News Flash

स्वत:ला बदलताना : होते ओझे इतिहासाचे अन् पूर्वग्रहांचे!

स्वत:ला बदलताना सर्वात पहिली एक गोष्ट आपल्याला ध्यानात घेणे आवश्यक आहे. समोरची व्यक्ती आपल्याकडे जुने संदर्भ आणि त्याच्या मनातील पूर्वग्रह यांचा चष्मा डोळ्यांवर ठेवून पाहणार

| August 29, 2014 01:07 am

स्वत:ला बदलताना सर्वात पहिली एक गोष्ट आपल्याला ध्यानात घेणे आवश्यक आहे. समोरची व्यक्ती आपल्याकडे जुने संदर्भ आणि त्याच्या मनातील पूर्वग्रह यांचा चष्मा डोळ्यांवर ठेवून पाहणार आहे. दुर्दैवाने त्या व्यक्तीच्या चष्म्याचा नंबर किती आहे? आणि तो किती वर्षांपासून हाच चष्मा वापरत आहे? याचा संपूर्ण अंदाज आपल्याला येणे अशक्य असते. तेव्हा त्यांचा चष्मा गृहीत घरून जास्तीत जास्त वेळा निखळ नजरेने त्या व्यक्तीशी व्यवहार करायचा. हे थोडेसे अवघड आहे, परंतु अशक्य निश्चित नाही.
झाली त्या कथेला लिहून तीस-बत्तीस वर्षे. मी भलताच तरुण होतो. काही तरी वेगळे लिहावे म्हणून मी ‘संदर्भ’ ही कथा लिहिली. त्या कथेचा नायक संभ्रमात असतो. निमित्त नेहमीचेच. त्याच्या प्रेयसीचे आई-वडील त्यांच्या लग्नाला आधी संमती देतात आणि त्याच्या घराण्याची चौकशी केल्यावर नकार देतात. त्यांचे कारण सबळ असते. नायकाचे वडील- त्यांचे विविध स्त्रियांशी असलेले अनैतिक संबंध. घरातील आई-वडिलांची भांडणे तीही इतकी टोकाची की त्याच्या आईने आत्महत्येचे दोनतीनदा प्रयत्न केलेले. त्यात बाहेरून दिसायला मोठे श्रीमंत घराणे, गाडय़ा-बंगले असले तरी त्यांना भरपूर कर्जे असल्याचे कळले होते. नायक सतत तिच्या आई-वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो, ‘मी अशा कुटुंबात जन्माला आलो, त्यात माझा काय अपराध? लग्न झाल्यावर मी माझ्या कुटुंबाशी सगळे संबंध तोडून टाकतो.’
पण तिचे पालक त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. ते जे एक वाक्य बोलतात ते त्याला खोलवर जाऊन विचार करायला भाग पाडते.(नक्की जसेच्या तसे आठवत नाही, पण असेच काही तरी होते हे नक्की!) ‘‘ हे बघ, तू कितीही संबंध संपवायचे ठरवलेस तरी संदर्भ संपत नाहीत. तू जन्माला आलास तेव्हा अमुकतमुक यांचा मुलगा, भाचा-पुतण्या, नातू-पणतू, हे संदर्भ घेऊनच जन्माला आलास. त्या क्षणी जशी तुझी जन्मकुंडली तयार झाली त्याच क्षणी- तुझे आडनाव, बापाचे नाव, गोत्र, जात – पोटजात सारे संदर्भ तुला आपोआप मिळाले. आत्ता आत्ता पर्यंत तुझी स्वतंत्र ओळखच नव्हती. तू नेहमीच अमक्याचा तमका या संदर्भाने ओळखला जात होतास. प्रत्येक व्यक्तीची ओळख ही नेहमीच कोणत्या न कोणत्या संदर्भानेच होत असते. माझ्या तरुण मित्रा, एकुलत्या एक मुलीचे जबाबदार पालक म्हणून, मी तुझ्या कौटुंबिक संदर्भाशिवाय, तुझे अस्तित्व स्वतंत्र आहे हे मान्य करू शकत नाही. तू एक गुणी माणूस आहेस हे मान्य आहे. तरीही तुझ्या कौटुंबिक संदर्भासह तुला मी आमच्या कुटुंबाचा नवा घटक -जावई म्हणून स्वीकारू शकत नाही.’’
आणि त्यानंतर तो संदर्भाचे इतरांना असणारे महत्त्व याबद्दल बरीच स्वगते म्हणतो ती म्हणजे ती कथा.
आज इतक्या जुन्या कथेची आठवण का व्हावी? आणि त्याचा स्वत:ला बदलताना या प्रक्रियेशी काय संबंध? त्याचे असे आहे- आपण सगळेच बहुतांशी वेळा समोरच्या व्यक्तीकडे आपल्याला ठाऊक असलेल्या माहितीच्या संदर्भातच ओळखतो. तिच्याबद्दलच काही एक अटकळ बांधतो. आपल्या संस्कारानुसार त्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रहांचे-दृष्टिकोनांचे आणि मतांचे पक्के जाळे विणतो. आणि त्याला एक लेबल लावून मोकळे होतो. त्या व्यक्तीशी व्यवहार करताना, बोलताना त्या व्यक्तीला आता आहे तसे पाहण्याऐवजी त्याच्या पाठीमागचे संदर्भ आणि पूर्वग्रह यांच्या वलयांसह पाहतो. आणि इथेच गोची होते. आपली स्वत:ची होतेच परंतु आपल्याशी बोलणाऱ्या, व्यवहार करणाऱ्या व्यक्ती निखळ आणि निव्वळ या क्षणावर इतिहासाचे ओझे टाकून ते क्षण घालवतात.
स्वत:ला बदलताना सर्वात पहिली एक गोष्ट आपल्याला ध्यानात घेणे आवश्यक आहे. समोरची व्यक्ती आपल्याकडे जुने संदर्भ आणि त्याच्या मनातील पूर्वग्रह यांचा चष्मा डोळ्यांवर ठेवून पाहणार आहे. दुर्दैवाने त्या व्यक्तीच्या चष्म्याचा नंबर किती आहे? (+) का (-)? आणि तो किती वर्षांपासून हाच चष्मा वापरत आहे? याचा संपूर्ण अंदाज आपल्याला येणे अशक्य असते. तेव्हा त्यांचा चष्मा गृहीत घरून पुढे जायचे फक्त आपला नंबर कमी करण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त वेळा निखळ नजरेने त्या व्यक्तीशी व्यवहार करायचा. हे थोडेसे अवघड आहे. परंतु अशक्य निश्चित नाही.
  हे माझा मित्र तन्मयला बऱ्यापैकी जमायला लागले आहे. तो इंटिरिअर डिझायनर आहे. त्यात जे.जे.चा विद्यार्थी. शिवाय अमेरिकेतून शिकून वगैरे आलेला. सुरुवातीला तो स्वत:च्या डिझाइनच्या प्रचंड प्रेमात असे. क्लायंटशी डिझाइन करण्यापूर्वी सविस्तर चर्चा करीत असे. त्यांना काय हवे-नको, बजेट वगैरे सगळे नीट नोंदवून घेई. आणि एकदा त्याचे डिझाइन पूर्ण झाले की तो त्याच्या प्रेमात पडे. आणि त्यात कोणी जर बदल सुचवले तर तांत्रिक कारणे सांगून कोणताही बदल करण्यास साफ नकार देई. हा व्यवसाय असा आहे की कोणत्याच क्लायंटला आपल्या सर्वच्या सर्व गरजा आधी निश्चित आणि नेमक्या सांगता येत नाहीत. विशेषत: घरांची कामे करताना. घरातल्या प्रत्येकाची प्रत्येक बाबतीत स्वत:ची अशी पक्की मते असतात. आणि जरी थ्रीडी डिझाइन पाहिली असली तरी नंतर एकेक सुचत जाते आणि प्रत्यक्ष कामे सुरू झाल्यावर बदल सांगितले जातात. त्याचा त्याला प्रचंड राग येई. ‘हे आधी सांगत नाहीत आणि डोके फिरवतात,’ अशी प्रतिक्रिया असे. तो बदल करायला इतकी खळखळ करायचा की त्याचे पर्यवसान वाद-विवाद, पैसे उशिरा मिळणे आणि ‘कोणी केलं हो तुमचं इंटिरिअर डिझायनिंग?’ अशा चौकशांतून जी फुकट प्रसिद्धी मिळते ती मिळेनाशी झाली. उलटपक्षी ‘गुणी आहे, पण हट्टी आहे हो’ अशी निगेटिव्ह प्रसिद्धी होऊ  लागली. व्यवसाय कमी होऊ  लागला. त्याला काय करावे सुचेना. अखेर तो एका नामवंत व्यवसाय सल्लागाराकडे गेला. त्याने त्याला काही मंत्र दिले. पहिला- क्लायंटला आपल्यापेक्षा कमी कळते असे समजून (कदाचित तसे असेलही) त्याच्या अभिरुचीबद्दल,  विचारांबद्दल, कल्पनाशक्तीबद्दल आपल्या नजरेतून न बघता, तो सांगतो ते त्याचे त्याच्या घराचे कल्पनाचित्र समजायचे. दुसरा- नेहमीच व्यवसाय प्रथम. आपली मूल्ये, आपला विवेक आणि आपण त्यांच्या मनातले घर सजवणारे तज्ज्ञ आहोत हे लक्षात ठेवायचे. एक कायम लक्षात ठेव, जे घराचे कल्पनाचित्र ते स्वत: करू शकत नाहीत तेवढय़ापुरते तुझे तज्ज्ञसुद्धा पैसे मोजून विकत घेतात. तुला जे चांगले वाटते ते क्लायंटला आवडले असेल असे किंवा आवडलेच पाहिजे हे विसरून जायचे.
आणि दर तीन महिन्यांतून आपण या मंत्रांचा वापर केल्याने काय होत आहे याचा आढावा घ्यायचा.
आणि तन्मयने खरेच ते मनावर घेतले.(मला म्हणाला, एक लाख मोजलेत मला माहीत असलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी. करायलाच हवे). त्याने जाणीवपूर्वक स्वत:त बदल केले आणि त्याला अनुभव येऊ लागला की त्याच्या हट्टीपणाची वलये कधी विरली हे त्याचे त्याला समजलेच नाही.
हे सगळे मी पाहिलेले आहे. त्यामुळे स्वत:ला बदलायचे. कारण माझा स्वत:चा विकास हे तर आहेच पण त्याबरोबर माझ्या सर्व भूमिकांचा विकास, माझ्या नातेसंबंधांचा विकास, हेही निश्चितच असते हे विसरून चालत नाही.
अलीकडील अनेक पुस्तकांत आनंदाचे रहस्य ‘आत्ता इथे या क्षणी मी जमिनीवरचे पाय जमिनीवर ठेवत नजर माझ्या उद्दिष्टाकडे रोखीन तेव्हा माझा क्षण-अन्-क्षण आनंदाचा होईल’ अशा आशयात मांडले गेले आहे. भूतकाळातील घटना, चुका-घोडचुका मी बदलू शकत नाही. इतिहासाचा उपयोग हा आताच्या क्षणी काय करायला हवे याचा अनेक बाबींपैकी एक बाब म्हणून होण्यापुरताच असतो आणि आत्ता जे आपण करीत आहोत त्यातच भविष्यकाळाची बीजे रोवली गेली आहेत हे अंतिम सत्य स्वीकारले तर जगणे आनंददायी व्हायला वेळ लागणार नाही. माणसांकडे आपण इतिहासाची वलये पुसट करीत निखळ दृष्टीने बघू शकू.
प्रत्येक माणसाच्या इतिहासात चुकांचे, घोडचुकांचे, अपराधांचे सांगाडे कमी-अधिक प्रमाणात असतातच, परंतु प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या गतीने परिस्थितीच्या रेटय़ाने किंवा अनुभवातून शिकत गेल्यामुळे बदलतच असतो. तेव्हा इतिहासाची लेबले जर त्याने आत्ताच्या माणसाला डकवली तर तो फारसा शहाणपणाचा भाग नाही हे निश्चित.
मी स्वत: गेले वर्षभर ‘आत्ता इथे या क्षणी’ तत्त्वाने जगायचा प्रयत्न करतोय. बऱ्याचदा त्यात यश येते, पण अपयशाचे प्रसंगही अनेक येतात. माझ्या जिवाभावाच्या माणसांबरोबर तर अनेकदा मी साफ चुकतो. मीही घटनांच्या चोपडय़ा उघडतो इतकाच नाही तर त्या मोठय़ाने वाचूनसुद्धा दाखवतो. मग माझ्या जिवाभावाची मंडळी म्हणतात, ‘जे काही लिहितोस ते आमच्याबाबतीत लागू का होत नाही? त्यांना मी उत्तर देतो, जिथे अनुराग असतो तिथेच सर्वात जास्त राग असतो.’ प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी जे त्यांना सांगतो ते माझे मला मनोमनी पटलेले नसते. परंतु नेमक्या जवळच्या माणसांशी बोलताना माझा अहंकार डोके वर काढतो. कुठेसे वाचलेले -जिथे अनुराग असतो तिथे अहंकाराचे विसर्जन असते. अनुराग म्हणजे निखळ प्रेम जिथे मतभेदांना जागा आहे, पण राग नसतोच. खूप प्रयत्न सातत्याने करतोय. आणि मला विश्वास आहे नजीकच्या भविष्यात ते मला निश्चित जमेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:07 am

Web Title: changing himself everybody should forget past
टॅग : Chaturang
Next Stories
1 उद्योगाचे दारी
2 वेगळी लेखणी
3 पोलिसी खाक्या
Just Now!
X