आईचं स्वप्न हेच ध्येय मानत अंगच्या निर्वविाद कलागुणांनी चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू  शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! त्याच्या आईने घडवल्यामुळेच तो ‘चार्ली चॅप्लिन’ बनू शकला.
एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते. त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो.
तो. चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. त्याचं बीज कुठे तरी त्याच्या लहानपणामध्ये दडलेलं आहे. त्याचं बालपण, त्यातले अनुभव यात ते कुठेतरी रुजलं आहे. लहानपणी आईने केलेल्या मायेची गुंतवणूक त्यानं मनात जमा करून ठेवली. त्यावर आठवणींचं व्याज चढवत तो मायेचा धनी झाला आणि प्रेक्षकांवर तो संपूर्ण खजिना त्यानं उडवला. भीषण आणि दाहक बालपणात तो तगला याचं मुख्य कारण म्हणजे आईचं त्याच्यावरचं प्रेम, विश्वास, अपेक्षा आणि त्याचं मातृप्रेम. पराकोटीच्या नकारात्मक वातावरणातून आईच्या त्याच्याबद्दल असलेल्या आशा-आकांक्षांच्या सकारात्मक ध्येयानं प्रेरित होऊन नुसता यशस्वीच नाही तर जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला!
चार्ली चॅप्लिनच्या आईचं नाव हना चॅप्लिन. वडिलांचं नाव चार्लस् सीनिअर चॅप्लिन. चार्लीचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन इथे झाला. त्याच्या जन्माच्या वेळी ते दोघंही ऑपेराचे गायक होते, परंतु कालांतराने ते विभक्त झाले. हनाचं रंगमंचावरचं नाव होतं लीली हर्ली. रंगमंचावर गायिका आणि कधीकधी बाहेर छोटी मोठी कामं, असं करत आपलं आणि आपल्या मुलांची पोटं भरण्याची तिची धडपड असे. सगळ्या परिस्थितीचा ताण तिच्यावर पडतच होता, पण त्यातही तिच्या लेकरांवर असलेली माया तिला उभं करत होती. या सगळ्याची जाणीव कोवळ्या चार्लीमध्ये मुरत होती. आईचं प्रेम त्याला बळ देत होतं आणि त्यामुळेच त्याची जिद्दही अजूनच चेतवली जात होती. त्याच्या शिकण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन मिळत होतं.
जगण्याच्या ताणामुळं तिची कारकीर्द खालावत गेली. रंगभूमीवरच्या तिच्या शेवटच्या सादरीकरणाचा तो साक्षीदार होता आणि त्याच वेळी अनपेक्षितरीत्या रंगभूमीवरच्या त्याच्या सादरीकरणाचा श्रीगणेशा झाला. त्याचं वय होतं अवघं ५ र्वष. एकदा म्युझिक हॉलमध्ये हनाच्या गाण्याचं सादरीकरण होतं. त्या वेळी गाण्यात एका ठिकाणी एका स्वराला हनाचा आवाज फाटला. प्रेक्षकांनीही तिची हुर्यो उडवली. तिला रंगमंचावरून बाजूला व्हायला लावलं होतं. ही सगळी घटना तिचा लेक चार्ली, िवगेत उभा राहून बघत होता. त्याच वेळी त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापकानं तिथं उपस्थित असलेल्या चार्लीला ते गाणं पूर्ण करायला सांगितलं. त्या वयात प्रसंगाचं भान ठेवून तत्परतेनं ते गाणं पूर्ण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ही तयारी त्याच्या आईनं, हनानं करून घेतली होती. त्यामुळे त्याची त्या गाण्याची तयारी झाली होती.
या प्रसंगाच्या बरेच दिवस आधी चार्ली आजारी होता. त्या काळात हना त्याच्यासमोर त्याचं मन रिझवण्यासाठी अनेक जणांच्या नकला करून दाखवायची. त्याच्यासमोर वेगवेगळी गाणी स्वत: सादर करायची. त्याला केवळ बरं वाटावं म्हणून हा आटापिटा नव्हता, तर ‘तू खूप प्रतिभावान आहेस, त्यामुळे तू तयारी करायची आहेस आणि खूप मोठं व्हायचं आहेस,’ हे म्हणणं त्याच्या मनावर सतत िबबवत राहिली. त्याला तयार करण्यासाठी तिची ही सुरुवातीची पावलं होती. तो कलाकार म्हणून खूप काही करू शकेल, त्या दृष्टीनं त्याची तयारी असावी. त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे हे तिला कायम जाणवत होतं. त्यासाठी, आहे त्या परिस्थितीत तिला जे काही करता येणं शक्य होतं ते ती आवर्जून करायची. लहान चार्लीलाही हे जाणवत होतं. त्यानं एक ठरवलं की काहीही झालं तरी आईचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवायचं.
त्या वेळच्या परिस्थितीबद्दल चार्लीनं आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय, ‘‘मला त्या परिस्थितीचे चटके फार कमी वेळा जाणवले, कारण आम्ही त्या परिस्थितीतून सतत वाटचाल करत होतो आणि लहान असल्यामुळे हा त्रास मी सहजच विसरून जायचो.’’
शाळेत शिकता शिकता वडिलांच्या ओळखीनं चार्ली एका नृत्यपथकात दाखल झाला. या पथकातून फिरता फिरता, त्याचं शाळेकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे त्याच्या आईचं लक्ष असायचं. पण आईच्या मानसिक आजारामुळे आणि एकूण परिस्थितीमुळे त्यानं १३ व्या वर्षीच शाळा सोडली. पोट भरण्यासाठी अनेक छोटी मोठी कामं केली, पण ही कामं करत असताना त्यानं आत्मविश्वास जराही ढळू दिला नव्हता, जो त्याच्या आईनं सतत त्याच्या मनावर िबबवला. त्याच्यातला कलाकार तिनं जोपासला. त्यानं म्हटलंय, ‘‘माझ्यात काहीतरी क्षमता आहे, कला आहे, आणि मी ते करू शकतो, असं आई सतत माझ्यावर ठसवत राहिली.’’
छोटी-मोठी कामं करतानासुद्धा तो कधीही आपल्या ध्येयापासून ढळला नाही. अभिनेता होण्याचं ध्येय कायम त्यानं आपल्या उराशी बाळगलं. त्यासाठी तो स्वत:चे बूट पॉलिश करायचा, कपडे साफ ठेवायचा, नाटक कंपन्यांना नित्य नेमाने संपर्क करत राहायचा.
जेव्हा जेव्हा चार्लीच्या आईचं सादरीकरण असायचं, त्या रात्री त्याला भाडय़ाच्या घरात ठेवण्यापेक्षा ती त्याला स्वत:बरोबर नाटय़गृहात आणायची. स्वत: उपाशी राहून या मुलांना खायला द्यायची. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व्हायला लागला होता. चार्लीनं यशस्वी अभिनेता व्हावं ही तिची तीव्र इच्छा होती. या इच्छेपुढे त्यानं स्वत:समोर पर्यायही ठेवला नव्हता.
स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला. पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’
आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’
आईचं स्वप्न हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानत अंगच्या निर्वविाद कलागुणांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू!

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!