून म्हणाले. दयानंद एका समृद्ध व समाधानी कुटुंबात वाढलेला मुलगा होता. आई-वडिलांनी त्याला आनंदी वातावरण दिलं होतं. त्याला साजेसं असं वर्तन व प्रतिसाद दयानंदनेही आपल्या वागण्यातून दिला होता. दयानंदला नैराश्याची औषधं देणाऱ्या त्या आधीच्या मनोविकारतज्ज्ञांनी दयानंदच्या विवंचनेचं मूळ कारण समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न अजिबात केला नव्हता. सरधोपटपणे डिप्रेशनचं निदान करून, एका चौदा वर्षांच्या मुलाला एका सामान्य गोष्टीसाठी थेट नैराश्यावरची औषधं सुरू करणं हे निर्वविादपणे गरच होतं.

डॉक्टर म्हटले होते अगदी तसंच झालं. दीडेक वर्षांत दयानंदची समस्या काहीही न करता आपोआप लुप्त झाली व पुरुषांना असतात तसे केसही त्याच्या छातीवर उगवले. दयानंद पुन्हा उत्साहाने पोहायला जाऊ लागला व त्याचं तारुण्यसुलभ आनंदी स्वरूप पुन्हा बहरू लागलं.

पौगंडावस्थेतून जात असताना मुलामुलींमध्ये अनेक स्थित्यंतरं होत जातात. या स्थित्यंतरांसाठी त्यांची मानसिक तयारी करून घेणं ही पालकांचीच जबाबदारी आहे. मुलं त्या वयात उदास व चिंतित होण्यास अनेक वेळेला त्याची कारणं त्यांच्यात घडून येणाऱ्या अशा प्रकारच्या बदलांबाबत ती अनभिज्ञ असणं किंवा त्यांच्या मनांत स्वत:बद्दल काही तरी गैरसमज रुजलेले असणं अशीच असतात. त्या वयात ‘आपण नॉर्मल आहोत’ याची वारंवार हमी देतील अशी हक्काची माणसं त्यांना हवी असतात. म्हणूनच पालक आणि मुलांमध्ये मोकळ्या वातावरणात सातत्याने सुसंवाद होत राहणं हे अगत्याचं आहे, जेणेकरून मनातल्या विवंचनांना व्यक्त करण्याचे मार्ग खुले राहतील.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे; पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com