15 January 2021

News Flash

मेजवानी

‘‘सर, आय अ‍ॅग्री बिर्याणीला जळकट वास येतोय. पण बाकीच्या पदार्थाचं काय?’’ कर्णिक. ‘‘तुमचं बरोबर आहे; पण तुम्ही पाहिलंत ना? कोणी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे का?’’..

| November 22, 2014 12:14 pm

05-blogठीक साडेबारा वाजता साहेबांच्या केबिनचे दार उघडले. मीटिंग संपली होती. युनियन-कार्यकर्ते बाहेर आले. सर्वाच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. ‘‘सो.. मि. कर्णिक, काय करायचं आता आपण?’’ साहेबांनी विचारले. ‘‘सर, आय अ‍ॅग्री बिर्याणीला जळकट वास येतोय. पण बाकीच्या पदार्थाचं काय?’’ कर्णिक. ‘‘तुमचं बरोबर आहे; पण तुम्ही पाहिलंत ना? कोणी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे का?’’..

बारा वाजून वीस मिनिटे झाली तरी नाडकर्णी साहेबांच्या केबिनमध्ये चाललेली मीटिंग संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. कामगारांमधली अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती. सगळ्यांनी कामं तर केव्हाच थांबवली होती. ज्याच्या-त्याच्या तोंडी एकच विषय होता. तावातावाने बोलणाऱ्यांचे लक्ष मात्र केबिनच्या दाराकडे होते. कधी एकदा मीटिंग संपते आणि युनियनची माणसं साहेबांच्या केबिनमधून बाहेर येतात असे सगळ्यांना झाले होते.

इतर वेळी हा ‘मेजवानी’चा दिवस असला, की सकाळपासूनच कारखान्यात उत्साहाचं वातावरण असायचं. सगळेच त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहायचे. कँटीनमध्ये निरनिराळे चविष्ट पदार्थ बनविले जायचे. मसाल्याचा खमंग दरवळ सगळीकडे पसरायचा. ऑफिस स्टाफ आणि कामगारांच्या जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या होत्या आणि त्या काटेकोरपणे पाळल्या जात. तसा नियमच होता. मेजवानीच्या दिवशी मात्र थोडी सवलत मिळत असे. त्यामुळे सायरन व्हायच्या आधीच सगळे कामगार जेवायला जायचे. आजही सकाळचा तो प्रकार घडला नसता, तर या वेळी सर्व जण कँटीनमध्ये स्वादिष्ट मेजवानीचा आस्वाद घेत असताना दिसले असते.
कंपनीचे व्यवस्थापन आणि युनियनमध्ये सुसंवाद असल्यामुळे संघर्षांचा प्रसंग क्वचितच येत असे. त्या दिवशी मात्र युनियनने आक्रमक पवित्रा घेतला होता. ऑफिसमधल्या महिला कर्मचाऱ्यांना वाटत होते की, फार ताणू नये, काही तरी सुवर्णमध्य काढावा; पण तसे बोलून
दाखवण्याचे धैर्य कुणाला झाले नाही. ठीक साडेबारा वाजता साहेबांच्या केबिनचे दार उघडले.
मीटिंग संपली होती. युनियन-कार्यकर्ते बाहेर आले. सर्वाच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. युनियन लीडर संभाजी माने आणि इतर पदाधिकारी केबिनबाहेर जाताच नाडकर्णी साहेबांनी सिगरेट पेटवली. डोळे मिटून ते खुर्चीवर मागे रेलले आणि विचार करू लागले. वातावरण कमालीचे गंभीर होते.
‘‘सो.. कर्णिक, आता काय करायचे आपण?’’ साहेबांनी चिंतायुक्त स्वरात विचारले.
‘‘सर, आय अ‍ॅग्री बिर्याणीला जळकट वास येतोय. इतर पदार्थाचं काय? व्हेजिटेबल पुलाव, कुर्मा, पॅटीस, गुलाबजाम हे पदार्थ तर व्यवस्थित आहेत ना?’’ कर्णिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
‘‘तुमचं बरोबर आहे; पण तुम्ही पाहिलंत ना? कोणी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे का?’’
‘‘साब, हमारे आदमी की गलती हुई. उसने ये जानबुझके तो नही किया ना? और मैंने आपके सामने सॉरी बोला तो भी वर्कर्स मानने को तय्यार नही और ये युनियनवाले उनको भडका रहे है साब.’’ कँटीन मॅनेजर शेट्टी काहीसा रागातच म्हणाला.
‘‘ओ. के. मला जरा विचार करू देत. कुछ ते सोल्यूशन निकालनाही चाहिये.’’ साहेबांनी चर्चेचा समारोप केला.
कर्णिक आणि शेट्टी निघून गेल्यावर साहेब पुन्हा विचारात गढून गेले. चारशे माणसांसाठी बनविलेल्या खाद्यपदार्थाचं काय करायचं, हा प्रश्न त्या क्षणी साहेबांसमोर आ वासून उभा होता. विचार करता करता त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी चट्कन फोनचा रिसिव्हर उचलला.
‘‘हॅलो, ऑपरेटर!’’
‘‘यस् सर..’’
‘‘प्लीज गेट मी ‘आधार’ अनाथालय चेंबूर. लवकर, धिस इज व्हेरी र्अजट.’’
काही क्षणातच ऑपरेटरने साहेबांना आश्रमाचा नंबर जोडून दिला.
‘‘हॅलो, आश्रमाचे व्यवस्थापक काळे का? मी नाडकर्णी बोलतोय. मुलांची जेवणं झाली का? अजून व्हायचीत? थँक गॉड.’’
साहेबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि ते सांगू लागले.

‘‘कामगार बंधूंनो!’’ युनियन लीडर मानेचा खणखणीत आवाज कानावर पडताच कामगारांचा गलका एकदम थांबला. सर्व जण लक्षपूर्वक ऐकू लागले. ‘‘आज कँटीनमध्ये जे काही घडलं त्याचा निषेध करण्यासाठी ही गेट मीटिंग बोलावण्यात आली आहे. आज ‘मेजवानी’चा दिवस. पहिल्या पाळीचे कामगार काही तरी खास मिळणार या अपेक्षेने जेवायला कँटीनमध्ये गेले; पण त्यांच्या पुढय़ात काय आलं माहीत आहे? करपलेली, जळकट वास येणारी बिर्याणी. तोंडाजवळ नेलेला घास कामगारांच्या हातातच राहीला. हा कँटीन मॅनेजरचा निष्काळजीपणा नाही काय? आणि वर अरेरावीची भाषा! अरे, कामगार म्हणजे काय जनावरं वाटली यांना पुढय़ात येईल ते निमूटपणे खायला? (शेम.. शेम.. शेम..) साहेबांकडे तक्रार घेऊन गेलो तर ते म्हणाले, पुन्हा असं होणार नाही; पण जेवणावर बहिष्कार टाकू नका. कामगारांना शांत करा. अरे, कामगार कसे शांत होतील? हा त्यांच्यावर सरळसरळ अन्याय आहे. आजकाल शांत राहून काही पदरात पडतं का? अशा वेळी आंदोलन हाच एक मार्ग असतो हे अनुभवाने आम्हाला पटलंय. मग प्रश्न बोनसचा असो, बढतीचा असो, बदलीचा असो किंवा बिर्याणीचा असो. (जोरदार टाळ्या) तेव्हा मित्रांनो, आजच्या ‘मेजवानी’वर बहिष्कार टाका. नाय पाहिजे आम्हाला असली करपट मेजवानी.’’
टाळ्यांच्या कडकडाटात भाषण संपले. तेवढय़ात एक कार्यकर्ता लीडरच्या कानात काही तरी कुजबुजला. मग युनियन लीडरने जाहीर केले, ‘‘बंधूभगिनींनो, हा बहिष्कार फक्त कँटीनमधल्या मेजवानीवर असल्यामुळे तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायला युनियनची हरकत नाही.’’ हे ऐकताच अधिक जोराने टाळ्यांचा कडकडाट झाला. पाठोपाठ ‘कामगारांच्या एकजुटीचा विजय असो’, ‘कामगार शक्ती झिंदाबाद’ अशा घोषणा देत सगळे हॉटेल विश्रांतीच्या दिशेने धावले. राइसप्लेट मिळविण्यासाठी.

नाडकर्णी साहेबांचा निरोप मिळताच कर्णिक त्यांच्या केबिनमध्ये गेले. साहेब इंटरकॉमवरून कँटीन मॅनेजरला काही सूचना देत होते. बोलणं संपल्यावर ते कर्णिकांना म्हणाले, ‘‘हा पत्ता घ्या आणि ताबडतोब निघा.’’ साहेबांकडून सर्व काही समजावून घेऊन कर्णिक उठले. दहा मिनिटांनी कंपनीची स्टेशन वॅगन कारखान्याच्या गेटबाहेर पडली आणि अनाथालयाच्या दिशेने धावू लागली.

चार-पाच तासांच्या धावपळीनंतर युनियन लीडर माने आणि त्यांचे सहकारी कारखान्याच्या आवारात असलेल्या युनियन ऑफिसमध्ये आले. आजचा बहिष्काराचा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झाला होता. एकही कामगार कँटीनकडे फिरकला नव्हता. कामगारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे युनियनची मंडळी खुशीत होती. मेजवानीकडे पाठ फिरवून कामगार बंधूंनी जी एकजूट दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार मानणं आवश्यकच होतं. एक कार्यकर्ता युनियनच्या फळ्यावर लिहू लागला.. ‘कामगार बंधूंनो, धन्यवाद..’

साहेबांनी सांगितलेले काम करून कर्णिक परत आले आणि सरळ साहेबांच्या केबिनमध्ये गेले. ‘आधार’ अनाथालयाकडून देण्यात आलेले आभाराचे पत्र त्यांनी साहेबांना दिले. त्यातील मजकूर साहेबांनी पुन्हा पुन्हा वाचला. ‘‘या पत्राची मोठय़ात मोठी झेरॉक्स कॉपी काढा आणि सगळ्यांना दिसेल अशा जागी लावा.’’ पत्र कर्णिकांना देत साहेब म्हणाले.
संध्याकाळी कारखाना सुटला तेव्हा गेटजवळ ठेवलेले दोन फलक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. युनियनच्या फळ्यावर लिहिले होते- ‘‘धन्यवाद! आजच्या मेजवानीवर बहिष्कार टाकून अपूर्व असे सहकार्य दिल्याबद्दल कामगार बंधूंना युनियनतर्फे शतश: धन्यवाद! यापुढेही असाच पाठिंबा द्यावा ही विनंती.’’
दुसऱ्या फळ्यावर लावलेल्या पत्रात पुढील मजकूर होता. ‘‘आपण पाठविलेले रुचकर पदार्थ आमच्या मुलांना खूपच आवडले. व्हेज पुलाव, पॅटिस, गुलाबजाम यांसारखे पदार्थ या निराधार मुलांना पाठवून आपण त्यांना स्वादिष्ट मेजवानीच दिलीत. त्याबद्दल ‘आधार’ अनाथालयातर्फे मन:पूर्वक धन्यवाद ! आमच्या मुलांवर सदैव कृपादृष्टी ठेवावी, ही विनंती.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2014 12:14 pm

Web Title: chaturang article blog maza
टॅग Blog Maza 2
Next Stories
1 घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
2 जोमाने नेऊ पुढे चळवळ
3 भक्कम आधार
Just Now!
X