News Flash

चेंज मेकर्स – ड्रॉप

भारतात ग्रामीणच काय अगदी शहरी भागातही पाणीटंचाई वा पाणी येण्याच्या अनियमित वेळा या गोष्टी नव्या नाहीत.

| January 10, 2015 02:10 am

पश्चिमेकडचे प्रगतीचे वारे भारतासारख्या विकसनशील देशात पोहोचायला बराच अवधी लोटतो. मग इथल्या समस्या, संकटं आणि आव्हानांचे काय? या समस्या आपापल्यापरीने बदलण्यासाठी, तरुणाईचे काही हात प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. संशोधनाद्वारे वा प्रयोगशील वाटांना धुंडाळत त्यावर उपाय शोधण्यासाठी चाचपडत का होईना पुढे जात आहेत. सरकार काही करेल, सामाजिक संस्था मदतीचा हात देतील या आशेवर विसंबण्यापेक्षा स्वतच बदलाचा चेहरा होऊन, उत्तर शोधण्याची धडपड असलेली सोशल आंत्रप्रनर्सची एक साखळी तयार होते आहे. आशादायी उद्याची हमी देणाऱ्या, चौकटीबाहेर विचार करणाऱ्या तरुणींची दखल घेणारे हे सदर दर पंधरा दिवसांनी.
पाण्याची वाट पाहात तासन्तास वाया घालवणाऱ्या हुबळीकरांची अखेर या त्रासातून सुटला झाली ती ‘नेक्स्ट ड्रॉप’ या सेवेमुळे. कर्नाटकच्या अनू श्रीधरन या तरुणीने मोबाइलद्वारे संपर्कक्रांती घडवण्याचा एक नवा आयाम शोधला आणि आपणही चेंज मेकर होऊ शकतो हे सिद्ध केलं.

भारतात ग्रामीणच काय अगदी शहरी भागातही पाणीटंचाई वा पाणी येण्याच्या अनियमित वेळा या गोष्टी नव्या नाहीत. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या बातम्या तर गेली अनेक वर्षे सातत्याने येत आहेत. मात्र पाणीटंचाई वा पाण्याच्या अनियमिततेचे सावट हे कायमच राहणार, या आपण गृहीत धरलेल्या वा आपल्या अंगवळणी पडलेल्या मानसिकतेला आव्हान दिले एका तरुणीने आणि एका कल्पक योजनेचा जन्म झाला आणि ही समस्या कायमची सुटली.
शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून ‘सिव्हिल सिस्टीम्स इंजिनीअरिंग’मध्ये मास्टर्स केलेली अनु श्रीधरन ही २६ वर्षांची तरुणी भारतातील पाणीटंचाई व पर्यायाने उद्भवलेल्या पाण्याच्या अनियमित वेळांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकली आणि तिच्या या दृष्टिकोनामुळे कर्नाटकातल्या हुबळीमध्ये ‘नेक्स्ट ड्रॉप’ हा लोकांच्या परवलीचा शब्द बनला.
 ch10सोप्या भाषेत या सेवेची किमया सांगायची म्हणजे ‘नेक्स्ट ड्रॉप’तर्फे हुबळीतील सुमारे ७५ हजार घरांना त्यांच्या विभागात, किती वाजता पाणी येणार याची साधारण तासभर आधी सूचना मिळू लागली. तीही थेट मोबाइल एसएमएसच्या स्वरूपात. प्रगत तंत्रज्ञानाचा, तितकाच प्रगत व सुखद असा हा आविष्कार!
त्याचे झाले असे, कॅलिफोर्निया विद्यापीठाचीच एक विद्यार्थिनी एमिली कुम्पेल हिचा पीएच.डी.साठीच्या प्रबंधाचा विषय होता भारतातील अनियमित पाणीपुरवठा. त्यासाठी भारतातील अनेक भागात तिचे दौरे सुरू असत. माहिती गोळा करणे, त्याचे संकलन, कारणमीमांसा अशा निमित्ताने हुबळीशी तिचा परिचय झाला. इतर भागातील पाण्याच्या समस्येपेक्षा इथली समस्या तिला अधिक गंभीर वाटली.
पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कधी सोडले जाईल, याची नागरिकांना माहिती नसायची, तर अनेकदा सांगितलेल्या वेळेत पाणी यायचेच नाही. त्यामुळे तासन्तास लोक पाण्याची वाट पाहात घालवत. कुणाची क्लासला-शाळेला दांडी, तर कुणाच्या आंघोळीला चार दिवस सुट्टी. पाणी नसण्याचे हे सावट लोकांच्या दैनंदिन कारभारामधला अडथळा ठरत असल्याचं तिला जाणवलं. परतीच्या प्रवासात तिने ही बाब तिचे प्राध्यापक तपन पारीख यांच्या कानावर घातली. अनेक सहाध्यायींशीही यावर चर्चा केली. त्यावेळी अनु श्रीधरन अमेरिकेच्या एका सामाजिक प्रकल्पात काम करत होती. या बाबीने तिचे लक्ष वेधले. तिचे आईवडील भारतीय. अनू मात्र तिकडेच लहानाची मोठी झालेली, ch11पण भारतीयत्वाची नाळ कुठे तरी घट्ट जुळलेली असावी. म्हणूनच तर हुबळीतील पाणीसमस्येवर उपाय शोधण्यासाठी, पाच आकडी पगाराची नोकरी सोडून ती थेट हुबळीत दाखल झाली.
सोशल आंत्रप्रनर्स अर्थात सामाजिक कार्याला व्यावसायिकतेची जोड देत, प्रगत तंत्रज्ञान व शिक्षणाचा समाजाला उपयोग करून देणाऱ्या नव्या पिढीची ती प्रतिनिधी! हुबळीत येताच तिने सगळ्यात आधी समस्येचा नेमका वेध घ्यायला सुरुवात केली. स्थानिकांशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाणी कधी येणार हे माहीतच नसल्याने कुणी कार्यालयातल्या महत्त्वाच्या बैठका बुडवल्या होत्या, कुणी जवळची/नातलगांची लग्ने चुकवली होती, तर एका आजींनी भावाचे अंत्यदर्शन घेतले नव्हते. आणि आता ते कायमचेच राहून गेले ही खंत त्यांचं मन पोखरून टाकत होती. एमिलीला वाटलेल्या गांभीर्याची प्रचीती येण्यासाठी अनुसाठी ही उदाहरणे पुष्कळ होती.  
तिने समविचारी गटाच्या मदतीने समस्येचा अभ्यास सुरू केला. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या हुकुमावरून ‘व्हॉल्वमन’ अर्थात पाणी सोडणारे कर्मचारी, त्या त्या विभागातील पाण्याचा पुरवठा सुरू करतात. ही माहिती नागरिकांना मिळेल अशी व्यवस्थाच नसल्याने हा गोंधळ होत होता. ही माहिती नागरिकांपर्यंत सुलभरीत्या वेळेत पोहोचवणे हेच खरे आव्हान होते.
२०१०च्या आसपास इंटरनेटविश्वात क्लाऊड सोर्सिगचे मॉडेल फार चर्चेत होते. कॅलिफोर्नियात ‘नेक्स्ट बस’ नावाची वेबसाइट कार्यरत झाली होती. एखाद्या थांब्यावर पुढची बस किती वेळात येईल, याचा अंदाज त्यावरून प्रवाशांना येत होता व बसची वाट पाहायची की पर्यायी वाहनाने प्रवास सुरू करायचा, हे ठरवणे लोकांना सोपे होत होते. तोच धागा पकडून अनु व तिच्या गटाने ‘नेक्स्ट ड्रॉप’ ही संकल्पना विकसित केली. त्यासाठी त्यांनी मोबाइल फोनचा वापर केला. पाणीपुरवठा विभागाकडून पाणी सोडण्याच्या त्या त्या विभागाच्या वेळा पाहायच्या व ती माहिती लोकांपर्यंत एसएमएसद्वारे पोहोचवयाची. तासभर आधी हा संदेश जात असे. यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान म्हणजे गुगल मॅप्स व क्लाऊड सोर्सिग. पाणीपुरवठा विभागाची माहिती आयव्हीआर सिस्टीमद्वारे (इंटरअॅक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स) एकाच वेळी अनेक ग्राहकांना एसएमएस पाठवण्यास फायदेशीर ठरली. विशेष म्हणजे हे एसएमएस प्रणालीद्वारेच तयार होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचतील. प्रयोगशील तत्त्वावर सुरुवातीला २३० घरांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला. आणि २०१४च्या अखेपर्यंत सुमारे ७५ हजार ग्राहक याचा लाभ घेत आहेत.
कल्पना जरी ‘नेक्स्ट बस’ची असली, तरी ती भारतात राबवताना अनंत अडचणी आल्या. हुबळीतील घरे, त्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक गुगलमॅप्सवर दिसत नव्हते. त्यांची निश्चिती करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्या त्या विभागात पाणी सोडल्यावरही, पाइप फुटणे, पाणीचोरी अशा बाबींमुळे तांत्रिकदृष्टय़ा पाणी त्या त्या विभागात तर पोहोचलेले दिसायचे, पण प्रत्यक्षात नळ कोरडाच असायचा. मग रहिवाशांना संपर्क साधून याची खातरजमा करण्याचे ठरले. तशी सुधारणा प्रणालीत केली गेली.
सेवा घेणे हीसुद्धा अत्यंत सोपी प्रक्रिया ठेवण्यात आली. ‘नेक्स्ट ड्रॉप’ने दिलेल्या क्रमांकावर एक मिसकॉल द्यायचा आणि सेवा सुरू करायची. मात्र पुढे असे लक्षात आले की सगळ्यांनाच लिहिता वाचता येते असे नाही. त्यातही एसएमएस येणार इंग्रजीतून. मग ‘नेक्स्ड ड्रॉप’चा पुढचा टप्पा होता की इंटरअॅक्टिव व्हॉइस मेसेजची सेवा सुरू करण्याचा. या सेवेद्वारे ग्राहकांना कन्नड या प्रादेशिक भाषेत पाणी कधी येणार याची ‘आकाशवाणी’ होऊ लागली.
या सेवेसाठी, पाणीपुरवठा विभागाशी अधिकृतपणे करार करण्यात आला. मात्र रहिवाशांचा या प्रक्रियेतील सहभाग वाढल्याने दुहेरी फायदा झाला. म्हणजे समजा एखाद्या विभागात पाणी दुपारी ३ला पोहोचणार हा एसएमएस           २ वाजता आला. मात्र साडेतीन वाजून गेल्यावरही पाणी आले नाही, की त्या विभागातील कुणीही ग्राहक ‘नेक्स्ट ड्रॉप’कडे उलट फोन करून याची माहिती देणार. पुढची सूत्रे वेगाने हलल्याने, कुठे दुरुस्ती, गळती अशी समस्या असेल तर त्याचा वेध घेणे सोपे व्हायचे. थोडक्यात पाणीवाटपातील छोटय़ा छोटय़ा अडचणीही त्वरित अभियंत्यांपर्यंत पोहोचायच्या व त्यावर कार्यवाही होऊन पाणीवाटपाची व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यास मदत झाली. हा सामाजिक प्रकल्प असल्याने ‘नेक्स्ट ड्रॉप’ची सेवा घेण्यासाठी १० रुपये महिना इतके शुल्क, तर दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांकडून ५ रुपये महिना असे नाममात्र शुल्क आकारले जाते. पूर्णत व्यावसायिक पातळीवर हा प्रकल्प राबवला गेला आहे. आता हुबळीसह धारवाड व बंगळुरूच्या दोन नगरांमध्ये प्रकल्प विस्तारित झाला आहे.
‘नेक्स्ट ड्रॉप’च्या पाणी येण्याच्या आगाऊ सूचनेमुळे स्थानिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. पाणी नसण्याचा ताण घरोघरी स्त्रीवर्गावर अधिक होता, तो कमी झाला व त्यांनाही भिशी, लग्न-मुंजी, मेळावे असे कार्यक्रम निर्धास्तपणे अनुभवता येऊ लागले. पाणी वाटप व्यवस्था कार्यक्षम झाल्याने पूर्वीसारखे घरोघरी टाक्या, बादल्या,फुटके डबे असे मिळेल ते भांडे पाण्याने भरायचे प्रमाण घटले व लगेचच पाणीसाठय़ामुळे उद्भवणारे कॉलरा, डायरिया, मलेरिया अशा आजारांचे प्रस्थ कमी झाले. दैनंदिन जगणे सुसह्य़ करण्यासह सामाजिक चित्र पालटण्यात या प्रकल्पाने मोठाच हातभार लावला.
‘नेक्स्ट ड्रॉप’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले. त्यात बिल गेट फाऊंडेशन, क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह युनिव्हर्सिटी, ग्लोबल सोशल व्हेंचर कॉम्पिटिशन अशा अनेकांचा समावेश आहे. पण या पुरस्कारांपेक्षा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा ही योजना ग्राहकांनी घ्यावी अशी शिफारस केली, तेव्हा अनु व तिच्या सहकाऱ्यांना अप्रूप वाटले.
ज्या सामाजिक बदलाची आपण स्वप्ने पाहात आहोत ती प्रत्यक्षात येण्यासाठी नव्या तंत्रज्ञानासह, नव्या जाणिवांसह तरुणाई पुढे सरसावते, यासारखे सुखद समाधान दुसरे काय असेल?     ल्ल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 2:10 am

Web Title: change maker drop
Next Stories
1 उद्याचे आज : वेदनाशमनाचे तंत्र!
2 कुमारसंभव : आकाशी झेप घेताना..
3 भोगले जे दु:खं त्याला : एक गलती खेल खतम..
Just Now!
X