01 December 2020

News Flash

कुमारसंभव : आकाशी झेप घेताना..

एक बातमी- बारावीत कमी गुण मिळणार या भीतीनं, एका मुलीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि तसा एक ई-मेल, एका दैनिकाला केला.

| January 10, 2015 01:59 am

मुलांचं तारुण्यात आणि तरुणांचं प्रौढात होणारं रूपांतर ही नैसर्गिक अवस्था असली तरी त्या वेळी बदलत जाणारं शरीर आणि मन-भावना यांच्यात प्रचंड घडामोडी घडत असतात. त्या काळात जर त्या मुलांना आश्वासक वातावरण मिळालं नाही तर त्या मुलालाच नाही तर कुटुंबाला आणि अनेकदा समाजालाही त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागतात. आपलं पिल्लू आता घरटय़ातून बाहेर पडू पाहत आहे, त्याला आकाशाच्या खुल्या वातावरणात सोडण्यासाठी तुमच्याच सजग हातांची गरज लागणार आहे. कसे असावेत हे सजग हात. हे सांगणारं पौंगडावस्थेतील मुलांच्या पालकत्वाविषयीचं हे सदर. दर पंधरा दिवसांनी.

एक बातमी- बारावीत कमी गुण मिळणार या भीतीनं, एका मुलीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि तसा एक ई-मेल, एका दैनिकाला केला. दुसरी बातमी- प्रेमभंग झाला म्हणून आपण आत्महत्या करीत आहोत असा फोन थेट पोलिसांनाच केला.
आजकाल अशा बातम्यांनी आपण सगळेच जण अस्वस्थ झालो आहोत. माझ्याकडे पौगंडावस्थेतल्या मुलांच्या समस्या अधिक प्रमाणात येत आहेत. प्रश्नाचं स्वरूप एक असलं तरी त्यातली गुंतागुंत वेगवेगळी आहे. यात भावनिक गुंतवणूक कमी-अधिक असल्याने त्यातलं गांभीर्यही कमी-अधिक असतं. म्हणून पौगंडावस्थेतील मुलांना समजून घेऊन, त्यांच्या विचारांना, कृतीला विधायक वळण कसं देता येईल हेही आपण पाहिलं पाहिजे. या सदरातून याच गोष्टीचा आपण प्रामुख्यानं विचार करणार आहोत.
आजच्या पालकांची (त्यातही दोघंही काम करणारे पालक) मोठी अडचण म्हणजे आपल्या मुलांना योग्य प्रकारे वेळ देऊ शकत नाहीत, दुसरं म्हणजे सुसंवादाचा अभाव, स्वत:च्या उपस्थितीची कसर महागडय़ा भेटवस्तूंनी भरून काढायची आणि मुलं म्हणतील त्या वस्तू केवळ मी देऊ शकतो म्हणून द्यायच्या. दैनंदिन धावपळीत आपल्याला बऱ्याचदा पराकोटीची सहनशक्ती लागते, पण जेव्हा आपण घरी परततो तेव्हा मुलांच्या बाबतीत मात्र आपल्याकडे सहनशक्तीची वानवा असते. आपण त्यांच्याशी वागताना नकळतपणे हळूहळू टोकाची भूमिका घेत जातो. ज्या काळात त्यांना अत्यंत समजूतदार पालक हवे असतात त्या काळात नेमके त्यांना मिळतात अत्यंत हेकेखोर पालक. अनुकरणातून अनेक गोष्टी शिकताना मुलं हाही गुण तत्परतेनं स्वीकारतात. त्यांच्या हट्टी स्वभावाला पूरक असा ‘आज, आत्ता, ताबडतोब’चा स्वभावधर्म बनत जातो.
अनेकदा समस्या अगदी छोटय़ा स्वरूपातली असते, पण ती सतत दुर्लक्षित असल्यामुळे ती कधी टोक गाठते हे कुणालाच समजत नाही. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या अंकितने अकरावीच्या वार्षकि परीक्षेत अत्यंत सुमार गुण मिळवले. अंकितसह त्याच्या पालकांसाठीही हा मोठा धक्का होता. अभ्यासात कायम अव्वल असणाऱ्या विनिता आणि निकिता व्यसनांच्या आहारी गेल्याचं पालकांना त्यांच्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीमुळे फारच उशिरा कळलं. दहावीतली टेक्नोसॅव्ही रचना या उपकरणांच्या एवढी अधीन झाली की ती परीक्षेला बसायला तयारच होईना. हल्ली संस्कृतीला सकाळी अंथरुणातून उठायचंच नसतं, कॉलेजमध्येही तिला जायचं नसतं. अशी कितीतरी उदाहरणे.
कामावर असणाऱ्या पालकांचं पालकत्व ही आज अतिशय महत्त्वाची बाब झाली आहे. आपल्या नजरेआड असणाऱ्या आपल्या पिल्लांचं आत्ता नेमकं काय चाललं असेल, त्यांची पावलं आडमार्गाला तर गेली नसतील? अशा प्रश्नांनी बऱ्याच पालकांची झोप उडवलेली असते. पालकांनी कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की, या उदाहरणातल्या मुलांच्या अयोग्य वर्तनाचं मूळ एखाद्या कारणात असतं. लवकरात लवकर त्या कारणांची ओळख होऊन, उदाहरणांनी आणि काही साध्या-सोप्या सूचनांनी त्या समस्येचं निराकरण करायचा प्रयत्न आपण या लेखांमधून करणार आहोत.
  सुरुवातीला उल्लेख केलेल्या उदाहरणातला, प्रेमप्रकरण हाही विषय या वयातला मोठा प्रश्न बनू लागलाय. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष, पुन्हा पुन्हा ब्रेक-अप्स्, मत्सर, तिरस्कार, पालकांना मनस्ताप हे मोठे प्रश्न नाजूकपणे हाताळणं आवश्यक आहे. शिवाय मुलांच्या घरातून पळून जाण्याच्या धमक्या, आयुष्य संपवणं.. किती गुंतागुंत. हे सगळं अस्थिर मानसिकतेतून होत असतं हे आपण जाणतोच, पण त्या मानसिकतेला कारणीभूत ठरलेल्या घरातील गंभीर कारणांकडे मात्र आपण सोयीनं डोळेझाक करतो. ती लपवायचा प्रयत्न करतो. त्याची काही उदाहरणं द्यायची म्हणजे, आई-वडिलांमधली सततची होणारी भांडणं, नोकरी अचानक जाणं किंवा व्यवसायातले तोटे, वडील, भावंडाचा अकस्मात मृत्यू, यांसारख्या कारणांनी अत्यंत गंभीर कायमस्वरूपी परिणाम मुलांवर होऊ शकतो. त्यामुळे या मुलांमधल्या या धगधगत्या तिरस्काराला, संतापाला लवकरात लवकर शांत करणं किंवा तो निवळू देणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात्, आपला तोही प्रयत्न असणारच आहे. याशिवाय वडीलधाऱ्यांबरोबरचे, मित्रांबरोबरचे वाद सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि मानसिक आजार- समस्या यांचीही माहिती आपण या सदरातून घेणार आहोत.
या समस्यांबरोबरच काही जणांमधला बुजरेपणा, निरुत्साह, परीक्षेचा ताण, करिअरसंबंधी येणारं नराश्य, या खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि या आधुनिक जगात या गोष्टी सतत वादात असतात. काही जण आक्रमकपणे रस्त्यावर किंवा घरात गोंधळ माजवतात, परिणामी त्याबद्दल शरम वाटणं किंवा तिरीमिरीत कायद्याविरुद्ध वागणं. या सगळ्या गोष्टी मूल्यासंबंधीच्या नसून, भावनिक सुधारणेत आणि मनावरच्या शस्त्रक्रियेत उपचारांनी सुधारण्याच्या आहेत. या उपचारातले आवश्यक नट, बोल्ट्स् आपल्यापुढे मांडले जाणार आहेत, शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी!
  या समस्यांचा मुलांसकट संपूर्ण घरादारावर परिणाम होत असतो. पालकांना आणि भावंडांना तर यामुळे थेट चटके बसतात. पालकांचे दोष, समाजातल्या अपप्रवृत्तीचा दोष काहीही असो, भरडली जातात ती मुलं, त्यांचे पालक आणि बरोबरीनं समाज. ही समस्या काही आमच्या घरातली नाहीये, असं न म्हणता त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, त्या भरडल्या गेलेल्या परिवाराला, जरासा, आपलेपणाही पुरेसा ठरतो. हळूहळू अशी वेळ येत चालली आहे की, प्रत्येकानं आपल्या स्टेटस्च्या, हुशारीच्या कोषातून बाहेर पडून या पसरत जाणाऱ्या मानसिक अस्थिरतेला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 आज या मुलांच्या उदाहरणांतून प्रामुख्यानं जाणवते ती या मुलांची व्यक्त होण्याची भूक. मग ते माध्यम योग्य, अयोग्य याचा विचार न करता ती आपल्या परीनं व्यक्त होत राहतात. फक्त हा व्यक्त होण्याचा दाहक अनुभव समाजाला वारंवार सोसावा लागतो! एखाद्या दैनिकाला किंवा पोलिसांना फोन करणं यात दोन गोष्टी प्रामुख्यानं जाणवतात. त्या म्हणजे कोणी तरी आपल्या या जीवन-मरणाच्या प्रश्नाची दखल घ्यावी, पण त्याचबरोबर आपल्या माणसांवरचा, समाजावरचा अविश्वास. आपण जरी या गोष्टी एखाद्याच्या समोर उघड केल्या तरी ती व्यक्ती आपली गोष्ट गांभीर्यानं घेणार नाही याबद्दलचा विश्वास! कुणासमोर विश्वासानं मोकळं व्हायचं, याचा गोंधळ. आपल्या पाल्यांसाठी जे पालक स्वत:ला घडय़ाळ्याच्या काटय़ांना बांधून घेतात, ते आपल्या मौलिक वेळेत एक गोष्ट दाखल करायचीच विसरून जातात, बहुधा.. मुलांसाठी उबदार, आश्वासक विश्व!
‘‘आहेस कुठं? जग इतकं जवळ येतंय, तुला एवढंसुद्धा माहीत नाही?’’ असे संवाद आपण वारंवार ऐकत असतो. पण बाहेर काय चाललंय याच्या चिंतेपेक्षा आपल्या घरात काय जळतंय याचं भान जर आपण आपल्या परीनं घेत राहिलो तर नक्कीच आपल्या जिवांचं संगोपन आपल्याला अजून समर्थपणे करता येईल.
त्यासाठी गरज आहे, आपण सगळ्यांनी मिळून (पालक, समाज), आपल्या परीनं एक एक पाऊल पुढे टाकण्याची.  
शब्दांकन- शिल्पा भागवत    
 डॉ. हरिश श़ेट्टी – harish139@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:59 am

Web Title: changing body and emotions at adultery
Just Now!
X