डॉ. सरिता मोडक

drsaritamodak@gmail.com

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

वयात आल्यावर मुलांचं प्रेमात पडणं ही आता विशेष बाब राहिलेली नाही, विशेष आहे ते नातं निभावून नेणं आणि प्रतिकूल घडल्यास त्याचा परिपक्वतेने सामना करणं. त्यासाठी आवश्यकता आहे ती जीवनकौशल्यांची. स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे व आवेगांच्या आहारी न जाणे म्हणजेच भावनिक बुद्धिमता! अपयश, निराशा व विपरीत परिस्थितीतून स्वत:ला सावरून पुन्हा ध्येयप्राप्तीकरिता प्रयत्न करणे हे आहे भावनिक बुद्धिमत्तेचे कौशल्य. स्वत:बरोबरच इतरांना समजून घेणे म्हणजेच सामाजिक कौशल्य. तरुणाईला आवश्यकता आहे ती या कौशल्यांची. पालकांनी प्रयत्नपूर्वक या कौशल्याचे शिक्षण पाल्यांना देऊन नातेसंबंध बळकट करण्याचे कौशल्य शिकवायला हवे.

यंदाचा व्हेलेंटाइन डे सात दिवसांचा होता म्हणे, पहिला दिवस रोज डे, दुसरा प्रपोज डे वगैरे वगैरे. मला हसू आले, पण त्याचबरोबर नात्यांचे प्रश्न घेऊन क्लिनिकमध्ये येणारी आणि गोंधळलेली, निराश झालेली मुलेही आठवली. पूर्णपणे संभ्रमात असलेली आणि कधीकधी अगदी असहाय्य! त्यांच्याबरोबर आलेल्या (क्वचितच) पालकांची अवस्था तर विचारायलाच नको. शरमेने मान झुकलेली आणि पाल्यच नव्हे तर आपणही मोठा गुन्हा केलाय, असे चेहऱ्यावर भाव!  हे आठवून माझे हसू सुन्न झाले. घराघरातील प्रेमप्रकरणे आणि पालकांची भूमिका डोळ्यांसमोर आली. कारण पाल्यांची प्रेमप्रकरणे कशी हाताळावी हे सांगण्यापेक्षा नावे ठेवणारी, सामाजिक दबाव निर्माण करणारी, तुम्हाला पुन्हा नैराश्यामध्ये नेणारीच मंडळी आपल्या अवतीभवती अधिक असतात आणि यातूनच सुरू होतो तो खरा संघर्ष!

मी जी माणसं अनुभवते, पाहाते तेथे आजही आपल्या मुलगा वा मुलीचे प्रेमप्रकरण आहे असे कळताच अनेक पालक प्रचंड घाबरतात, तणावात येतात. आपल्या मुला-मुलींच्या आयुष्याचे कसे होणार? लोक काय म्हणतील, अशा प्रश्नांचा गुंतावळा त्यांच्या मनात निर्माण होतो. अनेकदा यातूनच त्यांच्यावर एक अदृश्य सामाजिक दबाव येतो आणि हातून काहीतरी विपरीत घडते. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळण्यापूर्वी पालकांनी खूप आधीपासूनच या संभाव्य गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.  कारण आपल्या पाल्याकडून असे काही होऊच शकत नाही, अशी त्यांची दृढ भावना असते. त्यामुळे असे काही घडताच दोषारोपण सुरू होते. पाल्यांना दोष देणे किंवा पालक म्हणून आपलेच चुकले म्हणून स्वत:ला दोष देणे सुरू होते.

मुळात पाल्यांविषयी, त्यांच्या प्रेमात पडण्याविषयी माहिती कळल्यावर मुलांना पहिल्यांदा गरज असते ही मानसिक आधाराची. हा आधार त्यांना पालकांकडून अपेक्षित असतो. मात्र अनेकदा सामाजिक दबावाने पालकच दिशा चुकतात. यामुळेच काहीवेळा टोकाला जाऊन ‘ऑनर किलिंग’सारख्या घटनाही घडतात. त्यामुळे ही प्रकरणे संयमानेच हाताळणे गरजेचे असते. मुलांच्या अशा वागण्याचा, प्रतिकूल काही घडल्यास त्यांच्यात येणाऱ्या नैराश्याच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे.

आपल्याकडे वयात आल्यानंतरची तारुण्यसुलभ भावना, त्यातलं प्रेम म्हणजे काय याची समज पौगंडावस्थेत तयार होत नाही. कारण आपल्या ‘सुसंस्कृत’ समाजात प्रेम, संबंध हे विषय वर्ज्य आहेत. त्यामुळे हे नाते विश्वास, बांधिलकी, समज, परस्पर संमती आणि सन्मानाच्या पायावर उभे असणे याची शिकवण कुठून मिळणार? मोठं होत जाताना अशा गोष्टी प्राधान्याने शिकविल्या जात नाहीत, ना कौटुंबिक पातळीवर ना सामाजिक स्तरावर किंवा त्या अधिक हिंसक, तुटलेल्या अवस्थेत दिसतात. दुसरीकडे मुले आणि पालकांमध्ये फारसा संवाद होत नाही. त्यामुळे मुलं, त्यांचे घराबाहेरील आयुष्य, सामाजिक वर्तन, मित्र-मैत्रिणींची सोबत, वैचारिक, भावनिक वाढ, त्यांचे ताणतणाव या बाबींवर घरात चर्चा कितीशा होतात? मुलांची लैंगिकतेबद्दलची समज, त्यांची निवड या गोष्टी तर आणखी दूरच्या. मुलांनी शालेय शिक्षण घ्यावे यावर सगळ्याच घटकांनी लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र त्यांच्या परिपक्वतेकडे डोळेझाक केली जाते. आई-वडील कामावर जाणाऱ्या कुटुंबात मुलांचा वाढणारा एकटेपणा, मैदानी खेळ आणि तत्सम गोष्टी आयुष्यातून हद्दपार झाल्याने मिळणारा फावला वेळ ड्रग्ज, पोर्नोग्राफी, सोशल मीडिया अशा फुक्या दुनियेत व्यतीत करून ‘स्व’ची भलतीच प्रतिमा तयार करणाऱ्या तरुण पिढीसोबत गांभीर्याने काम करण्याची गरज खरच आहे. बोट दाखवेल ती महागडी वस्तू वेळेच्या बदल्यात देणाऱ्या आई-वडिलांनी आपण आपल्या पाल्याचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहोत हे समजून घेतले पाहिजे.

अशा प्रकरणांचा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली ती दिव्या (नाव बदललेले) आणि तिच्यासोबत आलेली तिची आई. दिव्या एका प्रसिद्ध शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. तिची दहावीची परीक्षा दोन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेली. प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या होत्या, पण शाळेतील प्रिलिम्स्मध्ये ती नापास झाल्याचे तिच्या आईला कळलं. दरम्यान, दिव्या शाळेत जायचेही टाळत होती. वडील नोकरीनिमित्त परगावी राहात असत. ते खूप शिस्तीचे व कडक होते. शाळेतून बोलावणे आल्यानंतर बऱ्याच प्रयत्नांती दिव्याने खरी गोष्ट आईला सांगितली. वर्गातील एका मुलाबरोबर तिची मैत्री होती. शिक्षकांनी नको त्या अवस्थेत त्या दोघांना शाळेत पकडले होते. प्राचार्यानी दोघांनाही दमदाटी केली. वडील गावात नसल्यामुळे आई एकटीच शाळेत प्राचार्याना भेटून आली. या सर्व प्रकारामुळे दिव्याने शाळेत जाणेच बंद केले होते. अपराधीपणाच्या भावनेने ती ग्रासली गेली, अबोल झाली. वडिलांना कळले तर ते काय करतील या कल्पनेने मायलेकी खूपच घाबरल्या होत्या. त्यासाठी त्या समुपदेशनासाठी माझ्याकडे आल्या. इथे मी दिव्याच्या आईचं कौतुक करेन. मला वाटतं, अशा अनेक घटना अजाणत्या वयात घडत असतात. पण योग्य वेळी योग्य सल्ला मिळणंही आवश्यक होतं. दिव्याला तिची चूक उमगली. त्याचबरोबर यातून बाहेर येऊन आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकली. डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याकरिता ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून आयुष्याला दिशा द्यायला हवी, याचे भान तिला आले. या साऱ्या प्रवासात तिच्या आईने तिला न डिवचता भक्कम आधार दिला म्हणूनच दिव्या या प्रकरणातून बाहेर पडू शकली.

बरेचदा आपली मुले/मुली घराबाहेर काय करतात, कुठे जातात आणि त्यांची मैत्री कुणाशी आहे हे सुद्धा आई-वडिलांना माहिती नसते. कधी कधी ते माहिती करणे कठीण असते. पण मुलांच्या गोष्टींकडे पालकांचे बारीक लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या मैत्रिणीचा पंधरा वर्षांचा मुलगा आनंद. हसरा व खोडकर स्वभावाचा. अभ्यासात हुशार व नम्रही. आजकाल फार चिडचिडा झाला आहे. कमी बोलतो, उदास असतो आणि कसला तरी विचार करीत असतो, अभ्यासात त्याचे लक्ष लागत नाही, असे ती मला सांगत होती. तो समजूतदार आहे, पण त्याच्या वागण्यात झालेल्या या बदलामुळे ती चिंतित झाली आणि त्याला घेऊन माझ्याकडे आली. त्याच्याशी बोलून मी त्याचा विश्वास संपादन केला. अभ्यासाचा ताण आहे का ते जाणून घेतले. तसे काहीच नसल्याचे त्याने कबूल केले. हळूहळू तो मोकळा झाला. त्याने सांगितले की शिकवणी वर्गातील एक मुलगी त्याला खूप आवडते आणि त्याचे तिच्यावर प्रेम आहे. तिचेच विचार मनात सतत असतात, पण ती तसेच काहीच दर्शवित नव्हती. त्याचे मात्र अभ्यासातून मन उडाले होते. परिस्थिती बिकट नसली तरी नाजूक जरूर होती आणि बिकट होण्याची शक्यता दाट होती. मन मोकळे करायला एक विश्वासू व्यक्ती भेटल्यामुळे व सर्व मोकळेपणाने सांगता आल्यामुळे आदित्यला हलके वाटले. समुपदेशनातील विविध तंत्राचा योग्य पद्धतीने उपयोग करून त्याला यातून सुलभपणे बाहेर येण्यास मदत करता आली. पण प्रत्येक वेळी असे घडतेच असे नाही. आपली मुले-मुली बाहेर काय करतात, कुठे जातात आणि कुणाशी त्यांची मैत्री आहे हे माहिती ठेवणे सोपे नसते, पण पाल्यांच्या बारीक हालचालींकडे, मोबाइलच्या वापराकडे व त्यातील माहितीकडे पालकांनी लक्ष ठेवायला हवे. तंत्रज्ञानाच्या युगात या उपकरणांचा गैरवापर करण्याचा मोह लहानांना नव्हे तर मोठय़ांना देखील होतो. त्यामुळे मन भरकटते. यासाठी पालकांशी मुलांचा निखळ व मनमोकळा संवाद आवश्यक आहे. ‘अ‍ॅथॅरिटेटिव’ आणि ‘परमिसिव’ या दोन्ही पालकत्व शैलींचा सुयोग्य मेळ घालणे आवश्यक आहे.

माझ्या मैत्रिणीच्या १२ वर्षांच्या मुलाने जेव्हा सांगितले की, त्याचे त्याच्या वर्गातल्या मुलीवर प्रेम आहे तेव्हा ती दचकली. या वयात प्रेम? पण ती लगेच सावरली. एक आई म्हणून एक स्वच्छ दृष्टिकोन तयार करायचे तिने ठरविले. वय, त्यावेळचं प्रेम, या वयातील इतर आव्हाने याची कल्पना तिने त्याला दिली. तिने मुलाला स्वत:हून त्या मुलीशी बोलावयास सांगितले. काही काळाने ती दोघंही छान मित्र-मैत्रीण झाले. पण प्रत्येक वेळेला आईवडील असा स्वच्छ दृष्टिकोन ठेवू शकतील का? ठेवायला हवा. कारण त्यामुळे मुलांच्या मनातसुद्धा प्रेम याबद्दल स्वच्छ दृष्टी राहील. परवाच एका लग्नात पूर्ण वेळ थांबावे लागले.  तेव्हा मला एका पाचवीत असलेल्या मुलाच्या आणि तिसरीत असलेल्या मुलीच्या वर्तनाचे सहज निरीक्षण करण्याची संधी मिळाली. दोघेही लग्नातच प्रथम भेटले होते. दोघांच्याही आया नटण्या-मुरडण्यात मग्न होत्या. या दोघाही मुलांचे वागणे अगदी दोन मोठय़ा आणि प्रेमात असलेल्या युवांसारखे होते. बोलणे, शारीरिक हावभाव, एकमेकांशी त्याचे संभाषण, लहान मुलांपेक्षा मोठय़ांचेच अधिक वाटत होते. मला हे बघत असताना हसू आले. पण असे का, या प्रश्नाचे उत्तरही मला लगेच मिळाले. आजूबाजूला जे सतत घडत असते, दृक्श्राव्य माध्यमातून ऐकायला मिळते, त्याचे नकळत अनुकरण ही मुले करीत होती. त्यात त्यांचे काही चुकले असे नाही. बाह्य़ वातावरणाचा परिणाम होणे हे अटळ आहे. पण घरातच मोकळा सुसंवाद पालक आणि बालकांमध्ये असेल तर यातून निष्पन्न मात्र नक्कीच चांगले निघेल.

बऱ्याचदा पाल्यांच्या प्रेमाबद्दल (प्रकरण मी म्हणणार नाही कारण तो शब्द योग्य वाटत नाही) किंवा नात्याबद्दल कळल्यावर पालकांची प्रतिक्रिया राग आणि दोषारोपाची असते. त्यातून अविश्वास व फसविल्याचे आरोप लावले जातात. त्यामुळे नात्यातला सांधा जुळण्याऐवजी अधिक खिळखिळा होतो. या नाजूक क्षणी पालकांनी प्रगल्भतेने परिस्थिती हाताळायला हवी. मुलामुलींना तरुण वयात एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे किंवा प्रेमात पडणे ही घटना नैसर्गिक आहे. त्यातून मोबाइल व कॉम्प्युटरच्या युगात एकमेकांशी सतत संवाद साधणे (कुणाच्याही नकळत) सहज शक्य होते. त्यातून प्रेम, आकर्षण या सर्व भावनांना खतपाणी मिळते. या भावनांचे प्रकटीकरण योग्य तऱ्हेने होणे व नातेसंबंध योग्य तऱ्हेने हाताळता येणे तरुणाईला नेहमीच शक्य होते असे नाही. काहीवेळा प्रेमातील अपयश किंवा नकार पचविणे अशक्य होते. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते आणि त्यामुळे आत्महत्या किंवा समोरच्या व्यक्तीला हानी पोहोचविणे अशा दुर्दैवी घटना घडतात. काय चुकते, कुणाचे चुकते या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा ही परिस्थिती योग्य पद्धतीने पालकांनी व तरुणांनी कशी हाताळावी आणि त्याकरिता व्यक्तिमत्त्वात कोणता बदल करावा, याचा विचार करणे गरजेचे आहे.

सामंजस्य, सुसंवाद व पाल्यांचे म्हणणे ऐकून घेणे ही पालकांसाठी त्रिसूत्री आहे. आजच्या काळातील पालकत्व हे खरोखरच आव्हानात्मक आहे मात्र ते पेलावेच लागणार आहे. त्याकरिता स्वत:ला बदलणे हेच योग्य ठरेल. त्यासाठी पालकांनी स्वत:ला कणखर करणे गरजेचे आहे. कारण कठीण परिस्थितीत जर भावनिक व मानसिक आधार पाल्यांना मिळाला तर बऱ्याच समस्या हाताळल्या जाऊ शकतात. आजकाल तरुणांना प्रत्येक गोष्ट मला हवीच, असे वाटते. पालकांमध्ये सुद्धा पाल्यांची प्रत्येक गरज पुरविण्याची जणू चढाओढ दिसून येते. ‘नकार’ ही कल्पना सहन होत नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या निराशेला हाताळता येत नाही आणि त्यातूनच आक्रमक वर्तनाचा उगम होतो. मित्र-मैत्रिणींचा प्रभाव व त्यांनी आपल्याला त्यांच्यात सामावून घ्यावे याकरिता ते म्हणतील तसं वागायला तरुणाई तयार असते आणि यातूनच विपरीत कृती घडते. आयुष्यातील वेगवेगळया परिस्थितीला तोंड देणे, योग्य-अयोग्यातील फरक समजणे तसेच स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे. ती बौध्दिक गुणवत्ता, ती क्षमता मानवाला जन्मजात असते, पण भावनिक बुद्धिमत्तेचा विकास जाणीवपूर्वक करावा लागतो, करता येतो.

स्वत:बद्दल माहिती व ओळख म्हणजेच स्वत:चे विचार, भावना, वर्तनाची माहिती आणि जाणीव असणे. स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे व आवेगांच्या आहारी न जाणे म्हणजेच भावनिक बुद्धिमता. अपयश, निराशा व विपरीत परिस्थितीतून स्वत:ला सावरून पुन्हा ध्येयप्राप्तीकरिता प्रयत्न करणे हे सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेचे कौशल्य आहे. स्वत:बरोबरच इतरांना समजून घेणे म्हणजेच सामाजिक कौशल्य. ही सुद्धा भावनिकदृष्टय़ा बुद्धिमान असलेल्या व्यक्तीचे लक्षण आहे. तरुणाईला आवश्यकता आहे ती या कौशल्यांची. पालकांनी प्रयत्न करून या कौशल्याचे शिक्षण पाल्यांना द्यायला हवे.

जागतिक आरोग्य संघटनेने जीवनकौशल्याचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. जीवनातील चांगल्या-वाईट प्रसंगांना, आव्हानांना विचलित न होता सामोरे जाण्याकरिता ही कौशल्ये कामी येतात. जीवनातील अनुभव व त्यातून येणाऱ्या शहाणपणातून या कौशल्याचा विकास तर होतोच, पण स्वत:हून जाणीवपूर्वकसुद्धा या कौशल्यांना आत्मसात केले तर नक्कीच जीवनाची गुणवत्ता वाढेल व त्यातून अधिक समाधान प्राप्त होईल हे नक्की.

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळण्यात आले. या भयावह घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. अशा घटनांमधून पालकांनी मानसिकदृष्टय़ा बाहेर निघणे अशक्यच. जिवंत असूनही ते एक सांगाडा होऊन जगतात. अशा घटनांनंतर सरकार त्यांना आर्थिक मदत करेल, गुन्हेगाराला फासावरही लटकवेल, पण पीडितांच्या पालकांना मानसिक आधार देणारी समुपदेशनाची यंत्रणा नाही ही खंत आहे. शहरात काही ठिकाणी समुपदेशनाच्या सोयी आहेत. मात्र अशा घटना या शहरातच घडतात असे मुळीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात किमान तालुक्यांच्या ठिकाणी तरी सरकारने समुपदेशनाची केंद्रे उघडणे काळाची गरज आहे. ज्यामुळे पालक आणि पीडितांनाही या केंद्रांमध्ये जाऊन उपचार घेता येईल. यातून किमान त्यांचे मानसिक स्वास्थ्य बळकट करता येईल. याची दुसरी बाजू म्हणजे समुपदेशनाला जाणे किंवा मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्याला समाज वेडय़ात काढतो. सर्वदूर पसरलेला हा दृष्टिकोन आज बदलण्याची गरज आहे. पाल्यांच्या हातून चुका झाल्या, कुणाच्या परिवारात अनुचित प्रकार घडला म्हणजे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असे मुळीच नाही. त्यांना समुपदेशनातून बळ मिळेलच, पण समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे आवश्यक आहे.

(लेखिका नागपूर येथील वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ आणि सल्लागार आहेत.)