11 August 2020

News Flash

यत्र तत्र सर्वत्र : बदल- स्वत:पासून जगापर्यंत

स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असा महात्मा गांधींचा कायम आग्रह असायचा.

‘सफराज मूव्हमेंट’

प्रज्ञा शिदोरे

pradnya.shidore@gmail.com

स्त्रियांनी जगभरातल्या, अनेक विषयांवरच्या चळवळींमध्ये कायम मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला आहे. विरोधाच्या, चळवळींच्या अनेक अनोख्या पद्धती यापुढेही वापरल्या जातील. परंतु स्त्रिया आणि चळवळी याकडे बघताना, आपण या एकटय़ादुकटय़ा पण दृश्य अशा उदाहरणांच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करायला हवा..

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी ‘दंगलसदृश परिस्थिती’ निर्माण करण्याच्या संशयावरून डिसेंबर महिन्याच्या मध्यावर हल्लाच चढवला. तिथल्या ग्रंथालयाचीही नासधूस केली. अनेक विद्यार्थी या पोलिसांच्या हल्ल्यात जबर जखमी झाले. या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले. दिल्लीच्या जामिया नगरमधील नागरिकांना या घटनेचा निषेध नोंदवायचा होता. त्यांच्या वस्तीच्या जवळपासच्या मदानात निषेधाच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. सगळ्यांनाच वाटलं की कोणत्याही निषेध सभेप्रमाणे काही तास बसून, घोषणा देऊन ही सभा संपून जाईल. पण आज, जेव्हा मी हा लेख लिहायला बसले आहे तेव्हा, दिल्ली येथील शाहीनबागमध्ये, जबर थंडीत ‘जामिया’मधील हिंसाचाराच्या निषेधार्थ स्त्रिया ठिय्या मारून बसल्या आहेत, याला ४५ दिवस झाले आहेत.

शाहीनबागमधील स्त्रियांचा आवाज हा संपूर्ण देशाने ऐकला. तिथल्या स्त्रिया म्हणतात की जोपर्यंत केंद्र सरकार नागरिकता कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आज केंद्र सरकारच्या नागरिकता कायद्याविरोधी आंदोलनाचा तो केंद्रिबदू ठरतो आहे.

स्त्रियांचा आंदोलनातला असा सहभाग आपल्यासाठी नवीन नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असा महात्मा गांधींचा कायम आग्रह असायचा. कदाचित केवळ मिठाचा सत्याग्रह असा असेल की जेव्हा त्यांनी स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी होऊ नये, असे सुचवले होते. ज्या स्त्रियांना थेट आंदोलनांमध्ये सहभागी व्हायचं नसेल तर सत्याग्रहींना पूरक साहित्य तयार करण्याचं काम त्यांनी हाती घ्यावं, असं ते म्हणत. त्यातूनच चरखा हा स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकसहभागाचं प्रतीक बनला. सूत कातून खादी कापडाची वस्त्रे शिवणे हेही आंदोलनांमध्ये सहभागी होण्याएवढंच महत्त्वाचं आहे, असं त्यांचं मत होतं. आंदोलनातल्या स्त्रिया जर तुरुंगात गेल्या तर त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी आश्रमात शिक्षणाचे बरेच नवे प्रयोग सुरू केले. कोणत्याही चळवळीत लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्या रोजच्या गरजांचाही विचार करावा लागतो आणि स्वातंत्र्याच्या अशा दीर्घकाळ चालणाऱ्या चळवळीत तर तसा विचार नक्कीच लागतो. गांधीजींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांच्या सहभागाची अनेक साधनं शोधून काढली.

समाजशास्त्रातील काही नव्या संकल्पना असं सुचवतात की सध्याच्या ‘कलेक्टिव्ह आयडेंटिटी’च्या जमान्यात कोणत्याही निषेधाला, चळवळीला, जेंडर किंवा लिंगभावाच्या काळ्या-पांढऱ्या चष्म्यातून बघू नये. कारण विरोध करणं ही कोणत्याही मानवाची प्रवृत्ती आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष. पण चळवळींना स्त्रीवादाच्या, लिंगभावाच्या चष्म्यातून पाहिलं तर कोणत्याही बदलाची अपेक्षा करताना आपण समानतेचा धागा तर निसटू देत नाहीना हे कळायला मदत होते.

गेल्या काही वर्षांतली आंदोलने आणि चळवळी पाहिल्या तर स्त्रियांचा वाढलेला सहभाग ही स्वागतार्ह बाब प्रकर्षांने जाणवते. जगभरात ज्या मोठय़ा चळवळी उभ्या राहिल्या, राहत आहेत, जे निषेध नोंदवले जात आहेत, त्यापैकी अनेक चळवळींचं नेतृत्वही स्त्रियांनीच केलं आहे, असं दिसून येतं. मग अमेरिकेत समानतेचं बीज रोवणाऱ्या रोझा पार्कस् असोत, जगाचा प्रकल्प बाधितांविषयीचा, त्यांना दिल्या जात असलेल्या मोबदल्याविषयीचा दृष्टिकोन बदलणाऱ्या मेधा पाटकर असोत, पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवणारी मालाला युसुफजाई असो किंवा वातावरण बदलाविषयी जगाला पुन्हा एकदा जागं करणारी १७ वर्षांची ग्रेटा थनबर्ग असो!

स्त्रिया आणि चळवळींचा विचार करताना सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात त्या स्त्रियांनी स्त्रियांना न्याय हक्क मिळावेत यासाठी १९ व्या शतकाच्या शेवटाला सुरू केलेल्या चळवळी. त्यामध्ये सर्वप्रथम युरोपात सुरू झालेल्या ‘सफराज मूव्हमेंट’चा मोठा वाटा आहे. या चळवळीची मुख्य मागणी म्हणजे स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच ‘पूर्ण नागरिक’ बनण्याचा हक्क मिळावा ही. जसजशी जगभरात राजेशाही जाऊन हळूहळू विविध देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित होत गेली तेव्हा मतदानाचा हक्क केवळ पुरुषांनाच होता. स्त्रिया आणि अर्थातच गुलामांना तो हक्क डावलला गेला होता. स्त्रियांच्या न्याय्य हक्कांसाठी समाजाच्या सर्व थरांमधून स्त्रिया आंदोलनांमध्ये सहभागी होऊ लागल्या. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंडमध्ये ही चळवळ विसाव्या शतकात जोर धरू लागली आणि मग ती जगभर पसरली. न्यूझीलंड स्त्रियांना मतदानाचा हक्क देणारं पहिलं मोठं राष्ट्र ठरलं, त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही स्त्रियांना हे हक्क बहाल केले.

यानंतरच्या स्त्रीवादी चळवळींनी विरोधाच्या पद्धतींमध्ये खूपच विविधता आणली. यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेला असा ‘ब्रा बìनग प्रोटेस्ट’. १९६८ च्या सप्टेंबर महिन्यात ‘मिस अमेरिका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे स्त्री सौंदर्याचे निकष केवळ पुरुषांच्या नजरेतून ठरवले जातात आणि त्यामुळे हे निकष सर्वच ठिकाणी लादले जातात, असा त्यांचा विरोधाचा मुद्दा होता. हा विरोध नोंदविण्यासाठी ४०० हून अधिक स्त्रिया अमेरिकेतील अटलांटिक सिटीमध्ये जमल्या होत्या. त्या सर्वानी एकत्र येऊन मग स्त्रीला ‘सुंदर’ दिसण्यासाठी जखडून ठेवणाऱ्या सर्व वस्तू जसं- उंच टाचेच्या चपला, मेकअप, अंतर्वस्त्र अशा गोष्टी ‘स्वातंत्र्यासाठीच्या कचरापेटीत’ भिरकावून दिल्या. या ठिकाणी प्रत्यक्षपणे या सर्व साहित्याची होळी करण्यात आली नाही, पण तरी या घटनेला माध्यमांनी मोठय़ा प्रमाणात उचलून धरले. अशा पद्धतीचा विरोध अमेरिकेत अनेक ठिकाणी केला गेला. तिथे मात्र या साहित्याची होळी करण्यात आली. म्हणून आजही या प्रकारच्या विरोधाला ‘ब्रा बìनग प्रोटेस्ट’ या नावानं ओळखलं जातं.

याच्याशी थोडं साधम्र्य असलेली विरोधाची पद्धत मंगलोरमध्ये बघायला मिळाली. या कँपेनचं नाव ‘पिंक चड्डी कँपेन! ६ फेब्रुवारी २००९ मध्ये मंगलोरमध्ये श्रीराम सेनेच्या काही स्वयंघोषित ‘संस्कृतीरक्षकांनी’ पबस्मध्ये जाणाऱ्या मुलामुलींवर हल्ले केले. कारण काय, तर पब ही भारतीय संस्कृती नाही आणि मुलींनी तिथे जाणं हे भारतीय संस्कृतीवर घाला ठरतं, म्हणून. या पुढे जाऊन त्यांनी ‘व्हेलेंटाईन्स डे’ ला जर कुणी मुलगा आणि मुलगी एकत्र फिरताना दिसले तर त्यांचं लग्न लावून देऊ.’ अशी घोषणाही केली. या प्रकाराला ‘तेहेलका’ मासिकाच्या निशा सुझन यांनी उत्तर द्यायचं ठरवलं. त्यांनी या विद्वेषाचा सामना प्रेमाने करायचा ठरवला. त्यांनी त्यांच्या ‘श्रीराम सेने’च्या प्रमोद मुतालिक यांच्या कार्यालयात १४ फेब्रुवारीला प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबी चड्डय़ा पाठवायचं ठरवलं. ‘फेसबुक’ व इतर समाज माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ दिवशी शहरभरातून आलेल्या गुलाबी अंतर्वस्त्रांचे ढीग त्यांच्या कार्यालयात पाठवले गेले. या अशा वेगळ्याच प्रकारच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी पुढचे अनेक दिवस आपापल्या शहरातून कुरियरने अंतर्वस्त्रांचे ढीग पाठवायला सुरवात केली. अशा शांततापूर्वक, पण अतिशय अपमानास्पद आंदोलनाला कंटाळून शेवटी प्रमोद मुतालिक यांनी या आंदोलकांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली.

असंच काहीसं २०११ मध्ये कॅनडामध्ये घडलं. टोरांटोमधल्या योर्क युनिव्हर्सिटीमध्ये स्वसंरक्षणावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात मायकल सांगीनेटी या पोलीस अधिकाऱ्याने ‘जर बायकांना त्यांच्यावर होणारे अत्याचार टाळायचे असतील तर वेश्येसारखे कपडे घालणं बंद केलं पाहिजे,’ असं विधान केलं. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने हे विधान करणं निश्चितच पटण्यासारखं नव्हतं. या कार्यक्रमाच्या संयोजिका सोनिया बारनेट आणि हेदर हार्वसि यांनी याचं उत्तर याच शब्दात द्यायचं ठरवलं. त्यांनी आयोजन केलं एका ‘स्लट वॉक’चं. सोनियाच्या मते, स्त्रियांना कायमच त्यांच्या बाह्य़ रूपावरून जोखलं जातं. हा ‘स्लट वॉक’ पुरुषी मानसिकतेच्या विरोधात आयोजित केला होता. पुढे जगभरातल्या अनेक शहरांमध्ये असे ‘वॉक्स’ आयोजित केले गेले.

अलीकडे सोशल मीडियाच्या साहाय्याने आंदोलनं गाजताहेत. अशाच प्रकारे जगाचं लक्ष वेधून घेणारी आला सलाह ही सुदानमधल्या उठावाचं प्रतीक बनली. डिसेंबर २०१८ मध्ये सुदानमध्ये ओमर अल-बशीर या लष्करी हुकूमशहाच्या ३० वर्षांच्या जाचक सत्तेविरोधात आंदोलनं सुरू झाली. २२ वर्षीय आला सलाह त्यावेळी  सुदानची राजधानी खारतूममध्ये स्थापत्यशास्त्राचं (आर्किटेक्चर) शिक्षण घेत होती. जवळजवळ रोज सकाळी ती तिच्या आजूबाजूला अल-बशीरच्या सत्तेच्या विरोधात मोर्चे, आंदोलनं बघत होती. या विरोधाचा भाग म्हणून तिने ७-८ स्त्रियांसमोर बदलाविषयी – क्रांतिविषयी एक कविता म्हणून दाखवली. सुदानमध्ये ही कविता आंदोलकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण याचा वापर आजपर्यंत मोर्चामधली घोषणा म्हणून केला नव्हता. लोकांना या कवितेमधली, ‘बंदूक जीव घेत नाही. जीव जातो तो जनतेच्या गप्प बसण्याने’ ही ओळ अतिशय भावली आणि हळूहळू लोकं या मोर्चामध्ये सहभागी होऊ लागले. याबरोबरच आला ही कविता चौकाचौकात, कधी गाडय़ांच्या टपावर तर कधी छोटय़ा चौथऱ्यावर उभं राहून मोठय़ाने गाऊ लागली, आणि ही कविता या आंदोलनाचा केंद्रिबदू ठरू लागली. अशाच एका प्रसंगी कुणीतरी तिचा व्हिडीओ ‘ट्विटर’वर टाकला. गाडीच्या टपावर उभं राहून जोराजोरात गाणं म्हणणारी आलाची ही प्रतिमा खूपच प्रसिद्ध झाली. आंदोलनाच्या वेळी आलाने जो पोशाख परिधान केला आहे, तोही खूप बोलका आहे. आंदोलनाच्या वेळी ती ‘टूब’ हा पारंपरिक पोशाख वापरणं पसंत करते. या ‘टूब’मुळे आम्हा स्त्रियांना कंदाकसची आठवण होते, असं ती म्हणते. ३००० वर्षांपूर्वी कंदाकस येथे जे न्यूबीयन राज्य होते त्या राणीचा पोशाख आहे. तिचे मोठे गोल चकतीसारखे कानातले, ज्याला ते ‘मून इयरिरग्ज’ म्हणतात, तसे कानातले सत्तेत असणाऱ्या स्त्रियाच परिधान करतात. आणि सामान्यत: हे कानातलं आई तिच्या मुलीला देत असते. या कवितेच्या ओळींबरोबरच तिचा तो पारंपरिक पोशाखही हा आंदोलनाचा पोशाख बनला आहे.

याच प्रकारे समाजमाध्यमांचा आधार घेऊन ‘मी टू’ चळवळ पुढे आली. २००६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये राहत असलेल्या तराना बर्क या समाजसेविकेला एका लहान मुलीने पेचात टाकलं. तरानाने २००३ मध्ये ‘जस्ट-बी’ नावाची सामाजिक संस्था सुरू केली होती. त्यामध्ये आफ्रिकी अमेरिकी मुलींना व्यक्तिमत्त्व विकासात मदत केली जायची. या संस्थेत एका लहान मुलीने, तिच्या आईचा मित्र तिच्यावर लैंगिक अत्याचार करतो, असं सांगितलं. या विषयाबद्दल नक्की काय आणि कसं बोलायचं हे तरानाला माहीत नव्हतं. तेव्हा ती त्या मुलीला काही उत्तर देऊ शकली नाही. नंतर तराना म्हणते, ‘‘मी कदाचित तिला, हो मी पण समदु:खी आहे, असं सांगितलं असतं तरी चाललं असतं.’ आणि याच भावनेने तरानाने ‘मायस्पेस’ या समाजमाध्यमावर, स्वत:वर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी सर्वाना मोकळेपणाने बोलता यावं यासाठी २००६ मध्ये ‘#मी टू’ चळवळ सुरू केली. या चळवळीला आता १४ वर्षे झाली आहेत. पण गेल्या २-३ वर्षांत जगभरातल्या अनेक सेलिब्रिटीज जेव्हा याविषयी बोलू लागले तेव्हा ही चळवळ सर्वदूर पोहोचली. भारतातही अनेक लोकं याविषयी बोलू लागले. आणि मुख्य म्हणजे हा विषय खुलेपणाने बोलण्याची ऊर्जा अनेकांना मिळाली. तरानाच्या या कामासाठी तिला २०१७ चं ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ हे पारितोषिकही मिळालं आहे.

स्त्रियांनी जगभरातल्या, अनेक विषयांवरच्या चळवळींमध्ये कायम मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला आहे हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून दिसून येईलच. विरोधाच्या, चळवळींच्या अनेक अनोख्या पद्धती यापुढेही वापरल्या जातील. पण स्त्रिया आणि चळवळी याकडे बघताना, आपण या एकटय़ादुकटय़ा पण दृश्य अशा उदाहरणांच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करायला हवा. स्त्रीवादी चळवळींचा यामध्ये आधार घ्यायचा झाला तर ही चळवळ एक राजकीय चळवळ म्हणून पुढे आली. पण एक विचार म्हणून ही चळवळ सुरू झाली ती स्वत:मधल्या बदलांमधून. ‘हे असंच असतं, बाई म्हणून आपण अशा एका पद्धतीने वागायचं असतं.’ या विचारांमधल्या बदलांमधून. येत्या काळात स्त्रिया  या समाजाचं दडपण न घेता, आपलं विचारस्वातंत्र्य मांडण्याच्या, ते आपल्या कृतीमधून दर्शविण्याच्या आणि त्यासाठी तसा समाज घडवण्याच्या अशा धोरणात्मक बदलांच्या चळवळींमध्ये अधिक दिसतील, असं वाटतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2020 12:09 am

Web Title: change from self to world yatra tatra sarvatra chaturang abn 97
Next Stories
1 गद्धेपंचविशी : मुंबईला जायचं राहिलंच..
2 वेतन समानतेचा लढा!
3 गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘संशोधनकौशल्यावर भर हवा’’
Just Now!
X