28 January 2020

News Flash

गुंतुनी गुंत्यात साऱ्या..

 मला कुठला प्रश्न छळत होता ते चटकन उमगलं आणि अस्वस्थता का वाटत होती ते आकळलं.

(संग्रहित छायाचित्र)

प्रज्ञा ओक

कधी तरी सकाळपासून एखादं गाणं जिभेवर रेंगाळत असतं. त्या दिवशी असंच सकाळपासून सुरेश भटांचं ‘रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’ हे गाणं सतत ओठावर येत होतं. सुरेश भटांचं काव्य, गझल, सगळंच मला प्रचंड आवडत असल्यानं प्रत्येक ओळीच्या अर्थापाशी मी नेहमीच रेंगाळत राहते. त्या दिवशी असंच झालं. ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’ या ओळीपाशी सारखी थबकत होते. काय वाटत होतं मला समजत नव्हतं. पण अस्वस्थपणा येत होता. गुंत्यात राहून पाय माझा मोकळा, असं राहाता येतं का?

मला कुठला प्रश्न छळत होता ते चटकन उमगलं आणि अस्वस्थता का वाटत होती ते आकळलं. खरंच आयुष्याच्या अनेक गुंत्यातून आपला पाय मोकळा होऊ शकतो का? समजूत आल्यापासून असंख्य गुंते आपण निर्माण केलेले असतात. काही आपोआप झालेले असतात. काही अवचितपणे पुढय़ात येऊन उभे ठाकलेले असतात. अनेक वेळा त्यात अडकायलाही आवडतं. काही वेळा सवयीनं त्याचे पाश काचत नाहीत.. खूप आयुष्य जगून झाल्यानंतर सगळेच गुंते मग जाचक वाटायला लागतात. मोकळं तर होता येत नाही आणि ते सोडवताही येत नाहीत. कधी हे गुंते सामाजिक बंधनाचे असतात, कधी नात्यांचे, कधी मैत्रीचे असतात.. ते अपरिहार्य होऊन बसतात.

एकदा एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमाला अवकाश असल्यानं एकटीच बाहेर बाकावर बसले होते. आजूबाजूच्या माणसांचं निरीक्षण करत होते. तेवढय़ात एक नीटनेटक्या बाई माझ्याशेजारी आल्या; बसल्या.. हातातला मोबाइल नीट पर्समध्ये ठेवून माझ्याकडे पाहून हसल्या. एक-दोन वाक्यावरून बोलणं सुरू झालं. माहिती मिळाली ती अशी.. पदवीपर्यंत शिक्षण, सुखवस्तू संसार. दोन मुलं चांगली शिकलेली.. आता श्रीमंतात गणना व्हावी असं एकंदरीत चित्र! मीही माझ्याबद्दल जुजबी माहिती सांगितली. इतका वेळ नेमकं अंतर राखून असलेल्या गप्पा नंतर मोकळ्याढाकळ्या व्हायला लागल्या. मध्येच एकदम म्हणाल्या, ‘‘मला हे श्रीमंती आयुष्य नकोय खरं म्हणजे. किती ते गुंते? असंच वागा, हेच बोला, जेवताना शिष्टाचार बाळगा, मोठय़ानं हसू, बोलू नका, खूप कुणाच्या जवळ जाऊन अघळपघळ बोलू नका, हे काय आहे? या गुंत्यातून सुटायचंच मला. घुसमटतो जीव माझा. माझं माहेर साधं होतं, पण सुसंस्कृत होतं. आम्ही सगळी मंडळी वाचनवेडे, कलेचे भोक्ते. आई सतत मोलकरणींच्या अडचणी निवारणारी.. साधं-सुधं वातावरण.. मोकळं, स्वच्छ आणि आरपार..!’’ तेवढय़ात कार्यक्रमाची वेळ झाली म्हणून आम्ही आत गेलो. घरी परतताना सतत त्या बाईंचाच विचार येत होता. त्यांचं मत मला पूर्णपणे पटलं होतं. का म्हणून आपण एकेक गुंते वाढवत नेत असतो? का नाही वेळीच त्याचे धागे मोकळे करून टाकत? चिवट मनानं चिवट धागे गुंडाळायचा खेळ खेळायचा आणि रडीचा डाव आला की रडून घ्यायचं. खरंच असं मोकळं होता येतं? अलिप्त मनानं हे गुंते सोडवता येतात?

आमच्या परिचयाचे एक वृद्ध गृहस्थ. सून, मुलगा नोकरीवर गेल्यानंतर त्यांना नातवाला सांभाळावं लागतं. तो नातू त्याच्या वयाप्रमाणे त्यांना खूप दमवतो. आजोबा काही वेळा केविलवाणे होतात. पण नातवाला त्यांचा खूप लळा आहे. म्हणून आजोबा सगळे कष्ट विसरतात. त्याला त्यांचा लळा म्हणून सून, मुलगा कधी त्याला ठेवून आऊटिंगलाही जातात. आजोबा म्हणतात, ‘‘मी नातवाच्या प्रेमात अडकून गेलोय. हा गुंता आता सुटणारा नाही. असंच जगायचं.’’

कोण जाणे कोठूनी सावल्या आल्या पुढे

मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा।

आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे असंच घडत असतं. आणखीन एक गुंता वाढवत नेणारी, धडकी भरवणारी भावना म्हणजे, हा काय म्हणेल अन् तो काय म्हणेल? याला काय वाटेल अन् त्याला काय वाटेल, ही. आयुष्य उतरणीला लागेपर्यंत ‘लोकं काय म्हणतील’ या न्यूनगंडातून बाहेर पडता येत नाही. जे कोणी या गुंत्यातून बाहेर पडण्यात यशस्वी होतात त्यांनाही हजार वेळा मनाशी झगडा करावाच लागलेला असतो. पण किमान ते बाहेर पडतात. समाजाच्या विचारांची एक बैठक घट्ट बसवली गेलेली असते. त्यातून बाहेर पडणं येरागबाळाचं काम नाही. ती चौकट भेदून बाहेर पडून मोकळं होणं सोपं नाही.

माझ्या नात्यातल्या एक बाई, त्यांनी मुलाचं लग्न झाल्यानंतर तत्परतेनं सांगितलं, ‘‘तुझी बायको नोकरी करणारी आहे. पण तुमची मुलं मला सांभाळायला जमणार नाही. तुमची मुलं तुम्ही सांभाळा. आम्हाला यापुढे भरपूर हिंडा-फिरायचं आहे.’’ एक घाव दोन तुकडे करून त्या बाईंनी होऊ घातलेला गुंता फटकन सोडवून टाकला. त्या गुंत्यातून त्या बाहेर पडल्या खऱ्या, पण मुलापासून कायमच्या दुरावल्या, हेही एक वास्तव. एक साधण्यासाठी दुसरं मूल्य चुकवावं लागलं. जगताना येणारी ही अवघड अपरिहार्य गोष्ट.. म्हणूनच गुंत्यातून सुटण्यासाठी, त्यातून पाय मोकळा करण्यासाठी द्यावी लागणारी किंमत काही वेळा इतकी जबरदस्त असते की तो गुंत्यात अडकलेला पाय परवडला.

‘अनुराधा’ चित्रपटात डॉक्टरवरच्या प्रेमाखातर संगीताला तिलांजली देणारी अनुराधा अंतरातल्या गाण्याबाबतीत भुकेली राहाते. मन अस्वस्थ असतं. पण अखेर या तडफड करणाऱ्या गुंत्यातून बाहेर पडायचं ती ठरवते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातला केर काढून दार बंद करताना मनाचंही बंद करते.. एका अभिजात चित्रपटातला हा प्रसंग फार फार बोलका आहे. बलराज सहानी, आणि लीला नायडू या दोघांनी हा चित्रपट जिवंत केलाय..

तर, आयुष्यातले हे सगळे गुंते; काही हवेसे  वाटणारे, काही नकोसे वाटणारे. काही बोचरे, काही सुखावणारे. काही बळजबरीनं निर्माण झालेले, काही आपण मागितलेले. ते नसतील तर जगायचं कसं? त्यातून पाय मोकळा करायचा म्हणजे काय करायचं?

व्यंकटेश माडगूळकरांनी एका ठिकाणी पक्षिणीचं उदाहरण दिलंय. पक्षीण घरटं बांधताना ते बांधता बांधता त्या धाग्यात स्वत:च अडकत मरून जाते. अगदी जवळच राहाणारं एक कुटुंब. पती-पत्नी दोन मुलं आणि सासू. पूर्वी कधीतरी सासूनं वाईट वागवलं होतं म्हणून सुनेनं स्वतंत्र फ्लॅट घेतला रहायला. नवरा आईला एकटीला सोडायला तयार नव्हता. कारण नंतर आई बेडवरच होती. त्यामुळे नवऱ्यानं ठरवलं होतं आपण आईजवळ राहायचं आणि बायकोनं मुलांबरोबर वेगळं राहायचं. आईचा मृत्यू होईपर्यंत ऐन उमेदीची वर्ष नवरा-बायको वेगवेगळे राहात होते. आई गेल्यानंतर तो बायकोकडे राहायला गेला. अत्यंत सरळपणे सोडवला गेलेला हा गुंता इतका सरळ असेल का? केवढाले ताण दोघांच्या नात्यात असतील. दोघांनीही एकमेकांचे हट्ट सोडले नाहीत. सून शेवटपर्यंत सासूजवळ आली नाही आणि मुलानं शेवटपर्यंत आईला सोडलं नाही. कारण मधला कोणताही मार्ग त्यांना शक्य वाटला नव्हता. एक गुंता सोडवण्यासाठी दोघांनी अनेक वर्ष विभक्त राहण्याचा पर्याय अमलात आणला. हा एक गुंताच. यालाच जगणं म्हणतात? जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा आलेख या अशा असंख्य गुंत्यांनी बनलेला आहे. हा प्रवास रोमांचक आहे, खडबडीत असल्यानं धाडसी आहे; आव्हानात्मक आहे, परीक्षा घेणारा आहे..

हे गुंते कधी नातवाला सांभाळणाऱ्या त्या आजोबांसारखे पूर्ण स्वीकारायचे तरी नाहीतर त्या ‘मुलं नाही सांभाळणार’ म्हणणाऱ्या बाईंसारखे नाकारायचे तरी. दोन्हीचं उत्तर एकच.. पुन्हा नवीन गुंता! म्हणून या गुंत्यातून पाय मोकळे करायची इच्छाच नको धरायला. त्यातल्या त्यात नात्यांचे गुंते हे फार अवघड असतात. कधी ती ओझीही होतात आणि दु:ख देतात.

हे प्रमेय उत्तर मागतच नाही. ते सारखं सोडवतंच राहायचं. म्हणूनच सुरेश भट या गाण्यात म्हणतात,

सांगती तात्पर्य माझे सारख्या खोटय़ा दिशा

चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा

dilipoak.@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on July 13, 2019 12:11 am

Web Title: chaturang aricle by pradnya oak abn 97
Next Stories
1 घरकामाचेही व्यवस्थापन हवेच 
2 विचित्र निर्मिती : लघुकथा..
3 ‘मी’ची गोष्ट : एकाच या जन्मात..
Just Now!
X