‘आपल्या स्वत:त काही बदल -चांगले बदल करायचे असतील तर माणसाने स्वत:चे लाड करणे बंद करावे आणि आपण चुकलो त्या क्षणी शब्दांचे जोरदार फटके द्यावेत मनाला. मन सवयीचे गुलाम असते. त्याला वळवण्यासाठी कठोर, प्रसंगी निर्दय व्हावे लागते. आणि त्याचबरोबर आपण ठरल्याप्रमाणे केले तर स्वत:च स्वत:ला बक्षीस द्यावे लागते. मन बदलतेच!’
साल १९९८ असेल. मी त्या वेळी स्व-मदत पुस्तकांच्या वाचनाने भारावलेला होतो. मला प्रत्येक नवे काहीतरी शिकावे वाटे, परंतु प्रत्यक्ष वापरात आणणे इतरांसारखे मला जमत नव्हते. याचा अर्थ मला चांगले, शिस्तशीर वागायचे नव्हते असे नाही, पण बदल करणे मला जरा अवघडच जायचे. त्या वेळी मी ‘बर्निग डिझायर ’ (बहुतेक तेच नाव असावे. चूकभूल देणे घेणे) या पुस्तकाने अत्यंत प्रभावित झालो होतो. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी तुमची केवळ इच्छा पुरेशी नसते तर ज्वलंत ध्यास असावा लागतो असे त्या पुस्तकाचे सूत्र होते आणि तुमची ज्वलंत इच्छा तेवती राहण्यासाठी सदैव भानावर राहायलाच कसे हवे असते ते वारंवार बजावलेले होते. त्याच वर्षी पहिल्यांदा मला रक्तदाबाचा त्रास होऊ  लागला होता. त्यामुळे योगाच्या भाषेत ‘युक्त आहार, युक्त विहार आणि युक्त विचार’ यांची अंमलबजावणी करणे तेव्हा तरी माझी तीव्र ज्वलंत इच्छा होती.
यातला आहार हा भाग बायकोने ताब्यात घेतला होता. त्यात मला स्वत:ला विशेष काही करण्याची फारशी संधीच नव्हती. कमी मीठ, कमी तेल, कमी तूप, तळलेले पदार्थ क्वचित असा माझ्या पथ्याचा डोस ती तंतोतंत पाळत असे. माझ्या रक्तदाबाचे, कोलेस्ट्रोल आणि पोटाचा वाढता घेर यांच्याबरोबरीचे नियंत्रण करण्यासाठी ‘डॉक्टर मी काय खाऊ ’ अशी पुस्तके वगैरे आणली होती. त्यामुळे मला ती जे काही खाऊ  घालेल ते खाण्यावाचून पर्याय नव्हता. प्रश्न होता युक्त विहाराचा. मला डॉक्टरांनी योगा वर्गाची मेडिकल बॅच करावी असे सांगितले. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर मी गेलो. तिथे समजले महिन्याच्या मध्यावर नवीन प्रवेश नाही. म्हणजे मला अजून दहा दिवस योगा वर्ग काही सुरू करता येणार नव्हता, पण माझी ज्वलंत इच्छा असल्यामुळे ‘मी एक तारखेपासून येईन पण फी भरून टाकतो’, असे म्हणत तब्बल तीन महिन्यांची फी भरली. जसजशी एक तारीख येऊ लागली तसतसे माझे टेन्शन वाढू लागले. शाळेत असताना वडिलांनी मला एका योग वर्गाला घातले होते. ते लेले का दामले गुरुजी मी जानूशिर्षांसन करताना डोके गुडघ्याला टेकवले नाही तर पाठीवर बसून वाकवत. तेव्हापासून मी एकंदर योग प्रकाराचा धसकाच घेतला होता. एका बाजूला तीव्र इच्छा तर स्वप्नात येणारे लेले का दामले गुरुजी यात माझा अगदी कोंडमारा झाला होता. पुन्हा मी ‘बर्निग डिझायर’ पुस्तक काढले. ‘यशाचा रस्ता अथक परिश्रमाचा असतो’ हे वाक्य पुन:पुन्हा मनाशी घोळवले आणि नेमकी ३० तारखेला माझी स्कूटर घसरली. बऱ्यापैकी मुका मार बसला. साहजिकच मी घरी झोपून. चला, दोन-तीन दिवस तरी योग वर्ग पुढे ढकलला. यावर ‘स्कूटर स्लीप झाली, का केली? कुणास ठावूक?’ असा खडूस शेरा मात्र ऐकावा लागला. तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण कुठले ना कुठले कारण शोधत, चालढकल करीत मी त्या महिन्याचे पंधरा दिवस वाया घालवले. सोळाव्या दिवशी ‘मेडिकल योग’ शिकवणारे म्हणाले, ‘अहो, तुमची बॅच आता बरीच पुढे गेली आहे. तुम्ही पुढच्या बॅचला एक तारखेपासून या.’ मी पडत्या फळाची आज्ञा मानून घरी आलो. ‘मला वाटलंच होतं, तुम्ही केवळ वाचावीर आहात. प्रत्येक गोष्टीत चालढकल!’ सौ. म्हणाल्या. त्यांच्यापाशी तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता.
 माझ्या लक्षात आलं कितीही धगधगती इच्छा असेल आणि चालढकल करण्याची तुमची सवय असेल तर त्या इच्छेची धग विझते. मी विचार करू लागलो- चालढकल नेहमीच का बरं करत असेन मी? योग वर्गाचे एक ठीक आहे, पण घरातली छोटी-मोठी कामे मी अगदी ऐन वेळी का करतो? विजेचे बिल, टेलिफोनचे बिल, मोबाइलचे बिल, हे सगळे मी शेवटच्या दिवशी का भरतो? स्कूटर रिझव्‍‌र्हवर आल्या आल्या पेट्रोल का भरत नाही? क्रेडिट कार्डाचा चेक पेटीत टाकायला नेहमीच कसा विसरतो आणि बँक भरमसाट व्याज घेते म्हणून का वैतागतो?
 गेल्या काही वर्षांत पेट्रोल भरणे सोडले तर सर्व गोष्टी ऑनलाइन करता येतात, तरीही मी शेवटच्या दिवशीच का बिले भरतो. खरे तर दिवसातून एक तास मी ऑनलाइन असतोच. त्याबद्दलसुद्धा  ‘फेसबुक, ट्विटरपेक्षा बिल भर’ असे बायकोने सांगूनसुद्धा मी लगेच ते काम का करीत नाही. व्यवसायातसुद्धा मी ई-मेलना उत्तरे द्यायची उगीचच चालढकल करतो. हे मी एकदा माझा मित्र तन्मयशी बोललो. तो म्हणाला, ‘हा तुझा एकटय़ाचा प्रश्न नाही. आसपास नजर टाकलीस तर ७० टक्के माणसे हा चालढकल नावाचा खेळ खेळत असतात आणि त्याचे त्यांना काही वाटत नाही. बघ ना, वीज बिल भरण्यासाठी, कर भरण्यासाठी अनेक बूथ आहेत, पण शेवटच्याच दिवशी ही भली मोठी रांग का? परीक्षा एप्रिलमध्ये आहे हे जानेवारीपासून माहिती असताना अचानक २८ फेब्रुवारीला टेन्शन का यावं?
वरकरणी पाहिलं तर ही बेफिकीर वृत्ती असते असे वाटेल, पण शेवटचा दिवस उलटला की दंड भरावा लागेल ही विवंचना आहेच ना! म्हणजे ती बेफिकिरी नाही, आळस नाही तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत याचा क्रम लावायची सवयच नाही. वेळापत्रक हे शाळा संपल्यावर संपते. महाविद्यालयात ते गरजेनुसार लागते. नोकरीवर गेल्यावर इन-आउट, टी-लंच इतकेच मर्यादित राहते आणि व्यावसायिकांना तर वेळापत्रक नसतेच. हा सगळा समज इतका सार्वत्रिक आहे की जगण्यासाठी वेळापत्रक ही नितांत गरजेची गोष्ट आहे आणि ते वेळापत्रक पाळणे हे स्वत:वर राजीखुशीने घातलेले बंधन आहे हे मानणारे थोडे लोक आहेत. तू त्यातला नाहीस एवढेच!’ ठेवणीतला फटका मारून तो सटकला. पण त्याच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम झाला हे नक्की. तो नेहमी म्हणतो, ‘आपल्या स्वत:त काही बदल -चांगले बदल करायचे असतील तर माणसाने स्वत:चे लाड करणे बंद करावे आणि आपण चुकलो त्या क्षणी शब्दांचे जोरदार फटके द्यावेत मनाला. मन सवयीचे गुलाम असते. त्याला वळवण्यासाठी कठोर, प्रसंगी निर्दय व्हावे लागते आणि त्याचबरोबर आपण ठरल्याप्रमाणे केले तर स्वत:च स्वत:ला बक्षीस द्यावे लागते. मन बदलतेच!’
 अर्थात यासाठी काही तंत्रे आहेत. आजपर्यंतचा आपला शिरस्ता असतो की आपण वहिवाट सोडत नाही. कार्यालयात काम करताना काही समस्या आली तर- पूर्वी असे झाले होते तेव्हा काय केले होते ते बघू या आणि त्याच मार्गाने ती सोडवू या ही वृत्ती अनेकांच्या अंगवळणी पडलेली आहे. शक्यतो मागील पानावरून पुढे चालू असाच खाक्या असतो. या समस्येला अजून वेगळ्या प्रकारे कमीत कमी नुकसान होईल या रीतीने कसे हाताळता येईल याचा विचारच नाही. ‘बाबा आदमके जमानेसे यहीच हो रहा है’ असे म्हंटले की मोकळे व्हायचे.
   नेमकी हीच गोष्ट, समकालीन मध्यमवयीन पुरुषांच्या प्रगतीच्या आड येते. आतापर्यंत घटना घडल्यावर त्याबद्दल विचार करायची त्यांना सवय लागली आहे. त्याचबरोबर ‘आली अंगावर नि घेतलं शिंगावर’ अशी वृत्ती आहे. कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचे याचा तक्ता करायची सवयच नाही. अनामिक मद्यपी संघटनेचे एक घोषवाक्य इतके वैश्विक आहे की त्याला तोडच नाही. ‘पहिले काम पहिले’ (First thing first). याचा अर्थ असा की प्रथम आत्ता तातडीने करायचे काम प्रथम, आज करायचे काम त्यानंतर, उद्या करून चालेल त्या आपोआप उद्यासाठी आजचे काम बनणार आणि सवडीने करायचे काम उद्याचे ठरणार आणि हा नियम कामापुरता मर्यादित नाही बरं का. आता या क्षणी कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे? काय आत्ता इथे या क्षणी घडत असले तरी नजर दीर्घकालीन परिणामांकडे पाहिजे. इतके सारे त्यात सामावलेले आहे.
  माझा एक मित्र आहे, निरंजन. तो कधीही लांबचा विचार करत नाही. अगदी साधी गोष्ट. मध्यंतरीच्या काळात नामवंत बँका फोन करून आम्ही तुम्हाला विनातारण, विना जामीनदार  ५०,००० कर्ज मंजूर करत आहोत असे फोन करीत. या पठ्ठय़ाने काहीही योजना नसताना तीन वेगवेगळ्या बँकाकडून दीड लाख रुपये कर्ज उचलले. मी विचारलं, ‘कशासाठी?’ तर त्याच्याकडे काहीही प्लान नव्हता. मी विचारले, ‘बायकोला सांगितलेस का?’ तो म्हणाला, ‘आमच्यात ही रीत नाही.’ आणि या सद्गृहस्थाने ते पैसे एका खासगी सावकाराकडे फिरवायला दिले. पहिले सहा महिने व्यवस्थित गेले आणि नंतर तो सावकार शहर सोडून निघून गेला. तो कुठल्या तरी चीट फंडाचा व्यवस्थापक होता. अनेकांकडून पैसे घेतले आणि ती कंपनी बुडाली. निरंजनची बोबडीच वळली. खासगी बँकांच्या वसुली कंत्राटदारांचा तगादा सुरू झाला. बायकोला काही माहिती नव्हते. जेव्हा वसुलीवाले फारच त्रास देऊ  लागले तेव्हा तिचे सगळे दागिने विकले आणि तो या प्रकरणातून सुटला. हे जे निरंजनचे वर्तन आहे त्याला इंग्रजीत म्हणतात -Short Term Headonism. अर्थात अल्पकालीन सुखाचा विचार. किंवा आत्ता तर ब्याद टळली ना पुढचं पुढे बघू.
हे वागणे कसे तर प्रतिक्रियात्मक. घटना घडल्यानंतर केलेला विचार किंवा कृती आणि वर्षांनुर्वष आपण हेच करीत आलो आहोत. आणि त्यात पुरुषार्थ समजत आहोत. मी आलेली समस्या कशी झटक्यात लीलया सोडवली हेच मुद्दाम छाती ठोकून सांगत आहोत. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच स्वस्त असतात, पण कुठे घेतो आपण स्वत:च्या शरीराची काळजी? डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत सगळ्या गोष्टी अर्निबध करायच्या आणि मग लगेच व्यायाम आहार यांचे पालन करू लागायचे ही आपली जीवनशैली झाली आहे आणि ती आपल्या सर्व व्यवहारांमध्ये दिसून येतेच!  प्रश्न हा आहे की उद्या काय घडू शकेल याचा अंदाज घेत त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मला काय काय करावे लागेल याचा ठोस विचार करण्याचा. (त्याबद्दल सविस्तर ३१मे च्या अंकात -प्रतिक्रिया ते अनुक्रिया)           

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?